अजूनकाही
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कृषिचिंतन’ हे पुस्तक डॉ. माधव जाधव यांनी संपादित केलंय. ते आ. बाळापूर, जि. हिंगोली येथील नारायणराव वाघमारे कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक आहेत. हे पुस्तक बाबासाहेबांच्या कृषिविषयक विचारांचं आणि कार्याचं यथाशक्ती प्रतिपादन करतं. डॉ. जनार्दन वाघमारे, प्रा. जैमिनी कडू, प्रा. यादव गायकवाड, डॉ. प्रकाश मोगले, डॉ. अनंत राऊत, डॉ. शेषराव माहिते, प्रा. उत्तम सूर्यवंशी आदी अनेक तज्ज्ञ मान्यवरांनी या पुस्तकासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कृषिचिंतनाचा विविध लेखांद्वारे आढावा घेतलाय. या पुस्तकातून बाबासाहेबांचे आर्थिक विचार, जल व ऊर्जानीती, कृषिविषयक विचार व भूमिका, शेतीचे प्रश्न, समकालीन शेती व शेतकरी, शेती आंदोलनं व श्रमिकांचे प्रश्न, कृषिचिंतन आणि मराठी साहित्य अशा विविधांगी पैलूवर चर्चा करण्यात आलीय.
डॉ. बाबासाहेब हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होतं. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, कायदेपंडित, अर्थतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ म्हणून आपण त्यांना ओळखतो. त्याशिवाय इतर अनेक क्षेत्रांतील त्यांची मुशाफिरी न भुतो न भविष्यती अशी आहे. त्यांनी केलेल्या विविधांगी कामाची, त्यांच्या अभ्यासाची, भाषणांची आणि लिखाणाची व्याप्ती पाहिली की, आपली छाती दडपून जाते.
डॉ. बाबासाहेबांनी जीवनाच्या साऱ्याच क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचं काम केलं. अफाट अशी ज्ञानसंपदा निर्माण केली. ती केवळ तत्त्वज्ञानाच्या स्वरूपाची नाही तर व्यक्तीसाठी आणि पर्यायानं समाजासाठी रचनात्मक ठरणारी आहे.
त्यांच्या एकूण लिखाणांपैकी आणि कामापैकी सर्वांत प्रभावी व त्यांच्या अनुयायांपासून ते विरोधकांपर्यंत सर्वज्ञात बाब म्हणजे त्यांचं दलितोद्धाराविषयीचं काम. ज्यांच्यासाठी ते अव्याहतपणे झटले. संविधानाच्या माध्यमातून त्यांना माणूस म्हणून जगण्याचा व्यावहारिक अनुभव दिला. त्यामुळे दलित, बहुजन तर त्यांना देवच मानतात यात काही दुमत नाही.
परंतु डॉ. बाबासाहेबांनी केवळ त्यांच्या जातीबांधवांसाठीच काम केलं असं नाही. स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी, त्यांना पुरुषांच्या बरोबरीनं समानतेनं जगण्यासाठीही त्यांनी काम केलं. नव्हे त्यासाठी सत्तेचा त्याग केला. भारतीय अर्थव्यवस्थेचा सखोल अभ्यास करून त्यातील प्रश्नांचं विश्लेषण केलं आणि त्यावर उपायही सुचवले. भारतीय शेतीचे प्रश्न व त्यावर उपाय, शेतमजुरांचे प्रश्न व उपाय, नदीजोड प्रकल्प, ऊर्जा धोरण, कामगारांचं जीवन सुकर होण्यासाठी उपाययोजना अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी प्रभावी काम केलं.
पण डॉ. बाबासाहेबांनी त्यावेळी मांडलेले विविध प्रश्न व त्यावरील उपाययोजनांवर अजूनही अंमलबजावणी झालेली नाही. परिणामी ते प्रश्न आजही तसेच आहेत. उलटपक्षी आज त्या प्रश्नांची तीव्रता प्रचंड वाढलीय. तत्कालीन प्रश्नांवरचे बाबासाहेबांचे विचार आजही सुसंगत ठरतात. म्हणूनच हे विचारधन अधिक वेगानं आणि मोठ्या स्तरावर पोहचणं गरजेचं आहे. त्यासाठी विविध पातळ्यांवर काम होणं आवश्यक आहे. हे पुस्तक नेमकं त्याच अनुषंगानं महत्त्वाचं आहे.
समग्र बाबासाहेब हे भावनिक पातळीवर नाही तर वैचारिक पातळीवर समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी त्यांनी केलेल्या विविधांगी कामाचा व विचाराचा सर्वव्यापी प्रचार व प्रसार झाला पाहिजे. ज्या वेळी हा विचार प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचेल आणि प्रत्येक माणूस कोणत्याही पूर्वग्रहानं त्या विचाराकडे न पाहता त्यांच्या विवेकाला आवाहन करण्याची संधी देईल, त्यावेळी हा विचार त्यांना नक्कीच आपल्या प्रगतीचा वाटेल.
निवडणुकांच्या वेळी सगळ्याच पक्षांना डॉ. बाबासाहेब आठवतात आणि आठवतं त्यांनी दलितांचं उजाळलेलं जीवन. मग त्याचाच धोशा लावून त्यांनी कसं फक्त दलितांसाठीच काम केलं हे पटवलं जातं. डॉ. बाबासाहेबांनी जातीभेद मोडीत काढण्यासाठी केलेलं काम उत्तुंग आहे. तरी तिचा केवळ स्वार्थासाठी उल्लेख व प्रचार होतो. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी लोकांसमोर केवळ अर्धसत्य मांडलं जातं.
‘सत्तेसाठी काहीही’ अशा डॉ. बाबासाहेब नव्हेत, तर सर्वच महामानवांना जाती-धर्माच्या चौकटीत बंद केलं जातंय. डॉ. बाबासाहेबांनी दलितांशिवाय इतरांसाठी काय केलंय, हा बाळबोध प्रश्न विचारणाऱ्या प्रवृत्तीपासून ते त्यांचं सर्वांगीण काम माहीत असणाऱ्या, पण ते लोकांसमोर न येऊ देता त्यांची फक्त आणि फक्त दलितांचे नेते एवढीच संकुचित प्रतिमा लोकांसमोर मांडणाऱ्या प्रवृत्ती, इतके टोकाचे विचार मांडले जात आहेत. यातील दुसऱ्या प्रवृत्तीवर काही इलाज नाही, पण पहिल्या प्रवृत्तीसाठी आपण निश्चितच काहीतरी करू शकतो. आणि अगदी हाच विचार लक्षात घेत बाबासाहेबांचे काम व विचार या लोकांसमोर मांडण्याच्या भूमिकेतून हे पुस्तक आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम डॉ. जाधव यांनी केलंय.
आजच्या व्हॉट्सॲप आणि फेसबुकच्या युगात माणसं मेढरांसारखं वागायला लागलीयत. ‘आला मॅसेज की केला फॉरवर्ड’ हा अनेकांचा विरंगुळा झालाय. एक वेळ हा प्रकार परवडला, पण दुसरा प्रकार अतिशय घातक आहे. तो म्हणजे या समाजमाध्यमावरचं ज्ञान (?) हेच अंतिम सत्य समजणारे लोक. या लोकांची जडणघडण अतिशय धोक्याच्या वळणावर आहे. व्हॉट्सॲप आणि फेसबुकवरचं ज्ञान टोकाची मतं घडवत आहेत. अशा या संकटाच्या काळात एका महापुरुषाचे विचार व काम लोकांपर्यंत पोहचवण्याचा उपक्रम खरंच स्तुत्य आहे.
अर्थशास्त्राच्या प्राध्यापकानं करायचं काम जाधव यांच्यासारख्या मराठीच्या प्राध्यापकानं केलं, त्याबद्दल जाधव यांचं अभिनंदन आणि मनापासून शुभेच्छा.
.............................................................................................................................................
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कृषिचिंतन : संपादक - डॉ. माधव जाधव,
लोकायत प्रकाशन, सातारा,
पाने – २०८, मूल्य – २२० रुपये.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4434
.............................................................................................................................................
लेखक कपिल नरवाडे हे महाराष्ट्र शासनात सहायक कक्ष अधिकारी आहेत.
kapiln48@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment