अजूनकाही
‘द कॉल ऑफ द वाईल्ड’ हे डायमंड पब्लिकेशन्सच्या ‘वर्ल्ड क्लासिक्स’ मालिकेतलं एक अतिशय वाचनीय पुस्तक आहे. १६ ऑगस्ट १८९६ला वायव्य कॅनडाच्या स्थानिक खाणकामगारांना त्या भूमीत सोनं सापडलं. ही बातमी पुढे सिएटल आणि सॅन फ्रान्सिस्कोपर्यंत पसरली, आणि १८९६ ते १८९९च्या दरम्यान सुमारे एक लाख माणसांनी सोनं सापडण्याच्या आमिषाने पराकोटीच्या हाल-अपेष्टा सोसून आणि अत्यंत प्रतिकूल निसर्गाशी दोन हात करत या प्रदेशाच्या दिशेने कूच केलं. या मोहिमा ‘क्लॉन्डाइक गोल्ड रश’ नावाने प्रसिद्ध आहेत. सदर पुस्तकाचे मूळ लेखक जॅक लंडन मूळचे कॅलिफोर्नियाचे होते. १८९७मध्ये आपल्या साथीदारांसह त्यांनी याच प्रदेशात मोहीम काढली आणि स्टुअर्ट नदीलगतच्या सुमारे आठ सोन्याच्या खाणींवर त्यांनी स्वतःचा दावा लावण्यात यश मिळवलं.
अशा मोहिमांवर सामान वाहून नेण्याकरता कुत्र्यांकरवी ओढल्या जाणाऱ्या ‘स्लेड’ प्रकारच्या गाड्या वापरल्या जात. त्यामुळे तंदुरुस्त, शक्तिमान कुत्र्यांना त्या काळात मोठा भाव होता.
कॅनडाच्या अगदी पश्चिमेला असलेल्या युकॉन प्रदेशात या कथेतल्या घटना घडतात. प्रस्तुत कथेचा नायक म्हणजे ‘बक’ हा सेंट बर्नार्ड-स्कॉच कॉली या मिश्रजातीचा उमदा कुत्रा आहे. संपूर्ण कथा बकच्या दृष्टिकोनातून लिहिली आहे. हा कुत्रा कॅलिफोर्नियामध्ये एका श्रीमंत घरात ऐशोआरामात जगत असतो, पण एके दिवशी त्या घरातला एक कर्जबाजारी नोकर बकला विकून टाकतो. आयुष्यात पहिल्यांदाच बकला पिंजऱ्यात डांबलं जातं. अतिशय त्रासदायक प्रवासानंतर तो अलास्कात पोचतो. तिथे इतर कुत्र्यांसोबत तोही स्लेडला जुंपला जातो, आणि त्याचे हाल सुरु होतात. निसर्गातल्या हिंस्र स्पर्धेला पहिल्यांदाच तोंड देत असलेला बक मुळात चाणाक्ष आणि तगडा असल्याने तिथले ‘नियम’ पटकन शिकतो, आणि अखेरीस त्या कुत्र्यांचा म्होरक्या असलेल्या स्पिट्झला द्वंद्वात हरवून स्वतः टोळीचा प्रमुख बनतो. कालांतराने कुत्र्यांविषयी जराही माहिती किंवा प्रेम नसलेला हॅल त्याला विकत घेतो आणि बकच्या आयुष्याला पुन्हा एकदा कलाटणी मिळते. नंतर थॉर्नटन नावाचा अतिशय प्रेमळ माणूस बकला हॅलच्या तावडीतून वाचवतो आणि बकच्या आयुष्यातला सर्वात सुखकर काळ सुरु होतो; पण अजूनही त्याच्या आयुष्यात काहीतरी वाढून ठेवलेलं असतं. एका स्थानिक जमातीकडून थॉर्नटनची हत्या होते आणि सैरभैर झालेला बक निसर्गाच्या सादेला अनुसरून, ‘स्व’च्या शोधात रानोमाळ भटकू लागतो. तिथे रानटी लांडग्यांच्या एका टोळीशी त्याचा मुकाबला होतो, आणि स्वतःच्या ताकदीच्या जोरावर तो त्या टोळीवर कब्जा मिळवतो. अशा प्रकारे अखेरीस बक त्याच्या बापजाद्यांचं मुक्त आणि पूर्णपणे जंगली आयुष्य जगू लागतो.
बकची ही विलक्षण कथा वाचताना त्यातले अनेक पदर आपल्यासमोर उलगडत जातात. ही एक रोमांचक साहसकथा तर आहेच. शिवाय यात आपल्याला इसापनीतीतल्या कथांचे अंश सापडतात; तसंच किपलिंगने लिहिलेल्या ‘जंगल बुकचा' प्रभावही दिसून येतो. यापलीकडे पाहिलं, तर आपल्याला ‘निसर्ग विरुद्ध संस्कृती-सभ्यता’ असं द्वंद्वही या कथेमधून दिसतं. मानवी सभ्यतेचा मुलामा केवळ वरवरचा असतो. त्यामुळे जेव्हा अस्तित्वाचा प्रश्न येतो, तेव्हा व्यक्तिमत्त्वाचं खरं अक्राळविक्राळ रूप बाहेर येतं. एका पाळीव कुत्र्याच्या दृष्टिकोनातून लेखक समाजाकडे त्याची नजर वळवतो आणि आपल्यासमोर मानवी सुसंस्कृतपणाच्या आड दडलेली अनिर्बंध हाव, अति महत्त्वाकांक्षा उघडी करतो. सरधोपट, आरामशीर आयुष्यातून रांगड्या निसर्गात फेकलं गेल्यावर कुठल्याही प्राण्याला त्या कठोर वास्तवाशी जुळवून घ्यावंच लागतं. कोणतीही गोष्ट गृहीत धरून चालत नाही. कारण अशा वेळी स्पर्धा, संघर्ष आणि साक्षात मृत्य ठायी ठायी वाट पाहत उभा असतो.
एका वेगळ्या पातळीवर बकची ही कथा जॅक लंडनच्या आयुष्याचीही कथा आहे. अलास्कातल्या वास्तव्यात स्वतःची ओळख होईपर्यंतचं जॅकचं आयुष्य काहीसं भरकटलेलं होतं. त्याने हमाली आणि सटर-फटर कामांपासून, ते जहाजावर खलाशी म्हणून काम करण्यापर्यंत अनेक प्रकारची कामं केली होती; पण या सर्वांतून तावून सुलाखून निघालेला जॅक अलास्कातल्या कठीण परिस्थितीत तग धरून राहिला, नव्हे, तो निसर्गावर मात करून जिवंत राहू शकला.
हेमिंग्वेसारख्या नंतरच्या लेखकांवर जॅक लंडनच्या लिखाणाचा प्रभाव पडला, असं मानलं जातं. या सर्वांच्या लिखाणात नैसर्गिक, अनावृत, शुद्ध, स्वच्छंद जीवनशैलीचं काहीसं उदात्तीकरण केलेलं आढळतं. सर्वसाधारणपणे लेखक वापरत असलेली फारशी कोणती ‘डिव्हायसेस’ न वापरता, साध्या सोप्या शब्दांत हे लेखक आपल्या कथा सांगतात.
मूळ इंग्रजी पुस्तकाच्या गाभ्याला आणि शैलीला माधव जोशींनी अजिबात धक्का लावलेला नाही. त्यांचा अनुवाद तितकाच सहज-सोपा, ओघवत्या शैलीतला आणि त्यामुळेच अतिशय वाचनीय झाला आहे. आयुष्याचं सार सांगण्याकरता शब्दांचं अवडंबर माजवावं लागत नाही किंवा कोणत्याही क्लृप्त्या वापराव्या लागत नाहीत, हेच या कथेतून जाणवतं. कदाचित याच कारणामुळे आजही शंभराहून अधिक वर्षे उलटून गेली असली, तरी बकची ही गोष्ट लोकांच्या मनाला तितकीच भिडते आणि अंतर्मुख करून सोडते.
द कॉल ऑफ द वाईल्ड - मूळ लेखक : जॅक लंडन, मराठी अनुवाद : माधव जोशी, पाने -११३, मूल्य - १०० रुपये.
हे पुस्तक बुक्सनामावर खरेदी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3404
लेखिका चित्रकार व अनुवादक आहेत.
rama.hardeekar@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment