अशा थोर संपादकाची आज भारतातील प्रत्येक शहरात व राज्यात गरज आहे
संकीर्ण - श्रद्धांजली
रामचंद्र गुहा
  • पत्रपंडित गोविंदराव तळवलकर (रेखाचित्र - वसंत सरवटे)
  • Mon , 02 April 2018
  • संकीर्गोण श्रद्धांजली गोविंद तळवलकर Govind Talwalkar रामचंद्र गुहा Ramachandra Guha

गोविंद तळवलकर यांची व माझी प्रत्यक्ष भेट होण्याचा योग आला नाही, पण त्यांच्या दीर्घ आणि अतिशय गौरवास्पद जीवनाच्या अखेरच्या दीड दशकात माझा त्यांच्याबरोबर पत्रव्यवहार होता. याची सुरुवात मी लिहिलेल्या वेरिअर एल्विन यांच्या चरित्रामुळे झाली. तळवलकरांनी मला लिहिले की, हे पुस्तक त्यांना आवडले. परंतु ‘माझे सत्याचे प्रयोग’ या महात्मा गांधींच्या मूळ गुजरातीतील आत्मचरित्राचा इंग्रजी अनुवाद करण्यात महादेवभाई यांना एल्विन यांनी मदत केली होती, हे माझे प्रतिपादन मात्र चूक आहे, असे त्यांनी माझ्या निदर्शनास आणून दिले. हे प्रतिपादन करताना मी अनुवादक महादेवभाई देसाई यांच्या प्रस्तावनेचा संदर्भासाठी उपयोग केला होता. महादेवभाईंनी प्रस्तावनेत म्हटले होते की, ‘अनुवादाच्या इंग्रजी भाषेच्या संबंधात मला एका आदरणीय मित्राचे साह्य लाभले आहे. इतर गुणांबरोबरच इंग्लिश विद्वान अशी या मित्राची ख्याती आहे. हे अनुवादाचे काम हाती घेण्यापूर्वी त्याने मला अशी अट घातली की, त्याच्या नावाची कधीही वाच्यता होऊ देणार नाही.’ महादेवभाईंच्या या लिखाणावरून माझा असा समज झाला की, ही व्यक्ती एल्विनच असावी. कारण एल्विन हे इंग्लिश होते, विद्वान होते आणि महादेवभाईंचे जवळचे मित्रही होते. तथापि गांधींच्या आत्मचरित्राच्या अनुवादामध्ये सुधारणा करण्यास साह्य करणारी व्यक्ती म्हणजे मद्रासचे उदारमतवादी व्ही. एस. श्रीनिवास शास्त्री, असे तळवलकरांचे मत होते. त्यामुळे तळवलकरांनी त्यावेळी मला असेही विचारले की, आता तुम्ही याचा तपास करून खात्री करून घ्याल काय?

काही वर्षांनी पुन्हा नव्याने पुराभिलेखात (अर्काइव्हमध्ये) संशोधन करत असता महादेवभाई व शास्त्री यांच्यातील काही पत्रव्यवहार मला सापडला, त्यावरून तळवलकर यांचे अनुमान बरोबर असल्याचे सिद्ध झाले. याचे कारण असे की त्या प्रस्तावनेत महादेवभाई यांना ‘एक प्रख्यात इंग्लिश विद्वान’ नव्हे, तर ‘इंग्लिशचा एक प्रख्यात विद्वान’ असे अभिप्रेत होते. सुदैवाने एल्विनच्या चरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये मी ही चूक दुरुस्त करू शकलो. तसेच या वर्षअखेरीस येणाऱ्या मी लिहिलेल्या गांधींच्या चरित्राच्या दुसऱ्या खंडामध्ये श्रीनिवास शास्त्री यांना ते श्रेय मी तळवलकरांमुळेच देऊ शकलो आहे. याची कृतज्ञतापूर्वक नोंद दुसऱ्या खंडामध्ये श्रेय नामावलीमध्ये येईल.

तळवलकरांचे निधन मार्च २०१७ मध्ये झाले. त्यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त ‘साधना साप्ताहिका’ने पुण्यात त्यांच्या जीवनकार्याचे स्मरण करण्यासाठी एका विशेष समारंभाचे आयोजन केले होते. या वेळी त्यांच्यावरील लेखांचा संग्रह असलेले (त्यांच्या मुलींनी लिहिलेले) पुस्तकदेखील प्रकाशित करण्यात आले. त्यांच्या मूळ प्रदेशात ‘महाराष्ट्रात’ आजही त्यांच्याकडे प्रदीर्घ अशा पाच दशकांतील लेखन आणि सामाजिक जीवनातील योगदानामुळे अतिशय आदराने पाहिले जाते. महाराष्ट्रात असेदेखील सांगितले जाते की, मराठी पत्रकारितेच्या इतिहासात दोन महत्त्वाची युगं होऊन गेली : एक ‘टिळकयुग’ आणि दुसरं ‘तळवलकरयुग’.

तळवलकरांचे वास्तव्य बहुतांश काळ मुंबईतच होते. त्यांचे त्यांच्या शहराशी आणि राज्याशी घट्ट असे नाते होते, पण तरीसुद्धा त्यांचा दृष्टिकोन कधीच संकुचित नव्हता. त्यांना भारताबरोबरच जागतिक घडामोडींमध्येदेखील तितकाच रस होता. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांत ब्रिटिश राज्यकर्त्यांकडून भारतीयांच्याकडे झालेल्या सत्तांतराचा इतिहास, सोव्हिएत साम्राज्याचा उदय आणि अस्त, तसेच नवरोजी ते नेहरू या कालखंडातील आधुनिक राजकीय विचारधारांचा इतिहास, यांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. महाराष्ट्रीय समाजावर तळवलकरांच्या लेखनाचा जो प्रभाव पडला, त्याचा उल्लेख करताना टिळकांनंतरचा प्रभावी संपादक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अशा उल्लेखामुळे ते नक्कीच नाराज झाले नसते, कारण त्यांनी स्वत:च टिळकांवर लेखन केले आहे. तथापि, टिळकांपेक्षाही त्यांना गोपाळ कृष्ण गोखले यांच्याविषयी अधिक आदर होता. गोखले यांच्याप्रमाणे तळवलकरसुद्धा सामाजिक सुधारणांचे पुरस्कर्ते आणि एक देशभक्त होते. भारतीय समाजाला भेडसावणाऱ्या सामाजिक प्रश्नांबाबत आणि त्यातही स्त्रियांसंबंधीच्या भेदभावाबाबत ते अतिशय जागरूक होते. इंग्रजी भाषेवर उत्तम प्रभुत्व असूनही त्यांनी फक्त गोपाळ कृष्ण गोखले यांचे चरित्रच तेवढे इंग्रजीमध्ये लिहिले. नेहरू, नवरोजी, लेनिन व मार्क्स यांचा परिचय मराठी जनतेला करून द्यावा आणि त्याच वेळी गोखले यांचा भारतीय जनतेला अधिक परिचय करून द्यावा, असा त्यांचा उद्देश होता.

महाराष्ट्रातील संपादकांसाठी तळवलकर हे एक समकालीन आदर्श असे उदाहरण होते. तरीही त्यांच्या कार्याची परंपरा महाराष्ट्राबाहेरच्या तसेच आजकालच्या संपादकांनीही आदर्श समजून पुढे चालू ठेवायला हवी. त्यांच्या कार्याचे महत्त्वाचे असे तीन पैलू आहेत, ज्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. पहिला म्हणजे तळवलकर हे एक विचारवंत होते, पण त्याच वेळी प्रत्यक्षातील वास्तवाविषयी ते भान राखून होते. आज भारतीय पत्रकारितेत दोन प्रकारचे स्तंभलेखक आहेत, एक वातानुकूलित कक्षामधून आपले मत प्रदर्शित करतात आणि दुसरे प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन वार्तांकन करतात. तळवलकर हे या दोन्ही प्रकारच्या पत्रकारितेला प्रोत्साहन देणारे संपादक होते. अगदी अखेरच्या काळापर्यंत ते त्यांच्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून होते.

त्यांच्या कार्याचा दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे- त्यांनी स्तंभलेखन, परीक्षणे आणि संपादकीये तर लिहिलीच, पण सखोल संशोधनावर आधारित पुस्तकेदेखील लिहिली. ते लेखक तर होतेच, पण विद्वान अभ्यासकदेखील होते (मला खात्री आहे की, त्यांच्या सूचनांचा लाभ झालेला मी एकमेव इतिहासकार नाही.) गहन अभ्यास आणि विविध विषरांमध्ये रुची असलेले असे ते व्यक्तिमत्त्व होते (रोजच्या कामाव्यतिरिक्त त्यांना बागकामाची विशेष आवड होती.).

त्यांचा तिसरा पैलू म्हणजे, ते कोणत्याही प्रकारच्या पक्षपातीपणापासून सदैव अलिप्त राहिले. त्यांची स्वत:ची अशी वैयक्तिक मते, दृष्टिकोन कल्पना आणि पूर्वग्रहदेखील होते. पण राजकीय पक्षांच्या भूमिकांसाठी आपल्या मतांना व विचारप्रणालीला मुरड घातली जाणार नाही याची त्यांनी सदैव दक्षता घेतली. त्यामुळे विविधांगी वैचारिक भूमिका असलेला वाचकवर्ग त्यांचा आदर करत असे आणि त्याचबरोबर सर्व प्रकारच्या विचारसरणीचे राजकीय नेतेही त्यांना दबून असत.

मला पाठवलेल्या एका ई-मेलमध्ये त्यांच्या एका लेखाविषयी त्यांनी लिहिले होते, ‘या लेखामुळे भाजपचे लोक माझ्यावर अतिशय चिडले आहेत, पण त्याची मला अजिबात फिकीर वाटत नाही.’ काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाचे लोक चिडतील असे लेखही त्यांनी अनेकदा लिहिले आणि यांचीदेखील तमा त्यांनी कधी बाळगली नाही. त्यांचे वैचारिक स्वातंत्र्य आणि त्याच वेळी सचोटीदेखील परिपूर्ण होती. या दोन्हींचे रक्षण करण्यासाठी राजकारण्यांशी सलगी करणे किंवा त्यांनी दिलेल्या मेजवान्यांमध्ये भाग घेणे ते टाळत असत.

माझ्या पिढीतील मुंबईमधील एका संपादकाला मी ओळखतो, ज्याच्यामध्ये तळवलकरांचे सर्वोत्तम गुण आहेत. तो आपल्या शहराशी आणि राज्याशी रुळलेला आहे. पण त्याच वेळी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींविषयीदेखील तितकाच सतर्क आहे. तो चांगल्या स्तंभलेखकांना प्रोत्साहन तर देतोच, पण त्याच वेळी विस्तृत वार्तांकनालाही चालना देतो. तो कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. तो गंभीर विषयांवर लिहितो आणि सामान्य लोकांना आवडतील असे लेखही लिहितो. मी इथे त्याचे नाव घेतले तर त्याला नक्कीच अवघडल्यासारखे होईल. इतकेच बोलणे पुरेसे राहील की, प्रत्येक शहरात, प्रत्येक राज्यात गोविंद तळवलकरांसारखा पत्रकार-संपादक असता, तर आज ज्या अवस्थेत भारतीय प्रसारमाध्यमे आहेत, त्यापेक्षा ती अधिक जास्त चांगल्या अवस्थेत दिसली सती.

(‘साधना’ साप्ताहिकाच्या ७ एप्रिल २०१८च्या अंकातून साभार)

(अनुवाद : साजिद इनामदार)

(‘हिंदुस्थान टाइम्स’ या इंग्रजी दैनिकाच्या २४ मार्च २०१८ च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या लेखाचा हा अनुवाद.)

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Shrinivaas L

Mon , 02 April 2018

नाही हो शेटे, शेवटचा परिच्छेद हा 'सामना'ची तोफ असलेल्या संजय राउतांना समर्पित असावा. ते जरी शिवसेनेशी संबंधीत असले, तरी सेना ही ८०% समाजकारण व फक्त २०% राजकारण करते. म्हणजे त्यांच्यासाठी सेना हि एक सामाजिक चळवळच आहे, राजकीय पक्ष वगैरे नाही.


anirudh shete

Mon , 02 April 2018

शेवटचा परिच्छेद श्री गिरीश कुबेर याना समर्पित असावा