कॅथरिन मेयो आणि महात्मा गांधी
सदर - गांधी @ १५०
अलका गाडगीळ
  • महात्मा गांधी आणि कॅथरिन मेयो
  • Tue , 02 October 2018
  • सदर गांधी @ १५० Gandhi @ 150 महात्मा गांधी Mahatma Gandhi कॅथरिन मेयो Katherine Mayo मंदिर इंडिया Mother India

२ ऑक्टोबर २०१९ रोजी म. गांधी यांची १५०वं जयंती वर्षं साजरं केलं जाईल. या जयंती वर्षाला आजपासून सुरुवात होत आहे. त्याचं निमित्त साधून वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमानं २१-२२ फेब्रुवारी २०१७पासून ‘गांधी १५० जयंती अभियान’ सुरू केलं आहे. (२२ फेब्रुवारी हा गांधींच्या पत्नी कस्तुरबा यांचा स्मृतिदिन असतो.) या अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम केले जात आहेत. त्याला प्रतिसाद म्हणून ‘अक्षरनामा’वर दर महिन्याच्या दोन तारखेला गांधींविषयी एक लेख प्रकाशित केला जातो… या मालिकेतला हा सत्ताविसावा लेख ...

.............................................................................................................................................

भारतात सतत स्वच्छता अभियानं चालवावी लागतील असं अनुमान कॅथरिन मेयो या अमेरिकन संशोधक-लेखिकेनं व्यक्त केलं होतं. मेयो १९२५ साली भारतात आल्या, सहा महिने राहिल्या आणि अनेक राज्यांचे त्यांनी दौरे केले. भारतातल्या फिरस्तीवर आधारलेलं ‘मदर इंडिया’ हे त्यांचं पुस्तक त्यानंतर दोन वर्षांनी प्रसिद्ध झालं. भारतात मात्र ते ‘कुप्रसिद्ध’ झालं.

या पुस्तकाची कोरी प्रत अनेक वर्षं घरी पडली होती. दोन वर्षांपूर्वी मृणालिनी सिन्हा यांचं ‘स्पेक्टर्स ऑफ मदर इंडिया’ नावाचं पुस्तक हाती पडलं. ते वाचल्यानंतर मेयोचं मूळ पुस्तक वाचावंच लागलं.

भारतातील स्वच्छता, मलमूत्रनिस्सारण, जातीव्यवस्था, दलित आणि स्त्रियांवरील अत्याचार, सतीप्रथा, बालविवाह, बाळंतपणं, बाल आणि माता मृत्यु, शिक्षणाची स्थिती, भारतातल्या भाषा, सार्वजनिक आरोग्य, संसर्गजन्य रोग, आणि रोगट वातावरणासंबंधीची चर्चा या पुस्तकात आहे.

मेयो ज्या काळात भारतात आल्या, त्या काळात महात्मा गांधींच्या कामाला बहर आला होता. शिवाय गांधींनी ज्या मुद्यांवर काम करायला सुरुवात केली, त्याच मुद्यांचा मेयो यांनी मागोवा घेतला.

कोलकात्याच्या काली मंदिरातील प्रवेशानं पुस्तकाची सुरुवात होते. मंदिर परिसरातील गर्दी, बळी देण्याचे विधी, गाभा-यातील कालीची मूर्ती, तिची बाहेर आलेली जीभ, जिभेतनं टपकणारे रक्ताचे थेंब, तिच्या हातातलं मुंडकं आणि तिथं जमलेल्या हजारो भक्तांची गर्दी पाहून मेयोंच्या प्रोटेस्टंट ख्रिश्चन संवेदनांना धक्का बसला असणार. मेयोबाई कडव्या प्रोटेस्टंट. इतर धर्मांबद्दल त्यांना अनास्था होती. कॅथलिक पंथीयांना अमेरिकेनं आसरा देऊ नये अशी मोहीम त्यांनी सुरू केली होती.

काली मंदिरातील घडामोडींचं त्यांचं वर्णन हेच भाष्य आहे. मंदिरातील लोटालोटी, चिकचिकाट आणि बळी देण्याच्या प्रथेवर थेट टिपणी न करताही त्यांचं म्हणणं वाचकांपर्यंत पोचतं.

काली मंदिरात बळी देण्याचा विधी चालू असताना आजूबाजूची भटकी कुत्री रक्ताचा वास लागल्यामुळे तिथं दाखल होतात. खाली पडलेलं रक्त चाटू लागतात. गर्दीतून वाट काढत एक स्त्री पुढे येते, आपल्या कमरेला खोचलेल्या कपड्यानं खाली पडलेलं रक्त ती पुसून घेते आणि कपडा ओच्यांमध्ये ठेवून देते.

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_list_by_category

...............................................................................................................................................................

मंदिराच्या समोर असलेल्या घाटावर एका ओलेत्या बाळंतिणीला अग्नी दिला जातो. तिचा पाच वर्षांचा मुलगा ही क्रियाकर्मं करत असतो. प्रसूतीदरम्यान या तरुणीचा अणि तिच्या बाळाचा मृत्यू झालेला असतो.

मंदिराचे मालक हालदार यांची मेयो भेट घेतात. कालीचे बहुसंख्य भक्त ब्राह्मणेतर का असतात, या विषयी त्यांची चर्चा होते. मेयोंनी जातीव्यवस्था आणि धार्मिक चालीरीतींबद्दल वाचन केलेलं असतं. स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी कार्यकर्ते, समाजसुधारक, डॉक्टर, नर्सेस, शिक्षक, भट-भिक्षुक, ब्राह्मणेतर, दलित चळवळीतील कार्यकर्ते, चर्च, ख्रिश्चन धर्मगुरू आणि सरकारी अधिकाऱ्यांसोबत त्या ठिकठिकाणी चर्चा करतात. गांधींनाही त्या भेटतात.

‘धर्म आणि संस्कृती वगळता सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, प्लेग, कॉलरा, कावीळ अशा साथीचे रोग, तसंच मातामृत्यू, बाळंतपणादरम्यान होणारे मृत्यू आणि अर्भकमृत्यू रोखण्यासाठीच्या उपाययोजना समजून घेणार आहे’, असं पत्र मेयोंनी तत्कालीन सरकारला पाठवलं होतं. पण प्रत्यक्षात हे सारे मुद्दे धर्म आणि संस्कृतीशीही जोडलेले असतात, हे लक्षात यायला वेळ लागत नाही.

भारतात आल्यावर त्या ज्येष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना भेटल्या. अनेक वर्षांच्या प्रशासकीय अनुभवातून शहाणपण आलेल्या एका ब्रिटिश अधिकाऱ्यांनी मेयो यांना समजुतीच्या चार गोष्टी सांगितल्या- ‘काही झालं तरी ढोबळ निष्कर्ष काढू नको. हा देश प्रचंड मोठा आहे. प्रत्येक ठिकाणचं वेगळेपण असतं, ते पाहण्याचा प्रयत्न कर. मद्रास, कलकत्ता आणि पेशावरमध्ये काडीचंही साधर्म्य नाही. सरसकट विधानं तू केलीस तर तुझ्यावर अब्रनुकसानीचे खटले या ना त्या कोर्टात नक्की उभे राहतील’. 

सतीप्रथेबद्दल बंगालमधल्या एका हिंदू पंडिताशी त्यांची चर्चा झाली होती. ‘पती पत्नीला दु:ख देण्याचं काम करतो. त्यामुळे पत्नी आपल्याला विष घालेल अशी भीती पुरुषांच्या मनात असते. म्हणून आमच्या शहाण्या पूर्वजांनी स्त्रियांना शिक्षा द्यायचं ठरवलं’. ही भीषण मांडणी ऐकून कोणाचंही रक्त खवळेल. मेयो यांना धक्का बसला याचं आश्चर्य वाटायला नको.

मेयो पुढे अनेक भीषण सत्यांचा पाठपुरावा करतात.

भारतात या पुस्तकाचं स्वागत झालं नाहीच, उलट मेयोंच्या विधानांचं खंडन करणारी दोन-चार पुस्तकं प्रकाशित झाली. त्याच काळात भारतीय घटनेचा अभ्यास करण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटनं सायमन कमिशन गठित केलं होतं. या समितीत एकही भारतीय नव्हता. या ‘सर्व गोऱ्या’ समिती विरोधात मोठं आंदोलन उभं राहिलं होतं. गांधी अर्थातच या आंदोलनाच्या केंद्रस्थानी होते.

या पार्श्वभूमीवर मेयो यांचं इथं येणं आणि त्यांनी भारतातल्या सर्व जटील प्रश्नांची मुळं हिंदू धर्माच्या कर्मकाडांत आहेत असा निष्कर्ष काढणं भारतीयांना पटलं नाही. त्यांचा वृत्तांत साम्राज्यप्रणित असल्याचा अनेकांनी दावा केला होता. शिवाय स्त्रियांची स्थिती, सतीप्रथा, विधवांची स्थिती, विधवाविवाह, मुलींचं शिक्षण, बालविवाह, सार्वजनिक स्वच्छता, दलित प्रश्न यासंबंधी एतद्देशीयांनी मोठं काम केलं होतं आणि हे कार्य तेव्हाही सुरू होतं. त्यांची काडीचीही दखल मेयो यांनी घेतली नाही. भारतीयांनी भारताच्या डाव्या बाजूबद्दल बोलणं आणि एका परदेशी व्यक्तीनं त्यावर दुर्बीण रोखणं, यात फरक असतो असं मत अनेक अभ्यासकांनी व्यक्त केलं आहे. या पाहणीमागच्या उद्देशांवर गांधी आणि इतर अनेक नेत्यांनी प्रश्न उपस्थित केला.

‘ड्रेन इन्स्पेक्टर्स रिपोर्ट’ असं गांधींनी या पुस्तकाचं वर्णन केलं. ‘देशातल्या गटारांची तपासणी करण्यासाठी या ड्रेन इन्स्पेक्टरला ब्रिटिश सरकारनं पाठवलंय. हे काम मेयोंनी उत्तमरीत्या पार पाडलं. त्यांच्या रिपोर्टमधून गटाराचा दुर्गंध येतोय’, असं त्यांनी म्हटलं होतं.

मेयो यांच्या पुस्तकामुळे सुरू झालेल्या सार्वजनिक चर्चेची निष्पत्ती पहिला बालविवाह प्रतिबंध कायदा पारित करण्यात झाली, असा युक्तीवाद मृणालिनी सिन्हा यांनी ‘स्पेक्टर्स ऑफ मदर इंडिया’ या आपल्या पुस्तकात केला आहे. हा कायदा १९२९मध्ये परित करण्यात आला

भारतासमोरील धार्मिक आणि सामाजिक आव्हानं रूढी-परंपरांमधून निपजली आहेत, हे अटळ सत्य आहे. हा विचार भारतीय संतांनी आणि समाजसुधारकांनी वेळोवेळी मांडला होता. १९२७ साली या प्रश्नांची जोडणी पारतंत्र्याशी करण्यात आली. समाजसुधारणा वसाहतवादी सरकारच्या अडथळ्यामुळे घडून येत नाही, असा विचार तेव्हा मांडला गेला.

लोकमान्य टिळांकांनीही आधी स्वातंत्र्य आणि नंतर समाजसुधारणा हा मार्ग स्वीकारला होता. गांधींनी मात्र स्वातंत्र्य चळवळीसोबत समाज आणि व्यक्तींच्या नैतीकतेविषयी मांडणी करायला सुरुवात केली होती. १९३२सालापासून पुढील चार वर्षं अस्पृश्यताविरोधी मोहिमेत गांधी गुंतले होते. अनेक राज्यांना त्यांनी भेटी दिल्या, ठिकठिकाणी बैठका घेतल्या आणि कर्मठ हिंदूंबरोबर चर्चा केल्या.

दांडीयात्रेला जेवढी प्रसिद्धी मिळाली, तेवढी अस्पृश्यता विरोधी यात्रेला मिळाली नाही, असं मत रामचंद्र गुहा या ख्यातनाम इतिहासकार-लेखकांनी व्यक्त केलं आहे. ‘गांधी : द इयर्स दॅट चेंज्ड् द वर्ल्ड’ हे रामचंद्र गुहांचं अभ्यासपूर्ण पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे.

गांधींनी बालविवाह, बालविधवा आणि विधवाविवाहासंबंधी लिखाण केलं आहे. या मानवताविरोधी रूढींवर त्यांनी हल्ला चढवला होता. या तुलनेत संमतीवयाच्या कायद्याविरोधातील टिळकांची भूमिका तपासावी. स्वातंत्र्य मिळाल्यावर समाजसुधारणा करू हा विचार आगरकरांना मान्य नव्हता आणि गांधींनाही.

१९३० नंतर गांधी अस्पृश्यता निवारण, आंतरजातीय विवाह, सार्वजनिक स्वच्छता, ग्रामस्वराज आणि इतर अनेक विषयांत गुंतले गेले. १९३० पासून त्यांनी काँग्रेसच्या दैनंदिन कार्यातून अंग काढून घेतलं आणि १९३४ साली त्यांनी काँग्रेसचा राजीनामाही दिला.

मेयो यांची काही निरीक्षणं आजही लागू पडतात. सतीप्रथेवर बंदी आली असली तरी या रूढीचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो, त्याचं छुप्या पद्धतीनं समर्थनही केलं जातं. संजय लीला भन्सालींच्या ‘पद्मावत’ सिनेमात महाराणी पद्मिनी आणि इतर दरबारी स्त्रियांचा जोहार गाजवण्यात आला आहे. या सर्व स्त्रिया आनंदानं आगीकडे चालत जातात असं दृश्य आहे. नवरा गेल्यानंतर स्त्रीचं अस्तित्व राहू नये, तिला जगायचा अधिकार नाही असं या प्रथेतून प्रतित होतं. दुसरीकडे पत्नी  पतीची गुलाम नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं आपल्या व्याभिचारविरोधी कायद्यावरील निकालात दिला आहे. या दोन्ही घटना भारताबद्दल सरकसट विधान करू शकत नाही, या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या म्हणण्याला दुजोरा देणाऱ्या आहेत.

भारतातल्या सार्वजनिक शिक्षणातील भारतीयांच्या योगदानावर मेयोंनी ताशेरे ओढले होते. शाळांची अल्प संख्या, मुलींच्या शिक्षणाची हेळसांड आणि शिकलेले तरुण गावात शिक्षणाचं कार्य न करता शहरात राहून सरकारची चाकरी करतात, हे पाहून त्यांना धक्का बसला होता.

शिकलेल्या काही तरुणांना त्यांनी यासंबंधी प्रश्न केला. गावात शिक्षणाचं कार्य का करत नाही, असं विचारल्यावर ‘शाळा काढणं सरकारचं काम आहे’ असं उत्तर त्यांना मिळालं. ‘त्या शाळेत तुम्ही शिकवायला जाल का?’ यावर ‘नाही’ असंच सरसकट उत्तर त्यांना मिळालं होतं.

१९२३ साली शहरी लोकसंख्या फक्त आठ टक्के होती. ९२ टक्के जनता गाव आणि खेड्यात राहत होती. इंग्रजी शिक्षणाचा फायदा मिळालेल्या वर्गानं गावात जाऊन आपली जबाबदारी उचलली नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

मेयोंची टिपणी वाचताना आज संताप येण्याची शक्यता नाही. मेयोंच्या उद्देशांबद्दल शंका घेता येतील, पण त्यांनी मांडलेल्या तथ्यांवर विचार व्हायला हवा होता.

मेयोंनी गांधींनाही हा प्रश्न विचारला होता. गांधींच्या उत्तरानं त्या विचलित झाल्या होत्या. ‘शेतकरी प्रामाणिकपणे कष्ट करून आपली भाकरी कमावतो. त्याला अक्षरओळख झाली तरी काय फरक पडणार आहे? त्याच्या आनंदात भर पडणार आहे का?’ गांधींच्या या उत्तरांचं आजही आश्चर्य वाटतं. पण स्थानिक संदर्भांशी आणि स्थानिक ज्ञानाशी जोडलेलं शिक्षण मिळायला हवं हा विचार पुढे आला. गांधी ज्या प्रकारच्या शिक्षणाबद्दल बोलत होते, त्या काळात हा विचार प्रचलित नव्हता. शिवाय ठिकठिकाणचे स्थानिक संदर्भ वेगळे असतात, त्या प्रकारची पाठ्यपुस्तकं आणि प्रशिक्षित शिक्षक आणायचे कोठून हा प्रश्न आजही सुटलेला नाही.

‘या देशाची सूत्रं हाती मिळाली तर मी सर्व विद्यापीठं बंद करीन. भारतीय तरुणांना क्लार्क आणि सरकारी बाबू, वकील आणि राजकीय नेता बनवण्यासाठी शिक्षण देणं चुकीचंच होतं. अन्न निर्माण करायला शिकवण्याच्या आधी दुसरं कोणतंही शिक्षण देऊ नये’, भारतात अनेक वर्ष शिक्षणाचं काम करणाऱ्या एका अमेरिकन मिशनरीनं मेयोंना सांगितलं होतं.

मेयोंनी भारतातल्या असंख्य हॉस्पिटलमधील स्त्रियांच्या वॉर्डला भेटी दिल्या. तिथं प्रसुतीसाठी आलेल्या सर्व महिला अल्पवयीन होत्या. प्रसूतीदरम्यान अनेकजणी प्राण गमावायच्या. या हॉस्पिटलांत नर्सची चणचण डॉक्टरांना भासत होती. नर्सिंगचं शिक्षण घ्यायला दलित मुलीच फक्त तयार होतात आणि आज त्याच महिलांचे जीव वाचवण्यात आम्हाला मदत करतात, असं डॉक्टरांनी आवर्जून सांगितलं.

दलितांना करावी लागणारी कामं आणि त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांची विस्तृत चर्चा मेयोंनी केली आहे. गांधींबद्दल त्यांनी फारसे उदार उद्गार काढले नाहीत.

विधवांच्या जीवनासंबंधीची अत्यंत विस्तृत मांडणी मेयो यांनी केली.

गरिबीसाठी वासाहतिक सरकार जबाबदार आहे असं अनेकांनी मेयो यांना सांगितलं. हे मत त्यांना पटलं नाही. ब्रिटिशांनी शेतीत ढवळाढवळ केली. निर्वाहासाठी घेतल्या जाणाऱ्या पिकांवर बंदी आणून नगदी पिकं घेण्याची सक्ती केल्यामुळे शेतकऱ्यांची उपासमार झाली. या साऱ्या इतिहासाचा नकार मोयो करत होत्या, पण ब्रिटिश सरकारच्या दप्तरात असे असंख्य तपशील सापडतात.

मेयो यांना हे पटलं नाही याचं आश्चर्य वाटायला नको. त्या वर्णवर्चस्ववादी होत्याच, शिवाय धर्मवर्चस्ववादीही होत्या. अमेरिकन सरकारात अँग्लो सॅक्सन वंशांचं वर्चस्व असावं आणि सत्तेत अ‍ॅन्ग्लिकन चर्चचे नेतेच असावे, यासाठी छुपी मोहीम त्यांनी सुरू केली होती.

‘गरिबीबद्दल ब्रिटिशांना दोष कशाला द्यायचा? भारताची लोकसंख्या चोवीस कोटी; 1920 बमदेनेद्ध आणि भारतातील ब्रिटिश नागरिकांची संख्या फक्त 67ए432 असताना ब्रिटिशांमुळे गरिबी कशी येऊ शकते?’ असा प्रश्न त्यांनी आपल्या पुस्तकात उपस्थित केला आहे. ब्रिटिश साम्राज्यानं सर्वार्थानं लूट केली होती. लंडनच्या सरकारी खजिन्यात कोट्यवधी पाउंडची भर पडत होती, याची आकडेवारी ब्रिटिश इंडियाच्या दप्तरांत सापडते.

भारतातील पुरुषांसंबंधी विकृत विधानं मेयो यांनी केली. ‘दहा वर्षांची भारतीय मुलं हस्तमैथून करतात आणि तिशीपर्यंत त्यांची लैंगिक क्षमता संपुष्टात आलेली असते’.

वर्चस्ववादी मेयोंनी दलित, स्त्रिया आणि मुलांसाठी मात्र कळकळ दाखवली. सार्वजनिक स्वच्छतेबद्दलही त्यांची पाहणी अचूक होती.

गावागावात एकच नदी, नाला किंवा ओढा असतो. या पाण्याच्या स्त्रोताभोवतीच खूपसे मानवी व्यवहार चालतात. पाण्याजवळ लोकं शौच करतात, आंघोळ करतात, कपडे धुतात आणि पिण्याचं पाणी तेथूनच भरतात, हे पाहून मेयोंना धक्का बसला होता.

आजही हे चित्र दिसतं. पाण्याचे सर्व स्त्रोत मलीन झाले आहेत. भारतातील या व्यवहारांचं समर्थन होऊ शकत नाही. तसंच कोलमडलेल्या आरोग्य व्यस्थेचंही समर्थन होऊ शकत नाही.

१९३०च्या दशकांत बहुतांश प्रसुती घरीच व्हायच्या. त्यामध्ये अनेक अल्पवयीन मातांचे मृत्यू व्हायचे. राजस्थानात दाईने केलेली प्रसूती मेयोंनी पाहिली. ‘बाळंतीणीला अंधाऱ्या खोलीत नेण्यात आलं. तिथं आधीच खूप धूळ होती. मधोमध ठेवलेल्या बाजेची वीण सुटली होती. बाजेचे पायही डुगडुगत होते. मुलीला कळा सुरू झाल्यानंतर दाईला बोलावण्यात आलं. तिचे कपडे कळकट होते. तिनं प्रसूतीसाठी आणलेल्या घड्यांवर पुटं चढली होती. मुलीला मोडकळीस आलेल्या बाजेवर ठेवण्यात आलं. बाळ जन्मानंतर दाईने शेगडी पेटवली, कोळशात उद घातली आणि खोलीच्या चारही बाजूंनी शेगडी फिरवली’.

हे वर्णन अतिशयोक्त आहे असं आपल्याला वाटणार नाही. गावागावात हे असंच होत होतं. अस्वच्छता, डुगडुगणारी कॉट आणि बंदिस्त खोलीत कोळसे पेटवण्यामुळे मेयो कमालीच्या अस्वस्थ झाल्या होत्या. सुरक्षिततेच्या सर्व आडाख्यांना हरताळ फासणारी ही प्रथा होती.

जमीनदारांच्या मुली, ब्राह्मणांची पोरं, कडवे राष्ट्रवादी आणि युरोपीय वंशांचा तिरस्कार करणाऱ्या घातकी देशभक्तांना मिशनरी आपल्या शाळांमधून इंग्रजी शिक्षण देतायत. या मिशनरींना युरोपीय आणि अमेरिकन चर्चमधून भरघोस निधी मिळतो. आपले पैसे वापरून आपल्या विरोधातील राजकारण करणाऱ्यांना पैसा पुरवाला जातो असा शेरा त्यांनी पुस्तकात मारला आहे.

मेयो यांच्या पुस्तकाचं फारसं स्वागत अमेरिकेत झालं नाही. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या कहाण्यांनी आणि सत्याग्रहाच्या प्रयोगांनी अमेरिकन जनतेला मोहीत केलं होतं. गांधींच्या विचारांचा प्रभाव जगभर पडला होता. साम्राज्याची पाठराखण करणा-या या पुस्तकाला अनुल्लेखाने मारलं गेलं. ते विस्मृतीच्या गाळात गेलं होतं. पण गेल्या दोन दशकांपासून या पुस्तकाचा वेगवेगळ्या प्रकारांनी अभ्यास होतोय.

मेयोंना गांधी आवडत नसत, पण दलितांचा मुद्दा त्यांनी लावून धरला होता. भारतातील ईस्ट इंडिया कंपनी सरकार आणि नंतर आलेल्या ब्रिटिश सरकारांनी जातीयवादाचे लाड पुरवले नाहीत. १८५४ मध्ये काढलेल्या आदेशात कंपनी सरकारने म्हटलं होतं- सरकारी शाळा, महाविद्यालयं आणि इतर आस्थापानांत जातीच्या आधारावर कोणालाही प्रवेश नाकारला जाणार नाही. हा नियम त्यांनी साम्राज्याचा अस्त होईपर्यंत पाळला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांना- सुभेदार रामजी आंबेडकरांना सैन्यात नोकरी मिळाली होती आणि बढतीही मिळाली होती.

भारतीय समाजाने नाकारलेल्या, ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या आणि इंग्रजी शिक्षणामुळे प्रबुद्ध झालेल्या दलित मुलीच शिक्षिका, नर्स आणि डॉक्टर होतील आणि समाजाच्या उपयोगी पडतील. सवर्ण हिंदू समाजातील स्त्रियांना दास्यात ठेवलं आहे. त्यामुळे त्यांना शिक्षण दिलं जात नाही. पण ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या दलित मुली शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात आपली चमक दाखवतायत, हे सत्य मेयो यांनी जाणलं होतं.

मेयो साम्राज्याच्या पुरस्कर्त्या होत्या. वर्णवर्चस्ववादीही होत्या तरी दलित प्रश्न आणि स्त्रियांच्या शोषणासंबंधीची मांडणी करून त्यांनी ब्राह्मणी चौकटीला आव्हान दिलं होतं. मेयोंच्या पुस्तकामुळे डॉ. आंबेडकरांना एक प्रकारचं पाठबळ मिळालं, अशी मांडणी अमेरिकन आणि युरोपीय विद्यापीठांत होऊ लागली आहे.

.............................................................................................................................................

लेखिका अलका गाडगीळ मुंबईस्थित सेंट झेविअर महाविद्यालयाच्या झेविअर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्समध्ये अध्यापन करतात.

alkagadgil@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................