अपंगत्वावर मात करून स्वतःला सिद्ध करण्याची धडपड फजल करतो आहे!
पडघम - राज्यकारण
सागर भालेराव
  • फजल छोटी बहीण आणि आईसोबत
  • Mon , 03 December 2018
  • पडघम राज्यकारण फजल Fazal जागतिक अपंग दिन International Day of Persons with Disabilities 3 December

जगातला प्रत्येक माणूस हा वस्ती करताना आपल्या जाती-जमातीचे लोक आपल्या आसपास असावेत असा विचार करून एखाद्या ठिकाणी राहतो. ही कथा अखिल मानवजातीची आहे. सर्वमान्य असलेल्या या समाजशास्त्राच्या नियमाला मायानगरी मुंबई तरी अपवाद कशी ठरेल? त्यामुळेच डोंबिवली, विलेपार्ले, घाटकोपर, चेंबूर अशा विशेष भागात काही जातिविशेष समुदाय राहत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. यातलंच एक उदाहरण म्हणजे मुंब्रा. ठाणे जिल्ह्यातील हे अतिशय भरगच्च असलेलं शहर. बहुसंख्येनं मुस्लिम समाज या ठिकाणी राहतो. मुंबईत ९२-९३ साली झालेल्या हिंदू-मुस्लिम दंगलीनंतर मुंबई शहरातील, विशेषतः दक्षिण मुंबईतली कित्येक मुस्लिम कुटुंबं इथं स्थलांतरित झाली. कारण एकच होतं, वर सांगितलेला समाजशास्त्राचा नियम.

आपल्या सामाजातील अपंग व्यक्तींना कुठल्या ना कुठल्या सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक प्रश्नांना सामोरं जावं लागवं, हे जाणून घेण्यासाठी आणि याचा अभ्यास करण्यासाठी मी आणि माझे इतर दोन सहकारी मुंब्राला पोहोचलो. रशीद कंपाऊंड या परिसरात आम्ही उतरलो. वाहतुकीची प्रचंड वर्दळ होती. पायी चालणारे लोक रस्ता ओलांडताना काय काय दिव्य करत होते, हे बघण्यासारखं होतं. मुंबईतून मुंब्रामध्ये स्थलांतरित झालेल्या अशाच एका कुटुंबाला आम्ही भेटलो. रशीद कंपाऊंड मुख्य रस्त्यापासून थोडं आत चालत शेवटची बिल्डिंग आम्हाला गाठायची होती. आम्ही ज्याला भेटायला आलो होतो, तो फजल नावाचा मुलगा इथं राहतो. इयत्ता बारावीमध्ये शिकणारा फझल डोळ्यानं अंशतः अंध आहे, मानसिकदृष्ट्या असक्षम आहे. त्याला सुस्पष्ट बोलता येत नाही. एकाधिक अपंगत्व असलेला फझल सध्या २० वर्षांचा आहे. एक अपंग व्यक्ती म्हणून त्याचे प्रश्न जगापेक्षा निराळे तर आहेतच, परंतु ज्या परिवेशातून तो येतो, ज्या सामाजिक संरचनेच्या एकूण व्यवस्थेबद्दल तो अनभिज्ञ आहे, त्या सगळ्यांचा सामना त्याला कळत-नकळत रोजच करावा लागतो.

नेमकं ते जाणून घेण्यासाठी आम्ही त्याच्या घरी पोहोचलो होतो. फजल ज्या इमारतीमध्ये राहतो, ती इमारत सहा मजल्यांची आहे. इमारत ही मुख्य रस्त्यापासून आत आणि एकदम टोकाला असल्यामुळे इथं प्रकाशव्यवस्था नाही. इमारतीला लिफ्टची सुविधा नाही आणि फजल सहाव्या मजल्यावर राहतो. त्यामुळे जिने चढून जाण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता. अंधारलेले जिने चढत, धापा टाकत आम्ही सहाव्या मजल्यावर पोहोचलो. घरात शिरल्यावर उघड्या तावदानातून येणारी हवेची झुळूक आणि लख्ख सूर्यप्रकाश आम्ही अनुभवला. फजलच्या आईला आम्ही येणार आहोत ही पूर्वकल्पना दिलेली होती. त्यामुळे ते आमच्या प्रतीक्षेतच होते. आम्ही जेव्हा त्यांच्या घरी पोहोचलो, तेव्हा घरी फजल, फजलची आई आणि एक छोटी बहीण असे तिघेजण होते. चहापान झाल्यानंतर आमच्या गप्पा सुरू झाल्या.

पांढरा शुभ्र शर्ट आणि निळी पँट घातलेला फजल त्याच्या आईला खेटून बसलेला होता, तर त्याची चार-पाच वर्षांची छोटी बहीण घरभर खेळत होती. घरातील इतर सदस्यांबद्दल विचारलं असता असं समजलं की, फजलला एकूण चार भावंडं आहेत. त्याचा मोठा भाऊ पुण्यात कॉम्प्युटर इंनिजिनिअरिंगचं शिक्षण घेतोय, एक बहीण बारावी शिक्षित असून सध्या घरीच असते, तर एक छोटा भाऊ मुंबईतच एका कॉलेजमध्ये शिकतो आहे. आणि फजलपेक्षा छोटी बहीण बालवाडीत शिकते आहे. फजलच्या वडिलांबद्दल विचारलं असता, ते बिहारमध्ये राहतात असं समजलं. तिथं त्यांचा जनरल स्टोअरचा व्यवसाय असून मुंबईतून नेलेला माल ते तिथं विकतात.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

हे ऐकून थोडं आश्चर्य वाटलं. बहुधा होतं काय की, बिहार-उत्तर प्रदेशमधून अनेक पुरुष मंडळी मुंबईत व्यवसायानिमित येतात आणि आपली मुलं-बाळं, आपलं कुटुंब गावीच ठेवतात. त्यांच्या पालनपोषणाचा खर्च मुंबईच्या महागाईत झेपत नाही म्हणून असं करणारी कित्येक कुटुंबं आपल्याला मुंबईत, आपल्या आसपास पाहायला मिळतात. त्यामुळे हे कुटुंब जरा वेगळं वाटलं. विस्तारानं विचारलं तेव्हा असं समजलं की,, मुंबईच्या दंगलीनंतर जेव्हा परिस्थिती बदलली, तेव्हा या कुटुंबानं आपल्या मूळ गावी बिहारला परत जाण्याचा निर्णय घेतला. गावी परतल्यानंतर फजलच्या आईला असं जाणवलं की, इथं मुलांच्या शिक्षणाच्या संधी नाहीत. स्वतः कॉन्व्हेंटमध्ये इयत्ता सहावीपर्यंत शिकलेली फजलची आई शिक्षणाबद्दल कमालीच्या जागरूक आहेत. आणि म्हणूनच मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी पुन्हा मुंबई गाठली आणि शहर निवडलं मुंब्रा.

फजल जेव्हा चार-पाच वर्षांचा होता, तेव्हाच त्याच्या आईला जाणवलं की याला इतरांसारखं स्पष्ट दिसत नाही. रोज संध्याकाळी जेव्हा सगळी लहान मुलं खेळायला जात, तेव्हा फजल धडपडायचा. त्याला आपल्या मार्गात काय वस्तू आहेत याचं नीट आकलन व्हायचं नाही. या सगळ्याचं आईशिवाय आणखी कोण निरीक्षण करणार? आपला मुलगा इतर मुलांपेक्षा असक्षम आहे, त्याला इतरांपेक्षा कमी दिसतं याची सर्वप्रथम त्याच्या आईला जाणीव झाली. त्याच्या शिक्षणाच्या संधी या बिहारमधल्या त्या छोट्या खेड्यात उपलब्ध नव्हत्या, म्हणूनच मनाची हिंमत करत त्यांनी पुन्हा मुंबईला यायचं ठरवलं. मुंबईत आल्यानंतर जेव्हा त्याच्या इतर टेस्ट केल्या, गेल्या तेव्हा हे निदान झालं की, त्याचा बुद्ध्यांकदेखील कमी आहे. जसजसा तो मोठा होत गेला, तसतशा त्याच्या अडचणी वाढत गेल्या.

वयाच्या चार-पाच वर्षांपर्यंत त्याला बोलता येत नव्हतं. आणि जेव्हा बोलायला लागला, तेव्हा फारच कमी शब्द बोलायचा. फजलच्या वाढत्या वयासोबत त्याच्या आईच्या चिंतादेखील वाढत होत्या. परंतु या सगळ्या चिंतांना सामोरं जाण्याची जिद्ददेखील त्यांच्या अंगी होती. मुलाला सुगम्य असतील अशा गोष्टी घरात असायला हव्यात यासाठी त्यांचा कायम प्रयत्न असतो. फजल अंशतः दृष्टिहीन असल्यामुळे त्यांनी घर घेताना अगदी वरच्या-शेवटच्या सहाव्या मजल्यावर घर घेतलं. जेणेकरून घरात प्रकाशव्यवस्था पुरेशी असेल, त्यामुळे फजलला अडचण होणार नाही.

उम्मीद फौंडेशन नावाचा एक एनजीओ आहे. अपंग विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम ही सेवाभावी संस्था करते. तिथं फजल शिकतो. फजलला शाळेत जायला खूप आवडतं. त्याच्या मित्रमैत्रिणींबाबत तो सारखा बोलत राहतो. त्यांच्यासोबत तो काय काय खेळ खेळतो, कशी भांडणं करतो हेदेखील तो सांगत होता. त्याला खेळाची प्रचंड आवड आहे, परंतु दृष्टिहीनतेमुळे त्याच्या काही मर्यादा आहेत. त्यामुळे त्याच्या शाळेत त्याच्याच सारख्या विद्यार्थ्यांसोबत तो खेळू शकतो. हे सगळं सांगत असताना गोळाफेक (शॉर्ट पुट) स्पर्धेत त्याला मिळालेलं सन्मानचिन्ह मोठ्या अभिमानानं तो दाखवत होता.  

इमारतीतल्या इतर मुलांसोबत खेळायला फजलला पाठवलं जात नाही. एक तर इतर मुलं वयानं लहान आहेत. ती त्याला ‘पागल-पागल’ असं चिडवतात. ते त्याला आवडत नाही. त्यामुळे त्याला बाहेर पाठवल जात नाही. त्याला कॅरम खेळायलादेखील आवडतं. घरातच खेळला जाणारा हा बैठा खेळ असल्यामुळे त्यात पडण्या-झडण्याची भीती नसते. त्यामुळे त्याच्या घरच्यांनी त्याच्यासाठी एक कॅरम बोर्ड  घरातच आणून ठेवला आहे. तो खेळण्यासाठी घरामध्येच त्याच्या इतर मित्रांना बोलावलं जातं आणि तोदेखील या खेळाचा आनंद घेतो. 

त्यांच्या इमारतीमध्ये लिफ्ट नाही, त्याचा फटका आम्हाला तर बसलाच होता. परंतु जे स्थानिक लोक या इमारतीमध्ये राहतात, त्यांना तर रोजच या कसरतीला सामोरं जावं लागतं. फजलला याचा काही त्रास होतो का? असा प्रश्न केला असता, त्यांनी सांगितलं की, “त्रास तर होतो पण त्याला उपाय नाही. एक तर भरदुपारीसुद्धा जिन्यात अंधारलेलं असतं. सामान्य माणूस येऊ जाऊ शकेल, पण फजलला अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यामुळे आम्ही त्याला पूर्वकल्पना देतो, कुठल्या मजल्यावर काय अडचणी आहेत. कुठे पाणी साचलंय किंवा कुठे कुत्र्यानं किंवा बकरीनं विष्ठा केलेली असेल तर ते आम्ही त्याला डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला आहे, कुठल्या मजल्यावर आहे ते सांगतो. त्यानुसार मग तो आपला मार्ग काढतो. इमारतीमध्ये अजून कुणाला लिफ्टची आवश्यकता नाही म्हणून कुणी तशी मागणीदेखील केलेली नाही.” आपल्या एकट्यासाठी का सगळे लोक खर्च उचलतील म्हणून आहे त्या परिस्थितीत मार्ग काढण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. 

फजलची शाळा घरापासून एक दीड किलोमीटरच्या अंतरावर आहे. सुरुवातीला त्याला न्यायला-आणायला जावं लागायचं. आता मात्र तो स्वतःच शाळेत जातो- येतो. त्याला शाळेचा रस्ता आता अंगवळणी पडलाय. परंतु दिशाभूल झाली की, त्याची अडचण होते. किती पाऊल पुढे गेल्यावर डावीकडे किंवा उजवीकडे वळायचं यावर त्याचं घरी येण्या-जाण्याचं आकलन अवलंबून आहे. परंतु एक जरी दिशा चुकली तर तो संपूर्ण रस्ताच चुकतो. त्यामुळे त्याला रस्ते गणिताच्या सूत्राप्रमाणे स्वतःला समजून घ्यावे लागतात. सुरुवातीच्या काळात त्याला या समस्यांचा सामना करावा लागला. परंतु हळूहळू तो या समस्यांचं निराकरण करायला शिकलाय.

दोन-तीन वर्षांपूर्वी ईदच्या मिरवणुकीत जाण्याचा हट्ट त्यानं केला. गर्दी कमी झाली की, आपण जाऊ, असं त्याच्या आईनं त्याला सांगितलं. पण नजर चुकवून तो घराबाहेर पडला. ढोल-ताशाच्या दिशेनं त्याची पाऊलं पडली. इथं रस्ता निवडण्यासाठी त्याच्या सूत्राचा उपयोग नव्हता. आवाजाच्या दिशेनं तो चालत होता. ज्या दिशेनं चालत जाऊ, त्याच दिशेनं आपण परत येऊ असा विचार करून तो निघाला. येताना तो नेमका दिशा विसरला आणि चालत चालत मुंब्रा रेल्वे स्टेशनला पोहोचला. फजलकडे घरच्यांनी एक छोटा मोबाईल दिलेला आहे. अडीअडचणीच्या काळात तो मोबाईलनं घरच्यांशी संपर्क करतो. त्यानं आपला मोबाईल काढला आणि घरच्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु मोबाईलचं लाल बटण घाईगडबडीत अनेकदा दाबलं गेल्यानं तो स्विच ऑफ झाला होता. मोबाईल बंद झालाय याची फजलला काहीच कल्पना नव्हती. घरचेदेखील फोन करत नाहीयेत असं समजून घरी पोहोचण्यासाठी आपल्याकडे अजून बराच वेळ आहे, असं समजून तो मुंब्रा रेल्वे स्टेशनच्या परिसरातच इकडेतिकडे भटकत राहिला. लोकांना त्यानं पत्ता विचारला. तो रहात असलेल्या कादर अपार्टमेंटचा पत्ता जेव्हा त्यानं लोकांना विचारला, तेव्हा त्याच्या अस्पष्ट बोलण्यामुळे लोकांना ते समजू शकलं नाही. काहींनी ‘कादर’ऐवजी ‘दादर’ असं समजून त्याला ट्रेननं दादर या बऱ्यापैकी लांब असलेल्या रेल्वे स्टेशनवर कसं जायचं याचाही सल्ला दिला. परंतु रेल्वेनं आपण इथं आलो नाही, तेव्हा रेल्वेनं परत जाण्याचा संबंधच नाही याची फजलला पूर्ण कल्पना होती. इकडे फजल घरी पोहोचण्याचा दृष्टीनं होतील तितके प्रयत्न करत होता, तर तिकडं घरच्यांचा जीव टांगणीला लागला होता. घरच्यांची शोध मोहीम सुरू होती. नातेवाईकांना फोन करून विचारलं जात होतं, शेजारीपाजारी शोधलं जात होतं. आजूबाजूचा परिसर, बाजार, दुकानं सगळं धुंडाळून झाल्यांनतर त्यांच्याच अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या कोणा भल्या माणसाला तो स्टेशनवर उभा असलेला आढळला आणि ते त्याला घरी घेऊन आले. 

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

असाच आणखी एक प्रसंग घडला. फजलला घरातील स्विच बोर्डला हात लावण्यास मनाई आहे. दक्षता आणि सुरक्षितता म्हणून त्याला काही नियम घालून दिलेले आहेत. स्विच बोर्डला हात लावायचा नाही, किचनमध्ये गॅसजवळ जायचं नाही, अनोळखी व्यक्तीचा आवाज असेल तर घराचा दरवाजा उघडायचा नाही, कुणी अनोळखी व्यक्तीनं काही खायला दिलं तर ते घ्यायचं नाही वगैरे वगैरे. एकदा फजलचा मोठा भाऊ दुबईला जाण्यासाठी निघाला होता. त्यामुळे दुसऱ्या मोठ्या भावाला त्याच्या देखरेखीसाठी ठेवून त्याचे आई-वडील आणि इतर मंडळी एअरपोर्टला गेली. दरम्यान त्याच्या सोबत घरी असलेल्या त्याच्या भावाला त्याच्या मित्रांचा फोन आला आणि तो त्यांना भेटायला जातो असं सांगून निघून गेला. जाताना फजलला आतून कडी लावून घ्यायला सांगितलं. आता घरात केवळ फजलच होता. दरवाजाला आतून काडी लावून तो झोपी गेला. संध्याकाळ होत आली होती, अंधारून आलेलं होतं. प्रकाश नसल्यामुळे झोपेतून उठल्यानंतर नेमकं आपण कुठे झोपलो आहोत आणि कुठल्या दिशेला डोकं ठेवून झोपलेलो होतो हे तो विसरला. इलेक्ट्रिक बोर्डला हात लावायचा नाही अशी ताकीद असल्यामुळे तो अंधारातच जागेवर बसून राहिला. एअरपोर्टवरून घरचे त्याला फोन करण्याचा प्रयत्न करत होते, पण अंधारात त्याला त्याचा फोनदेखील सापडत नव्हता. फजल फोन उचलत नाहीये म्हणून घरचे चिंतेत होते. त्यांच्या घराच्या जवळच फजलची मावशी राहते. त्याच्या मावशीला फोन करून, घरी जाऊन काय परिस्थिती आहे हे पाहण्यास सांगितलं गेलं. मावशी जेव्हा घरी पोहोचली, तेव्हा तिनं फजलला आवाज दिला. त्यानं आवाज ओळखला परंतु दरवाजाची कडी खोलण्यासाठी दरवाजा नेमका कोणत्या बाजूला आहे, हेच त्याला समजेना. तो धडपडत भिंतींना हात लावत दरवाजा शोधायचा प्रयत्न करू लागला. परंतु त्याला यश आलं नाही. एव्हाना घरच्यांची धाकधूक वाढली. एरपोर्टवरून सगळे लोक घरी यायला निघाले, इकडे लोकांनी असाही कयास लावला की, कोणी चोर घरात घुसला आहे आणि फजलला त्यानं ओलीस ठेवलं आहे. तेव्हा  घराचा  दरवाजा तोडण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. आसपासचे लोक जमा झाले आणि त्यांनी वेगवेगळ्या युक्ती लढवून दरवाजा तोडला. आत येऊन बघतात तर पलंगावर घाबरा होऊन फजल बसलेला होता. 

असे सगळे अनुभव आल्यामुळे आता फजलला एकटं सोडलं जात नाही. त्याची आई आता तर भावंडांच्या भरवशावरही त्याला सोडून जाण्यास धजावत नाही. फजलला आता ब्रेल लिपी लिहिता-वाचता येते. त्याच्यासाठी खास अँड्रॉइड स्मार्ट फोन घेतला आहे. ठाण्यात एक खाजगी संस्था दृष्टीहीन व्यक्तींसाठी मोबाईल अॅप्स बनवते. फजल तिथं जाऊन ती अॅप्स आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेतो. स्क्रीनरीडर (आलेले संदेश, कॉल आदी सूचना मोबाईल स्वतःच वाचतो) सारख्या सुविधा त्या अॅपमुळे आता उपलब्ध झाल्या आहेत. काही सुविधा स्मार्टफोनमध्ये मूलतःच असतात, पण आपल्याला हव्या असलेल्या सुविधादेखील नंतर आपण त्यात घेऊ शकतो. सोबतच तो आता संगणक प्रशिक्षणसुद्धा घेतो आहे. अपंगांना सरकारी नोकरीत आरक्षण आहे. भविष्यात आपल्यालाही सरकारी नोकरी मिळावी यासाठी स्वतःला  सक्षम बनवावं असं फजलला वाटतं. त्याच्या कुटुंबाचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे. त्यांची हीच इच्छा आहे की, फजलनं स्वतःच्या पायावर उभं राहावं, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं. जेणेकरून भविष्यात तो कुणावरही अवलंबून असणार नाही.

कुठल्याही व्यक्तीचा पहिला आधार हे त्याचं कुटुंब असतं. कुटुंबाकडून मिळालेला पाठिंबा, विश्वास इतर कुणाकडूनही मिळत नाही. कुटुंबानंतर येतो तो समाज आणि शाळा-कॉलेज-सेवाभावी सामाजिक व शासकीय संस्था. संस्था या  तुम्हाला आर्थिक, शैक्षणिक समर्थन प्रणाली म्हणून मदत करण्याचं काम जरूर करतील, परंतु अगदी सुरुवातीच्या काळात तुम्हाला मानसिक आधार देण्याचं काम कुटुंबाशिवाय इतर कुठलीच संस्था करू शकत नाही. 

फजलच्या आईनं जर बिहारच्या त्या खेडेगावातच राहण्याचा निर्णय घेतला असता आणि मुंबईला येण्याचं धाडस केलं नसतं तर कदाचित  शिक्षणाच्या संधी फजलला मिळू शकल्या नसत्या. एक माणूस म्हणून ज्या सर्वांगीण विकासाची आवश्यकता आपल्या सगळ्यांनाच असते, तो कदाचित होऊ शकला नसता. सरकार अपंगांसाठी काही करेल न करेल, परंतु वैयक्तिक पातळ्यांवर लढताना अपंग म्हणून समस्यांचा सामना करताना येणाऱ्या अडचणी स्वतःच समजून घेऊन स्वतःच सोडवाव्या लागतात. फजलच्या कुटुंबियांना आणि विशेष म्हणजे त्याच्या आईला हे माहीत आहे. त्यामुळे अपंगत्वाच्या इतक्या सगळ्या अडचणींवर मात करून स्वतःला सिद्ध करण्याची धडपड फजल करू शकतो आहे. 

.............................................................................................................................................

लेखक सागर भालेराव रिझवी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, बांद्रा (प.), मुंबई इथं असिस्टंट प्रोफेसर आहेत.

sagobhal@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................