‘बलुतं’ ते ‘आयदान’
ग्रंथनामा - झलक
प्रा. प्रज्ञा दया पवार
  • ‘बलुतं’ आणि ‘आयदान’ या पुस्तकांची मुखपृष्ठे
  • Thu , 20 September 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक बलुतं Baluta दया पवार Daya Pawar उर्मिला पवार Urmila Pawar आयदान Aaydan

‘बलुतं’ हे मराठीतील पहिलं दलित आत्मकथन. त्यानंतर अनेक दलित आत्मकथनं लिहिली गेली, प्रकाशित झाली. तर अशा या ‘मदर ऑफ ऑल दलित ऑटोबायोग्रफीज’ ठरलेल्या आणि अनेक भारतीय व परदेशी भाषेतही अनुवादित झालेल्या ‘बलुतं’ला लवकरच (म्हणजे २४ डिसेंबर रोजी) ४० वर्षं पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं आज मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये एक दिवशीय संमेलन होत आहे.

‘बलुतं’ प्रकाशित झालं २४ डिसेंबर १९७८ रोजी आणि  त्यानंतर बरोबर २५ वर्षांनी, नोव्हेंबर २००३मध्ये उर्मिला पवार यांचं ‘आयदान’ हे आत्मकथन प्रकाशित झालं. त्यानिमित्तान दया पवार यांच्या कन्येनं लिहिलेल्या लेखाचं हे पुनर्मुद्रण...

.............................................................................................................................................

दया पवार यांचं ‘बलुतं’ ग्रंथालीनं प्रसिद्ध केलं तो दिवस होता २४ डिसेंबर १९७८. म्हणजे बघताबघता २५ वर्षं पूर्ण होत आली ‘बलुतं’ प्रसिद्ध होऊन. या २५ वर्षांच्या काळात मराठी साहित्याच्या पुलाखालून बरंच पाणी वाहिलं. यात मूलभूत, मौलिक, भरभक्कम असणारं ‘अनुभवजन्य’ ते टिकून राहिलं, ग्लोबलायझेशनच्या आजच्या काळातही ‘रेलेव्हंट’ असण्याचे संदर्भ थेटपणे वागवत.

या काळात खऱ्या अर्थानं वाहतं झालं, ते होतं अपमानबोधाच्या जाणिवेचं साहित्य. काय होतं नेमकं जातिव्यवस्थेच्या कराल उतरंडीत जगताना माणसांचं? त्यांच्या अस्तित्वाचं? अस्तित्वभानाचं? एकूणच मानवी संबंधांचं? त्याच्यासाठी झगडू पाहणाऱ्या चळवळींचं? चळवळीच्या ऱ्हासाचं?... असे अस्वस्थ करणारे, आतून हलवणारे, गाभ्याशी नेणारे प्रश्न गावकुसाबाहेरचं आयुष्य भोगलेल्या ‘दगडू मारुती पवार’ नावाच्या माणसाला कधीपासून पडलेले...

अर्थात या प्रश्नांमागे, संस्कृतीच्या राजकारणामागे, त्यासंबंधीच्या दगडू मारुती पवारच्या समग्र आकलनामागे एक विस्तीर्ण ऐतिहासिक प्रक्रिया आहे. द्वंद्वात्मकतेची, वर्ग- जात- लिंगभेदाच्या शोषणाविरुद्ध झालेल्या प्रबोधनांची, फुले-आंबेडकरवादी विचारप्रणालीची पुढच्या काळात म्हणजे १९६० च्या आगेमागे ज्यांनी दलित संज्ञेचं सर्जनशील भान जागृत केलं त्या म. भि. चिटणीस, म. ना. वानखेडेंपासून शंकरराव खरात, प्र. ई. सोनकांबळे, बाबुराव बागुलांपर्यंतचा टप्पा अत्यंत मोलाचा आहे, जो ‘बलुतं’ निर्माण होण्यासाठी पायाभूत ठरला आहे.

हे गृहीतक स्वीकारूनदेखील ‘बलुतं’सारख्या कलाकृतींचं अनन्यत्व दशांगुळे उरताना दिसतं. आजही ‘बलुतं’ची नवी आवृत्ती प्रसिद्ध झाली की हातोहात खाते.

विक्रीचे नवे उच्चांक मांडले जातात. दया पवार यांच्या पश्चातही ‘बलुतं’वर साक्षेपी प्रतिक्रिया व्यक्त करून आवर्जून पाठवणारे, निरनिराळ्या थरांतले, वयोगटांतले आस्थेवाईक वाचक पत्रव्यवहार करतात. २५ वर्षांनंतरही ‘बलुतं’चा करिश्मा अबाधित राहावा हा योगायोग किंवा साहित्य क्षेत्रातली ‘स्ट्रॅटेजी’ म्हणता येईल का? जर असं नसेल तर मग अत्यंत गंभीरपणानं ‘बलुतं’च्या समकालीन परिमाणांची चर्चा करावी लागेल. ‘बलुतं’ची कलाकृती म्हणून असणारी ताकद आजही किती मोठी आहे ते नीटपणे मांडून पाहावं लागेल.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

दगडू मारुती पवारच्या वाट्याला आलेलं दु:खाचं हे ‘बलुतं’! भारतीय समाजव्यवस्थेनं त्याच्या पदरी बांधलेलं. त्याचं इतकं ओझं दगडू मारुती पवारला झालं, की हा भार हलका नाही झाला तर मस्तकाच्या चिंधड्याच होतील, अशा अनिवार्य निकडीमधून उरी फुटून जीवाच्या करारानं त्यानं दया पवारजवळ जे कथन केलं, ती कालांतरानं अशा अनेक दगडूंना आणि धोंडूबाईंना लिहितं करण्यासाठी नैतिक बळ देणारी असामान्य कलाकृती ठरली. खुद्द दया पवार यांनादेखील हे त्या वेळी माहीत नसावं की ‘बलुतं‘सारख्या पुस्तकाला जन्म देऊन आाल्या हातून अभावग्रस्तांच्या जगण्याचा, त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक इतिहासाच्या दस्तावेजीकरणाचा एक मैलाचा दगड मराठी साहित्यात रोवला जाणार आहे.

‘बलुतं’ची अनन्यसाधारण ताकद ढोबळ अर्थानं वास्तववादाचा तयार झालेला साचा मोडण्यात आहे. ही साहित्यकृती कोणत्याही ठशात किंवा शिक्क्यात ठाकून-ठोकून बसवता येत नाही. किंबहुना ठसे आणि शिक्के पुसून टाकणं हा गर्भित हेतू ‘बलुतं’च्या संपूर्ण मांडणीतून जाणवत राहतो.

‘वादी’ असूनही ‘बलुतं’चा नायक क्रांतिकारी वगैरे कोणतंच तत्त्वज्ञान बोलताना दिसत नाही किंवा त्याला क्रांतीच्या झिणझिण्याही येत नाहीत. ‘बलुतं’ दलित समाजातील पांढरपेशी वाचकांना स्वीकारार्ह वाटलं नाही याची कारणं तपासली तर क्रांतिकारी तत्त्वज्ञानाचं आकलन किती बंदिस्त, झापडबंद असू शकतं हे जाणवतं.

‘बलुतं’मधला प्रत्येक प्रसंग, प्रत्येक घटना विफल होताना दिसते. संघर्षात वाट्याला आलेला भ्रमनिरास दिसतो. यातून येणारं दुभंगलेपण दिसतं. दलित समाजातलं लढाऊ स्पिरिट नासवून टाकण्यातले नेतृत्वाच्या पातळीवरचे डावपेच दिसतात. दलित समाजातल्या सुशिक्षितांच्या मध्यमवर्गीय होत जाण्याच्या प्रक्रियेचे, त्यातल्या अनैतिहासिकतेचे, अ-सामाजिक होत जाण्याचे अत्यंत गंभीर धोके दिसतात. ‘बलुतं’चा निवेदक सतत एका मूल्यात्मक पेचाकडे कुठलीही सेक्टेरियन (एकजातीय) भूमिका न घेता व्यक्ती- समष्टी संबंधात, स्त्री-पुरुषसंबंधात कसलंही सोपं समीकरण न मांडता, माणसांमधल्या अंतर्विरोधावर मानवी पातळीवरून भाष्य करतो.

यातला सगळ्यात पृथगात्म असलेला भाग म्हणजे ‘बलुतं’मधल्या स्त्री व्यक्तिरेखा. आईपासून निरनिराळ्या नातेसंबंधातल्या स्त्रियांकडे बघण्याची या नायकाची दृष्टी पूर्णत: अपारंपरिक आहे. बाईकडे हाडामांसाच्या माणसांसारखं पाहता येणं- कोणत्याही प्रकारचं उदात्तीकरण न करता- इथं हे आत्मकथन मोठीच झेप घेतं. दलित स्त्रीचा लिंगभाव किंवा भारतातल्या कोणत्याही स्त्रीचा लिंगभाव निखळ असूच शकत नाही. तो जात, धर्म म्हणजेच समाजसापेक्षच कसा असतो, हे विदारक सत्य दगडू मारुती पवारला कळलेलं आहे.

पारंपारिकतेकडे अपारंपारिकतेनं पाहता येणं आणि त्यासाठी कुठलाही पवित्रा घेण्याची, पोज घेण्याची गरज न भासणं, तेही आंबेडकरवादाच्या ठोस वैचारिक परिप्रेक्ष्यात राहूनही ‘बलुतं’च्या नायकाला साध्य झालेली, परंतु अजिबात सहजसाध्य नसलेली बाब आहे.

अर्थात हे सोपं नाही. विचारप्रणालीच्या आणि सौंदर्यमूल्यांच्या पातळीवर अधिनायकत्वाचा समर्थ पर्याय देणं, दमनाविरुद्ध संघर्षशील होताना ‘ते आणि आम्ही’, ‘ते आणि आपण’ असा द्विपर्याय विरोध झुगारून देणं, स्वशोध- स्वसमष्टीशोध, समष्टीशोध अशा व्यापक व्यूहाकडे आणि एकूणच विश्वव्यूहाकडे आतून आणि बाहेरून पाहणं ही श्रेष्ठ साहित्यकृतीच्या ठायी असलेली वैशिष्ट्यं ‘बलुतं’मध्ये साक्षात होताना दिसतात. मुल्कराज आनंद आणि कमलेश्वर यांच्यासारख्या प्रख्यात लेखकांनी भारतीय संदर्भात ‘बलुतं’चं विश्लेषण करून ‘प्रेमचंद’ यांच्या साहित्याशी ‘बलुतं’चं नातं जोडलं आहे. ‘अछूत’ या नावानं ‘बलुतं’चा अनुवाद हिंदीत होणं ही गोष्ट या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. जागतिक पातळीवर ‘बलुतं’ची नोंद घेणं, फोर्ड फाऊंडेशनची शिष्यवृत्ती दया पवारांना लाभणं, फ्रेंच, जर्मन भाषेत ‘बलुतं’ सन्मानूर्वक जाणं ही घटना केवळ मराठी नव्हे तर समकालीन भारतीय साहित्याच्या दृष्टीनंही आश्वासक आहे. ‘मदर ऑफ ऑल दलित ऑटोबायोग्राफीज’ अशा शब्दांत ‘बलुतं’च्या उपलब्धीचं, थोरवीचं वर्णन केलं गेलं आहे,

‘बलुतं’नंतर आत्मकथनाच्या अनेक वाटा मोकळ्या झाल्या आहेत. ‘बलुतं’पासून मराठी साहित्यात आत्मकथनाचं एक नवं सशक्त पर्व निर्माण झालं आहे. पूर्वाश्रमीच्या महार समाजापासून ते भटक्या विमुक्तांपर्यंत, ऊसतोडणी कामगारांसून ते दलित स्त्रियांच्या दुहेरी-तिहेरी शोषणापर्यंतची आशय- केंद्रं यात सामावलेली आहेत. मराठी साहित्यात आजवर कधीच प्रकट न झालेल्या, दुर्लक्षित राहिलेल्या माणसांच्या जगण्याचा उभा-आडवा छेद या आविष्कारांत प्रकटतो. ‘भटक्या’, ‘मातीचे आकाश’, ‘थोट्या मिटलेली कवाडे जिणं आमुचं’, ‘माज्या जलमाची चित्तरकथा’, ‘आदोर’, ‘रात्रंदिन आम्हा’, ‘तीन दगडांची चूल’, ‘मरणकळा’, ‘बिनपटाची चौकट’ ते आता प्रसिद्ध होणारं ऊर्मिला पवार यांचं ‘आयदान’ अशी ‘बलुतं’च्या योगदानाची व्यापक फलश्रुती अधोरेखित करता येते.

यातल्या काही आत्मकथनकर्त्यांचा अपवाद सोडला तर एका पुस्तकातच ‘लेखक’ म्हणून संपून जाण्यातला तोटा या अनुषंगानं व्यक्त केला जातो किंवा ‘एक पुस्तकी लेखक’ म्हणून टीका केली जाते, ती वस्तुत: अनाठायी आहे. कारण ‘लेखक होणं’ हे काही या आत्मकथनकर्त्यांचं प्रयोजन नाही, नसावं. लिहिणं ही गोष्टच या आत्मकथनकर्त्यांच्या दृष्टीनं जगण्यातलं ‘बायप्रॉडक्ट’ आहे. लिहिण्याची कला अवगत आहे म्हणून निर्मितीची नवनवीन क्षेत्रं धुंडाळत जाण्यासाठी लागणारी काहीशी निवांतपणाची चैन जगण्याचा मूलभूत पातळीवरून लढा देणाऱ्यांना कशी परवडणार? जगण्याच्या लिडबिडाटात खोलवर गुंतून पडणं आणि लिहिणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी नाहीतच यांच्या दृष्टीनं. कुणी सांगावं, कदाचित यातूनच उद्याचा डोस्टोव्हस्की, उद्याचा टॉलस्टॉय, मॅक्झिम गॉर्की जन्म घेईल.

(पूर्वप्रसिद्धी - दै. लोकसत्ता, ३० नोव्हेंबर २००३)

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......