समीक्षेचा, टीकेचा विचार न करता, कुणाशीही स्पर्धा न करता, आपल्या आतल्या आवाजाला अंकुरासारखं फुटू द्यावं, फुलू द्यावं
ग्रंथनामा - झलक
नलेश पाटील
  • निसर्गकवी नलेश पाटील यांच्या ‘हिरवं भान’ या कवितासंग्रहाचं मुखपृष्ठ
  • Fri , 15 June 2018
  • ग्रंथनामा झलक नलेश पाटील Nalesh Patil हिरवं भान Hiravan Bhan

कविता आणि जाहिरात अशा दोन्ही सर्जनशील क्षेत्रांत सहजतेनं वावरणारे कवी नलेश पाटील यांच्या कवितांची भुरळ रसिक मनावर कायमच राहिली. शब्दांची, त्यांतील अर्थाची, नादाची, लयीची, उत्तम जाण, चित्रमय मांडणी ही नलेश पाटील यांच्या कवितेची वैशिष्ट्यं. ‘कवितांच्या गावा जावे’ या जाहीर कार्यक्रमातून त्यांची कविता रसिकांपर्यंत पोहोचली, लोकप्रिय झाली. मात्र त्या कविता पुस्तकरूपानं उपलब्ध नाहीत याची खंत त्यांच्या चाहत्यांना सदैव वाटत होती. काल मुंबईत त्यांच्या कविता पुस्तकरूपानं पॉप्युलर प्रकाशनातर्फे ‘हिरवं भान’ या नावानं प्रकाशित झाल्या आहेत. या संग्रहाला नलेश पाटील यांनी लिहिलेलं हे मनोगत.

.............................................................................................................................................

समुद्रकिनाऱ्याला वसलेल्या ‘अक्करपट्टी’ या निसर्गरम्य अशा खेड्याचे माझ्या मनावर, जडणघडणीवर व माझ्या कवितेवर खोलवर परिणाम झाले.

सटवाईने किंवा नियतीने म्हणा हवं तर, ललाटी निसर्गाच्या जबरदस्त आकर्षणाचे लेख लिहून जन्माला घातल्यामुळेच कदाचित, या रानोमाळी भटकताना त्यातले मनोहारी विभ्रम मनाच्या खोल पटलावर गोंदले गेले. म्हणून ‘चित्रकार’ व ‘कवी’ होण्याचं भाग्य मला लाभलं, नव्हे तर ते क्रमप्राप्तच होऊन गेलं नि त्यामुळेच माझ्यातला चित्रकार कवी म्हणतो,

फुलास जिथे फुलता येते

अन् पाखरास नाचता येते,

ते झाडच माझे पुस्तक आहे

ज्याचे पान अन् पान वाचता येते.

कवितेशी निवांत गुज करताना तेजाचा एक नितळ प्रवाह आपल्याशी आतून सोबत करत असल्याची सतत जाणीव होत असते. तिच्या पवित्र डोहात डुबकी घेताना आपणही एक तेजाचाच लोळ होऊन जातो आणि त्यात विलीन होत असंख्य फांद्या फुटून, उजेडाचा महाकार वृक्ष होऊन सळसळू लागतो. सूर्यपाखरांचा थवा मग किरणांच्या काड्यांची घरटी त्यावर विणू लागतो अन् अवघा वृक्ष आनंदाने सोन्याचं गाणं गात डोलू लागतो.

असो, हे झालं माझ्यापुरतं, पण सर्वसामान्यपणे कवितेचं चिंतन करताना असं वाटतं की, कविता ही निश्चितपणे स्वान्तसुखाय, मनाला अस्वस्थ करत जगण्याची एक गूढ, परंतु तितकीच आकर्षक अशी अनुभूती देत जन्माला येते.

एखादं बीज जेव्हा अंकुरतं, तेव्हा वर कोंभ व खाली मूळ धरण्यापूर्वीचं द्विदल बीज हे डोळ्यांसमोर आणलं तर त्याचं दृश्र स्वरूप हे उदगार- चिन्हासारखं वाटतं; किंबहुना तो निसर्गाचा उदगारच वाटतो, तद्वतच कवितेचंही आहे.

अंतःस्थ ध्यानावस्थेतील तंद्रीत कवितेचा जन्म हा त्या उदगारासारखाच असतो. प्रसूतीचा क्षण, सर्जनाच्या वेदनेचा परमोच्च असा हा बिंदू एका तरल तरतरीत नवजात विचाराला कवितेतून प्रकट करतो. असे क्षण व त्याची सतत नशा चढल्यागत ध्यास असणे, हेच कवीचं जगणं व हीच त्याच्या कवितेची निर्मळ पारदर्शक भूमिका असं माझं प्रामाणिक मत आहे.

‘आर एम अ पोएट, लिसन टु मी !’, ‘हा माझा आवाज आहे, ही माझी कविता आहे, तिला माझा चेहरा आहे’ इतकं ठणकावून सांगण्याइतपत ती कविता त्या कवीशी नातं सांगणारी हवी. अस्सल मातीतली, कसलेली, नकलेच्या जवळपासही न फिरकणारी अशीच कविता मी सदैव देईन, अशा दृढनिश्चयाने कवीनं आपला पुढील प्रवास चालू ठेवावा, असं मला वाटतं.

कवितेच्या तळमळीनं सर्जनाच्या ऊर्जेनं व्यापक होत जाताना कवीची घालमेल होते, कस लागतो व शेवटी ऐरणीवर त्याची सांगता होते. तिचा आस्वाद घेताना, ती किती खोलवर भिडतेय, भंडावून सोडतेय, निखळ आनंद देतेय, अस्वस्थ करतेय की अंतर्मुख करते याचाच विचार व्हावा आणि म्हणूनच ती चांगली किंवा वाईट या दोनच निकषांवर दाद देऊन तिचा आस्वाद घ्यावा असं मला प्रामाणिकपणे वाटतंय. कारण कविता ही समीक्षातीत आहे असं मला नेहमीच वाटत आलंय.

या हिरव्या वस्तीमधले हे प्राणवायूचे घर,

मज इथे निवारा मिळतो, अन इथेच हिरवा सूर...

माझ्या हातांच्या रेषा, पानांत उमटल्या कशा

पानातून कुठे निघाल्या त्या शोधीत हिरव्या दिशा?

हातावरूनी पानी, पानावरूनी दूर

मज इथे निवारा मिळतो, अन इथेच हिरवा सूर...

समीक्षेचा, टीकेचा विचार न करता, कुणाशीही स्पर्धा न करता, आपल्या आतल्या आवाजाला ‘त्या’ अंकुरासारखं फुटू द्यावं, फुलू द्यावं हीच माझी भूमिका, हेच माझं मनोगत व हेच माझं व्रत.

आपल्या ओंजळीत ही आकाशगंगा सोपवताना मला विशेष आनंद होत आहे.

.............................................................................................................................................

या कवितासंग्रहाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4430

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Dust Golden

Fri , 22 June 2018

*


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......