कॉ. शरद् पाटील कोणत्याही एका अंगानं समजून घेता येत नाहीत. ते अनेक अंगांनी समजून घ्यावे लागतात.
संकीर्ण - श्रद्धांजली
गणेश निकुंभ
  • कॉ. शरद् पाटील (जन्म - १७ सप्टेंबर १९२५ मृत्यू - १२ एप्रिल २०१४)
  • Fri , 12 April 2019
  • संकीर्ण श्रद्धांजली कॉ. शरद् पाटील Sharad Patil बाबरी मशिद Babri Masjid राममंदिर Ram Mandir भाजप BJP काँग्रेस Congress डावे Left बाबासाहेब आंबेडकर Babasaheb Ambedkar बुद्ध Buddha बौद्ध धम्म Buddha Dhamma सत्यशोधक समाजवादी पक्ष Satyashodhak Communist Party

प्राच्यविद्या संशोधक, ‘माफुआ’कार, ‘सौत्रांतीक मार्क्सवाद’कार कॉम्रेड शरद् पाटील यांचा आज पाचवा स्मृतिदिन. त्यानिमित्तानं त्यांच्या काही आठवणी सांगणारा हा विशेष लेख...

.............................................................................................................................................

१.

१९८५ साली मी धुळ्यात शेतकी महाविद्यालयात शिकायला आलो, तेव्हापासून कॉ. शरद् पाटील यांना भेटावं, त्यांच्याशी ओळख करून घ्यावी, गप्पा माराव्या, चर्चा करावी असं वाटत होतं. त्यातूनच त्यांचं लिखाण वाचू लागलो. समजत नव्हतं, अक्षरक्ष: डोक्यावरून जात होतं. तरीही पुन:पुन्हा वाचत होतो. हे मी का करत होतो? त्याला एकमेव कारण होतं. आणि ते म्हणजे त्यांचं ‘पाटील’ असणं. एक ‘पाटील’ आंबेडकर सांगतो याचंच मला फार अप्रूप वाटायचं.

मी ज्या समाजात जन्मलो तो पूर्वाश्रमीचा महार समाज. धर्मांतरानं १९५६ सालानंतर बौद्ध झाला तरी समाजाकडे पाहण्याचा तथाकथित उच्चवर्णीय सवर्णांचा दृष्टिकोन कसा आहे हे सांगायची गरज नाही. माझा जन्म, बालपण शहादा तालुक्यातील भिरुड या लहानशा गावात गेलं असल्यानं जातीव्यवस्थेचे अनुभव बालपणीच कोरले गेले. सवर्णांच्या दारात काय पण ओट्यालाही हात लावायची, स्पर्श करायची परवानगी नव्हती. अस्पृश्यांची सावलीही पडू दिली जायची नाही, असे अनुभव बालपणीच घेतले. आजोबा, वडिलांकडून तर एकापेक्षा एक असे भयंकर जीवघेणे अनुभव ऐकले.

त्यामुळे पाटील, गुजर समाजाबद्दल मनात खोलवर अढी रुतून बसली होती. हे पाटील लोक आपल्या लोकांचा दुस्वास करतात, तिरस्कार करतात हा समज अनुभवांती पक्का झाला होता. तशात कुणी कॉ. शरद् पाटील या व्यक्तीनं मार्क्सवादासोबत फुले-आंबेडकरवादाचा समन्वय केल्याचं वाचनात आलं. ‘धुळ्यातील एक विद्वान’ अशी त्यांची ओळख वर्तमानपत्रातील एका बातमीतून झाली होती. त्या वेळी वडिलांच्या नोकरीनिमित्त आम्ही विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यातील चिरोली या खेड्यात वास्तव्याला होतो.

एक पाटील, तोही आपल्या धुळ्याला, आंबेडकर सांगतो, याची मोठी नवलाई आणि कुतूहल होतं. त्यात नावही कॉ. शरद् पाटील असं. साधं, सोपं. स्मरणात कायम राहील असं. डॉ. बाबासाहेबांचं नाव घेणारा, त्यांच्या गुरूंचं महात्मा फुल्यांचं नाव घेणारा आणि मार्क्सवादाशी सांगड घालणारा एक विद्वान आहे, याची जाणीव तेव्हाच झाली होती. जेव्हा धुळ्यात जायचो प्रसंग येईल, तेव्हा या पाटलांना भेटू ही खुणगाठ मनाशी पक्की बांधून ठेवली होती.

२.

पुढे महाविद्यालयीन शिक्षणानिमित्त धुळ्याला येणं झालं. आणि ‘असंतोष’ची पायरी चढण्याची संधी मिळाली. तत्पूर्वी कॉ. शरद पाटील यांची जी साहित्यसंपदा होती, ती वाचली होती. त्या वेळी ‘दासशूद्रांची गुलामगिरी’ या पहिल्या भागासह ‘रामायण-महाभारतातील वर्णसंघर्ष’, ‘भारतीय तत्त्वज्ञान आणि नास्तिक मत’, ‘मंडल आयोगा’वरील पुस्तिका एवढाच ऐवज होता. सोबतीला ‘सत्यशोधक’ मासिकाचे अंक. या सर्वांचं वाचन झालं होतंच.

कॉ. शरद् पाटलांच्या या लिखाणामुळे त्यांचं वेगळेपण ठळकपणे जाणवत होतं. पण त्याहीपेक्षा माझ्या मनात त्यांच्याविषयी जी भावना निर्माण झाली होती, ती अभ्यासातून नाही तर अनुभवातून आली होती. हे अनुभव वर उल्लेख केल्याप्रमाणे जातीव्यवस्थेनं लादलेले होते. त्यातूनच वैचारिक नाळ घट्ट होत गेली. कॉ. शरद् पाटील जे काही सांगत आहेत, मांडत आहेत, ते अन्य कुणीही तसं सांगत नाही, याची जाणीव होत गेली. त्यातून ‘असंतोष’चं आकर्षण वाढत गेलं. मी माझ्या उत्सूकतेतून, गरजेतून त्यांच्याकडे गेलो. आणि नकळतपणे, बेमालूमपणे शपा माझ्या जीवनाचाच जणू एक भाग बनून गेले.

या अशा संपर्कातून, वाचनातून पाटलांचं आकलन करण्याचा प्रयत्न करू लागलो. त्यांचं लिखाण बोजड वाटत असलं तरी नेटानं समजून घेण्याचा, पुन्हा पुन्हा वाचण्याचा तेव्हापासूनच सुरू झालेला माझा शिरस्ता आजही तसाच अखंडीतपणे सुरू आहे. कारण कॉ. शरद् पाटील समजून घेणं हे वाटतं तितकं सोपं नाही. कोणत्याही एका अंगानं शपा समजून घेता येत नाहीत. ते अनेक अंगांनी समजून घ्यावे लागतात.

महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीचा वारसा लाभलेले शपा फुल्यांचा वैचारिक वारसा घेऊन कम्युनिस्ट पक्षात दाखल झाले. मार्क्सवाद स्वीकारला पण फुल्यांचा वैचारिक वारसा त्याला नसल्यानं मार्क्सवादाचीही डोळसपणे चिकित्सा केली. त्यातून मार्क्सवादी विश्लेषण भारताला गैरलागू ठरल्याचं त्यांनी निक्षून सांगितलं आणि दाखवून दिलं. भारतीय इतिहास, संस्कृतीचा मागोवा घ्यायचा असेल, त्यातील संघर्षाचं सूत्र कोणतं हे जाणून घ्यायचं असेल, तर मार्क्सची वर्गवादी अन्वेशन पद्धत अपुरी ठरते. भारतात वर्गव्यवस्था ब्रिटिशांच्या आगमनानंतर आली, त्यापूर्वी भारतीय इतिहास-संस्कृतीतील संघर्ष मावळती स्त्रीसत्ता आणि उगवती पुरुषसत्ता असा वर्णसंघर्ष होता. रामायण-महाभारतातील संघर्षाचं सूत्र शपांनी अशा प्रकारे प्रथमच समोर आणलं.

प्राच्यविद्येच्या क्षेत्रात हे संघर्ष सुरू ठेवून त्यांनी केलेलं संशोधन भारतीय प्राचीन इतिहास समजून घ्यायला पथदर्शक आणि मौलिक ठरलं. त्यातूनच इतिहासकार रोमिला थापर, इरावती कर्वे, नरहर कुरुंदकर, अ.भि. शहा, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी पाटील यांचं कौतुक केलं.

शपांनी पाच हजार वर्षांचा भारतीय संस्कृतीचा, तिच्यातील संघर्ष-समन्वयाचा आढावा घेताना पुराणकथांतील वास्तवतेचा अचूक वेध घेणारी अद्ययावत अन्वेशन पद्धत विकसित केली. त्याद्वारे प्राचीन भारताचा, बुद्ध कालखंडाचा, मध्ययुगीन इतिहासाचा वेध घेत नवी दिशा दिली. या ज्ञानभांडारावर जी ब्राह्मणी छावणीची मजबूत पकड होती, ती सैल करण्याचं आणि तोडण्याचं धारिष्ट्य शपांमध्ये या नवीन अन्वेशन पद्धतीमुळेच आलं.

त्यातूनच शपांनी ब्राह्मणी-अब्राह्मणी हे संघर्षाचं खरं सूत्र असल्याचं शेकडो दाखले देत पटवून दिलं. या ब्राह्मणी-अब्राह्मणी संघर्षाला ज्यांनी ज्यांनी विरोध केला, त्या विरोधांचं, आक्षेपांचं साधार खंडन केलं. त्यामुळे वैचारिक पाटलांचा जो दरारा आणि दबदबा निर्माण झाला होता. त्याला ‘ओपन चॅलेंज’ देण्याची हिंमत एकाही पंडितात नव्हती. ज्यांनी ज्यांनी असं आव्हान देण्याचा प्रयत्न केला, त्यांना बिनतोड जवाब देऊन कायमचं निरुत्तर करून टाकलं. केवळ प्राचीन, मध्ययुगीन इतिहासच नाही तर साहित्यापासून सौंदर्यशास्त्रापर्यंत आणि तत्त्वज्ञानापासून वर्तमान, सामाजिक, राजकीय परिस्थितीवर अब्राह्मणी दृष्टिकोनातून विश्लेषण केलं.

वैचारिक क्षेत्रातील त्यांच्या या पथदर्शक योगदानामुळे त्यांचा एक वेगळाच दरारा आणि दबदबा निर्माण झालेला होता.

३.

अयोध्येतील बाबरी मशिद विध्वंसानंतर देशभर धार्मिक दंगली उसळल्या. भाजपसह संघ परिवार आक्रमक झाल्यानं धार्मिक प्रश्न देशाच्या अजेंड्यावर आला. अशा वेळी मी शपा ऊर्फ कॉ. शरद् पाटील यांची मुलाखत घ्यावी, असं त्यांनी मला सांगितलं. परंतु विषयाचा आवाका आणि शपांची भूमिका मांडण्याची पद्धत पाहता ते शक्य होणार नाही, असं मला स्वत:लाच वाटत होतं. एक तर मी ज्या धुळ्यातल्या एका जिल्हा वर्तमानपत्रात होतो, तिथं ती छापणं शक्य नव्हतं. आणि प्रस्तुतही नव्हतं.

त्यामागील आणखी एक मुख्य कारण हे होतं की, शपांकडे पाहण्याचा स्थानिक पत्रकार, संपादकांचा दृष्टिकोनही फारसा निकोप नव्हता. त्यांच्या साध्या बातम्या, निवेदनंही फारशी प्रसिद्ध केली जात नव्हती. त्यामुळे स्थानिक वर्तमानपत्रांत ही मुलाखत यावी असंही शपांना वाटत नव्हतं. ही शंका वेगळ्या शब्दांत मी त्यांना बोलून दाखवली, तेव्हा त्यांनी मुंबईच्या ‘लोकसत्ता’, ‘महाराष्ट्र टाइम्स’ वगैरे वर्तमानपत्रांकडे मुलाखत पाठवायला सुचवलं. त्यामुळे छापून येण्याबाबतची माझी शंका निकाली निघाली.

मात्र तरीही माझ्या मनात धाकधूक कायम होती. ती अशी की, शपांसारख्या प्राच्यविद्यापंडिताची मुलाखत शब्दांच्या चिमटीत जशीच्या तशी पकडणं हे दिव्य काम होतं. एकतर ते अत्यंत दुर्बोध, क्लिष्ट लिहितात. सर्वसामान्यांना त्याचं आकलन होत नाही, असा आरोप होत होताच. आजही होतोच. त्यामुळे मुलाखत घेताना मनावर दडपण होतं. त्यातूनच मुलाखत घ्यायला टाळाटाळ करत होतो. वेगवेगळे बहाणे सांगत होतो.

मुलाखत कुठे छापून आणावी ही जी सबब मी सांगितली होती, ती त्यांनी निकाली काढली होती, तरीही माझ्यावरील दडपण काही कमी झालं नव्हतं. त्याला आणखीही एक कारण होतं. ते म्हणजे त्यांचा स्वभाव. एखादी बाब मनासारखी झाली नाही की, ते संताप प्रकट करायचे. चारचौघांत पाणउतारा करायला कमी करत नसत. हे मी अनेक वर्षांपासून पाहत होतो.

त्यामुळे अशा व्यक्तीची मुलाखत घेणं, त्यांना बोलतं करणं, हव्या त्या प्रश्नाचं उत्तर काढून घेणं हे माझ्या आवाक्यातलं काम नव्हतं. त्यामुळे मुलाखत घेण्याचं धारिष्ट्य होत नव्हतं. पण त्यांनी तगादाच लावला की, ‘तू माझा मुलाखत घे.’

त्यालाही मी ज्या काही सबबी सांगत होतो, त्या खऱ्या तर लंगड्या सबबी होत्या. पण त्यावरही त्यांच्याकडून उत्तर येत होतं. पण तरीही वेळ मारून नेण्यासाठी प्रश्नावली तयार करतो, टेपरेकॉर्डर शोधतो, अशा सबबी सांगून आणखी वेळ मारून नेऊ लागलो. मग काही दिवस ‘असंतोष’कडेच पाठ फिरवली. बरेच तिकडे फिरकलोच नाही.

४.

एखादा कार्यकर्ता जर ठरलेल्या कामासाठी आला नाही तर सोपवलेलं काम वेळेत केलं नाही तर त्याचा ते नाना तऱ्हेनं पाठपुरावा करायचे. फोन ज्याच्याकडे असेल त्याला फोन करायचे. तेव्हा फोनही फारच दुर्मीळ. मग कोणाकडे निरोप पाठवायचे. काही वेळा लेखी चिठ्ठी पाठवायचे. एवढंच नाहीतर थेट पोस्टकार्डही पाठवायचे. धुळ्यातल्या धुळ्यात पोस्टकार्ड पाठवून विचारणा करायचे. त्यामुळे नाही म्हणायची कोणतीच सोय नसायची. एवढं सर्व करूनही जर मग ठरलेलं काम केलं नाहीतर जाहीरपणे पाणउतारा करायला कमी करायचे नाहीत. ‘वकूब नाही तर आव आणायचा नाही’, अशा शब्दांत ठणकावायचे. त्यामुळे व्हायचं काय की, कार्यकर्ते नाराज होते. साहजिकही होतं ते. त्यातूनच अनेक जण दुरावत. अशी आपत्ती आपल्यावर यायला नको म्हणून मी माझ्यापरीनं काळजी घेत होतो. ठरवून दिलेलं काम काटेकोर होईल याची दक्षता बाळगत होतो. पण पत्रकारितेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या माझ्याकडून अपेक्षा वाढल्या असाव्यात. त्यातून ही मुलाखतीची जबाबदारी त्यांनी टाकली.

डिसेंबर १९९२मध्ये अयोध्येतील बाबरी मशिद पाडली गेली. तत्पूर्वीही रामरथयात्रा, शिलान्यास यामुळे धार्मिक उन्माद वाढला होता. अशा वेळी आपलं म्हणणं व्यापक प्रमाणावर जनतेसमोर यायला हवं, असं कॉ. शरद् पाटील यांना वाटू लागलं. तशात त्यांच्या एकाकीपणाच्या या काळात -सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या अपहरण काळात - माझ्यासह मोजक्याच म्हणजे चारच जणांनी त्यांना साथ दिली होती. त्यातून त्यांनी माझ्यासमोर या मुलाखतीचा प्रस्ताव ठेवला. मात्र मला वर सांगितल्याप्रमाणे माझ्या काही मर्यादांची जाणीव होती आणि मुलाखत घेण्याचं टाळत बहाणे शोधत होतो. परंतु त्यांचा लकडाच असा होता की, काहीही सबबी सांगितल्या तरी त्याला त्यांच्याकडे उत्तर असायचं. शेवटी ‘हो’ म्हणावे लागायचे. त्यातून मुलाखत साकारली. पण यासाठीही आणखी काही काळ गेला.

बाबरी मशिद पडल्यानंतर ही मुलाखत घेतली असल्यानं आणि त्यावेळी भाजप, संघपरिवार यांचं आक्रमण वाढत गेल्यानं, त्या केंद्रीय सत्तेच्या अगदी जवळ येऊन ठेपल्यानं त्याच पार्श्वभूमीवर प्रश्न विचारावेत म्हणून तयारी केली. आठ-दहा प्रश्नांची प्रश्नावली तयार केली. सोबतीला टेपरेकॉर्डर घेतला आणि मुलाखत साकारली.

५.

पहिलाच प्रश्न भाजपच्या आक्रमणाचा आणि एकूणच देशासमोर उभ्या ठाकलेल्या प्रबोधनाचा असल्यानं कॉ. शरद् पाटलांनी सविस्तर उत्तर दिलं. ही मुलाखत टेप होत असल्यानं त्या मुक्या यंत्रासमोर तोंड करून, जणू माईकच आहे, असं समजून कॉ. शरद् पाटील बोलत होते. त्यांनी एकदा बोलायला सुरुवात केली की, तल्लीन होऊन, बेभानपणे बोलायचे. मुलाखत असली तरी मुलाखतकर्त्याला मध्येच हस्तक्षेप करण्याचा वा मध्येच थांबवण्याचाही प्रश्न नव्हता. त्यामुळे पहिल्याच प्रश्नावर कॉ. शरद् पाटील यांनी बोलायला सुरुवात केली, ती विस्ताराचीच होती. अर्थात प्रश्नकर्ता कितीही बाळबोध प्रश्न विचारत असला तरी बोलणारे, उत्तर देणारे कॉ. शरद् पाटील होते. त्यांना जे काही सांगायचं, मांडायचं होतं, ते त्यांनी आपल्या नेहमीच्या धाटणीत मांडलं.

माझी प्रश्नावली आठ-दहा प्रश्नांची जरी असली तरी मुलाखतीत नेमके दोन-तीनच प्रश्न विचारू शकलो. कारण कॉ. शरद पाटलांना त्यावेळी जे सांगायचं होतं ते सांगून झालं होतं. आणि सोबत आणलेल्या तीन-चार कॅसेटचीही मर्यादा संपत आली होती. या मुलाखतीच्या वेळी मी कोणताही हस्तक्षेप केला नव्हता. करायचा प्रश्नही नव्हता. फक्त टेपबरोबर चालली आहे का, यावरच माझी नजर होती. तसंच मुलाखत टेप होत असल्यानं मी टिपणंही काढत नव्हतो. फक्त कान देऊन बारकाईनं ऐकत होतो. कारण न जाणो एखादा शब्द, वाक्य मुलाखतीत व्यवस्थित टेप झालं नाही तर लिहिताना उपयोगी पडेल.

तसंच टेपही मध्येच बंद पडायला नको. टेप मध्येच बंद पडला तर खाडकन असा मोठा आवाज व्हायचा. त्यामुळे कॉ. शरद् पाटलांची तल्लीनता भंग व्हायची, हा अनुभव यापूर्वी एक लहानशी मुलाखत मी टेप केली होती, तेव्हा आला होता. मी मुलाखत तेव्हा नव्वदच्या सुमारास ‘सुगावा’च्या दिवाळी अंकात छापूनही आली होती. त्यामुळे टेपचा हा असा पूर्वानुभव होताच. कॉ. शरद् पाटलांची वक्रदृष्टी आपल्यावर पडायला नको, त्यांच्या नजरेतून आपण उतरायला नको, अशी काळजी घेऊनच या मुलाखतीची जय्यत तयारी केली होती आणि तीनेक प्रश्नांतच मुलाखत आटोपली. प्रश्नावली शिल्लक होती, पण अडीच-तीन तास झाले होते.

शरद् पाटील एकटेच बोलत होते. त्यांना जे सांगायचं होतं ते सांगून झालं होतं. म्हटलं आता आणखी काही सांगायचं असेल तर उद्या पुन्हा टेप करू. त्यावर त्यांनीच ‘नको’ म्हटल्यानं हा विषय तिथंच संपला. मुलाखत घेण्याची माझ्या शिरावरची जबाबदारी उतरली.

मुलाखत घेतल्यानंतर ती जशीच्या तशी त्यांच्याच शब्दांबरहुकूम डायरीत उतरवून काढली. त्यानंतर पुन्हा कोऱ्या कागदावर आणखी व्यवस्थित लिहून काढली. एकेका प्रश्नाचं उत्तर म्हणजे एक स्वतंत्र लेख. त्यामुळे कोणतंही वर्तमानपत्र ही मुलाखत छापणार नाही याची जाणीव मला तेव्हाच होती. पण तसं सांगण्याचं धारिष्ट्य झालं नाही. म्हणून कॉ. शरद् पाटलांना मुलाखत दाखवली. ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘लोकसत्ता’ यांना पाठवून दिली. ही मुलाखत काही छापून आली नाही. मुलाखत घेतल्याचं आणि ती पाठवल्याचं माझ्या मनाला समाधान मात्र मिळालं. शपांकडे जाण-येणं. त्यांचं माझ्याकडे येणं नियमित सुरू झालं.

मुलाखत कुठेही छापून न आल्याची रुखरुख माझ्याही मनाला लागलेली होती आणि त्यांनाही चुटपूट लागली होती. त्यातून काही दिवस गेल्यावर मधूनच ते मुलाखतीबाबत विचारणा करायचे. मुंबईला गेला तर चौकशी कर म्हणायचे, नाही तर मुंबईच्या या या कार्यकर्त्याला सांग म्हणायचे. या मुलाखतीचा त्यांचा पाठपुरावा सुरूच होता. पण ते काहीच शक्य झालं नाही. शेवटी मुलाखतीचा नाद हळूहळू त्यांनी आणि मीही सोडून दिला.

६.

त्यानंतर एकदा नागपूरहून व्याख्यानाचं निमंत्रण आलं. नेमकं आठवत नाही, पण बहुधा नागपूर विद्यापीठाचं असावं. राहुल सांकृत्यायन यांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमाचं. तिथं पेपर सादर करावा आणि व्याख्यान द्यावं असं ते निमंत्रण होतं. त्यावेळी शपांनी सांगितलं ‘तुही चल माझ्यासोबत नागपूरला’. माझी तर केव्हाही तयार असायची. मात्र त्याच क्षणी मला सुचलं की, शपांनी लेख लिहावा या विषयावर. वर्तमानपत्राच्या भाषेत वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत लिहिलं तर जास्त लोकांपर्यंत जाईल. तसं मी त्यांना बोललो. त्यांनीही तयारी दर्शवली. त्यातून राहुल सांकृत्यायन यांच्यावर पेपर लिहून होत आला होता. त्यानंतर लोकमतसाठी म्हणून लेख लिहिला. लेखाचे शीर्षक होतं – ‘निवडणूक स्वयंवरात श्रीराम!’ हा लेख दै. ‘लोकमत’च्या नागपूर कार्यालयात जाऊन दिला. तिथं कमलाकर धारप यांना भेटलो. माझी त्यांची ओळख असण्याचा प्रश्नच नव्हता. पण कॉ. शरद् पाटलांचा लेख आणला आहे म्हटल्यावर धारपांनी माझी आणि शपांची आस्थेनं चौकशी केली. शपा किती दिवस नागपूरला थांबणार, काय कार्यक्रम आहे वगैरे. मला बरं वाटलं. मनात वाटलं मुंबईच्या पत्रकारांना विद्वानांची काही किंमत नाही, पण नागपूरच्या पत्रकारांना चांगली जाण आहे. विद्वत्तेची ते पारख करतात.

.............................................................................................................................................

हे पुस्तक विकत घेण्यासाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/4798/Krantikari-Satyashodhak-Comrade-Sharad-Patil

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................