‘मयासुरवध’ अर्थात भाऊबीज
ग्रंथनामा - आगामी
महेश केळुसकर
  • ‘दशावतार’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Sat , 13 April 2019
  • ग्रंथनामा आगामी दशावतार Dashawatar महेश केळुसकर Mahesh Keluskar

कवी, पत्रकार डॉ. महेश केळुसकर यांचं ‘दशावतार’ हे पुस्तक रविवारी समारंभपूर्वक प्रकाशित होत आहे. या पुस्तकात दशावताराचे मूळ, प्रयोगढाचा, प्रत्यक्ष प्रयोग निरीक्षणे, दशावताराची भाषा, कलाकारांची व कलेची जीवनमूल्ये, दशावतार आणि यक्षगान यांमधील साम्य व भेदयांच्या ऊहापोहासोबत आडदशावताराचीही चर्चा केलेली आहे. हे पुस्तक अनघा प्रकाशन, ठाणे तर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

‘मयासुरवध’ हे दशावतारी नाटक करणारी ‘श्री कलेश्वर दशावतारी नाट्य मंडळी’ १९८५ साली बाबी कलिंगण यांनी स्थापन केलेली असून दरवर्षी ही मंडळी सुमारे २०० खेळ करते. ह्या मंडळीत एकूण १६ जण असून बाबी कलिंगण आणि त्यांचे तीन मुलगे - सुधीर, बाळ व बबन, हे एकाच घरातील आहेत. सावळाराम नेरूरकर हे सुमारे ६५ वर्षांचे गृहस्थ सर्वांत वृद्ध असून बाबी कलिंगण त्यांना आपले ‘दशावतारातील गुरू’ मानतात. मात्र मंडळीत ते एक नट म्हणूनच नोकरीला आहेत.

सुमारे ५५ वर्षे वयाचे बाबी कलिंगण गेली ३० वर्षे दशावतारात कामे करीत आहेत. पार्सेकर मंडळीत त्यांनी पहिल्यांदा तोंडाला रंग लावला. त्यांच्या घराण्यात ह्यापूर्वी कोणीही दशावतारात काम केलेले नाही. बाबी ह्यांनी ऋद्धी-सिद्धी ही कामे पहिल्यांदा केली. ‘ललितप्रभा’ हा त्यांचा पहिला स्त्रीपार्ट. ‘संगीत चंडवर्मा’ असे त्या आख्यानाचे नाव होते आणि बाबी नालंग ह्यांनी राजाची भूमिका केली होती एवढेच त्यांना आता आठवते.

इयत्ता दुसरी एवढेच शिक्षण झालेल्या बाबी कलिंगण यांनी सगळी कथानके श्रुतिपरंपरेने मिळवलेली असून पार्सेकर, वालावलकर, मोचेमाडकर या कंपन्यांमध्ये राहून आपण अभिनय व इतर विद्या शिकलो असे ते सांगतात. देव, राक्षस, राजा, राणी, शेतकरी, महार, ब्राह्मण भटजी, वेडा अशा विविध भूमिका त्यांनी गेल्या ३० वर्षांत केलेल्या असून शंकर आणि मारुती या त्यांच्या सर्वांत आवडीच्या भूमिका आहेत. (एकदा वेंगुर्ल्यात खेळ पाहत असताना बॅ. नाथ पै ह्यांना बाबी कलिंगण यांची शंकराची भूमिका इतकी आवडली की, त्यांनी त्या भूमिकेतले त्यांचे छायाचित्र स्वत: काढले व नंतर भेट म्हणून दिले. ते छायाचित्र कलिंगण यांच्या नेरूर इथल्या राहत्या घरी प्रस्तुत अभ्यासकाने पाहिले आहे.) बाबी यांना अभिनयाप्रमाणेच इतर कला अवगत असून तबला आणि हार्मोनियम ते स्वत: वाजवू शकतात. खरा नट अष्टपैलू असावा लागतो असे त्यांचे मत आहे.

१९८३ पर्यंत ते इतर मंडळ्यात काम करत होते. १९८३ ते १९८५ पर्यंत त्यांनी ‘खानोलकर दशावतारी मंडळी’ स्वत: चालवली आणि नंतर १९८५ मध्ये स्वत:ची मंडळी काढली. दरवर्षी नेरूर इथल्या कलेश्वराच्या मंदिरासमोर वसुबारशी दिवशी, (आश्विन कृ. ११) आपला शुभारंभाचा पहिला खेळ ही मंडळी सादर करते आणि मग त्यांचा दौरा सुरू होतो. पूर्वी ‘पौराणिक’ कथानकांवर आपला भर असायचा. पण बदलत्या परिस्थितीत प्रेक्षकांच्या आवडीनुसार ‘काल्पनिक’ कथानके लावावी लागतात, असे त्यांनी सांगितले.

तीस वर्षांपूर्वी चार आणे रोजावर बाबी कलिंगण यांनी दशावतारात काम सुरू केले. त्यानंतर एक रुपया रोजी पगारावर काही काळ काढला. ‘पगारी नट’ म्हणून नाईक-मोचेमाडकर यांच्या मंडळीत १९८३ साली त्यांनी ३० रुपये (रोज) हा शेवटचा पगार घेतला. आज त्यांच्याकडे स्वत:चे वाहन (टेम्पो) आहे. प्रत्येक ‘पार्ट्या’ला ते जेवणासह ५० ते

९० रुपयांपर्यंत एका रात्रीची बिदागी देतात. खेळाच्या आयोजकांकडून त्यांना प्रत्येक खेळाची ८०० ते १००० रुपयांपर्यंत बिदागी मिळते. काही ठिकाणी जेवणाची सोयही केली जाते. याचाच अर्थ वर्षाला सुमारे दीड ते दोन लाखांचा व्यवसाय ही दशावतारी मंडळी करते.

‘मयासुरवध’ हा खेळ रात्री १ वाजून ४५ मिनिटांनी सुरू झाला आणि सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी संपला. म्हणजे सुमारे साडेचार तास हे नाटक चालले होते. या अवधीत ‘मध्यंतर’ नव्हते. या खेळातील नट आपापली रंगभूषा व वेशभूषा देवळामागच्या एका मांगरवजा खोलीत स्वत:च करत असताना प्रस्तुत अभ्यासकाने पाहिले. आपले काम झाल्यावर पुन्हा प्रवेश येईपर्यंत नटमंडळी ह्या खोलीत येऊन डुलक्या घेत होती. त्यांचा पुन्हा प्रवेश येण्याआधी त्यांना कोणी उठवत नव्हता.

विशिष्ट वाद्यध्वनी ऐकून जो तो स्वत:च पुन्हा उठत होता व आपले काम करून येऊन पुन्हा झोपत होता. या झोपण्याच्या कालावधीत त्यांची रंगभूषा आणि वेशभूषा ह्यात फरक पडत नव्हता हे विशेष. अधूनमधून नटमंडळी चहा पीत होती आणि बिड्या ओढीत होती.

व्यक्तिरेखाविकास आणि अभिनय

‘मयासुरवध’ या प्रयोगातील व्यक्तिरेखा आपल्या अंगभूत गुणदोषांनी उभ्या करण्यात नट यशस्वी होतात. संहिता नसताना नट आपापली व्यक्तिरेखा कल्पनेने विकसित करत नेतात. प्रायोगिक नाटकाच्या परिभाषेत ज्याला ’ ‘Improvise’ करणे म्हणतात, त्या पद्धतीने हा विकास होतो. आपली व्यक्तिरेखा आपणच उभी करायची, त्यात विविध रंग भरायचे, ‘बेअरिंग’ सांभाळायचे, हे नटांचे कौशल्य लक्षणीय म्हटले पाहिजे. मयासुर, भीम, द्रौपदी, सुभद्रा, कृष्ण, नारद ह्या यातील प्रमुख व्यक्तिरेखा. त्या कशा साकार केल्या जातात ते आता पाहू :

मयासुर : हा असुर आहे. पण तो सांगतो की मी ‘जन्माने माणूस आणि कृत्याने राक्षस’ आहे. लोककलांच्या प्रयोगात राक्षस किंवा देव मानवी पातळीवर ‘लोका’त उतरतात ते असे. ‘माणसाचा देव किंवा राक्षस त्याच्या कर्मांमुळे होतो’, हे भारतीय तत्त्वज्ञानातील सनातन सूत्र येथे अभिप्रेत आहे.

हा राक्षस प्रजाहितदक्ष आहे. तो असुरांचा राजा आहे. गजान्त लक्ष्मीचे राज्य त्याच्या पायाशी लोळण घेतेय. पण धनदौलत मिळूनही ‘विद्याधन’ त्याच्यापाशी नाही, म्हणून तो खंत प्रकट करतो. तो नि:स्वार्थी असल्याची आणि प्रजेचे कल्याण करण्याची त्याला तळमळ असल्याची ग्वाही त्याचा प्रधान देतो. त्यामुळे राज्यात त्याचा उदोउदो चाललाय. कुळाचे नाव आणि घराण्याची प्रतिष्ठा राखण्यासाठी तो सिद्ध आहे. राक्षस आणि देवांच्या वैराचा इतिहास तो कथन करतो. देवांनी राक्षसांवर अन्याय केल्याने तो सूडाने पेटलेला आहे. देवांवर सूड उगवण्यासाठी कैलासाच्या पायथ्याशी जाऊन शंभुमहादेवाची भक्ती करून वर मिळवण्याचा त्याचा संकल्प आहे.

शंभुमहादेव हा देवांचा देव. पण मयासुर राक्षस असूनही त्याची भक्ती करू इच्छितो. याचे कारण महादेव हा ‘लोकदेव’ आहे. विघ्नहर्ते देव हे प्रारंभी ‘विघ्नकर्ते’ होते. यासंबंधी डॉ. तारा भवाळकर यांनी केलेल्या विवेचनाचा सारांश असा : देव कल्पनेचा उगम भीतीतून झाला. निसर्गातील प्रतिकूल उग्रभागाने लोकमानसातून देवतेचे उग्र रूप धारण केले. लोकांनी त्याचे व्यक्तीकरण केले. उग्रदेवांच्या कोपाची आदिमानवाला सतत भीती वाटायची. तेव्हा ‘दुर्जन प्रथमं वन्दे’ या न्यायाने त्याने देवांना प्रसन्न करणे सुरू केले. सगळ्यात भीती रुद्राची कारण तो प्रलयंकर.

त्याच्याच गणातला गणपती, विनायक - हे आदिम अवस्थेतले विघ्ननिर्माते देव. मग पूजा, भक्ती करून रुद्राचा ‘शिव’ झाला. तो देवांचा देव जसा आहे, तसाच मयासुरासारख्या राक्षसांचाही देव आहे. कारण तो लोकांचा देव आहे.

मयासुर स्वभावाने उतावीळ आहे. नारदाने सुंदर स्त्रियांचे वर्णन केल्यावर त्यांच्या प्राप्तीसाठी तो अधीर होतो. पण तो विषयासक्त नाही. द्रौपदी व सुभद्रेला पळवून तो पाताळात नेतो. पण त्यांची अब्रू लुटण्यापेक्षा त्याचा मूळ हेतू आहे तो कृष्णाला दृश्यरूपात-सगुणरूपात-पाहण्याचा. कृष्णाचा वध करून त्याला सूड घ्यायचाय. पण कृष्णाच्या हाताने मरण आले, तरी ते त्याला हवे आहे.

मयासुराचे हे व्यामिश्र स्वभावदर्शन त्यांची भूमिका करणारा नट ताकदीने घडवतो. राक्षस असूनही आपला अभिनय तो मानवी पातळीवर आणतो. पण ‘राक्षस’ म्हणून त्याचे जे एक वेगळे व्यक्तित्व आहे. ते आवाजाची पट्टी कधीकधी वर लावून, राग आला की थयथयाट करून, युद्धप्रसंगी क्रूर हालचाली करून तो उभे करतो. त्याच्या अभिनयाची जात Loud म्हणजे ‘भडक’ आहे. पण हे Loud Acting तो हेतुत: करतो. पारंपरिक प्रेक्षकाच्या मनात राक्षसाची जी एक ‘प्रतिमा’ असते, तिला न्याय देण्याचा तो प्रामाणिकपणे प्रयत्न करतो.

भीम : पंचपांडवातील द्वितीय बंधू भीम हे या आख्यानातील दुसरे प्रमुख पात्र. मयासुर खलनायक तर भीम ‘नायक’ (Hero) आहे. स्वपराक्रमाविषयी त्याला सार्थ अभिमान आहे. या आख्यानात तो धर्माच्या अनुपस्थितीत राज्य सांभाळतो आहे. तो म्हणतो, ‘‘प्रत्येक जण माझ्या आज्ञेनुसार कर्तव्य करतो आहे. कारण प्रत्येकाला माझा पराक्रम माहिती आहे-माझा दरारा माहीत आहे.’’ पण तो गर्विष्ठही आहे. मयासुराला तो आव्हान देतो पण त्याच्याकडून लढाईत पराभूत होतो. भीमाचा स्वभावही उतावळा आणि भावनाशील आहे. त्याच्या भावनांचा प्रक्षोभ केव्हाही, कसाही होतो. तो भोळा आहे. तरीही बुद्धिमान आहे. त्याचे कृतज्ञ मन श्रीकृष्णाचे अनंत उपकार स्मरते आणि कृष्णाला काहीतरी वस्तुरूपाने तो देऊ इच्छितो. नामदेवाचा भोळा भक्तिभाव भीमाच्या ठिकाणी आहे. पण आपणच देवाचे आवडते भक्त असावे अशी त्याची इच्छा आहे. तो वीर आहे तसा गृहस्थही आहे. आणि म्हणून त्याच्या सव्य कराचे मांस देण्याचे ब्राह्मणाला दिलेले वचन द्रौपदीस तो पूर्ण करण्यास सांगतो. कारण ब्राह्मण हा त्याचा अतिथी म्हणून आलेला आहे.

आणि अतिथीला विन्मुख परत पाठवू नये हा गृहस्थाश्रमाचा संकेत भीमाला पाळावयाचा आहे. अतिमानुष शक्तीचा भीम येथे लोकांना आपल्यातला वाटतो. ह्या आख्यानात भीम विनोदी शैलीत आविष्कृत होतो. स्वत:च्या खादाडपणावर, स्त्रियांच्या भित्रेपणावर, जागोजागी अनेक गोष्टींवर तो विनोद करतो. महाभारतातील भीमापेक्षा हा वेगळा भीम आहे, तो लोकांचा भीम आहे.

ह्या प्रयोगात धिप्पाड शरीरयष्टी लाभलेला, भरदार आवाजाचा नट भीमाची भूमिका करतो. हाही Loud Acting करतो. पण तरीही तो आपले व्यक्तित्व मंचावर प्रस्थापित करतो. आपली बुद्धिमानता, वीरत्व, विनोद बुद्धी तो अशा रीतीने आविष्कृत करतो की प्रेक्षकांना तो त्यांचा भीम वाटावा. आवाजातील वेगवेगळ्या पातळ्या आणि आरोह-अवरोह याविषयीचे त्याचे ज्ञान कसलेल्या रंगकर्मीचे किंवा आकाशवाणी कलावंताचे वाटावे असे.

कृष्ण : प्रस्तुत प्रयोगातील कृष्णाची व्यक्तिरेखा सर्वव्यापी आहे. तो आपल्या दहा अवतारांचे प्रयोजन सांगतो. आणि आपण आठवा अवतार असल्याचे म्हणतो. तो अवतार असला तरी लोकमानसातील कृष्ण होऊन मंचावर मानवीय पातळीवर वावरतो. मात्र त्याचवेळी अधूनमधून चमत्कार करून आपल्या भोवतीचे अद्भुत वलय कायम ठेवतो. एकाचवेळी अलौकिक व लौकिक रूपात दृश्यमान होणारी ही व्यक्तिरेखा नटाच्या चतुरस्त्र अभिनयक्षमतेची कसोटी पाहणारी, पण प्रस्तुत नट तिला उतरतो.

भक्तवत्सल अशा या कृष्णाने आपल्या भक्तासाठी-अंब ऋषीसाठी गर्भवास सोसून अवतार घेतले आहेत. येथेही तो आपल्या भक्तांच्या-भीम, द्रौपदी, सुभद्रा यांच्या रक्षणासाठी धावून येतो. रावण किंवा मयासुर यांच्यासारखे असुरही त्यांचे भक्त आहेत. पण विरोधीभक्त. ते दुष्ट आहेत म्हणून कृष्ण त्यांचा तिरस्कार करत नाही; तर ते तसे का झाले असावेत याची कारणमीमांसा करतो. तो एक नि:पक्ष गुणग्राहक आहे. आपल्या रामावताराची कथा सांगताना तो रावणाचे गुणवर्णन करतो. रावण हा किती श्रेष्ठ वीर होता, त्याने रामाला राजशिष्टाई कशी शिकवली हे सांगून त्याचा पराभव का झाला याचीही कारणमीमांसा करतो.

पृथ्वीला वाचवणारा, भक्ताला अढळपद देणारा, बळीचा नाश करणारा असा हा कृष्ण एकाच वेळी पितृभक्त आणि मातृभक्तही आहे. परशुराम अवतारात त्याचा हा ‘पुत्रधर्म’ दिसतो. रामावतारात तो एकवचनी, एकबाणी व एकपत्नी असून आदर्श निर्माण करणारा आहे. त्याच्या प्रत्येक कृतीला कारण आहे आणि त्यामागे भारतीय तत्त्वज्ञानाची बैठक आहे. प्रस्तुत प्रयोगात आपल्या अलौकिक रूपात उभा राहणारा असा हा कृष्ण एका प्रेक्षकाने दिलेले दोन रुपयांचे पारितोषिक गाणे थांबवून मध्येच स्वीकारतो, त्या प्रेक्षकाचे आभार मानतो आणि पुढे गाणे सुरू करतो. येथे तो लौकिक पातळीवर उतरतो. देव असूनही देवत्वाची ‘पोझ’ न घेणारा असा हा कृष्ण लोकरंगभूमीवरच पाहणे शक्य होते.

कृष्णाची भूमिका करणारा नट उच्चशिक्षित असूनही ह्या प्रयोगात भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रदीर्घ भाषण अस्खलितपणे बोलतो. हा अनुभव त्याने श्रुतिपरंपरेतून मिळवलेला. संयत अभिनय ही या व्यक्तिरेखेची मागणी. नट ती पुरी करतो. ‘प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे बेअरिंग’ तो सांभाळतो.

तत्त्वज्ञानात्मक बोलतानाची धीमी संवादलय, मयासुराशी लढाईपूर्वी वीरश्रीयुक्त जलद होते. त्याचा मूकाभिनय, मुद्राभिनय, नृत्यप्रसंगीचा पदन्यास हे सारेच रंजक तरीही धर्मश्रद्धेतून अंत:स्फूर्तीने उमललेले सहज स्वाभाविक.

नारद : ‘मयासुरवध’मधील नारद आपल्या पारंपरिक कळलाव्या प्रतिमेत मंचावर अवतरतो. त्याच्या संवादांना विनोदाची झालर आहे. आपल्या त्रिलोकातील संचाराविषयी तो वारंवार उल्लेख करतो. त्याची स्वभावपारख उत्तम आहे. भीमाचा स्वभाव, मयासुराची प्रकृती, कृष्णाची मानसिकता, द्रौपदी व सुभद्रा यांच्या भावभावनांविषयी त्याला अचूक जाण आहे. त्या अनुषंगाने भाष्ये करीत तो आपले ‘नियत कार्य’ चोख बजावतो. आपल्या प्रत्येक निर्गमनाच्या वेळी तो प्रेक्षकांना हाकारतो आणि आपल्याबरोबर ‘पुढे काय होते’ ते पाहायला नेतो.

नारदाची भूमिका करणारा नट सात्त्विक मुद्रेचा, चपळ हालचाली असलेला आहे. त्याची संवादफेक सुविद्य वाटावी अशी. अभिनयाची जात संयत-ऋषीमुनींना शोभावी अशी.

द्रौपदी : सौदर्य, पावित्र्य, मंगलता या गुणांची पूजा करणार्‍या द्रौपदीचे गदाधरावर-भीमावर-प्रेम आहे. ती पतिव्रता आहे आणि आपल्या पातिव्रत्याचा तिला अभिमान आहे. आपल्या मानसबंधू कृष्णावरही तिचे अनन्यसाधारण प्रेम आहे. आपल्या हाकेला तो ओ देणारच याविषयी तिला जबरदस्त आत्मविश्वास आहे, म्हणून ती संकटात डगमगत नाही. एक नि:शंक भक्त, जिद्दी स्त्री, आदर्श गृहिणी म्हणून तिची प्रतिमा उभी राहते. अशी ही महाभारतकालीन द्रौपदी जेव्हा नर्म विनोद करते, पतीच्या-भीमाच्या-परोक्ष त्याचे गुणवर्णन करीत असताना अचानक तो आल्यावर स्त्रीसुलभ मोहक लाजते तेव्हा प्रेक्षकांना आपल्याच घरातील एक स्त्री वाटते. हे तिचे ‘लोकमय’ होणे उल्लेखनीय. अतिथीचा सन्मान करणारी, अतिथीला दिलेल्या वचनपूर्तीसाठी विलक्षण सत्त्वपरीक्षेस सिद्ध होणारी, पतिप्रेम की वचनपूर्ती या द्वंद्वात सापडलेली... तरीही अतुलनीय मनोबल असलेली व्यक्तिरेखा म्हणून मंचावरील आपले अस्तित्व सतेज करते.

द्रौपदीची भूमिका करणारा नट पुरुष. मुद्रेवर स्त्रीसुलभ कोमलता. नेत्राभिनय, हस्ताभिनय, मान वेळावणे, मुरका मारणे, नाजूक पदन्यास, मानसिक द्वंद्वाचे दर्शन दाखविणे या सर्वच बाबतीत हा नट द्रौपदीस न्याय देतो. त्याची अभिनयशैली स्त्रित्व साकार करणारी. ‘खेळता नेटके दशावतारी... परी अवघे धटिंगण...’ हे रामदासांचे वचन (दासबोध ६-८-११) आपल्या बाबतीत तरी लागू होणार नाही, असा असा स्त्रीसुलभ आविष्कार हा नट करतो.

सुभद्रा : येथे एक भोळी तरीही धीट स्त्री म्हणून सुभद्रा उभी राहते. ती पतिव्रता आहे. धनुर्धारी पार्थावर तिचे निस्सीम प्रेम आहे. परपुरुषाशी बोलण्याचा तिचा स्वभाव नाही. पण वेळ येताच मयासुराला ती वाक्ताडन करते. कृष्ण हा तिचा भाऊ. त्याच्यावरही तिचे प्रेम आहे. पण कृष्णाकडे फक्त आपला ‘भाऊ’ एवढ्याच दृष्टीने ती पाहते. त्याचे विश्वरूप तिला दिसत नाही. मानवी स्वार्थी मनाचे, अज्ञानमूलक मायेचे ती प्रतिनिधित्व करते. तिच्यापाशी विनोदबुद्धीही आहे. यामुळेच ती ‘लोकां’शी सुसंवाद साधते. सुभद्रेची भूमिकाही पुरुषनटच करतो. हा थोडासा स्थूल; तरीही धटिंगण वाटू नये असा. आपल्या शरीरयष्टीतील वैगुण्य तो प्रभावी मुद्राभिनयाने, वाचिक कौशल्याने झाकून टाकतो. सुभद्रेची ‘रूपवान’ प्रतिमा लाभलेली त्याची मुद्रा विलक्षण भाववाही.

इतर व्यक्तिरेखा : आडदशावतारातील भटजी, संकासुर, विष्णू आणि मुख्य कथानकातील ब्राह्मण, प्रधान या अन्य काही व्यक्तिरेखा. आपापल्या पारंपरिक भूमिका नट चोख बजावतात. संकासुराच्या मालवणी बोलीमुळे आणि विनोदामुळे तो लोकांना अगदी आपलाच वाटतो. सुरुवातीला येणारा भट हा तमाशातील सोंगाड्याप्रमाणे वर्तमान परिस्थितीवर औपरोधिक भेदक भाष्य करतो. तर शेवटी येणारा ब्राह्मण लोकविदूषकाच्या भूमिकेतून विनोद करत कृष्णाचे लोकरूप दाखवणारा.

सूत्रधार : या सर्व व्यक्तिरेखांचा विकास स्वाभाविकपणे होत असला तरी सूत्रधार अर्थात ‘नायक’ (नाईक) तेथे उपस्थित आहे. प्रेक्षकांच्या वतीने तो सगळी सूत्रे हलवितो, पात्रांचे आगम-निर्गम, विशिष्ट प्रसंगी द्यावयाचे संगीत, रंगमंचावरील हालचाली आणि आपले प्रेक्षक या सर्वांवर त्याचे प्रत्यक्ष लक्ष आहे. संकासुराशी किंवा भटाशी संवाद साधताना तो लोकांच्या मनातील प्रश्न त्यांना विचारतो, आणि औत्सुक्य वाढवीत नेत कथासूत्र पुढे नेतो. संगीताची त्याला जाण आहे. त्या त्या प्रसंगाला पोषक असे संगीत तो देतो. तो मंचावर असूनही नसल्यासारखा आणि प्रत्यक्ष कृतिशील नसूनही असल्यासारखा. म्हणूनच तो सूत्रधार आहे. सामान्यत: सूत्रधार हा हार्मोनियम वाजवणारा असतो पण या प्रयोगात झांज वाजवणारे रामचंद्र कलिंगण सूत्रधार म्हणून यशस्वी काम करतात.

रंगभूषा - वेशभूषा 

प्रस्तुत प्रयोगातील पात्रांची रंगभूषा आणि वेशभूषा भारतीय परंपरेतील वाटते. ‘प्रेक्षकसापेक्ष दर्शनीयता’ हा तिचा विशेष असला तरी ती ‘स्वधर्म’ सोडत नाही. छबक, लाली, नारिंगी, पिवळी, काजळ, झिगी हे नैसर्गिक रंग रंगभूषेसाठी वापरलेले दिसले. द्रौपदी व सुभद्रेने वापरलेली हलक्या रंगाची लिपस्टिक एवढेच काय ते आधुनिक प्रसाधन. वेशभूषेतील रंगसंगती आणि स्त्रीप्रावरणाचा पोत व जात परंपरा सांभाळणारी. आडदशावतारातील गणपती, ऋद्धी पारंपरिक वेशात येतात. गणपती मुखवटा घालून येतो. नंतर गळ्यात जानवे असलेला उघडाबंब भटजी येतो. तो तांबड्या रंगाचा मुकटा नेसलेला आहे, खांद्यावर उपरणे आहे. त्याच्या उजव्या हातामध्ये तांब्या आणि डाव्या हातामध्ये काठी आहे. तोंडावर काळ्या रंगाचा बुरखा घेऊन संपूर्ण काळ्या पोशाखात संकासुर प्रवेश करतो. त्याच्या हातामध्ये पीळ घातलेला रुमाल आहे.

तो गोल फिरवत तो प्रवेश करतो. कपाळाला भस्म आहे. काळ्या बुरख्याला डोळ्यांच्या जागी आणि तोंडाच्या जागी मोठी छिद्रे आहेत. त्यामुळे त्याला दिसते व बोलता येते. तोंडाच्या जागेतून लालभडक रंगाची कपड्याची जीभ लोंबते. बुरख्याच्या मागच्या बाजूला हातभर लांब शेंडीही लोंबते आहे.

आता मुख्य कथानकातील पात्रांची रंगभूषा, वेशभूषा व केशभूषा याविषयीची निरीक्षणे :

मयासुर : याने असुरांच्या राजाला शोभतील असे भरजरी कपडे घातले आहेत. मस्तकावर मुकुट आहे. कमरेला तलवार आहे.

भीम : वेशभूषा भरजरी आहे. मस्तकावर मुकुट आहे. खांद्यावर गदा.

नारद : वेश पारंपरिक आहे. दुटांगी धोतर, खांद्यावर शेला. गळ्यात आणि दोन्ही बाहूंवर फुलांच्या माळा आहेत. दंडावर भस्माचे पट्टे आहेत. कपाळी गंधटिळा. एका हातात वीणा, दुसर्‍या हातात चिपळ्या. लांब शेंडी ठेवलेला तुळतुळीत गोटा ही त्याची केशभूषा आहे.

द्रौपदी : नऊवारी भरजरी लुगडे, फुगीर बाह्यांचा पोलका असा वेश. कपाळावर आडवी कुंकवाची चिरी. कानात कुडी, नाकात नथ, गळ्यात मंगळसूत्र, हातात कंकणे असे स्त्री-अलंकार, अंबाड्यावर फुलांचे चक्कर.

सुभद्रा : हिची रंगभूषा व वेशभूषा द्रौपदीप्रमाणेच आहे.

कृष्ण : देववेश धारण केलेला. गळ्यात व बाहूंवर फुलांच्या माळा आहेत. पीतांबर नेसलेला. मनगटावरही फुलांचे गजरे बांधलेले. त्वचेला व मुखावर निळ्या रंगाचा लेप. चार हातांचा. चारही हातात शंख, चक्र, पद्म, गदा ही आयुधे. डोकीवर मुकुट व त्यात मोरपीस.

वृद्ध ब्राह्मण : आडवा पंचा नेसलेला. वरती उघडाबंब. गळ्यात जानवे. डोक्याला पागोटे. गळ्यात रुद्राक्षमाळा. ह्या रंगभूषेत पारंपरिकता सांभाळलेली दिसते. लोकमानसात महाभारतकालीन देव, दानव, स्त्रियांच्या ज्या प्रतिमा आहेत त्यांच्याशी सुसंगत अशी ही रंग-वेशभूषा आहे.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4801/Dashawatar

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......