गांधीवाद : एक चिरंतन सत्य
सदर - गांधी @ १५०
दादा धर्माधिकारी
  • म. गांधी
  • Thu , 07 June 2018
  • गांधी @ १५० Gandhi @ 150 महात्मा गांधी Mahatma Gandhi कस्तुरबा गांधी Kasturba Gandhi सेवाग्राम आश्रम Sevagram Aashram

मोहनदास करमचंद गांधी यांंना रेल्वेच्या फर्स्ट क्लासच्या डब्ब्यातून बाहेर फेकले गेले. कारण ते गोरे नव्हते. दक्षिण आफ्रिकेतल्या पीटरमार्टिझबर्ग या रेल्वे स्टेशनवर थंडीत कुडकुडणाऱ्या गांधींच्या आयुष्यातला तो आत्मसाक्षात्काराचा दिवस होता. त्यातून गांधींना आत्मबळ आले, त्यांची आत्मशक्ती जागृत झाली. त्या दिवशी त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला सत्याग्रह केला. तो दिवस होता ७ जून १८९३. म. गांधींचा दक्षिण आफ्रिकेत तो पहिला सत्याग्रह. त्याला आज १२५ वर्षँ पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं...

.............................................................................................................................................

‘गांधीवाद’ किंवा ‘गांधीमार्ग’ असे चुकीचे नाव ज्याला दिले जाते, त्याचा स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय जनमनावर खरोखरीच पुष्कळ प्रभाव पडला होता; पण तो गांधींच्या सत्यनिष्ठेचा किंवा अहिंसेवरील त्यांच्या अढळ श्रद्धेचा प्रभाव नव्हता. सत्य व अहिंसा या तत्त्वांच्या विषयी भारतीय जनमानसात परंपरागत आदरभाव होता व आहे. पण वैयक्तिक किंवा सामाजिक व्यवहारात त्या तत्त्वांचा विनियोग करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज मात्र फारच क्वचित वाटली. नि:शस्त्र, हतवीर्य व हताश झालेल्या लोकांना लोकसुलभ प्रत्यक्ष प्रतिकाराचा मार्ग गांधींच्या पूर्वी अरविंद, बिपिनचंद्र पाल व लोकमान्य टिळक यांनी दाखविला होता. गांधींनी तोच मार्ग अधिक परिणामक्षम स्वरूपात मांडला, असा समज त्यावेळच्या लोकधुरीणांनी व साधारण लोकांनी करून घेतला. ब्रिटिश साम्राज्यशाहीचा प्रतिकार करण्याकरिता गांधींचा मार्ग उपयुक्त वाटला, एवढाच त्याचा अर्थ. लोकमानसावर गांधींच्या कार्यक्रमाचा जो प्रभाव पडला, त्याचाच स्वातंत्र्यप्राप्तीमध्ये प्रमुख भाग होता. सशस्त्र क्रांतिकारकांच्याबद्दल लोकांच्या मनात निरतिशय आदर होता. किंबहुना गांधींच्यापेक्षाही त्यांच्याविषयी लोकांना अधिक कौतुक व आदर वाटत होता असे म्हटले तरी चालेल. पण त्या वेळच्या परिस्थितीत गांधींचा मार्गच अधिक लोकसुलभ, अधिक व्यवहारी व अधिक परिणामक्षम असल्यामुळे लोकांच्या आचरणावर त्याचाच प्रभाव अधिक पडला.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लोकमनावर गांधींच्या तत्त्वज्ञानाची पकड फारशी शिल्लक राहिली नाही. स्वातंत्र्यप्राप्तीच्या पूर्वकालातही म्हणण्यासारखी पकड नव्हतीच. आज भारताजवळ प्रचुर उत्पादनाची यांत्रिक साधने पुरेशी नाहीत. देशव्यापी बेकारी आहे, त्यामुळे गांधींच्या कार्यक्रमाविषयी अपरिहार्यपणे आस्था वाटते.

गांधींचे स्वत:चे काही तत्त्वज्ञान होते असे मानले, तर त्यातील चिरकाल टिकणारी तत्त्वे म्हणजे त्यांची सत्यनिष्ठा व सत्यनिष्ठेकरितादेखील कोणत्याही मानवाची हत्या न करण्याचा त्यांचा अभेद्य निश्चय ही होत. जीवनाची एकता व निरपवाद मानवनिष्ठा असे त्या तत्त्वांचे दुसऱ्या शब्दांत वर्णन करता येईल. या तत्त्वांचे दर्शन भारतामध्ये आज अत्यंत अल्प प्रमाणात घडते. याचे एक कारण दुर्भिक्ष व दुर्बलता अथवा पौरुषहीनता; आणि दुसरे कारण संप्रदाय, जात व भाषा यांच्या आधारावर उदयास येऊ पहाणाऱ्या क्षुद्र, संकुचित अस्मिता हे होय.

जागतिक राजकारण व समाजकारण यांच्या संदर्भात आज मानवाला गांधीजींवाचून गत्यंतर उरलेले नाही. विज्ञानाने माणसांना एकमेकांच्या अगदी निकट आणून उभे केले आहे. त्यांच्यात कुस्ती झाली तर उभयपक्षांचा संहार अपरिहार्य आहे असा निर्वाळा विज्ञानाने दिला आहे. ज्या मानवाला निसर्गाने स्वसंरक्षणाचे कोठलेही साधन दिलेले नाही आणि त्यामुळे ज्याचा जीव घेणे अत्यंत सोपे आहे, त्याच्या वधाकरिता उत्तरोत्तर नवीन नवीन शस्त्रास्त्रे शोधावी लागतात, यातील इंगित काय? या परिस्थितीत विज्ञानाचा एक असंदिग्ध संकेत साठवलेला आहे. तो संकेत असा की, आता शस्त्रास्त्रांची उपयुक्तता संपलेली आहे. अर्थात् शस्त्रनिरपेक्ष वीरतेचे युग अवतरण्याची प्रसादचिन्हे दिसू लागली आहेत. जागतिक संदर्भाचा दुसरा संकेत अतिसंपन्नता म्हणजे अतिप्रचुरता व उपकरणशीलतेचा अतिरेक यांच्यामुळे मानवीय जीवन सपक व नि:सत्त्व झालेले आहे. परोक्ष जीवनाला आजचा तरुण उबगला आहे. त्याचे मानव्य क्षीण होऊ लागले आहे. जीवनात मानवाला जणू भूमिकाच उरलेली नाही. मानवीय संबंधांना सामाजिक व्यवहारात वाव राहिलेला नाही. समाजाचा घटक मानव हा राहिलेला नसून संस्था व संघटन हे घटक झालेले आहेत. निरपेक्ष व निरुपाधिक मानवी संबंध म्हणजेच अहिंसा. अहिंसा हा शब्द जुनाच आहे; पण त्यात गांधींनी हा भावरूप आशय ओतलेला आहे. गांधींच्या अपरिग्रहाचा, स्वदेशीचा, स्पर्शभावनेचा व ब्रह्मचर्याचादेखील एक अभिनव आशय आहे. ती नित्यनूतन अशी सामाजिक मूल्ये आहेत.

या दृष्टीने जागतिक संदर्भात युरोप व अमेरिका यांच्यासारख्या समृद्ध खंडांत आणि रशिया-चीनसारख्या समृद्धीच्या मार्गावर असलेल्या देशांत गांधींची आवश्यकता आहे. युरोप-अमेरिकेत तशी आकांक्षाही आहे.

जगासमोर असलेल्या समस्यांचा उल्लेख वर आलेलाच आहे. युरोप-अमेरिकेत अतितृप्तीची व निरवधी अवकाशाची म्हणजेच बेसुमार फुरसतीची समस्या आहे. रशिया व चीनसारख्या देशात शारीरिक गरजा भागल्यानंतर ज्या मानसिक व बौद्धिक आकांक्षा उद्भूत होतात (उद्भवतात) त्यांची समस्या आहे. या दोन्ही समस्यांची उत्तरे गांधीनिर्दिष्ट मार्गांत आहेत, हे लक्षात येण्यास फारशा बुद्धिमत्तेची गरज नाही. गांधींच्या शरीरश्रमाचा भाकरीशी अनिवार्य संबंध नाही. गांधींच्या उद्योगनिष्ठेचा बेकारीच्या निवारणाशी जितका घनिष्ठ संबंध आहे, त्यापेक्षा कितीतरी अधिक संबंध निर्मितीच्या आनंदाशी आणि कारागिरीच्या व कलेच्या विकासाशी आहे. फुरसतीचा उपयोग ही सांस्कृतिक समस्या आहे. जीवन, संजीवन (recreation), जीविका यांचे संवादित्व साधावयाचे असल्यास गांधींवाचून गत्यंतर नाही.

आता थोडक्यात भारतीय परिस्थितीचा विचार करू. विपन्नता व दुर्बलता या भारताच्या दोन प्रमुख व्याधी आहेत. जेथे दुर्भिक्ष असेल तेथे सुबत्तेची हाव असणे स्वाभाविक आहे. अर्थातच भारतामध्ये वैभवाकांक्षा व वैभवशाली राष्ट्राचे अनुकरण करण्याची प्रवृत्ती सर्वत्र दिसून येते. भारताचे नि:शस्त्रीकरण म्हणजे काही स्वेच्छेने केलेला शस्त्रसंन्यास नव्हे. आपली शस्त्रास्त्रे बळजबरीने हिसकावून घेण्यात आली, या अपमानाचे शल्य भारतीय जनमनाला अजून टोचत आहे. त्यामुळे अनुपलब्ध शस्त्रास्त्रांचा हव्यास या देशातील लोकांना वाटत राहणे स्वाभाविक आहे.

अशा परिस्थितीत गांधींचा या देशाला काही उपयोग आहे काय?

गांधींचा आविर्भाव या देशात झाला त्यावेळीही येथे उपासमार, दारिद्रय, बेकारी यांचे साम्राज्य होते. बळजबरीच्या नि:शस्त्रीकरणामुळे राष्ट्र हतबल झालेले होते. भुकेलेल्याला भीक व चोरी या मार्गांचा अवलंब करावा लागू नये आणि नि:शस्त्र झालेल्यांना नामर्दपणे अन्याय सहन करावा लागू नये, ही तळमळ गांधींना लागून राहिली होती. म्हणून त्यांनी भुकेलेल्यांना स्वदेशीचा व हतबल झालेल्यांना सत्याग्रहाचा संजीवनमंत्र दिला. रशिया व अमेरिका यांच्यापुढे दीनपणे तोंड वेंगाडल्यावाचून आत्मप्रत्ययाने स्वत:च्या पुरुषार्थावर भारताला जगायचे असेल तर शस्त्रनिरपेक्ष शौर्य व स्वदेशी यांवर आधारलेले उत्पादन, याखेरीज दुसरा तरणोपाय आहे काय? शस्त्रनिरपेक्ष वीरता व शेजारधर्मावर अधिष्ठित स्वदेशी हाच गांधींच्या कार्यक्रमाचा गाभा नव्हता काय? शस्त्रनिरपेक्ष वीरतेत शस्त्रनिषेधाची वृत्ती असेलच असे नाही. कदाचित् शस्त्रास्त्रे व सैन्य यांचा उपयोग करून घेण्याची आकांक्षा व प्रयत्नही असेल. पण शस्त्र-प्रयोगाकरिता उपलब्ध होऊ शकणारी साधने अपर्याप्त असण्याचा संभवच अधिक. त्याचप्रमाणे स्वदेशीवर आधारलेल्या संयोजनाला यंत्राचे वावडे असण्याचे कारण नाही. पण मनुष्यशक्ती व पशुशक्ती वाया जाऊन बेकारी वाढण्याचा जेथे संभव असेल तेथे गांधीनिर्दिष्ट ग्रामसंजीवनेप्रवण संयोजनच अपरिहार्य ठरेल.

या दृष्टीने विचार केल्यास भारताला आजच्या परिस्थितीत गांधींच्या मार्गाची उपयुक्तता पटल्यावाचून राहणार नाही.

(‘गांधी नावाचे महात्मा’ या रॉय किणीकर संपादित आणि डायमंड पब्लिकेशन्स, पुणे प्रकाशित (२०१२) पुस्तकातून साभार.)

.............................................................................................................................................

गांधींविषयीच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_list

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................