या नाटकात ‘विवाहबाह्य संबंध’ हा वादग्रस्त विषय घेऊन एका वेगळ्याच विषयाची मांडणी आहे!
कला-संस्कृती - नौटंकी
प्रा. अविनाश कोल्हे
  • ‘द ट्रुथ’चं एक पोस्टर
  • Sat , 24 November 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti नौटंकी Nautanki अविनाश कोल्हे Avinash Kolhe द ट्रुथ The Truth फ्लोरिअन जेलर Florian Zeller

जुहूचं पृथ्वी थिएटर हे मुंबर्इतील एक प्रतिष्ठित नाट्यगृह. या थिएटरला या वर्षी चाळीस वर्षं पूर्ण होत आहेत. त्या निमित्तानं एक चांगला नाट्यमहोत्सव आयोजित करणं अगदीच स्वाभाविक होतं. त्यानुसार ३ ते १२ नोव्हेंबर २०१८ दरम्यान नाट्यमहोत्सव संपन्न झाला. यात पृथ्वीराज कपूर यांनी सादर केलेल्या १९४० च्या दशकातलं ‘दिवार’ हे हिंदी नाटक सादर करण्यात आलं. शिवाय या महोत्सवात अनेक नामवंत नाट्यसंस्थांनी ताजी नाटकं सादर केली. यातील एक महत्त्वाचं नाटक म्हणजे नसीरुद्दीन शहांच्या ‘मॉटली’ नाट्यसंस्थेतर्फे सादर करण्यात आलेलं इंग्रजी नाटक ‘द ट्रुथ’.

हे नाटक फ्रेंच नाटककार फ्लोरिअन जेलर (जन्म - १९७९) यांनी लिहिलं आहे. (त्यांनी कादंबऱ्याही लिहिल्या आहेत. त्यांना ‘फॅसिनेशन ऑफ एव्हील’ या २००४ साली प्रसिद्ध झालेल्या तिसऱ्या कादंबरीनं उदंड बक्षिसं व लोकप्रियता मिळवून दिली.) आजच्या फ्रान्समधील ते महत्त्वाचे नाटककार समजले जातात. त्यांची ‘फादर’ व ‘मदर’ ही नाटकं महत्त्वाची आहेत. त्यांच्या ‘द ट्रुथ’चं ख्रिस्तोफर हॅम्पटन यांनी इंग्रजीत भाषांतर केलं आहे.

आज आपल्या समाजात ‘विवाहबाह्य संबंध’ हा विषय सतत चर्चेत असतो. एकेकाळी या विषयाची समाजात दबक्या आवाजात चर्चा होत असे. आता हा विषय उघडपणे चर्चिला जातो. या विषयावर मराठीत अनेक नाटकं, दूरदर्शन मालिका आलेल्या आहेत. नेमका हाच विषय या नाटकातही चर्चिला गेला आहे. नाटककारानं हे नाटक २०११ साली लिहिलेलं आहे.

.............................................................................................................................................

सविस्तर माहितीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

या नाटकात एकुण चार पात्रं आहेत. दोन विवाहित जोडपी असतात, ज्यांचे एकमेकांशी विवाहबाह्य संबंध असतात. के.सी.व झेड हे दोन मित्र नेहमी टेनिस खेळतात. झेडची नोकरी नुकतीच गेलेली आहे. नाटकाची सुरुवात होते तेव्हा के.सी. झेडच्या पत्नीशी, लव्हलीनशी एका हॉटेलात मजा करत असतो. दोघंही आपापल्या घरी काही तरी खोटं कारण देऊन गावातल्याच एका हॉटेलमध्ये थोड्या वेळासाठी सेक्स करण्यासाठी आलेले असतात. त्यांचं अफेअर गेली सहा महिनं सुरू असतं. नाटक सुरू होतं, तेव्हा त्यांची मजा करून झालेली असते आणि ते परतायच्या तयारीत असतात.

तेवढ्यात दोघांना आपापल्या जोडीदाराचे मोबार्इलवर फोन येतात. दोघंही सरार्इतपणे खोटं बोलतात. निघताना लव्हलीन एक वेगळीच अपेक्षा व्यक्त करते. ती म्हणते की, असं एखाद्या हॉटेलात दोन-तीन तासांसाठी जायचं म्हणजे एखाद्या कॉलगर्लसारखे वाटतं. त्याऐवजी आपण छानपैकी प्लॅन करून जवळच्या हिल स्टेशनवर जाऊ, मस्तपैकी रात्रभर राहू वगैरे. के.सी. सावध होतो आणि हे टाळण्याचा प्रयत्न करतो, पण सरतेशेवटी ‘प्रेयसी हट्टा’पुढे माघार घेतो. ते लवकरच लोनावळ्याला जाण्याचा प्लॅन ठरवतात.

त्या दिवशी के.सी. जेव्हा घरी जातो, तेव्हा त्याची पत्नी अ‍ॅव्हान त्याच्या नकळत त्याची सौम्यपणे उलटतपासणी घेते. तिला दिलेल्या कबुलीनुसार दुपारी के.सी. दुपारी एका महत्त्वाच्या मिटिंगला जाऊ शकलेला नसतो, कारण त्याच्या जवळच्या मित्राला, झेडला बरं वाटत नसतं. के.सी. त्याला डॉक्टरकडे घेऊन जातो वगैरे. या परिस्थितीचा फायदा घेऊन के.सी. आजच्या काळात, मैत्री मित्रकर्तव्य वगैरे गोष्टींबद्दल नैतिक पातळीवरून छानसं भाषणही ठोकतो. त्याचं हे नैतिक मूल्यांनी भरलेलं भाषण संपल्यावर अ‍ॅव्हान के.सी.ला सांगते की, आज दुपारी झेडचा घरच्या लँडलार्इनवर फोन आला होता! हे ऐकल्यावर के.सी.ची कमालची भंबेरी उडते, पण जातिवंत खोटारडा असल्यामुळे तो निर्लज्जपणे किल्ला लढवत राहतो.

यथावकाश ते लोनावळ्याला जातात. तिथं अपेक्षित गोंधळ सुरू होतो. आधी लव्हलीनच्या नवऱ्याचा म्हणजे झेडचा फोन येतो. त्याला संशय येऊ नये म्हणून लव्हलीन के.सी.ला झेडशी तिच्या म्हाताऱ्या आत्याच्या आवाजात बोलायला लावते. हे संकट तात्पुरतं टळतं तर थोड्याच वेळात के.सी.च्या पत्नीचा फोन येतो. के.सी. काही तरी थातुमातुर बोलून तिची बोळवण करतो.

दुसऱ्या दिवशी के.सी.व झेड जेव्हा एकत्र टेनिस खेळून झाल्यावर गप्पा करतात, तेव्हा झेड काल लँडलार्इनवर केलेल्या फोनचं कारण सांगतो. के.सी. मात्र विचित्र मानसिकतेत हेलकावे खात असतो. अचानक त्याला थोडासा पश्चाताप व्हायला लागतो की, आपण आपल्या अतिशय चांगल्या मित्राच्या पत्नीबरोबरच भानगड करत आहोत. के.सी.ला त्यातल्या त्यात समाधान एवढंच की, गेली काही महिने तो झेडला टेनिसमध्ये सातत्यानं हरवत असतो.

के.सी.च्या मनात थोडी पश्चातापाची भावना असल्यामुळे तो झेडच्या नोकरीसाठी खास प्रयत्न करण्याचं आश्वासन देतो. त्यांच्या इकडच्या-तिकडच्या गप्पा सुरू होतात, पण दोघांत एक सूक्ष्म तणाव असतो. के.सी.ला संशय येतो की, लव्हलीननं झेडजवळ त्यांच्या अफेअरबद्दल कबुली दिली की काय? तो रागारागानं तिला तिच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटतो. ती झेडला सांगितल्याची कबुली देते, कारण ते लोनावळ्याला गेलेले असताना झेड तिला फोन करण्याआधी तिच्या आत्याशी बोललेला असतो. असा ठसठशीत पुरावा समोर आल्यावर लव्हलीनला कबुली देण्यावाचून पर्यायच नसतो.

याचा के.सी.वर वेगळाच परिणाम होतो. तो म्हणतो की, म्हणजे आज सकाळी झेड माझ्याबरोबर टेनिस खेळत होता, नंतर गप्पा करत होता, तेव्हा त्याला माहिती होतं की, माझे लव्हलीनशी अनैतिक संबंध आहेत. आता मात्र के.सी.ला अतिशय जवळच्या मित्राला फसवल्याच्या पापाचं ओझं सहन होत नाही. तो झेडला भेटायला जातो. पण त्याला कळत नाही की, ही कबुली द्यायची तरी कशी? तो गोलगोल फिरत राहतो, पण त्याला मार्ग दिसत नाही. शेवटी झेडच त्याला सांगतो की, त्याला के.सी व लव्हलीनच्या अफेअरबद्दल बऱ्याच दिवसांपासून माहिती होतं.

मग तो गप्प का बसला? तर त्याच्या मते के.सी. त्याच्यावर सूड उगवण्यासाठी हे सर्व करत होता. सूड उगवण्यासाठी? म्हणजे झेडचं के.सी.च्या पत्नीशी, अ‍ॅव्हानशी अफेअर? के.सी.प्रमाणेच प्रेक्षकांचंसुद्धा डोकं गरगरायला लागतं. एवढंच नव्हे तर झेड त्याला सांगतो की, त्यांचं अफेअर गेली दीड वर्षं सुरू आहे. के.सी.ला आठवतं की, गेलं दीड वर्षं झेड टेनिसमध्ये के.सी.शी सतत हरत असतो. झेड त्याला सांगतो की, तो के.सी.ला मुद्दामच जिंकू द्यायचा, एक प्रकारची नुकसान भरपार्इ म्हणून.

रागानं पिसाळलेला के.सी. घरी जाऊन अ‍ॅव्हानला जाब विचारतो. ती तडकाफडकी नाकारते व के.सी.नं विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं तार्किक, सुसंगत उत्तर देते. के.सी.ला आता वाटायला लागतं की, झेड त्याच्याशी मुद्दामहून खोटं बोलत होता. मनावरचं ओझं उतरलेला के.सी. नंतर अ‍ॅव्हानला सांगतो की, झेडला चांगली नोकरी लागली आहे व तो लवकरच सिंगापूरला जाणार आहे. हे ऐकताच अ‍ॅव्हान ‘काय?’ अशी जोरात किंचाळते. के.सी.ची नजर चुकवून झेडला फोन करण्याचा प्रयत्न करते. इथं नाटक संपतं.

केवळ चारच पात्रं असलेलं हे नाटक जरी नाटककारानं विनोदी पद्धतीनं लिहिलेलं असलं तरी यातला खोल, धारदार आशय लपत नाही. नाटकात अनेक ठिकाणी के.सी.च्या तोंडी नाटककारानं संवाद टाकले आहेत की, सतत खरं बोलणे गरजेचं आहे का? नेहमी सत्य बोललं तर जगणंच अशक्य होऊन बसेल वगैरे.

के.सी.च्या भूमिकेत असलेल्या नसीरच्या अभिनयाबद्दल नव्यानं काय लिहावं? नसीरनं के.सी.सारख्या भूमिका फारशा साकार केलेल्या नाहीत. म्हणूनच अशा भूमिकेत नसीरला पाहणं हा एक वेगळाच अनुभव होता. के.सी.ची मूलभूत लबाडी, त्यातही एक विचित्र प्रकारच्या नैतिकतेची अपेक्षा ठेवणं, झेड व अ‍ॅव्हान यांनी किती सफार्इनं त्याचा मामा केला, या प्रसंगातील त्याचा अभिनय केवळ लाजवाब. त्याला श्रुती व्यास (लव्हलीन), अवंतिका आकेरकर (अ‍ॅव्हान) आणि गौरव शर्मा (झेड) यांनी तितकीच तोलामोलाची साथ दिली आहे. दर्जेदार अभिनयाच्या संदर्भात असं टीमवर्क विरळा.

या नाटकाचं दिग्दर्शन नसीरुद्दीन शहा आणि रत्ना पाठक-शहा यांनी संयुक्तपणे केलं आहे. त्यांनी नाटकाची प्रकृती फार्सिकल असल्याचं अचूक ओळखून नाटकाला एक वेगळीच गती दिली आहे. या नाटकाच्या सहदिर्ग्दशक आर्घ्या लाहिरी आहेत. त्यांनीच या नाटकाची प्रकाशयोजना सांभाळली आहे. त्यांच्या मदतीला राहुल राय आहेत. नेपथ्य जयराज पाटील यांचं तर ध्वनियोजना साहिल वैद्य यांची आहे.

हे एक वेगळ्याच प्रकारचं नाटक आहे. यात नाटककारानं ‘विवाहबाह्य संबंध’ हा वादग्रस्त विषय घेऊन एका वेगळ्याच विषयाची मांडणी केली आहे. तो म्हणजे सत्य काय असतं आणि ते नेहमीच सांगितलं पाहिजे का? सांगण्याची गरज असते का?

.............................................................................................................................................

लेखक प्रा. अविनाश कोल्हे मुंबईमध्ये अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत.

nashkohl@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......