टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • उद्धव ठाकरे, अल्पेश ठाकोर, नारायण राणे, राधेश्याम मोपलवार आणि उदित राज
  • Thu , 28 December 2017
  • विनोदनामा टपल्या Taplya अल्पेश ठाकोर Alpesh Thakor नारायण राणे Narayan Rane उद्धव ठाकरे Uddhav Thackeray उदित राज Udit Raj राधेश्याम मोपलवार Radheshyam Mopalwar

१. गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील अनाचार संपवण्यासाठीच आपण, जिग्नेश मवाणी आणि हार्दिक पटेल यांनी झंझावात निर्माण केला. यामुळे भाजपची पीछेहाट झाल्याचा दावा गुजरातचे नवनिर्वाचित आमदार अल्पेश ठाकोर यांनी एका कार्यक्रमात केला. भाजपच्या एकाधिकारशाहीमुळे देशातील संसदीय लोकशाही आणि संविधानाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उभारलेल्या लढ्याला साथ देऊन महाराष्ट्र भाजपमुक्त करण्याचा इशाराही त्यांनी या वेळी दिला. देशात अराजक माजले असून दलित, अल्पसंख्याक वर्ग दहशतीखाली जगत आहे. भारतीय संविधानानं दिलेल्या अधिकारांची पायमल्ली होत आहे. ठरावीक वर्गाच्या हितासाठी बहुसंख्याक जनतेला वेठीस धरले जात आहे. हा प्रकार संविधानाला धोकादायक आहे, असा आरोपही त्यांनी या वेळी केला.

अल्पेश, जिग्नेश आणि हार्दिक यांनी गुजरातमध्ये निर्माण केलेला झंझावात काही खोटा नव्हता, पण, तो कशाचा होता, याचा विचार निवडणुकीनंतर किमान ते तरी करणार आहेत की नाही? आज भाजपला संपवण्याच्या समान उद्दिष्टानं त्यांना एकत्र आणलं आहे. मात्र, एकत्रित वाटचालीचा समान कार्यक्रम जातीपातींच्या राजकारणात कसा निर्माण करणार? शिवाय लोकशाहीत विरोधी पक्ष संपवण्याची भाषा लोकशाहीचा आत्माच न गवसलेले, अपरिपक्व आणि कोत्या बुद्धीचे राजकारणीच करू शकतात. त्यांचं अनुकरण करण्याची गरज काय?

.............................................................................................................................................

२. कोट्यवधी रुपयांच्या जमीन व्यवहारांमध्ये गुंतलेल्या राधेशाम मोपलवार या वादग्रस्त अधिकाऱ्याची चौकशी लवकर संपवून या अधिकाऱ्याला अभय देण्याबरोबरच त्यांची त्याच पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. अशा अधिकाऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एवढं प्रेम का, असा सवाल काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. मुख्यमंत्री काही ठरावीक अधिकाऱ्यांच्या प्रभावाखाली गेल्याची टीकाही विरोधकांनी केली आहे. पावसाळी अधिवेशनातच मोपलवार यांची चित्रफीत समोर आली होती. सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्यावर आपण लगेचच या पदावर परतू, असं मोपलवार सर्वांना सांगत होते.

काही अपरिग्रही मंडळी पैशाला हात लावत नाहीत. ती पैसे स्वत:जवळ बाळगत नाहीत. तरीही त्यांचे सगळे जीवनव्यवहार आरामात सुरू असतात. कारण, त्यांच्यासाठी त्यांचेच पैसे खर्च करण्याकरता त्यांनी नेमलेला पगारी माणूस सावलीसारखा सतत त्यांच्याबरोबरच असतो. त्याच्यामुळे यांचा जीवनव्यवहार चालतो आणि अपरिग्रहाचं व्रतही तुटत नाही... मुख्यमंत्री आणि मोपलवारांशी याचा संबंध काही नाही, सहज आठवलं.

.............................................................................................................................................

३. एकेकाळी ‘बामसेफ’ या कडव्या दलित संघटनेशी नातं सांगणारे दिल्लीतील भाजप खासदार डॉ. उदित राज हे जवळपास बंडखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचलेले आहेत. डॉ. राज हे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या अनुसूचित जाती-जमातींच्या अखिल भारतीय महासंघातर्फे आयोजित सभेत म्हणाले की, सरकारी नोकऱ्यांमधील भरती बंद केली आहे आणि आऊटसोर्सिंगच्या नावाखाली कंत्राटीकरण करून दलित, आदिवासींचा नोकऱ्यांमधील हक्क पद्धतशीरपणे डावलला जात आहे. बढत्यांमधील आरक्षणातही खोडा घातला जात आहे. याविरुद्ध आत्ताच एकत्र आलो नाही तर नंतर पश्चातापाची वेळ येईल. त्यांनी थेटपणे मोदी सरकारचा उल्लेख करण्याचे टाळलं; पण आपलं ‘लक्ष्य’ लपवण्याचा प्रयत्नदेखील केला नाही. केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांच्यावर टीका करताना डॉ. राज म्हणाले, ‘राज्याला कोणताच धर्म नसतो. म्हणून तर राज्यघटनेत धर्मनिरपेक्ष शब्दाचा उल्लेख आहे. तो वगळण्यास ठाम विरोध आहे. उद्या लोकशाही शब्द वगळण्याची मागणी कराल. भारतामध्ये तुम्हाला काय धर्मशाही आणायची आहे का?’

राज यांना आता झालेला साक्षात्कार मनोज्ञ आहे. बामसेफची पार्श्वभूमी असताना त्यांनी भारतीय जनता पक्षात मुळात प्रवेश कसा केला? या पक्षाची आणि त्याच्या मातृसंस्थेची विचारधारा काय आहे, त्यांची उद्दिष्टं काय आहेत, याची त्यांना तेव्हा कल्पनाच आली नव्हती, यावर विश्वास ठेवणं कठीण आहे.

.............................................................................................................................................

४. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एका तक्रारीवरून महाबळेश्वरमधील एक रिसॉर्ट सील केलं गेलं आहे. प्रख्यात उद्योजक अविनाश भोसले यांच्या बंगल्यात मुक्कामाला असताना शेजारच्या रिसॉर्टमध्ये रात्री दहानंतर मोठ्या आवाजात संगीत वाजत होतं, त्यानं उद्धव यांना त्रास झाला. उद्धव यांच्याकडून ‘विनंती’ केली गेल्यानंतरही संगीताचा आवाज कमी केला गेला नाही. आता या रिसॉर्टमध्ये परवानगीपेक्षा अधिक खोल्या आणि अन्य अनियमितता आढळल्या आणि ते सील केलं गेलं.

उद्धव ठाकरे यांना ध्वनिप्रदूषणाचा त्रास होतो, हे ऐकून राज्यात अनेक लोक खुसुखुसू ते खो खो हसले असतील. धर्माच्या आणि प्रांताच्या नावाखाली एकाहून एक उच्छादी उपक्रम आयोजित करणाऱ्या आणि सर्व उच्छादी उत्सवांना परंपरेच्या नावाखाली संरक्षण देणाऱ्या पक्षाच्या नेत्यांचे कान खरं तर तयार झालेले असायला हवे होते. तसं झालं नसेल तर या सगळ्याच धर्मवादी नेत्यांच्या निवासस्थानाबाहेरच सर्व उच्छादी उत्सव सगळ्या धांगडधिंग्यासह साजरे करून त्यांचे कान किटवले पाहिजेत.

.............................................................................................................................................

५. मराठी माणसांना न्याय देण्यासाठी शिवसेनेची निर्मिती होती; परंतु मराठी माणसाला अद्याप न्याय मिळालाच नाही. त्यामुळे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढला आहे, असं प्रतिपादन या पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी नाशिकमध्ये केलं. ते म्हणाले, आज सर्वच जण म्हणतात की मुंबई मराठी माणसाची आहे. परंतु तरुणांनो, विचार करा मुंबईच्या आर्थिक उलाढालीत मराठी माणूस कुठे आहे?

राणे यांच्या भाषणातला ‘एका’ हा शब्द कंपोझिटरनं खाल्ला की रिपोर्टरनेच लिहिलेला नाही? कोकणातून मुंबईत आलेल्या एका मराठी माणसावर अन्याय झाला, म्हणून राणे यांना हा पक्ष काढावा लागला आहे. आधी एका पक्षानं मुख्यमंत्री बनवून नंतर अपमानित केलं. दुसऱ्या पक्षानं मुख्यमंत्रीपदाचं आमिष दाखवून झुलवत ठेवलं. आता तिसऱ्या पक्षानं प्रवेशही दिला नाही आणि विधिमंडळातही प्रवेश दिला नाही. त्यामुळे पक्षरूपी चुटकीभर सिंदूरानं आपणच आपला मळवट भरून घेण्याची पाळी या मराठी माणसावर आली आहे.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4299

.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.