या नाटकात खुद्द शेक्सपिअर ‘शेक्सपिअरच्या म्हातारा’चा नाटककार मकरंद देशपांडेंना भेटायला येतो!
कला-संस्कृती - नौटंकी
प्रा. अविनाश कोल्हे
  • मकरंद देशपांडे आणि ‘एपिक गडबड’मधील दोन दृश्यं
  • Sat , 28 July 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti नौटंकी Nautanki अविनाश कोल्हे Avinash Kolhe मकरंद देशपांडे Makrand Deshpande एपिक गडबड Epic Gadbad

मुंबर्इतील अमराठी रंगभूमीवर एक मराठी भाषिक अवलिया आहे. त्याचे नाव आहे मकरंद देशपांडे (जन्म - १९६६). मकरंद गेली अनेक वर्षं स्वतःच्या मस्तीत नाटक करत आहे. तो स्वतः नाटकं लिहितो, दिग्दर्शित करतो व अनेकदा भूमिकाही करतो. मराठीत एकेकाळी ‘सबकुछ पु.ल.’ अशी स्थिती होती. तशीच स्थिती मकरंदची आहे. त्यानं १९९३ साली काही समविचारी मित्रांना घेऊन ‘अंश’ या नाट्यसंस्थेची स्थापना केली. या वर्षी ‘अंश’ ला पंचवीस वर्षं पूर्ण होत आहेत. त्या निमित्तानं मकरंदनं एक ताजं, दोन अंकी हिंदी नाटक सादर केलं आहे. अलिकडे जुहूच्या पृथ्वी थिएटरमध्ये ‘एपिक गडबड’चे प्रयोग झाले. मकरंदच्या कोणत्याही नाटकांना गर्दी करणारा एक प्रेक्षकवर्ग आहे. तसा तो याही नाटकाला लाभला. मकरंदच्या संस्थेचं हे पंचविसावं नाटक बघायला अनेक नाट्यप्रेमी आले होते.

अलिकडेच मकरंदनं ‘शेक्सपीअरचा म्हातारा’ हे पहिलंवहिलं मराठी नाटक लिहिलं. या नाटकात त्यानं शेक्सपिअरच्या म्हाताऱ्याची म्हणजेच किंग लिअरची भूमिका केली होती. या नाटकाचं चांगलं स्वागत झालं.

मकरंदनं आता ‘एपिक गडबड’द्वारे ‘शेक्सपिअरच्या म्हातारा’चा एक प्रकारचा उत्तरार्ध सादर केला आहे. या दोन अंकी हिंदी नाटकात खुद्द शेक्सपिअर ‘शेक्सपिअरच्या म्हातारा’चा नाटककार मकरंद देशपांडेंना भेटायला येतो. शेक्सपिअरला असं कळलेलं असतं की, मकरंद देशपांडेंनी त्याच्या नाटकात बरेच फेरफार केले आहेत. म्हणून चिडलेला शेक्सपिअर नाटकात प्रवेश करतो. ‘एपिक गडबड’ हे मकरंदचं पंचविसावं नाटक आहे! या नाटकाचा एकुण बाजच लोकनाट्यासारखा आहे. याचाच अर्थ असा की, या नाटकाला बंदिस्त संहिता नाही.

‘शेक्सपियरचा म्हातारा’मध्ये मकरंदनं पूर्वार्धात शोकांतिका दाखवली होती, तर उत्तरार्धात त्याला फार्सचं रूप दिलं होतं. ‘एपिक गडबड’मध्ये मकरंदनं संपूर्ण नाटकात फार्स वापरला आहे.

या नाटकात आरती ही एक मध्यमवर्गीय तरुण मुलगी आहे, जिला एका एखाद्या धनाढ्य मराठा घरातून मागणी यावी अशी अपेक्षा असते. तिच्या घरात वडील आहेत, आत्या आहे. तिला मागणी घालण्यासाठी एक गडगंज श्रीमंत असलेल्या राजघराण्यातला तरुण निघाला आहे अशी बातमी येते. मधल्या काळात तिला एक युरोपियन (खुद्द शेक्सपियर) मागणी घालतो. यामुळे त्या घरातील वातावरण एकदम बदलतं. ‘एका फिरंग्याशी मुलीचं लग्न’ या स्थितीमुळे हे घर हादरतं. पण शेक्सपिअर गोड बोलून सर्वांची मनं जिंकतो.

या निमित्तानं मकरंदनं आधुनिक काळातल्या मानसिकतेवर प्रकाश टाकला आहे. आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा आपण कसे श्रेष्ठ आहोत हे दाखवण्याच्या प्रयत्नात असते. या संदर्भात आज ‘लग्न’ ही घटना सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारी व सामाजिक प्रतिष्ठेचं प्रदर्शन करण्याची संधी देणारी घटना ठरते. यासाठी श्रीमंत लोक कोणत्याही थराला जातात. यातूनच ‘थीम वेडिंग’, ‘डेस्टिनेशन वेडिंग’ वगैरे अतिशय खर्चिक प्रकार बोकाळले आहेत, हे या नाटकाचं अगदी ढोबळ कथानक!

फार्ससारखा ढोबळ व लवचिक फॉर्म घेतल्यामुळे या नाटकात मकरंदला अनेक गोष्टी साधता आल्या. पात्रांद्वारे त्यानं अनेक प्रसंगी चटपटीत कॉमेंटस केल्या आहेत. उदाहरणार्थ एका प्रसंगी एक पात्र म्हणते ‘ये मकरंद देशपांडे अजीब आदमी है. ये है मराठी आदमी, फिर भी नाटकं लिखता है हिंदी में. इसकी वजह से इसको मराठी नाटकवाले भी नहीं पहचानते’.

फार्ससारखा लवचीक फॉर्म घेतल्यामुळे या नाटकातील ऊर्जेची पातळीवर कमालीची वरची आहे. मकरंदनं या नाटकात अनेक नवीन नट घेतले आहेत. यात संजय दधिच (मामाजी), माधुरी गवळी (मामाजीची बहीण), आकांक्षा गडे (आरती), अजय कांबळे (बाब्या), भरत मोरे (कुमार) आणि निनाद लिमये (शेक्सपियर) यांच्या भूमिका आहेत. यातील प्रत्येक पात्रानं भूमिकेत जीव ओतला आहे. ज्यांनी ‘शेक्सपिअरचा म्हातारा’ बघितलं नाही किंवा त्याबद्दल काही ऐकलेलं नाही, त्यांना सुरुवातीला अनेक संदर्भ चटकन लागत नाहीत. एकदा त्यांची संगती लागली की, मग मात्र ते नाटकात रमत जातात. ज्यांनी ‘शेक्सपियरचा म्हातारा’ बघितलेलं असतं त्यांना तर सुरुवातीपासूनच गंमत वाटायला लागते.

या नाटकातील प्रकाशयोजना अमोघ फडकेंची आहे, तर संगीत रचिता अरोरा आणि अनिकेत यांचं आहे. या नाटकाच्या नेपथ्याचा (टेडी मौर्य) खास उल्लेख करणं गरजेचं आहे. प्रेक्षकांच्या डावीकडे एक छोटेसं स्वयंपाकघर आहे, तर रंगमंचाच्या मागच्या बाजूला एक प्रकारची अडगळीची खोली आहे आणि उजवीकडे पाश्चात्य पद्धतीचा शयनकक्ष आहे. पृथ्वी थिएटरची रचना इंटिमेट थिएटरची असल्यामुळे पात्रांना वावरायला तशी फारशी जागा नसते. पण यातही ‘अंश’ च्या टीमनं कमाल केली.

यात तीन नटांचा उल्लेख केला पाहिजे. बाब्या झालेल्या अजय कांबळेनं सतत प्रमुख भूमिका मिळावी अशी स्वप्नं बघणारा, पण प्रत्यक्षात नेहमी सार्इड हिरोची भूमिका करणाऱ्या नटाचं भावविश्व सादर केलं आहे. बाब्याच्या पात्राला दुसऱ्या अंकात गती यायला लागते आणि अजयमधील अभिनयगुण समोर यायला लागतात.

या नाटकातील आणखी एक गंमत नोंदवली पाहिजे. सुरुवातीला आरती या तरुणीला फारसं महत्त्व नसतं. तेव्हा सर्व फोकस मामाजी व त्यांची बहीण यांच्यावर असतो. जसजसं नाटक पुढे सरकतं, खास करून दुसरा अंक सुरू होतो तेव्हा फोकस आरतीवर येतो. आतापर्यंत परिघावर वावरणारी आरती नंतर जे नाटक ताब्यात घेते ते शेवटपर्यंत. आरतीच्या भूमिकेतील आकांक्षा गडे या तरुण रंगकर्मीनं या भूमिकेचं सोनं केले आहे. ज्या प्रकारे ती पारंपरिक लग्न की शेक्सपिअरसारख्या परदेशी माणसाशी लग्न ही ओढाताण व्यक्त करते, ते केवळ लाजबाब आहे! तिच्या अंगात भूत शिरतं तो प्रसंग काय किंवा तिच्याशी लग्न करण्यासाठी बाहेरून आलेला खानदानी तरुण व शेक्सपियर यांच्यातील शब्दांद्वारे केलेले युद्ध वगैरे प्रसंगात प्रेक्षक वेड्यासारखे हसतात.

तिसरा आणि महत्वाचा उल्लेख म्हणजे माधुरी गवळीचा. ती शरीराच्या चपळ हालचाली करत प्रेक्षकांना खिळवून ठेवते. तिचा चेहरा बोलका व हलता असल्यामुळे ती या भावनेतून त्या भावनेकडे सहजतेनं जाऊ शकते. नाटक संपतं, तेव्हा माधुरीला सोडून या नाटकाचा विचारच करता येत नाही अशा भावनेनं प्रेक्षक बाहेर पडतात.

असे इतके प्रसंग या नाटकात आहेत की, प्रसंगी आपण मकरंद देशपांडे या गंभीर प्रवृत्तीच्या रंगकर्मीचं नाटक बघतो की, अन्य कोणाचं असा प्रश्न पडतो. पंचवीस वर्षं मकरंदनं अथकपणे रंगभूमीची सेवा केल्यानंतर फार्ससारखा वरवर सोपा वाटणारा, पण प्रत्यक्षात सादर करायला  अतिशय अवघड प्रकाराला हात घातला आहे. त्यानं ‘एपिक गडबड’मध्ये जे सादर केलं आहे, ते केवळ अतुलनीय आहे.

फार्सच्या माध्यमातून प्रचलित समाजव्यवस्थेतील विसंगती दाखवता येतात, हा या फॉर्मचा फार मोठा फायदा आहे. या आधी मकरंदने लिहिलेली व सादर केलेली नाटकं काहीशी गूढ आशय असलेली होती. त्याच्या प्रगतीमधील तो एक महत्त्वाचा टप्पा होता. आज मकरंद फार्सकडे वळला आहे. आजही आपल्याकडे ‘लग्न’ ही किती खर्चिक बाब आहे याचा आपल्याला अंदाज आहे. यात संपत्तीचे ओंगळ प्रदर्शन केलं जातं, सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी अनेकदा मोठमोठी कर्जं काढली जातात. हे सर्वच मकरंदसारख्या संवेदनशील कलाकाराला अस्वस्थ करून गेलं आणि त्यातून जन्म झाला ‘एपिक गडबड’चा. वाकडी वाट करून बघावा असा हा प्रयोग आहे.

.............................................................................................................................................

लेखक प्रा. अविनाश कोल्हे मुंबईमध्ये अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत.

nashkohl@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.      

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......