पश्चिम महाराष्ट्रातील मुस्लीम समाजमनाला लेखणीत पकडणारा कथासंग्रह
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
संजय रेंदाळकर
  • ‘सविनय अस्वस्थ’
  • Fri , 10 August 2018
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस साहिल शेख Sahil Shaikh सविनय अस्वस्थ Savinay Aswastha

काहीसं वेगळ्या संदर्भांना व परिवेशाला कवेत घेणारं नाव म्हणजे साहिल शेख. राहणार कुरुंदवाड. नरसोबावाडीजवळ. ‘फॉर्मलेस’ या पुस्तकानंतरचं  साहिलचं हे नवं पुस्तकं- ‘सविनय अस्वस्थ’. अलीकडे सोशल मीडियावर व्यस्त असताना, एखादं पुस्तक एका बैठकीत वाचून काढावं असं घडत नसताना, ते घडलं या ‘सविनय अस्वस्थ’मुळे. पश्चिम महाराष्ट्रातील मुस्लीम समाजमनाला लेखणीत पकडणारा हा कथासंग्रह आहे.

१४ कथांचं हे पुस्तक फक्त ९६ पानांचं आहे. हे पुस्तक अर्पण केलं आहे ते ‘प्रश्न पडणाऱ्या प्रत्येकाला’. शुद्धलेखनाच्या चुका आशयाच्या समोर क्षमापात्र ठरतात. पण काळजी घ्यायला हवी. श्रीरंग मोरे व गंगाधर म्हमाने यांची रेखाचित्रं पुस्तकाला अर्थगर्भ बनवतात. खरं तर मुखपृष्ठावरील पोत्यात भरलेली पुस्तकं माझ्यासारख्या वाचकाला अस्वस्थ करण्यात यशस्वी ठरली. वस्तुस्थिती अशी आहे की, आज आपलं ज्ञान, शहाणपण बांधून ठेवायला बाध्य करणारी यंत्रणा उभी राहिली आहे.

या कथा सहज भाषेत लिहिल्या आहेत. इतकी संवादी भाषा अलीकडे इतक्या लीलया वापरलेली दिसत नाही. प्रत्येक कथा वाचल्यावर पोटात खड्डा पडतोय की, काय अशी अवस्था तयार होते. यातील ‘अनसेड’ कथेचा शेवट ‘तिला परंपरेनं मारलं रे’ या वाक्यानं करताना जो परिणाम साधला आहे तो अप्रतिमच. धक्कातंत्राच्या पलीकडच्या काठावर नेणारं असं ते आहे. ‘कबनूर-कोल्हापूर’ कथेतही तेच जाणवतं. हे कुठंतरी आत भिडणारं आहे, यात वाद नाही.

‘भैरवी’तील कोवळ्या प्रेमाचं टेक्स्चर मनाला जाणवतं आणि एक अलवार गुज बराच वेळ कानाशी रेंगाळत राहतं. ‘नाळबंध’ तर करकरणाऱ्या दरवाजाप्रमाणे अस्वस्थतेची आंदोलनं मनात निर्माण करत राहते आणि काही चक्रं ऋतुचक्राप्रमाणे सुरूच राहतात असं वाटण्यास मजबूर करते. पण सोबतच समाजाच्या पांढरपेशीपणाच्या चिंध्या उडालेल्या असतात. ‘ओली बाळंतीण’ दिखाऊ स्त्रीवादाचा चांगलाच समाचार घेत अंतर्मुख करणारी कथा आहे.

‘पॉज’ ही कथा विवाहित ‘एकटी’चा विरह आपल्या डोळ्यासमोर उभा करतो आणि पैशामागे धावण्याचा फोलपणाही गडद करतो. ‘अरूपा’मध्ये कथेतील छोटी कथा जी मांजराच्या पिलाचं वागणं त्या तरुणीच्या इच्छांच्या अपूर्णतेशी जोडते, ती आपल्या घराजवळील अरूपासमोरच आपल्याला उभं करते. ‘वेदनांचा क्रूस खांद्यावर घेणारा प्रत्येक जण येशू होतोच असं नाही’ या वाक्यानं सुरू झालेली ‘करुणा’ कथा अनाथ मुलीचं दुःख त्रयस्थपणे मांडते खरी; पण आपण मात्र त्या वेदनेला आपली मानून विव्हळत राहतो.

साऱ्या कथांमध्ये मध्यवर्ती पात्र महिला असताना ‘गोलघुमट’ कथेत सॅमची घुसमट देशातील बहुसंख्य वर्गाची छुपी दडपशाही उघड करते आणि सहिष्णुता दूर उन्हात उभी असल्याचा भास होत राहतो. म्हातारीचं मरणं व सोकावलेला काळ व त्यानंतरचं बिघडत गेलेलं समाजवास्तव अंगावर काटा आणतं. समाजाचं वस्त्र फाटत जाऊन चिंध्या चिंध्या होताहेत आणि आपण हे टक्क डोळ्यांनी निमूटपणे पाहतोय, असं दुःस्वप्न समोर साकार होताना आतून तुटायला सुरुवात होते.

दंगली माणुसकीच्या शत्रू असतानाही दंगलीचे मोहोळ उठवून आपली तुंबडी भरणारे कोणालाही दिसत नाहीत, पण काहीजण आयुष्यातून उठतात आणि त्यांच्याकडे मात्र डोळेझाक केली जाते. उलट बाजूला धर्ममुश्तंड्यांची ‘बरकत’ होते, चलती सुरू होते हे ‘बरकत’चं कथासूत्र. ‘लोडशेडिंग’ कथा ही करुण रसाचा अर्क वाटते. यात गरिबीचा लोड व दुःखाचं शेडिंग व्यापून राहिल्याचं जाणवतं. मुस्लीम समाजाचे गांजलेपण अधोरेखित करताना कुठलाही अतिरेक दिसत नाही, कल्पनारम्यता नाही, आहे ते केवळ आणि केवळ सत्य.

थोडीशी अॅबसर्डिटीकडे झुकलेली ‘एवढीशी कथा’ एवढीशी न राहता हैराण करते. दोन-तीन वेळा वाचूनही समाधान होत नाही. लेखकाचा तर कुठे हट्ट असतो की, ते एखाद्यानं वाचलं की समजलंच पाहिजे असा. कारण समजणं, उमजणं या व्यक्तिसापेक्ष गोष्टी आहेत.

मुस्लीम समाज आजच्या भयानक वर्तमानात किती कशी  अस्वस्थता अनुभवतोय. दुय्यम वागणुकीची खेळी कुठल्याही विचार प्रणालीतून, छावणीतून पद्धतशीर पसरवली जातेय, त्याचा कहर होतोय. मात्र याला तितक्याच संयतपणे, आकांडतांडव न करता जसं जमेल तसं आतून उसवून हा लेखक आपली प्रातिनिधिक अस्वस्थता मांडत राहतो, तीही सविनय. त्याचा प्रत्यय हा कथासंग्रह देतो आणि ही सविनय अस्वस्थताच आपल्याला एकसंध ठेवते.

"

सविनय अस्वस्थ"- हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

Post Comment

ramesh singh

Fri , 10 August 2018

पुस्तकाचे प्रकाशन, किंमत, शक्य झाल्यास त्यांचा संपर्क, इत्यादी तपशील अशा परीक्षणासोबत देणे सयुक्तित ठरले असते.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......