नाहीतर, कदाचित मी क्रिकेटपटू म्हणून यशस्वी होऊच शकलो नसतो!
ग्रंथनामा - झलक
संजय मांजरेकर
  • ‘इम्पर्फेक्ट’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 19 April 2019
  • ग्रंथनामा झलक इम्पर्फेक्ट Imperfect संजय मांजरेकर Sanjay Manjrekar

प्रसिद्ध क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांच्या मूळ इंग्रजी आत्मचरित्राचा मराठी अनुवाद ‘इम्पर्फेक्ट’ या मूळ नावानेच प्रकाशित झाला आहे. पत्रकार मीना कर्णिक यांनी हा अनुवाद केला असून तो अक्षर प्रकाशनातर्फे नुकताच प्रकाशित झाला आहे. या पुस्तकाविषयी मांजरेकर यांनी लिहिले आहे - “हे पुस्तक माझ्याविषयी आहे. माझ्या क्रिकेटच्या कारकीर्दीविषयी, माझ्या आयुष्याविषयी. माझं यश आणि अपयश याविषयी. माझं सामर्थ्य आणि माझी दुर्बलता याविषयी. प्रत्येक व्यक्ती एक आगळं आयुष्य जगत असते. प्रत्येकाच्या जगण्याच्या या कहाण्या नेहमीच रंजक असतात. कोणीही माणूस निरर्थक आयुष्य जगत नाही. एक खेळाडू म्हणून माझ्या कारकीर्दीपासून तरुण, नवोदित खेळाडूंनी काही धडे घ्यावेत असंही मला वाटतं. एक बाप आपल्या मुलाला म्हणाला होता त्याप्रमाणे, ‘माझ्या आयुष्यात मी वीस चुका केल्या; तू नवीन वीस चुका कर.’

या पुस्तकातील ‘माझे वडील’ या प्रकरणाचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

खरं सांगायचं तर, माझ्या वडिलांशी त्या अर्थाने माझं फार नातं कधी जुळलंच नाही. त्यांच्याविषयी माझ्या मनात पराकोटीची भीती होती. आज, मी स्वत: दोन मुलांचा बाप असताना, वयाची पन्नाशी गाठल्यानंतर हे बोलणं सोपं आहे. पण लहान असताना, वाढत्या वयात आणि अगदी तरुणपणीही मी माझ्या वडिलांना प्रचंड घाबरायचो. ही वस्तुस्थिती माझ्या मनाने केव्हाच स्वीकारलेली आहे.

विजय लक्ष्मण मांजरेकर. भारतासाठी ते ५३ कसोटी सामने खेळले. ३९.१२च्या सरासरीने त्यांनी ३२०८ धावा केल्या. निवृत्तीनंतर मात्र त्यांचं सगळंच बिनसलं. त्यामुळे त्यांच्या तीन मुलांना वैफल्यग्रस्त, त्रासिक आणि रागावलेले वडीलच पहायला मिळाले.

आणि तरीही, अनेकदा ते खूप गहन आणि गंभीर असं काहीतरी सांगून जायचे. आमच्या गप्पा फार झालेल्या मला आठवत नाही, पण जेव्हा कधी ते माझ्याशी बोलत तेव्हा सांगत, ‘क्रिकेटकडे एक खेळ म्हणून पहा, तो आयुष्याचा एक भाग आहे, संपूर्ण आयुष्य नाही.’ आपल्या स्वत:च्या अनुभवातून ते असं बोलायचे हे उघड आहे. क्रिकेट म्हणजे त्यांचं संपूर्ण जग होतं हे आम्हाला, त्यांच्या कुटुंबाला दिसत होतं. त्यामुळे क्रिकेटच्या पलीकडचं आयुष्य जगण्याची तयारीच त्यांनी केलेली नव्हती. दुर्दैवाने, या खेळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त दहा किंवा पंधरा वर्षं तुमच्या कारकिर्दीच्या शिखरावर राहू शकता. ही कारकीर्दही तुम्ही ऐन उमेदीत, म्हणजे फार तर पस्तिशीत असताना संपुष्टात येते. माझ्या वडिलांकडे दुसरं कोणतंही कसब नव्हतं. आयुष्यातलं क्रिकेट संपल्यानंतर काही ना काही करण्याची त्यांनी खूप धडपड केली. अगदी क्रिकेटच्या जगात काहीतरी करावं म्हणूनही केली.

क्रिकेटपटू म्हणून माझ्या वडिलांना खूप आदर आणि लोकप्रियता मिळालेली होती. त्यामुळे क्रिकेटनंतरचं आयुष्य त्यांच्यासाठी कठीणच गेलं असणार. आता एका सरकारी कंपनीमध्ये त्यांना नऊ ते पाचची नोकरी करावी लागणार होती. पण त्यांचा पिंड हा एका कलाकाराचा होता. एखाद्या नामवंत गिटार वाजवणाऱ्याला टेबलवर बसवून क्लार्कचं काम करायला सांगण्यासारखंच होतं हे. त्यांनी प्रयत्न केला, पण ते काम त्यांना जमणारं नव्हतं.

एका टप्प्यावर त्यांनी क्रिकेटचं प्रशिक्षण देण्याचंही ठरवलं. पण तरुण क्रिकेटपटूंना हाताळण्याची कला त्यांच्यापाशी नव्हती. त्यांच्याविषयी एक गोष्ट ऐकून आहे. भारताचा माजी सलामीवीर चेतन चौहान एकदा त्यांच्याकडे सल्ला मागायला गेला. ‘सर, माझ्या फलंदाजीमध्ये काय चूक होतेय?’ त्याने विचारलं. माझे वडील त्याला म्हणाले, ‘तुझी काहीच चूक नाहीये. चूक आहे ती तुझी निवड करणाऱ्या निवड समितीच्या सदस्यांची!’

प्रशिक्षण देण्याचे त्यांचे प्रयत्न एक दिवस अकस्मात थांबले. भारताच्या १९ वर्षाखालील संघाचे ते कोच आणि मॅनेजर होते. इंग्लंडच्या दौऱ्यात त्यांनी एका खेळाडूच्या थोबाडीत मारली. हा खेळाडू माझ्या वडिलांना चांगला ओळखायचा. त्याने काहीच हरकत घेतली नाही, पण प्रसारमाध्यमं ही घटना अशी कशी सोडून देतील? आपण आता प्रसिद्ध राहिलेलो नाही आणि क्रिकेटपटू म्हणून एका जमान्यात आपल्याला जो आदर होता तसा मिळवण्यासाठी क्रिकेटच्या पलीकडे आपल्यापाशी कोणतंही कसब नाही या विचाराने ते स्वत:शीच चडफडायचे.

अर्थात, हे सगळं मला जाणवलं ते खूप नंतर. लहान असताना मात्र बदलणारे त्यांचे मूड्स आणि त्यांचा राग याचा सगळा ताण आम्हाला भोगावा लागत असे. आम्हाला म्हणजे, मी, माझी आई आणि माझ्या दोन बहिणींना. घरात होणार्‍या भांडणांच्या छायेखाली आम्ही वावरायचो. अनेकदा शेजार्‍यांना ऐकू जाऊ नये म्हणून अशा वेळी आम्ही धावत खिडक्या बंद करायला जायचो. काही वेळा हे वाद हिंसकही होत.

कधी कधी त्यांचा संताप रस्त्यावरही निघायचा. गाडी चालवणार्‍या इतर चालकांबरोबर त्यांची अनेकदा मारामारी व्हायची. आणि मारामारी म्हणजे, अक्षरश: खरीखुरी मारामारी. इंग्लंडमध्ये आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स मिळालेलं आहे याचा त्यांना खूप अभिमान होता. भारतीय रस्त्यांवरचे बेशिस्त ड्रायव्हर्स त्यांना सहन व्हायचे नाहीत. आणखी एका गोष्टीचा त्यांना प्रचंड राग येत असे. त्यांच्या मागे असलेल्या गाड्यांच्या हेडलाईट्सचे प्रखर बीम्स त्यांना संताप आणत. गाडी चालवताना बाहेरच्या आरशात पडणारं हे प्रकाशाचं प्रतिबिंब थेट त्यांच्या डोळ्यात जायचं. हे असं काही घडलं की गाडीतल्या आम्हा सगळ्यांच्या मनात धडकी भरायची. कारण आता पुढे काय होणार याची चांगलीच कल्पना आम्हाला असायची. ते मग खिडकीतून हात बाहेर काढून जोरजोराने मागच्या ड्रायव्हरला बीम कमी करण्याची सूचना देऊ लागत. दरम्यान आमची प्रार्थना सुरू झालेली असायची, ‘बाबा रे, प्लीज ते सांगताहेत तसं कर, प्लीज, कर.’ बहुतेक प्रार्थना काम करत नाहीत, तशीच हीसुद्धा. मग एका क्षणी माझे वडील त्या ड्रायव्हरला ओव्हरटेक करायला देत. तो पुढे गेला की ते आपला वेग वाढवून आपलं ओरडणं त्याला ऐकू येईल इतक्या जवळ जात. आणि मग मराठीतल्या अत्यंत निवडक आणि शेलक्या शिव्यांची लाखोली वहात. काही ड्रायव्हर घाबरून वेगाने पुढे निघून जात, पण बरेचदा त्यांना प्रत्युत्तर करणार्‍यांचीही कमी नसायची. तसं घडलं की मग मात्र काही खरं नसे.

माझे वडील गाडी थांबवत. बाहेर पडत आणि गाडीतून क्रूक लॉक काढत. हे उपकरण त्यांनी इंग्लंडहून आणलेलं होतं. भक्‍कम लोखंडाने बनलेलं, चार फूट लांब आणि दोन्ही बाजूला छत्रीसारख्या हूकची हँडल्स त्याला होती. त्यातलं एक टोक स्टिअरिंग व्हीलमध्ये अडकवायचं आणि दुसरं गाडीचा क्‍लच किंवा ब्रेक किंवा अ‍ॅक्सिलरेटर यापैकी एका पेडलमध्ये. गाडी चोरीला जाऊ नये म्हणून बनवलेलं हे उपकरण माझ्या वडिलांच्या गाडीच्या सुरक्षिततेसाठी फार वापरलंच गेलं नाही. त्याऐवजी, ते गाडीत पडून रहायचं आणि दुसऱ्या माणसाला दुखापत करायची असली की बाहेर यायचं.

सुदैवाने, या क्रूक लॉकने माझ्या वडिलांनी कधी कोणाला गंभीर जखमी केलं नाही कारण भांडण सुरू झालं की आसपासच्या माणसांची गर्दी जमायची. त्यामुळे धक्काबुक्की किंवा एखादा ठोसा मारण्यावर सगळं निभावत असे. काही वेळा माझी आई किंवा माझ्या बहिणी गाडीतून बाहेर पडून त्यांना शांत करायचा प्रयत्न करत, त्यांना आणून गाडीत बसवायला पहात. पण रागावलेल्या माणसामध्ये शारीरिक ताकदही जास्त असते, त्यामुळे बहुतेक वेळा त्यांचे प्रयत्न अपयशीच व्हायचे.

आपल्या वागण्याचा आपल्या कुटुंबियांवर काय परिणाम होतोय याचा जराही विचार माझ्या वडिलांच्या मनात यायचा नाही. परिणामी, ते आमच्या बरोबर असले की आमच्या मनात सतत भीती आणि टेन्शन असे. लहान असताना त्यांची गाडी आमच्या घरात शिरताना ऐकली आणि त्यानंतर जोराने दरवाजा आपटल्याचा आवाज आला आणि दारावरची बेल वाजली की मी धावत पलंगावर उडी मारायचो आणि झोपल्याचं सोंग घ्यायचो. ते निघून गेल्यानंतरच मी जागा होत असे.

पण त्यांच्या बाजूने विचार केला, तर मुंबईच्या ट्रॅफिकचा असा त्रास होणारे ते काही एकटेच नाहीत. त्यांच्यासारखाच आणि अनेक मुंबईकरांसारखाच मीसुद्धा शहरातल्या ट्रॅफिकवर संतापत असतो. त्यावर न चिडणं खरंच कठीण आहे. एकदा, माझंही डोकं भडकलं आणि रागाने मी गाडीतून कधी बाहेर पडलो, एका टॅक्सी ड्रायव्हरची कॉलर कधी पकडली हे माझं मलाच कळलं नाही. का माहीत नाही, पण त्या क्षणी माझं लक्ष गाडीकडे गेलं आणि माझ्या बायकोचा आणि त्यावेळी सहा वर्षांचं वय असलेल्या माझ्या मुलीचा भेदरलेला चेहरा माझ्या नजरेला पडला. आणि एका झटक्यात त्यांच्या जागी माझ्या वडिलांच्या गाडीत बसलेली माझी आई आणि घाबरलेला मीच मला दिसलो. झपाट्याने माझ्या रागाचा पारा खाली आला आणि मी त्या माणसाची कॉलर सोडून दिली.

या घटनेला चौदा वर्षं झाली. त्या दिवसापासून मी कधीही माझा असा ताबा जाऊ दिलेला नाही. शारीरिक मारामारी करण्याचा माझ्या आयुष्यातला तो एकमेव प्रसंग आहे.

माझे वडील कधी कधी खूप भावनिकही होत. आपल्या कुटुंबावरचं प्रेम दाखवायला त्यांना जड जायचं नाही. आमच्यासाठी ते भेटी आणत, आम्हाला फ्लोरा रेस्टॉरन्टमध्ये चायनीज जेवायला नेत. त्यांच्यात अनेक उणीवा असतील, पण माझ्या आईशी असलेली बांधिलकी आणि निष्ठा त्यांनी कायम जोपासली. कितीही आव्हानात्मक प्रसंग असो, ते ठामपणे आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिले. ते अतिशय उदारही होते. त्यांच्या ड्रॉवरमध्ये रुमालाच्या टोकाला गुंडाळून ठेवलेले सुटे पैसे असत. अडीअडचणीला लागले तर, म्हणून असावेत ते. मला आठवतंय, एकदा बराच काळ त्यांना हॉस्पिटलमध्ये रहावं लागलं होतं तेव्हा मी तिथूनच पैसे उचलेले आहेत. शाळेच्या कँटिनमध्ये मिळणार्‍या हॉटडॉगसाठी. एरवी मला तो हॉटडॉग कुठून परवडायला! हॉस्पिटलमधून ते घरी परतले आणि आपली नाणी जागेवर नाहीत हे त्यांच्या लक्षात आलं. तू घेतलेस का पैसे, त्यांनी मला विचारलं. मी हो म्हटलं. कशासाठी हा त्यांचा पुढचा प्रश्न होता. मी त्यांना खरं कारण सांगून टाकलं. एका शब्दानेही ते मला काही बोलले नाहीत.

पण असे हळुवार क्षण खूप कमी असत. आम्हाला त्यांचा रागीट स्वभाव अधिक अनुभवायला मिळायचा. माझ्या बहिणी शुभा आणि अंजली आणि मी, आम्ही तिन्ही भावंडं उत्तम प्रकारे मोठी झालो. आज आम्ही तिघेही पालक बनलेलो आहोत. पण तरीही खोलवर झालेल्या लहानपणातल्या त्या जखमा अजूनही पूर्णपणे पुसल्या गेलेल्या नाहीत. परक्या लोकांच्या लक्षात येणार नाही, आमची दैनंदिन कामं नेहमीसारखीच चालू असतात, पण आमच्या एकमेकांच्या स्वभावातल्या काही गोष्टींमधून आमचं आम्हाला ते जाणवतं. बहुदा माझ्या बॅटिंगमध्ये त्याचं प्रतिबिंब पडलं असावं. माझ्या खेळाच्या निरीक्षकांना मी अती सावध खेळायचो असं वाटत असे. माझ्या खेळात अधिक मोकळेपणा येऊ शकतो असं त्यांचं मत होतं. कदाचित त्यांचं म्हणणं बरोबर असेल. कदाचित मी ज्या प्रकारे मोठा झालो त्यामुळे मी तसा खेळत असेन.

क्रिकेटपटू म्हणून माझ्या वडिलांच्या लौकिकाचं ओझं माझ्यावर आलं असं अनेकदा मला सांगण्यात आलंय. मांजरेकर या नावाचा वारसा पुढे चालवणं हे सोपं असणारच नव्हतं आणि त्यामुळे दोघांमधल्या तुलनेचा परिणाम माझ्यावर होणं अपरिहार्य होतं असंही अनेकांचं मत आहे. पण क्रिकेटपटू म्हणून मी माझ्या वडिलांना फार कमी पाहिलंय. माझ्या आडनावाचं ओझं मला कधीही जाणवलेलं नाही. त्यांचं व्यक्तिमत्त्व इतकं दडपून टाकणारं होतं की, क्रिकेटपटू म्हणून ते कसे होते हे मला फारसं आठवतच नाहीये. खेळावर निस्सिम प्रेम करणारा माणूस एवढीच माझी क्रिकेटपटू म्हणून त्यांच्याबद्दलची सर्वात प्रबळ आठवण आहे. शिवाय तोपर्यंत ते क्रिकेटमधून निवृत्त झालेले होते. आणि शिवाजी पार्कला निवृत्तीनंतरचं टिपिकल क्रिकेट खेळू लागले होते. त्यांचं वजन वाढलेलं होतं, ते फिट नव्हते पण मला आठवतात कायम अंगावर असलेले त्यांचे ते पांढरेशुभ्र कपडे. क्रिकेटपटू म्हणून ते किती महान होते याची जाणीव मला व्हायला खूप वेळ जावा लागला. ते बॅटिंग करत तेव्हा मी कधी त्यांना बघायला गेलो नाही. माझे वडील क्रिकेट खेळतात एवढंच मला माहीत होतं आणि आज मला त्यांच्याविषयी खोलात जाऊन विचारलं जातं, तेव्हा ते क्रिकेटपटू होते एवढंच मी सांगू शकतो.

लोकांना त्यांच्याविषयी एवढा आदर का वाटतो हे समजून घेण्याइतका मी मोठा झालो आणि आपले वडील क्रिकेटपटू म्हणून खूप खास असणार हे माझ्या लक्षात आलं. अनेकदा माझी ओळख, विजय मांजरेकर यांचा मुलगा अशी करून दिली जायची. त्यांचा मुलगा असणं हेही काहीतरी विशेष होतं हे मला तोपर्यंत कळायला लागलं होतं. क्रिकेटमधला त्यांचा रेकॉर्ड बघितला तर तुम्ही त्यांचं नाव सर्वोत्कृष्ट भारतीय बॅटस्मनच्या यादीत घेणार नाही. पण त्यांचे संघातले माजी सहकारी आणि त्यांच्या काळातले क्रिकेटपटू त्यांची तोंडभरून प्रशंसा करत असतात. मी तुझ्या वडिलांच्या बॅटिंगची पूजा करायचो असं, एरापल्ली प्रसन्ना मला जितक्या वेळा भेटतात तितक्या वेळा सांगतात. आणि मी केवळ विजय मांजरेकर यांचा मुलगा आहे म्हणून ते तसं बोलत नाहीत याची मला पूर्ण कल्पना आहे. मी बोलिंग टाकलेला सर्वोत्कृष्ट बॅटस्मन म्हणजे विजय मांजरेकर होते असं विधान त्यांनी अनेक व्यासपिठांवरून केलेलं आहे. मन्सूर अली खान पतौडी यांच्यासारख्या स्पष्टवक्त्या माणसाने माझे वडील म्हणजे त्यांनी बघितलेला सर्वांत उत्तम बॅटस्मन होता असं म्हटलंय.

माझ्या वडिलांचे सहकारी मला सांगत की त्यांच्यापाशी प्रचंड विनोदबुद्धी आणि हजरजबाबीपणा होता. मुंबई क्रिकेटच्या वर्तुळात विजय मांजरेकरांचे किस्से प्रसिद्ध होते. (एकदा प्रतिस्पर्धी संघातल्या एका खेळाडूने, मी बॅट बदलू का असं विचारलं होतं. त्यावर त्यांचं उत्तर होतं, ‘जरुर. आणि त्याबरोबरच तुझी बॅटिंग बदलता आली तर प्रयत्न कर.’)

यातले अधिक मजेशीर किस्से छापता न येण्याजोगे आहेत. त्यांचा मुलगा म्हणून हे किस्से नवोदित खेळाडूंना ऐकवायला मला खूप आवडतं. प्रत्येक वेळी ते सांगताना, माझे वडील व्यक्‍ती म्हणून कसे होते हे मला अधिकाधिक समजत जातं. आणि तुलनेने मी त्यांच्यापेक्षा किती वेगळा आहे, हेही जाणवतं. ते खास शिवाजी पार्कमध्ये वाढलेले फटकळ, खोडकर क्रिकेटपटू होते. महाराष्ट्रातल्या बोर्डी नावाच्या गावातल्या बोर्डिंग शाळेतून पळून आलेले. तिथेही त्यांच्या पालकांनी या मुलाला घरी आवरणं शक्य होत नाही म्हणून बोर्डिंग स्कूलमध्ये घातलं होतं. मी माझ्या आईवर गेलोय. रेखा तिचं नाव. ती अत्यंत मृदू स्वभावाची होती. आणि टापटिपपणाची तिला प्रचंड आवड. माझ्या वडिलांनी त्यांचा एखादा खास विनोद केला की ती कोऱ्या चेहऱ्याने त्यांच्याकडे बघायची. खेळाकडे पाहण्याची त्यांची वृत्ती मात्र माझ्यापेक्षा अधिक चांगली असावी. प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध लागणारा खडुसपणा त्यांच्यापाशी होता. आणि ते माझ्यापेक्षा जास्त चतुर होते. मी बहुदा त्यांच्यापेक्षा अधिक संवेदनशील होतो. कदाचित हा माझा सर्वात मोठा कमकुवतपणा म्हणायला हवा- बाह्य घटकांबाबत मी खूप संवेदनशील होतो.

महत्त्वाचं म्हणजे माझ्या क्रिकेटच्या बाबतीत माझ्या वडिलांनी कधीही ढवळाढवळ केली नाही. उलट, त्याविषयी ते अनभिज्ञच होते. बिचारे आपल्याच अडचणींमध्ये इतके गुरफटलेले होते की, माझ्याविषयी विचार करायला त्यांच्यापाशी वेळच नव्हता. माझ्या पांढऱ्या कपड्यांमधून मी घराबाहेर पडताना त्यांनी क्वचितच मला कुठल्या सामन्यासाठी निघालायस असा प्रश्न केलेला आहे. कधी त्यांनी असा प्रश्न केलाच तर तो सामना म्हणजे माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाचा सामना बनून जायचा. एका परीने माझ्या क्रिकेटमध्ये फार रस दाखवला नाही यासाठी मला त्यांचे आभारच मानायला हवेत. नाहीतर, कदाचित मी क्रिकेटपटू म्हणून यशस्वी होऊच शकलो नसतो.

मला आठवतंय, एक दिवस ते अचानक मला म्हणाले, ‘आज मी तुझ्याबरोबर नेट्समध्ये येतोय. आणि थोडी बॅटिंगही करेन म्हणतोय.’ मला एकदम धक्काच बसला. माझ्या मित्रांबरोबर माझ्या नेट्समध्ये ते आहेत हा विचारच मला सहन होत नव्हता. मी जरा आक्रसूनच गेलो. वाटलं, आपल्या आयुष्यातला हा सर्वांत नकोसा अनुभव ठरणार. दुसरं म्हणजे मैदानापर्यंतचा प्रवास एकाच गाडीतून त्यांच्याबरोबर करायचा हा विचारही मला त्रासदायक वाटत होता. म्हणून मग मी लहान मुलं जे करतात तेच केलं- थेट पळूनच गेलो.

त्यांना सापडू नये म्हणून प्रॅक्टिसची वेळ झाली तशी मी नाहीसा झालो. आमच्या घराच्या गच्चीवर मी बरेच तास लपून राहिलो होतो. शेवटी काळोख पडला, रात्र झाली तेव्हा मी त्यांच्यासमोर आलो. आश्चर्य म्हणजे त्यांनी ही गोष्ट अजिबातच वाढवली नाही. कुठे हरवला होतास, नेट्समध्ये जायचं म्हणून मी तुला शोधत होतो, एवढंच काय ते मला म्हणाले. मी गप्प राहिलो. योग्य कारण नसतानाही प्रॅक्टिस बुडवण्याचा माझ्या आयुष्यातला तो एकमेव प्रसंग.

आज या प्रसंगाकडे मागे वळून पाहताना माझ्या लक्षात येतंय की मी जरा जास्तच रिअ‍ॅक्ट झालो होतो. आपण मूर्खपणा केला असं आता मला वाटतं. अगदी त्या दिवशीसुद्धा मला त्यांच्यासाठी वाईट वाटलं होतं. नेट्समध्ये आपल्या मुलाबरोबर क्रिकेट खेळावं अशी एक लहानशी इच्छा त्यांनी व्यक्‍त केली होती. तो आनंदही मी त्यांना मिळू दिला नाही. पण माझं वय तेव्हा केवळ सोळा होतं, आणि त्यावेळी माझ्या वडिलांविषयीच्या माझ्या भावनाही तशा होत्या.

एका गोष्टीसाठी मात्र मी कायम त्यांचा ऋणी असेन. मी एक दिवस कसोटी खेळाडू बनणार आहे ही श्रद्धा त्यांनी माझ्यामध्ये निर्माण केली. अतिशय लहान वयात तो आत्मविश्वास माझ्यात आला नसता तर भारतासाठी खेळायचं म्हणून मी इतक्या निष्ठेने प्रयत्न केलेच नसते. कॉलेजमध्ये, अकरावीत असताना माझ्या वर्गातल्या एका मुलाने मोठं होऊन कोण होणार असं मला विचारलं होतं. मी म्हटलं, ‘क्रिकेटपटू.’ ‘आणि ते नाही जमलं तर?’ या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. या शक्यतेचा मी विचारही केलेला नव्हता. आपण व्यावसायिक क्रिकेटपटू बनणार आणि तेच आपलं कमाईचं साधन असणार असा आंधळा विश्वास मला होता. आणि त्याचं खूप मोठं कारण माझे वडील होते.

.............................................................................................................................................

‘इम्पर्फेक्ट’  या क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4805/Imperfect

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 12 December 2019

मीना कर्णिक,

आयशप्पत तुम्हांस मी मुग्धा कर्णिक समजलो आणि मोदीविरोधी गोटात सामील केलं. त्याबद्दल क्षमा असावी!

आपला नम्र,
-गामा पैलवान


Gamma Pailvan

Sat , 20 April 2019

नमस्कार मीना कर्णिक. जो काही त्रोटक परिचय वाचला त्यावरून आत्मचरित्र रंजक आहे असं दिसतंय. भाषा ओघवती आहे. अनुवादाबद्दल धन्यवाद. तुम्ही मोदींच्या मागे लागणं सोडा आणि अनुवादादि कार्यांवर लक्ष द्या, ही विनंती. मराठी भाषेचा फायदा होईल. मोदींच्या मागे लागून कुणाचाही कसलाही फायदा झाला नाहीये. त्यांना त्यांचं काम करू द्या, तुम्ही तुमचं करा. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......