अजूनकाही
लेबल लावलेली कविता अनेकदा कविता नसते. तसेच, कविता लिहिण्यासाठी लिहिलेली कविता अनेकदा कवितापण घेऊन येते, कविता येतच नाही. ती हरवून जाते.
‘ग्रामीण कविता’ या लेबलासह येणारी कविता अनेकदा नागर जाणीवेच्या खिडकीतून आत येते, तर तथाकथित ‘शहरी’ आणि ‘महानगरीय’ लेबल लावून येणारी कविता ही ग्रामीण भागातून विस्थापित होऊन आलेल्या कवीची महानगरीय पसाऱ्यानं उडालेल्या गोंधळाची नोंद मात्र असते.
काही ग्रामीण लेबलांच्या कविता निव्वळ ग्राम्य असतात, तर काही महानगरीय कविता या निव्वळ शहरी प्रतीकं आणि प्रतिमांच्या वर्णनात अडकून जातात.
असंच काहीसं घडतं दलित आणि स्त्रीवादी ही लेबलं लावलेल्या कवितांच्या बाबतीतही. दलित लेखकांनी आपल्या आत्मकथनांनी मराठी साहित्यात आणलेली ऊर्जा, नवा अनुभव, नवी कथनशैली, साहित्याच्या मध्यमवर्गीय जाणिवा तोडून-फोडून काढण्याची क्षमता आता थंडगार झालेली आहे. आजकाल बरेच दलित लेखक या गारठ्यातच ‘माचीसच्या काड्या’ पेटवण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
या सगळ्या प्रकारात मी लेबल न लावलेली, कवितापणाचा नट्टापट्टा न केलेली कविता शोधत असतो आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर कवितेचं उत्पादन होत असताना, निराश होत असतो. म्हणून एक वाचक म्हणून मी लेबलं लावलेली कविता वाचायचं टाळतोच.
हे माझं अल्पमती निरीक्षण मांडण्याला कारण म्हणजे ‘बहादूर थापा आणि इतर कविता’ हा संतोष पद्माकर पवार यांचा संग्रह. ही लेबल न लावलेली किंवा न लागलेली कविता आहे, असं माझं मत आहे. परंतु यातील गद्यात्मक शैलीमुळे कुणी जर तिला कविता हे लेबल नाकारलं तरीही साहित्यकृती म्हणून तिचं वेगळेपण आणि महत्त्व कमी होणार नाही.
११ जून २०१५ साली साधना प्रकाशनानं प्रकाशित केलेला हा संग्रह मी मोजून दोन वर्षांनंतर म्हणजे आता वाचला. संतोष पवार हे मराठी साहित्यक्षेत्रातलं ओळखीचं नाव आहे, पण मीच मुळी या क्षेत्रातला आऊडसायडर असल्यानं माझी त्यांची ओळख नाही, त्यांना मी कधी भेटलेलोही नाही. पण त्यांचा फोन नंबर मिळवून नुकताच त्यांच्याशी या संग्रहाबद्दल बोललो.
कारण मला हा संग्रह खूप म्हणजे खूप आवडला आणि मनापासून वाटलं की या रचनांबद्दल आपण आपल्यापुरतं लिहिलं पाहिजे. या रचनांबद्दल कविता वाचणाऱ्यांशी, त्यावर लिहिणाऱ्यांशी बोललं पाहिजे. याची काही मला वाटतात ती कारणं अशी -
१) या रूढार्थानं ज्याला कविता म्हणतो तशा कविता नाहीत. या रचना कवितापणाचे ज्ञात आकृतिबंध आणि प्रचलित भाषा वापरत नाही. म्हणून त्यांची साहित्यात प्रकारनिश्चिती करावी लागेल. (हे काम प्रशिक्षित समीक्षकांचं!)
२) या संग्रहातील सर्व २५ रचना म्हणजे २५ काव्यात्म व्यक्तिचित्रणं आहेत. इथं एक प्रश्न पडेल आणि त्याचं उत्तर शोधावं लागेल की, मग पवारांना सरळसरळ गद्य व्यक्तिचित्रणाचा प्रकार सोडून काव्यात्मतेकडे का वळावंसं वाटलं?
३) अशा काव्यात्म व्यक्तिचित्रणाची फलश्रुती काय?
या मुद्द्यांची चर्चा व्हायला हवी.
हे मानवी दुःखाचं सूक्ष्म वाचन आहे
या रचनांचं एक वैशिष्ट्य जे त्यांना अतिशय वाचनीय करतात ते आहे - कवीची मानवी दुःखाचं सूक्ष्म वाचन करण्याची क्षमता.
पवार यांनी जी २५ व्यक्तिचित्रणं या निमित्तानं शब्दबद्ध केलेली आहेत, त्यापैकी बहुतांश इतकी जिवंत आहे की ती सरळ भिडतात. They prick you!
सोनी, चांगू किसन रणमळे, हिराबाई जाफरमियाँ, बाळू पिराजी, गुजाबाई धनगरीन, कमलबाई भानुराव भानुसे आणि फ्रँकी ही व्यक्तिचित्रणं वाचणाऱ्याला नजर हटवू देत नाही. ती सरळ तुमच्या हृदयाला हात घालतात.
पण ती केवळ भावसंवेद्य नाहीत. त्यात सभोवतालचं सूक्ष्म निरीक्षण आहे. ही दुःखग्रस्त माणसं कधी व्यवस्थेनं लुबाडली गेली आहेत, तर कधी जातिव्यवस्थेच्या आगीत होरपळलेली आहेत, तर कधी माणसातल्या वासनेनं घेतलेले बळी आहेत.
पवार यांच्या कवितेतली माणसं (ही या नावाची माणसं अस्तित्वात आहेत, असं पवार सांगत होते. त्यांनी थोडी ‘पोएटिक लिबर्टी’ घेतली आहे, पण म्हणून काल्पनिक पात्रं उभी केली नाहीत.) या दुःखांना सामोरं जाताना बहुतांशी दुःखाच्या डोळ्यात डोळे घालून, पाय रोवून उभी राहणारी माणसं आहेत. ते -
जे सोसत नाही असले, तू दुःख मला का द्यावे?
- असा प्रश्न विचारणारी अगतिक माणसं नाहीत.
अशी माणसं शोधून त्यांच्या जीवनाचा सहृदय पट पवार वाचकांपुढे मांडतात, हे मला महत्त्वाचं वाटलं.
पण एक निरीक्षण असंही मांडता येईल की, जे मला पवार यांनीच लक्षात आणून दिलं- यात एकही खलवृत्तीची व्यक्ती नाही. खरं तर असायला हवी होती.
मानवी जीवनातली खलवृत्ती ही जन्मजात आहे, आपल्या गुणसूत्रांतच ती आहे की, ती जन्मानंतर होणारा संस्कार आहे की, एका विशिष्ट परिस्थतीत दिला गेलेली मानवी प्रतिसाद आहे, हे समजायला त्यातून मदत झाली असती. मी तर पवार यांना अशी विनंती करेन की, त्यांनी तशा व्यक्तिचित्रणांचाही एक संग्रह अवश्य काढावा, जेणेकरून मानवी जीवनाच्या सुष्ट-दुष्ट अशा दोन्ही प्रेरणांचा अधिक चांगला काव्यात्म शोध घेता येईल.
तसंच या व्यक्तिचित्रणांची एक स्पष्ट मर्यादा आहे. ती म्हणजे एखाददुसरा अपवाद वगळला तर यातून व्यवस्थागत शोषण, हिंसा, कुरूपता, विद्रुपीकरण ठळकपणे पुढे येत नाही. बहुतांश रचनांमध्ये ते व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवरच राहून जातं आणि शोषण, हिंसा आदींचे व्यापक, जागतिक व्यवस्थागत रूप अधोरेखित होत नाही. ते घडलं असतं तर या कवितांची महत्ता अजून वृद्धिंगत झाली असती.
अर्थात हे माझं व्यक्तिगत आकलन आणि मत आहे. कुणी सहमत होईलच, असं नाही.
या कवितेची प्रशिक्षित समीक्षकांनी दखल घेऊन तिच्याबद्दल माझ्यासारख्या असंख्य सामान्य वाचकांचं प्रबोधन करायला हवं, असंही वाटलं. कारण साप्ताहिक ‘साधना’तून सदर म्हणून छापून येत असताना आणि नंतर पुस्तकरूपानं प्रकाशित झाल्यावरही, हे पुस्तक बऱ्याच वाचकांच्या पसंतीस उतरलेलं आहेच.
संतोषजींना पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
.............................................................................................................................................
या कवितासंग्रहाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4429
.............................................................................................................................................
लेखक गणेश कनाटे मराठी साहित्याचे अभ्यासक आहेत.
gankanate@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment