मराठ्यांना जागं करू पाहणारी संस्था
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
श्याम देशपांडे
  • अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचं संस्थेचं बोझचिन्ह आणि पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Sat , 22 October 2016
  • श्याम देशपांडे Shyam Deshpande अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद Akhil Bharatiya Maratha Shikshan Parishad

डॉ. सौ. शोभा बाळासाहेब इंगवले यांनी लिहिलेलं ‘अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद, स्वरूप आणि कार्य’ हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. हे पुस्तक लिहून लेखिकेनं एक महत्त्वाचं काम केलं आहे. सध्या महाराष्ट्रात मराठा समाजामध्ये मोठी घुसळण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर या पुस्तकाचं महत्त्व अधिकच आहे.

इतिहासाची जाणीव आपल्याकडे पूर्वीपासूनच फार कमी असलेली दिसते. महाराष्ट्राचा सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक ठेवा अत्यंत संपन्न असला तरी त्याची ओळख करून देणं आपल्याला फारसं पसंत पडत नाही. खरं तर कोणाचाही इतिहास हा त्या त्या काळातील माणसांच्या कर्तृत्वाचा लेखाजोखा असतो. त्यामुळे या इतिहासातून त्या त्या वेळी त्या त्या माणसांनी केलेलं कार्यकर्तृत्व अभ्यासता येतं. परंतु असं दस्ताऐवजीकरण करण्यात आपण कमी पडतो. त्यामुळे आपला हा संपन्न वारसा फारसा लोकांपुढे येत नाही. इंगवले यांनी मात्र अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या स्वरूप आणि कार्याविषयी लिहून एक चांगलं संदर्भ पुस्तक वाचकांच्या हाती दिलं आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला आपल्या पूर्वजांनी केलेल्या उज्ज्वल कार्याची ओळख तर होतेच, पण त्यांचं कार्यकर्तृत्वही लक्षात येतं.

महात्मा जोतीराव फुले, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी वि.रा.शिंदे आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यापासून प्रेरणा घेऊन अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेची अधिकृत स्थापना १९०७ मध्ये झाली. शिक्षणाचा प्रसार आणि समाजाची उन्नती हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून ही परिषद स्थापन करण्यात आली. तिच्या कार्याचा परिचय नवीन पिढीला व्हावा आणि ही पिढी कुणाच्या खांद्यावर उभी आहे, हे कळावं या उद्देशानं इंगवले यांनी या पुस्तकाचं लेखन केलं आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद ही संस्था अतिशय महत्त्वाची समजली जाते. म. फुले आणि शाहू महाराज यांच्या प्रेरणेतून या संस्थेची स्थापना झाली असली तरी पुढे डॉ. पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील, मामासाहेब जगदाळे, भाऊसाहेब हिरे, काकासाहेब वाघ इत्यादींनी त्यापासून प्रेरणा घेऊन बहुजन समाजाचा विकास घडवून आणण्याचं महत्त्वाचे कार्य केलं आहे. आज या संस्था महाराष्ट्राच्या वैभवात भर टाकणाऱ्या ठरल्या आहेत. 

इंगवले या अ.भा.म.शिक्षण परिषदेच्या पुणे येथील श्री शाहू मंदिर महाविद्यालयाच्या प्राचार्या आहेत. त्यांनी अ.भा.म.शिक्षण परिषदेनं केलेलं काम अतिशय जवळून अनुभवलेलं आहे. त्यामुळे याच विषयावर त्यांनी आधी प्रबंध लिहिला. प्रस्तुत पुस्तक  हे त्याचंच पुस्तकरूप आहे. पाच प्रकरणं आणि तीन परिशिष्टं असा २४० पानांचा भरगच्च मजकूर असलेलं हे पुस्तक आहे. अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेची स्थापना होण्यापूर्वीची पार्श्वभूमी सुरुवातीलाच लेखिकेनं सांगितलेली आहे. म.फुले यांच्या सत्यशोधक चळवळीतून बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी लढणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांची फौज निर्माण झाली. या सर्वांच्या एकत्रिकरणासाठी आणि अधिक व्यापक व प्रभावी सामाजिक विकास करण्यासाठी अ.भा.म. शिक्षण परिषदेची आवश्यकता भासू लागली. श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनीही बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसाराकडे लक्ष दिलं. फुल्यांपासून प्रेरणा घेऊन पुण्यातील नामवंत वकील भाऊसाहेब म्हस्के यांनी मराठा समाजात शिक्षणाच्या प्रसारासाठी ‘डेक्कन असोसिएशन’ची १८५८ ला स्थापना केली. इथपासून ते पुढे अ.भा.म.शि.परिषदेची स्थापना होईपर्यंतचा थोडक्यात इतिहास या पुस्तकात आलेला आहे.

अ.भा.म.शि.परिषदेची स्वरूप, वाटचाल, वैचारिक दिशा आणि कार्य या चार प्रकरणांत विस्तृत चर्चा करण्यात आलेली आहे. या पुस्तकामध्ये मी, अ.भा.म.शि.परिषदेची पार्श्वभूमी; ‘शिक्षण’ व ‘मराठा’ शब्दांची व्यापकता, संस्थेवरील सत्यशोधक विचारांचा प्रभाव, अधिवेशनाच्या माध्यमातून संस्थेनं केलेलं कार्य यांचा थोडक्यात आढावा घेतला आहे. ‘ही संस्था म्हणजे शैक्षणिक, सामाजिक परिवर्तनासाठी निर्माण झालेली एैतिहासिक चळवळ होती आणि शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाचा प्रसार होणं हा तिचा उद्देश होता’ असं लेखिकेनं आपल्या मनोगतात म्हटलं आहे. प्रस्तुत पुस्तकाला सुप्रसिद्ध साहित्यिक, ग्रामीण साहित्य चळवळीचे भाष्यकार डॉ. वासुदेव मुलाटे यांची दीर्घ प्रस्तावना लाभलेली आहे. त्यात डॉ. मुलाटे यांनी अ.भा.म.शि.परिषदेच्या संपूर्ण कार्याचा आढावा घेऊन या संस्थेनं केलेलं कार्य किती महत्त्वाचं आहे हे विषद केलेलं आहे. ‘‘अ.भा.म.शि.परिषदेच्या स्थापनेची पार्श्वभूमी म्हणजे एका समान ध्येयानं प्रेरित होऊन मराठा समाज बांधवांनी केलेली ती एक सामाजिक परिवर्तनाची चळवळच होती. कोणतीही चळवळ ही अन्याय, अत्याचार, शोषण, सकारण अभावग्रस्तता, परिवर्तनाची आवश्यकता, नवनिर्मितीची, क्रांतीची आस या निर्माण होते. ती जशी एक नकारात्मक, विरोधात्मक, सामूहिक, सांघिक प्रतिक्रिया असते, तशीच ती समूहगटाच्या, समाजगटाच्या आत्मभानातून केलेली कृती असते. चळवळीमध्ये अनेकांचा मिळून एक विचार एक ध्येय एक आवाज अपेक्षित असतो. चळवळीत विचार महत्त्वाचा असतो,’’ असं डॉ. मुलाटे यांनी आपल्या प्रस्तावनेत नमूद करून अ.भा.म.शि.परिषदेच्या झालेल्या संपूर्ण अधिवेशनाचं, तिथं झालेल्या भाषणांचं सविस्तर विश्लेषण केलं आहे.

१९०७-१९७४ या कालावधीत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर अ.भा.म.शि.परिषदेची एकंदर ३५ अधिवेशनं झाली. या अधिवेशनातील स्वागताध्यक्षांपासून ते अधिवेशनाच्या अध्यक्षांपर्यंत सर्वांनी अतिशय मूलभूत विचार मांडले. लेखिका म्हणते, ‘‘ही अधिवेशने अत्यंत नियोजनपूर्वक, महत्त्वाच्या विषयांना प्राधान्य देवून घेण्यात आली. या अधिवेशनातून तत्कालीन सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, वाङ्ममयीन, भावनिक वास्तवावर प्रकाश टाकून वर्तमान स्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यकालीन बहुजन समाजाच्या विकासासाठी करावयाच्या प्रयत्नांवर भर देण्यात आला आहे. अधिवेशनात विविध क्षेत्रांतील विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते प्रतिभावंत असल्यामुळे संस्थेच्या रचनात्मक कामाला नवी दिशा मिळाली. त्यामुळे त्या अधिवेशनातील विचारांना अतिशय महत्त्व प्राप्त झाले.’’

३० डिसेंबर १९०७ मध्ये खासेराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पहिलं अधिवेशन पार पडलं. यावेळी कोल्हापूरचे भास्करराव विठोजीराव जाधव हे स्वागताध्यक्ष होते, तर मुंबईमध्ये येथे १९ जानेवारी १९७४ ला पार पडलेल्या ३५ व्या अधिवेशनाचे अध्यक्ष लोकनेते बाळासाहेब देसाई होते. या सर्व अधिवेशनांतील स्वागताध्यक्षांपासून ते अध्यक्षापर्यंतच्या सर्वांच्या भाषणाची नोंद घेऊन त्यांनी मांडलेल्या विचारांची दखल घेतली आहे.

पुस्तकाच्या शेवटी काही परिशिष्टं दिलेली आहेत. अ.भा.म.शि.परिषदेच्या अधिवेशनांची सूची आणि अ.भा.म.शि.परिषद पुणे या संलग्न शाखेचा परिचय त्यात दिला आहे. एका उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन एका विशाल समाजाला जागं करण्याचं अवघड काम अ.भा.म.शि.परिषदेच्या मंडळींनी केलं आहे. आज वर्तमानातील परिस्थितीचा विचार केला तर खेड्यापाड्यांतून विविध प्रकारच्या शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालयं आणि शिक्षण केंद्रं मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहेत. या संस्थांमधून विविध प्रकारचं शिक्षणही देण्यात येतं. प्रस्तावनाकार डॉ. वासुदेव मुलाटे यांच्या मनात जो प्रश्न निर्माण झाला तोच प्रश्न माझ्याही मनात निर्माण होतो. तो म्हणजे, अ.भा.म.शि.परिषदेच्या कार्यकर्त्याजवळ जी समाज जाणीव आणि निष्ठा होती तेवढी आणि तशीच या नव्या संस्थापकांकडे असेल का? तिथं शिक्षण घेणाऱ्या नव्या पिढीला आपल्यासाठी श्रम करणाऱ्या आधीच्या पिढीबद्दल माहिती असेल का? या प्रश्नांची जाणीव करून देणारं हे महत्त्वाचं पुस्तक आहे. ते मराठा समाजातील मुलांनी अवश्य वाचायला हवं.

अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद : स्वरूप व कार्य - डॉ. सौ. शोभा बाळासाहेब इंगवले, स्वरूप प्रकाशन, औरंगाबाद, पाने – २४०, मूल्य – ४०० रुपये.

 

लेखक मराठवाड्यातील ग्रंथप्रेमी व स्तंभकार आहेत.

deshpande.shyam07@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......