सिनेमा : बहुजनांचा आणि अभिजनांचा 
सदर - इनसाइडर
अमोल उदगीरकर
  • 'वॉन्टेड' या सिनेमाची पोस्टर्स
  • Sat , 17 February 2018
  • इनसायडर Insider अमोल उदगीरकर Amol Udgirkar वॉन्टेड Wanted सलमान खान Salman Khan

मध्यंतरी मी माध्यम आणि हिंदी भाषा यासंदर्भातल्या एका परिसंवादात भाग घेतला होता. मी सिनेमांमधली बदलत जाणारी हिंदी या विषयावर बोलणार होतो. जेव्हा मी सोमय्या कॉलेजच्या सभागृहात (जिथं हा परिसंवाद चालू होता ) प्रवेश केला, तेव्हा प्रसारमाध्यमं आणि हिंदी या विषयावर परिसंवाद चालू होता. तिथं एका हिंदी न्यूज चॅनेलमध्ये काम करणारा पत्रकार बोलत होता. देशात इंग्लिश न्यूज चॅनेल्सची प्रेक्षकसंख्या कमी असूनही त्यांचा राजकारण्यांवर आणि एकूणच जनतेवर जास्त प्रभाव का आहे, याचं फार छान विश्लेषण त्यानं केलं होतं.

म्हणजे तुम्हाला आवडो वा ना आवडो, किंवा एक विशिष्ट वर्ग त्याच्या नावानं नाक मुरडत असला तरी भारतीय न्यूज चॅनेल्सचा आजचा चेहरा अर्णब गोस्वामी  आहे, हे मान्य केल्याशिवाय पर्याय नाही. खरं तर हिंदी चॅनेल्सचा टीआरपी ‘टाइम्स नाऊ’ (तेव्हा ‘रिपब्लिक’ चॅनेल प्राथमिक अवस्थेत होतं) पेक्षा कित्येक पटीनं जास्त आहे, पण देशाचा ओपिनियन मेकर अर्णब. असं का? तर इंग्रजी चॅनल बघणारा वर्ग खूप कमी असला, तरी तो प्रभावशाली वर्ग आहे. इंग्रजी चॅनेल्स आणि त्यावरच्या चर्चा बघणारे लोक बहुतांश प्राध्यापक, वकील, प्रशासकीय अधिकारी, बॉलिवुड सेलिब्रिटी आणि बुद्धिजीवी असतात.

थोडक्यात एक असा वर्ग इंग्रजी चॅनेल्स बघतो (जो संख्येनं कमी असून) पण त्याच्या स्वतःच्या भवतालात /प्रतलात त्याच्या पदामुळे /स्टेट्समुळे प्रभावशाली (किंवा ओपिनियन मेकर) असतो. दिवाणखान्यातल्या चर्चांमध्ये हाच वर्ग आक्रमकतेनं मुद्दे मांडत असतो. इंग्रजी न समजणारे किंवा इंग्रजी चॅनेल्सवरच्या चर्चा न बघणारे लोक, या इंग्रजी बोलणाऱ्या लोकांना थोडे बौद्धिकदृष्ट्या पण दबकून असतात. थोडक्यात तुमचं चॅनेल बघणारा वर्ग किती मोठा आहे हे तर महत्त्वाचं आहेच, पण तो कुठल्या स्तरातून आलाय हे पण किंचित का होईना जास्त महत्त्वाचं आहे.

न्यूज चॅनेल आणि सिनेमा ही दोन्ही क्षेत्रं तशी खूप वेगळी आहेत. त्यांची एकदम तुलना करणं शक्य नाही. पण 'अभिजन' किंवा ओपिनियन मेकर प्रेक्षकांचा मुद्दा काही प्रमाणात का होईना इथं लागू पडतो. माध्यम कुठलंही असो, त्याच्या प्रेक्षकांची एक वर्णव्यवस्था बनतेच. तुम्ही कुठल्या वर्णात आहात, हे ठरवण्यात आर्थिक आणि सामाजिक घटक महत्त्वाचे आहेत. हे घटक जसजसे वैयक्तिक आयुष्यात बदलत जातील, तसतसे प्रेक्षक एका वर्णातून दुसऱ्या वर्णात जाऊ शकतात. 

देशात सर्वाधिक प्रेक्षक कुठल्या प्रकारचे सिनेमे बघतो? तर याचं उत्तर आहे मनोरंजनाची हमी देणारे मसालापट. सलमान खान आणि रजनीकांतचे सिनेमे हे याचं प्रातिनिधिक उदाहरण. देशातला बहुसंख्य वर्ग या प्रकारचा सिनेमा बघतो. देशात सिंगल स्क्रीन थिएटर व्यवस्था अजूनही टिकवून ठेवण्यात या वर्गाचा मोठा वाटा आहे.

सलमान खानच्या कारकिर्दीचं पुनरुज्जीवन करणारा म्हणून 'वॉन्टेड 'हा सिनेमा ओळखला जातो. या सिनेमाचं उदाहरण या संदर्भात बघण्यासारखं आहे. या सिनेमात एक सीन आहे. एका गोदामात सलमान गळ लावून खलनायकांना बोलवतो. मग ते गोदाम आतून लावून घेतो. संख्येनं जास्त असणाऱ्या गुंडांची कुठल्याही हत्याराशिवाय फक्त हातानं धुलाई करतो. मग त्या गोदामातून बाहेर पडतो. बाहेर जाऊन स्वतःचं कौतुक स्वतःचं करणार गाणं म्हणायला लागतो. त्या गाण्यात काही सेकंदासाठी अनिल कपूर आणि गोविंदा येऊन जातात. नंतर ते अख्ख्या सिनेमात कुठंच दिसत नाहीत.

'वॉन्टेड' हा देशातल्या बहुसंख्य जनतेला आवडणाऱ्या सिनेमाचं प्रतिनिधित्व करणारा सिनेमा आहे. ग्रामीण, निमशहरी आणि मेट्रो शहरांमधल्या गरीब वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये हे मसाला सिनेमे प्रसिद्ध आहेत. या भागात राहणाऱ्या बहुसंख्य लोकांचा असे सिनेमे बघण्यामागचा उद्देश खऱ्याखुऱ्या आयुष्यातल्या प्रचंड गांजून टाकणाऱ्या सामाजिक-आर्थिक समस्यांपासून काही वेळ तरी किमान सुटका मिळावी असा असतो. अशा सिनेमातले कथानकाशी संबंध नसणारे विनोद , मध्येच कथानकाच्या प्रवाहाला फाट्यावर मारून सुरू होणारी गाणी, अतार्किक फायटिंग सीन्स, शिफॉनच्या साडीत गुंडाळलेली नायिका, हे अशा गांजलेल्या लोकांना किमान काही काळ रिलीफ देतात. सलमान खानचे सिनेमे, डेव्हिड धवन-गोविंदाचे सिनेमे, साऊथ इंडियन डब सिनेमे आणि भोजपुरी सिनेमे, ही काही बहुसंख्य लोकांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या सिनेमाची उदाहरणं.

या प्रकारच्या सिनेमाला लोकप्रियता प्रचंड असली तरी आदर नाहीये. माध्यमांमध्ये तुम्हाला या प्रकारच्या सिनेमांबद्दल एकतर वाचायला मिळणार नाही किंवा वाचायला मिळालं असेल तर ते थट्टेच्या स्वरूपात येतं. रविवारच्या पुरवण्यांमध्ये किंवा दिवाळी अंकांमध्ये तुम्हाला या सिनेमाबद्दल क्वचितच वाचायला मिळतं. कारण या सिनेमाला ओपिनियन मेकर समाजात लोकमान्यता नाहीये. हा सिनेमा बौद्धिक समजलेल्या वर्गाने कधीच वैचारिकदृष्ट्या वाळीत टाकला आहे. शायनिंग इंडियाच्या गावकुसाबाहेर हा सिनेमा तग धरून आहे.

या उलट लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेला ओपिनियन मेकर वर्ग आहे, त्याचा आवडता चित्रपट वेगळा आहे. त्याला खऱ्या आयुष्यातल्या समस्यांना भिडणारा वास्तवदर्शी शैलीतला सिनेमा जास्त आवडतो. या सिनेमातली पात्रं आणि कॉन्फ्लिक्ट खरीखुरी वाटतात. या सिनेमांमधली पात्रं तुमच्या-माझ्यासारखीच गोंधळलेली, विविध समस्या असणारी असतात. त्या पात्रांचे संवाद पल्लेदार, टाळ्याखाऊ नसतात. ते आपण जी भाषा रोज बोलत असतो, तीच बोलत असतात. या सिनेमातल्या पात्रांचे स्वभाव काळ्या किंवा पांढऱ्या रंगात रंगलेले नसतात. ते करड्या रंगाचे असतात. सिनेमात एखाद्या खलनायकापेक्षा परिस्थितीचं कॉन्फ्लिक्ट तयार व्हायला कारणीभूत असते. अर्थातच ही फार ढोबळ लक्षणं झाली. याबाबतीत असे काही कडेकोट नियम नाहीत.

आपल्या देशात अनुराग कश्यप, विशाल भारद्वाज, दिबांकर बॅनर्जी, विक्रमादित्य मोटवानी ही मंडळी अशा प्रकारचा सिनेमा करतात. हा सिनेमा देशातल्या अभिजन वर्गात लोकप्रिय आहे. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे समाजातला बहुसंख्य वर्ग या सिनेमांपासून दूर राहतो. काही मल्टिप्लेक्सची बेटं असतात, तिथं हा सिनेमा लागतो आणि त्याच हद्दीत राहतो. ग्रामीण आणि निमशहरी भागात बऱ्याच वेळेला हा सिनेमा प्रदर्शितच होत नाही. २००१ सालानंतर या दोन टोकांच्या सिनेमांमधली दरी कमी होत जाईल, अशी अपेक्षा करण्यात येत होती. पण दुर्दैवानं ही दरी कमी होण्यापेक्षा वाढतच चालली आहे. ‘इंडिया’ आणि ‘भारत’ यांच्यामध्ये जी आर्थिक आणि सामाजिक दरी वाढत चालली आहे, त्याचंच प्रतिबिंब इथंही पडलं आहे.

राजकुमार संतोषी, राजू हिराणी, राकेश ओमप्रकाश मेहरासारखे दिग्दर्शक दोन्ही प्रकारच्या प्रेक्षकांना कवेत घेणारा सिनेमा तयार करू पाहतात, पण त्यांचे प्रयत्न अर्थातच तोकडे पडतात.

यापैकी कुठलाही सिनेमा वाईट किंवा चांगला आहे असं माझं म्हणणं नाही. मी दोन्ही प्रकारचे सिनेमे पाहतो आणि एन्जॉय करतो. आशयप्रधान सिनेमाही तितकाच आवश्यक आहे आणि गल्लाभरू सिनेमाही. दोन्ही बाजूच्या प्रेक्षकांना त्यांना आवडणारे सिनेमे बघायला मिळायला हवेतच. या खंडप्राय देशाला कवेत घेणारी कुठलीही एक राजकीय-धार्मिक-सामाजिक विचारसरणी नाही. मग ते ओझं सिनेमावर टाकण्यात काय हशील? असंही वैविध्यातलं सौंदर्य जगाला दाखवण्यासाठीच भारताचा जन्म झालेला आहे असं रवींद्रनाथ टागोरांचंच म्हणणं आहे. 

.............................................................................................................................................

लेखक अमोल उदगीरकर फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.

amoludgirkar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......