प्रा. शेषराव मोरे करतात ते ‘राक्षसीकरण’ आणि बशारत अहमद करतात ते ‘शुद्धीकरण’?
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
मुकुल रणभोर
  • “मुस्लिम मनाचा शोध’ आणि ‘शेषराव मोरेंकृत मुस्लिम मनाचा शोध : एक चिकित्सा’ या पुस्तकांची मुखपृष्ठे
  • Sat , 01 September 2018
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस शेषराव मोरेंकृत मुस्लिम मनाचा शोध : एक चिकित्सा Muslim Manacha Shodh - Ek Chikitsa बशारत अहमद Basharat Ahamad मुस्लिम मनाचा शोध Muslim Manacha Shodh शेषराव मोरे Sheshrao More

भारतात इस्लाम आला तो त्याच्या स्थापनेनंतर काही वर्षांत. याचा अर्थ भारताची इस्लामचा आलेला संबंध हा आठव्या शतकापासून आहे. सुरुवातीची काही वर्षं तो तितका प्रभावी राजकीय शक्ती म्हणून नसेलही, पण गेली एक हजार वर्षं तरी एक आक्रमक आणि प्रभावी राजकीय शक्ती म्हणून भारतात वास्तव्य करत आहे. भारतातल्या एतद्देशीय हिंदू सत्तांना आणि साधारणपणे समाजाला त्या इस्लामच्या नावांनी होणाऱ्या आक्रमणांचा अर्थ कळलाच नाही. कारण त्या आक्रमणांचं स्वरूप वेगळं होतं, म्हणजे काय होतं हे कोणीही समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. आणि या समाजाला कोणी समजावूनही सांगू शकला नाही. हजार वर्षाच्या इतिहासात या नवीन, वेगळ्या आक्रमणांचा अर्थ समजलेले काही अपवाद होते. त्यांनी त्यांच्या पद्धतीने आणि मर्यादा पाळून या आक्रमणाचा अर्थ समजावून सांगायचा प्रयत्न केला. पण त्यांच्या मर्यादा या बाबतीत क्षमतांपेक्षा प्रभावी ठरल्या.

आता १९४७ नंतर हा देश स्वतंत्र झाला. लोकशाही प्रजासत्ताक सेक्युलर राज्यघटना आपण सर्वानुमते स्वीकारली. आता इस्लामच्या नावानं लष्करी आक्रमण होण्याच्या शक्यता मावळल्या आहेत. पण तरीही इस्लाम आणि मुस्लीम प्रश्न अजूनही संपलेला नाही. सुटलेला नाही. याच्यावर उत्तर म्हणून मोरे यांचा ‘मुस्लीम मनाचा शोध’ हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा ठरतो. मराठी विचारविश्वात २००० साली ही एक अभूतपूर्व घटना घडली. अर्थातच या ग्रंथावर अनेक मत-मतांतरं असणार आहेत. त्यासाठी मोरे यांनी हा ग्रंथ सर्वसामान्य वाचकांना उपलब्ध करून देण्याआधी महाराष्ट्रातील केवळ मोजक्या विचारवंतांसाठी प्रसिद्ध केला होता. आपला इस्लामचा अभ्यास योग्य दिशेनं सुरू आहे की नाही, हे तपासण्यासाठी एका प्रतिष्ठित मुस्लीम संघटनेच्या पाच विचारवंतांनी या ग्रंथाला अभिप्राय दिला होता. मोरे यांची प्रशंसा करणारा तो दीर्घ अभिप्राय पहिल्या आवृत्तीत छापला होता.

नुकतंच ‘मुस्लीम मनाचा शोध’ या ग्रंथावर ‘शेषराव मोरेकृत मुस्लीम मनाचा शोध - एक चिकित्सा’ हे बशारत अहमद यांचं चिकित्सात्मक पुस्तक प्रसिद्ध झालं आहे. ‘मुस्लीम मनाचा शोध’च्या आधीच्या आवृत्त्यांमध्ये मोरे यांनी प्रस्तावनेत बशारत अहमद हे लवकरच या ग्रंथाचा प्रतिवाद करणार आहेत, हे नमूद केलं आहे.

‘मुस्लीम मनाचा शोध’ हा ग्रंथ लिहिण्यामागची भूमिका मोरे यांनी लिहिलेली आहे. मोरे लिहितात, “विद्यापीठाची पीएच.डी. मिळवण्यासाठी लिहिलेला हा ग्रंथ नाही, तर राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीकोनातून परस्परांना समजून घेण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. मुस्लीम समाजाचे मन समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे.” तात्त्विक चर्चा करताना लेखकाच्या मनात काय आहे याचा कोणताही ठाम दावा कधीही करता येत नसतो. वैचारिक पातळीवर लेखकाच्या मनातल्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून चर्चा कधीही करता येणार नाही, करूही नये. लेखकाने लिहिलेल्या शब्दावर चर्चा करावी. शक्यतो हेत्वारोप न करता चिकित्सा केली पाहिजे. मात्र मोरे यांच्या ग्रंथाचा प्रतिवाद करताना बशारत अहमद यांनी हे पथ्य पाळलेलं नाही.

अगदी पहिल्या-दुसऱ्या पानापासूनच हेत्वारोपांना सुरुवात होते. तपशीलवार आपण एकेका मुद्द्यावर पुढे बोलूच. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी जो उपस्थित केला आहे तो म्हणजे मोरे यांनी हा अभ्यास करण्यामागची भूमिका काय होती? त्यासाठी त्यांनी ‘समारोप’ हे संपूर्ण प्रकरण लिहिलेलं आहे.

या देशात ‘हिंदू-मुस्लीम प्रश्न’ सोडवण्याच्या दृष्टीने फाळणी झाली, पण प्रश्न सुटला नाही. भारत हा बहुधर्मीय देश आहे आणि तो तसाच राहणार आहे. कोणतीही एक जमात संपवून (वंशहत्या) हा प्रश्न सुटणार नाही. अगदी कडवे हिंदुत्ववादीसुद्धा भारतातले सगळे मुसलमान मारून टाकले पाहिजेत, अशी भूमिका घेणार नाहीत. जो घेईल तो ‘माणूस’पणाला लायक नाही.

भारत हा देश बहुधर्मीय आहे आणि बहुधर्मीय राहणार आहे. मग धार्मिक सुसंवाद वाढवा यावर उपाय काय? तर भारतीय राज्यघटना. त्यातलं ‘धर्मस्वातंत्र्याचा हक्क’ (कलम २५). डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकारातून हे कलम राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलं आहे. त्यात भारतीय जनतेला धर्म आचरण्याचा, प्रसार करण्याचा हक्क दिला आहे. त्या कलमात ‘सेक्युलर’ शब्द आलेला आहे. समाजाला मध्ययुगीन धार्मिक भावनांतून, जोखडातून मुक्त करण्यासाठी ‘सेक्युलॅरिझम’ची योजना राज्यघटनेत केली आहे. समाजाला म्हणजे हिंदू, मुसलमान, जैन, बौद्ध, ख्रिश्चन सर्वांनाच. धर्माच्या प्रभावातून मुक्त करण्यासाठी कलम २५ आणि सेक्युलॅरिझमची योजना केलेली आहे. हिंदूंना ‘हिंदू’ धर्म समजावून सांगण्याची गरज फारशी उरलेली नाही. सामान्य ‘हिंदू’चा हिंदूधर्मशास्त्राचा अभ्यास नसला तरी त्याल ‘यदा यदा ही धर्मस्य’ आणि ‘जो जे वांछील तो ते लाहो' हे माहिती असतं. पण इस्लाम, कुराण, हादीस, शरियत, मुहंमद पैगंबर यांच्याविषयी तो पूर्णपणे अनभिज्ञ आहे.

बशारत अहमद यांनी आपल्या पुस्तकात ‘लेखकाच्या मनोगतात’ लिहिलं आहे की, ‘मोरे यांची इस्लामसंबंधी तीन पुस्तकं (‘मुस्लिम मनाचा शोध’, ‘प्रेषितांनंतरचे चार आदर्श खलिफा’ आणि ‘१८५७ चा जिहाद’) म्हणजे, आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘मुसलमानांचे राक्षसीकरण’ करण्याचा जो कट केला जात आहे, त्याचाच एक भाग आहे.’ हेत्वारोपांची सुरुवात ही इथून होते. ‘मुसलमानांचे राक्षसीकरण’ हा आरोप बशारत अहमद यांनी पुस्तकात दोन वेळेला केला आहे.

वर लिहिल्याप्रमाणे ‘मुस्लीम मनाचा शोध’ सामान्य वाचकांना उपलब्ध होण्याआधी विचारवंतांसाठी प्रसिद्ध करण्यात आली होती. ती वाचून ‘जमात-ए-इस्लामी’च्या पाच पंडितांनी ‘अभिप्राय’ दिला होता. सुरुवातीच्या आवृत्त्यांमध्ये मूळ ६१ पानांचा अभिप्राय होता. नंतरच्या आवृत्तीमध्ये तो अभिप्राय संक्षेपित करून २३ पानांचा करण्यात आला. बशारत अहमद यांनी आरोप केला आहे की, मूळचा ६१ पानांचा अभिप्राय मोरे यांनी स्वतःच्या मर्जीनं पंडितांना विचारात न घेता संक्षेपित करून टाकला आहे. मूळचा अभिप्राय लिहिणाऱ्या पाच जणांमध्ये एक होते प्राचार्य गुलाम समदानी (नांदेड). आताच्या आवृत्तीमध्ये त्या २३ पानी अभिप्रायाखाली टीप लिहिलेली आहे, ती अशी, “मूळ ६१ पृष्ठांचा हा अभिप्राय, त्यातील मुद्द्यांना, विवेचनाला व निष्कर्षांना बाधा न येऊ देता, प्राचार्य गुलाम समदानी (नांदेड) यांनी २३ पृष्ठांचा केलेला आहे.” मूळचा ६१ पानांचा अभिप्राय लिहिताना लेखकाचा हेतू शुद्ध असल्याची खात्री त्यांनी दिलेली आहे, याची आठवण बशारत अहमद करून देतात आणि पुढे लिहितात, ‘आम्ही त्यांच्या (अभिप्राय देणाऱ्यांच्या) मताशी सहमत होऊ शकत नाही’.

अहमद यांनी पुस्तकात अनेक ठिकाणी शेरेबाजी केली आहे. त्यापैकी एक म्हणजे मोरे यांचा बुद्धिवाद ‘कथित’ आहे आणि त्याला अभिप्राय देणारे भुलले आहेत. मोरे यांचा इस्लामचा अभ्यास चुकला असेल, त्यांचे निष्कर्ष चुकले असतील, हे सगळं मी मान्य करायला तयार आहे. पण मोरे यांनी त्यांच्या पूर्वीच्या सर्व पुस्तकातून पारलौकिक बाबींवर ज्या पद्धतीने प्रहार केले आहेत, इहलोकनिष्ठा दाखवलेली आहे. त्यावरून मोरे यांच्या बुद्धिवादाला ‘कथित’ म्हणून हिणवणं योग्य नाही.

आजचे प्रश्न हे हजारो वर्षापूर्वी तयार झालेले धर्म ग्रंथ सोडवू शकत नाहीत. धर्मग्रंथ मानवनिर्मित आहेत अशी भूमिका बशारत अहमद यांनी सर्वप्रथम घेऊन दाखवावी. ‘कुराण’ कालबाह्य झाले आहे, हादीस आजचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम नाही, अशी भूमिका त्यांनी जाहीरपणे घेऊन दाखवावी. ते जेव्हा अशी भूमिका घेतील, तेव्हाच त्यांना मोरे यांच्या बुद्धिवादावर टीका करण्याचा अधिकार प्राप्त होतो. आणि म्हणून मी सुरुवातीलाच म्हणालो तसं ‘मुस्लीम मनाचा शोध’मधील ‘समारोप’ या प्रकरणाचा अहमद यांनी परामर्श घ्यायला हवा होता. मोरे यांचे आधीचे सगळे निष्कर्ष (चुकीचे का असेनात) काय साध्य करण्यासाठी काढले आहेत, हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे होतं.

मोरे यांनी ‘मुस्लीम मनाचा शोध’ हा ग्रंथ लिहिताना २०५ ग्रंथ संदर्भ म्हणून वापरले आहेत. त्यात ११९ मुस्लीम लेखकांचा, १९ मराठी आणि इतर ख्रिश्चन लेखक आहेत. ज्याचा उल्लेख बशारत अहमद यांनीही केला आहे. तो म्हणजे मोरे ‘तंत्रप्रधान’ लेखक आहेत. मोरे यांनी संदर्भ वापरताना ‘लेखकाचे नाव, पुस्तकाचे नाव, पुस्तकातील पृष्ठ क्रमांक, आणि आवृत्ती’ इतका तपशील दिला आहे. ‘मुस्लीम मनाचा शोध’ या ग्रंथाचा हा ‘दोष’ म्हणून अनेक लोक उल्लेख करतात की, तळटीपांच्या, पुराव्यांच्या गर्दीमध्ये मूळ मुद्दा अनेकदा वाचताना लक्षात राहत नाही.

मुद्दा असा आहे की सहाशे पानांचां ग्रंथ लिहिताना मोरे यांनी आपल्या प्रत्येक वाक्याला, शब्दाला पुरावे, संदर्भ देण्याची पद्धत पाळली आहे. आणि बशारत अहमद ‘मुस्लीम मनाचा शोध’मध्ये मोरे यांनी ‘अशी अशी चलाखी केलेली आहे’ हे सांगताना पृष्ठक्रमांकसुद्धा देत नाहीत. इतकंच नव्हे तर मोरे यांचा मुद्दा खोडून काढण्यासाठी ते सय्यद अबुल आला मौदुदी यांच्या एका ग्रंथातील एक उतारा उदधृत करतात. पण ते मौदुदी यांच्या ग्रंथातील पृष्ठक्रमांक, आवृत्ती किती साली प्रकाशित झाली, हे तपशील देण्याचे कष्ट घेत नाहीत. शेषराव मोरे ‘मुस्लीम मनाचा शोध’मध्ये खोटं बोलत आहेत, हे गृहीत धरलं तरी बशारत अहमद खरं नेमकं कशाच्या आधारावर बोलत आहेत, याचे कोणतेही संदर्भ त्यांनी दिलेले नाहीत.

भारतीय परंपरेत ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्यापासून प्रबोधनाची परंपरा सुरू होते. या सगळ्यांनी ‘काळाच्या पुढे नेणारा बुद्धिवाद’ समाजाला दिला. परिणामी त्यावेळच्या सनातन्यांनी त्यांना त्रास दिलेला आहे. ही परंपरा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत सुरू राहते. आधुनिक काळातले धर्मसुधारक तर धर्मग्रंथात काहीही लिहिलेलं असलं तरी आम्ही तसे वागणार नाही, आजचे प्रश्न आजच्या समाजाच विचार करून सोडवणार, हे सांगताना डॉ. बाबासाहेबांनी हिंदूंच्या धर्मशास्त्राचा ग्रंथ (‘मनुस्मृती’) जाहीरपणे जाळला. पुरोगामित्वाची व्याख्या हीच आहे- जो सगळ्यात आधी धर्माची चिकित्सा करायला तयार असतो.

बशारत अहमद लिहितात, “धर्मसुधारकाची आवश्यकता तर स्वतः प्रेषितांनी आपल्या वेगवेगळ्या वचनांतून मांडली आहे. एका वचनात ते म्हणतात, ‘माझ्या अनुयायांमध्ये प्रत्यके शतकाच्या शेवटी एक धर्मसुधारक येईल. त्याच्यासाठी त्यांनी ‘मुजाद्दीद’ असा शब्द वापरला आहे आणि तो येऊन मागच्या शतकात मुस्लीम समाजात जे दोष निर्माण झाले असतील, ते दूर करून इस्लामच्या मूळ शिकवणीला मूळ पदावर आणेल.” पण याला धर्म सुधारक म्हणत नाही, याला मूलतत्त्ववादी म्हणतात. जो धर्माच्या अशुद्ध स्वरूपाबद्दल समाधानी नाही आणि मूळच्या शुद्ध स्वरूपविषयी तो आग्रही आहे. भारतीय परंपरेतली सुधारकाची व्याख्या वेगळी आहे. बशारत अहमद ‘धर्मसुधारक’ हा शब्द वेगळ्या संदर्भात वापरत आहेत. हा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न आहे.

इस्लामशी अनेकेश्वरवाद आणि अनेकेश्वरवादी यांच्याबद्दल काय भूमिका आहे, हे पाहू. इस्लाम ‘अनेकेश्वरवादी’ यांच्याबद्दल किती सहानुभूती आणि प्रेमाची भावना बाळगून आहे याचा एक हादीसमधला संदर्भ देताना अहमद यांनी एक हादीस दिली आहे. त्याच्याआधी त्यांनी हादीसचा जो क्रमांक आणि संकलक दिला आहे. तो चुकीचा आहे. त्यांनी दिलेली हादीस आहे- क्रमांक - ४२९४. अहमद यांनी ती श्रद्धाहीनांबद्दल इस्लाम किती दयाळू आहे हे दाखवण्यासाठी वापरली आहे. ४२९४ ही हादीस इस्लाममध्ये गुलामांच्या मुक्ततेचे धोरण काय असावे याबद्दलची आहे. पण असो. अहमद यांनी दिलेल्या हादीसमध्ये बिगर मुसलमानांना एकूण ३ पर्याय दिलेले आहेत.

एक -  इस्लाम स्वीकारण्याचं निमंत्रण द्या. त्यांनी प्रतिसाद दिला, तर तो स्वीकारा व त्यांच्याशी युद्ध करू नका.

दोन - जर त्यांनी इस्लाम स्वीकारण्यास नकार दिला; परंतु जिझिया (सुरक्षाकर) देण्यास त्यांनी मान्यता दिली, तर तो स्वीकारा व लढण्यापासून हात रोखा.

तीन - जर त्यांनी जिझिया कर देण्यासाठी नकार दिला, तर अल्लाहला मदतीचं आवाहन करा व त्यांच्याशी लढा.

बशारत अहमद म्हणतात, मोरे यांनी इस्लामचे राक्षसीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यासाठी कुराआन मधल्या आयती, हादीस हे विकृत करून मांडले आहेत. पण बशारत अहमद यांनी जी योग्य आणि शुद्ध म्हणून हादीस संदर्भादाखल उदधृत केली आहे, त्यातून इस्लामचं कोणतं चित्र उभं राहतं?

प्रेषितांनी बिगर मुसलमानांना तीन पर्याय दिले. इस्लाम स्वीकारण्याचे निमंत्रण अन्यथा जिझिया अन्यथा युद्ध. याचा अर्थ एकतर मुसलमान व्हा किंवा बिगर मुसलमान राहून त्यांच्या जीवाच्या रक्षणासाठी कर भरा. दोन्ही नसेल तर युद्धाला तयार व्हा. यामध्ये मोरे करतात ते ‘राक्षसीकरण’ आणि अहमद करतात ते ‘शुद्धीकरण’ असं म्हणण्यात काही अर्थ नाही.

बशारत अहमद असो किंवा कोणतेही मुस्लिम पंडित असो, त्यांचा हा आग्रह असतो की, दुसऱ्या कोणीही सांगितलेला इस्लाम समजावून घेण्यापेक्षा प्रत्यक्ष कुराण आणि हादीस आपण वाचलं पाहिजे आणि थेट इस्लाम समजून घेतला पाहिजे. आपण मोरे काय म्हणतात याचा विचार करायला नको, बशारत अहमद काय म्हणतात याचाही विचार करायला नको. अनेकेश्वरवादी यांच्याबद्दल कुराण काय म्हणतं ते पाहूया. अहमद यांनी मोरेंचा खोटेपणा उघडा पडण्यासाठी एक आयात दिली आहे. संदर्भ असा आहे की, कुराणचे अध्ययन केवळ पवित्र लोक करू शकतात. पवित्र माणसाशिवाय कुराणाला कोणीही स्पर्श करू शकत नाहीत. येथे पवित्र याचा अर्थ नेमका काय घ्यायचा याचा वाद सुरू आहे. आयात आहे, ‘पवित्र माणसाशिवाय कुराणला कोणीही स्पर्श करू शकत नाही’ (५६:७९). ‘मूर्तीपूजक हे अपवित्र आहेत’ (९:२८). आता कुराणातील सुरह ९ आणि आयात २८ नेमकी काय आहे ते बघा. “हे इमान बाळगणाऱ्यांनो! अनेकेश्वरवादी अगदी गलिच्छ आहे, यास्तव या वर्षानंतर हे मसजीदेहराम जवळ येता कामा नये आणि जर तुम्हाला आर्थिक तंगीचे भय आहे तर अल्लाहने इच्छिल्यास आपल्या कृपेनी तुम्हाला धनवान करील. अल्लाह जाणणारा, हिकमत बाळगणारा आहे.”

पवित्र कुराणचे एक विश्वसनीय भाष्य म्हणून दावअतुल कुराणचा उल्लेख सगळे जण करतात. त्यात या आयतीतील काही शब्दांचे स्पष्टीकरण दिलेले आहे. त्यात ‘गलिच्छ’ या शब्दाचे स्पष्टीकरण असे, ‘गलिच्छतेशी अभिप्रेत शिर्कची घाण होय. ज्यापासून एकेश्वरवाद केंद्रास स्वच्छ शुद्ध राखणे आवश्यक आहे. अनेकेश्वरवादी व काफीर यांच्या व्यवहारात इस्लामने स्पृश्य-अस्पृश्यतेची कोणतीही कल्पना मांडली नाही. किंबहुना त्यांच्या शिर्क व कुफ्रच्या प्रभावापासून स्वतःला अलिप्त राखण्याची ताकीद केली. स्पष्ट व्हावं की इस्लामजवळ हृदय व बुद्धी आणि श्रद्धेची गलिच्छता समस्त घाणीहून मोठी आहे’. याचा अर्थ अजून स्पष्टीकरण देऊन मी सांगायची गरज नाही. तुम्ही जर अल्लाहच्या अस्तित्वाबद्दल शंका ठेवणार असणार तर तुम्ही अपवित्र असा याचा साधा अर्थ आहे.

सरतेशेवटी माझी भूमिका अशी आहे की, सगळे धर्म जेव्हा निर्माण झाले, तेव्हा ते काळाच्या पुढे होते. इस्लामने १४०० वर्षापूर्वी गुलाम मुक्त करण्यासाठी काही धोरणं आखून दिली होती. १४०० वर्षापूर्वीच्या अरबस्तानमध्ये हे पाऊल क्रांतिकारकच होते. इस्लामपूर्व अरबस्तानात स्त्रीची स्थिती हलाखीची होती, तिच्यात काही बदल करण्याचे प्रयत्न इस्लामने नक्कीच केले आहेत. पण आज आपण १४०० वर्ष पुढे आलो आहोत. आजही तीच धोरणं उराशी बाळगून चालणार नाही.

मोरे यांनी कोणताही देव मानला नाही. सावरकरांची धर्मनिष्ठ प्रतिमा पुसून इहवादी प्रतिमा उभी करण्यासाठी प्रयत्न केले. पारलौकिक बाबींवर कधीही विश्वास ठेवला नाही. इतकेच नव्हे तर स्वतःच्या आई-वडिलांचे श्राद्ध करण्यासही नकार दिला. असं सगळं असताना मोरे यांना ‘कथित’ बुद्धिवादी म्हणणे त्यांच्या योग्य नाही.

मोरे यांचे विश्लेषण चुकले असे चर्चेसाठी आपण गृहीत धरले तरी बशारत अहमद यांनी ‘मुस्लीम मनाचा शोध’ या ग्रंथातील ‘समारोप’ हे प्रकरण विचारपूर्वक अभ्यासायला हवे होते. तपशील, भाष्य, संदर्भ चुकू शकतात, पण ‘समारोप’ प्रकरणाच्या आधीची साडेसहाशे पानं लिहिण्याचा आटापिटा मोरे का करत आहेत, ते त्या समारोप प्रकरणात स्पष्ट झालेलं आहे. त्याचा पुसटसा उल्लेखही अहमद यांनी करू नये याचं आश्चर्य वाटतं! 

.............................................................................................................................................

‘शेषराव मोरेंकृत मुस्लिम मनाचा शोध : एक चिकित्सा’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

लेखक मुकुल रणभोर हे ‘अक्षर मैफल’ या मासिकाचे संपादक आहेत.

mukulranbhor111@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

Post Comment

ADITYA KORDE

Sun , 02 September 2018

ह्यातली गोची फक्त अशी आहे कि ज्यांनी मोरे ह्याना काही एक अजेंडा घेऊन लिहिणारे ठरवले आहे, ढोंगी बुद्धीवादी ठरवून टाकले आहे ते अशा कुठल्याही प्रतीवादाने त्यांचे समाधान व्हायचे नाही.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......