टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • अरुण जेटली, अरविंद केजरीवाल, यशवंत सिन्हा, विराट कोहली आणि पुणे विद्यापीठ
  • Sat , 11 November 2017
  • विनोदनामा टपल्या Taplya अरुण जेटली Arun Jaitley अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal यशवंत सिन्हा Yashwant Sinha विराट कोहली Virat Kohli पुणे विद्यापीठ Pune University

१. देशातील आर्थिक परिस्थितीवरून भाजपलाच कोंडीत पकडणारे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा सध्या चांगलेच चर्चेत आहेत. पॅराडाईज पेपरप्रकरणी आपले पुत्र जयंत सिन्हा यांची चौकशी सुरू झाली, तर त्याचवेळी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांचा मुलगा जय शहा याचीही चौकशी केली जावी; केंद्र सरकारनं एका महिन्याच्या आत याप्रकरणी चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. ज्या नेत्यांची नावं पॅराडाईज पेपरमध्ये आली आहेत. त्यांची सर्वांत आधी म्हणजे एक महिन्याच्या आत चौकशी केली जावी आणि संबंधित राजकीय व्यक्ती दोषी आहे किंवा नाही यांची जनतेला माहिती द्यावी, असं ते म्हणाले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी नोटाबंदी ही जल्लोष करण्यासारखी बाब नसल्याचं म्हटलं आहे. अधिकृत आकडेवारी जाहीर झाल्यानंतरच देशात किती काळा पैसा आहे, हे समजेल. उगाच हवेत गप्पा मारून काहीही उपयोग नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

यशवंत सिन्हा इतकी वर्षं राजकारणात राहिले, पण त्यांना नावानावातला फरक कळला नाही. जय वेगळा, जयंत वेगळा. त्या जयला अंत नाही, या जयला अंत जोडलेलाच आहे. कोणाचे वडील कोण आहेत, त्यावर सगळं अवलंबून असतं. सगळ्या वडिलांना मुलांची काळजी असते. ती यंत्रणा वेगवेगळ्या प्रकारे वापरून घेत असते. सिन्हा यांनी योग्य वेळेतच कोणाचा ‘जयजय’कार करायचा हे शिकून घेतलेलं बरं.

.............................................................................................................................................

२. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी आसाममध्ये झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत जीएसटी कररचनेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले. त्यानुसार दैनंदिन वापरातील १७७ वस्तूंवरील जीएसटी २८ वरून १८ टक्के करण्यात आला आहे, तर ५० वस्तूंवरील २८ टक्के जीएसटी कायम ठेवण्यात आला आहे. या निर्णयामुळे व्यापारी, व्यावसायिक आणि ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी जीएसटी परिषदेनं १०० हून अधिक वस्तू आणि सेवांवरील कर कमी केला होता. चॉकलेट, खाद्यपदार्थ, मार्बल, प्लायवुड, आफ्टर शेव्ह, डिओ, वॉशिंग पावडर, ग्रॅनाईट, सॅनेटरी नॅपकिन, सूटकेस, वॉलपेपर, लेखन साहित्य, घड्याळं, खेळणी आदी स्वस्त होतील. तर रंग, सिमेंट, वॉशिंग मशीन, फ्रिज, तंबाखू, सिगारेट स्वस्त होणार नाहीत.

आता कुठे देशभरात मिळून साडेसात लोकांना आधीचा जीएसटी समजू लागला होता, तेवढ्यात हा बदल करण्यात आला आहे. आता पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. आधी शंभर आणि आता दीडशे वस्तूंवरचा जीएसटी घटवावा लागला, म्हणजे मुळात ही कररचना करताना एखाद्या करकक्षेबाहेरील उत्तेजक पदार्थाचं सेवन केलं गेलं असावं, अशी एक शक्यता बळावते. आताही डिओ आणि आफ्टर शेव्ह या गरजेच्या वस्तू आहेत आणि रंग, फ्रीज, वॉशिंग मशीन या चैनीच्या वस्तू आहेत, म्हणजे अजून तो पदार्थ संपलेला दिसत नाही.

.............................................................................................................................................

३. केवळ शाकाहारी आणि निर्व्यसनी विद्यार्थ्यांनाच विद्यापीठामार्फत ‘योगमहर्षी राष्ट्रीय कीर्तनकार रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा सुवर्णपदक’ दिलं जाईल असं पत्रकच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं काढलं आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर शेलारमामा सुवर्णपदकासाठीच्या अटींच्या यादीचं पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं असून, त्यात ही अजब अट घालण्यात आली आहे. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये दरवर्षी हे सुवर्णपदक देण्यात येतं. विज्ञान विद्याशाखा आणि विज्ञानेतर विद्याशाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी या पदकासाठी अर्ज करू शकतात. यंदा विज्ञानेतर शाखेचा विद्यार्थीच या पदकासाठी पात्र असल्याचं नमूद करण्यात आलं असून अर्ज करणारा विद्यार्थी शाकाहारी आणि निर्व्यसनी असावा, अशी अट या पत्रकात आहे. या पुरस्कारासाठी अर्ज करणारा विद्यार्थी दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेतील प्रथम किंवा द्वितीय क्रमांकानं उत्तीर्ण झालेला असावा, त्या विद्यार्थ्यानं भारतीय आणि परदेशी क्रीडा स्पर्धांमध्ये पारितोषिकं मिळवलेली असावीत. रक्तदान, श्रमदान, पर्यावरण रक्षण आणि प्रदूषण नियंत्रण कार्य, साक्षरता आणि स्वच्छता मोहीम, तसंच एड्स रोगाविरुद्ध जनजागरण मोहिमेमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असावा, अशीही अट घालण्यात आली आहे. हे कमी म्हणून की काय योगासनं, प्राणायाम, ध्यानधारणा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा या पुरस्कारासाठी प्राध्यान्यानं विचार केला जाईल, असंही यात नमूद करण्यात आलं आहे. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अटींची यादी खूपच मोठी आहे. वरील अटींशिवाय अर्ज करणारा विद्यार्थी भारतीय संस्कृती, आचार, विचार, परंपरांचं जतन करणारा तर असावाच. पण त्यानं गायन, नृत्य, वक्तृत्व, नाट्य आणि इतर कलांमध्ये नैपुण्य मिळवलेलं असावं, अशीही अट या पत्रकात आहे.

यापेक्षा हे पदक रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण यांना तहहयात विभागून दिल्याचं जाहीर झालं असतं, तर हे पत्रक काढण्याचा तापच वाचला असता की! या सगळ्या अटींची पूर्तता करणाऱ्या सद्गृहस्थाला शैक्षणिक अभ्यास करण्यासाठी वेळ कुठून मिळणार? कदाचित ती अट नसेलच सुवर्णपदकासाठी. सगळ्या कॉलेजांची यज्ञ वगैरे शिकवणारी गुरुकुलं बनेपर्यंत दम धरा राव.

.............................................................................................................................................

निद्रित निखारे - नासिरा शर्मा, अनुवाद - प्रमोद मुजुमदार 

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4283

.............................................................................................................................................

३. दिल्लीतील हवा गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्यामुळे अरविंद केजरीवाल सरकारनं एक दिवस शाळांना सुट्टी जाहीर केली होती. सकाळच्या वेळी दिल्लीच्या रस्त्यावर प्रचंड धुरक्याचं साम्राज्य असल्यामुळे अनेकांना श्वसनाचे आजार झाल्याचंही समोर आलंय. काही दिवसांपूर्वी यमुना एक्स्प्रेस हायवेवर धुरक्यामुळे अंदाजे २०-२२ गाड्यांचा अपघात झाला होता. केंद्र आणि राज्य सरकार या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. दिल्ली सरकार वाहनांसाठी राबवलेली सम-विषम योजना पुन्हा राबवण्याच्या विचारात आहे. दिल्लीतील प्रदूषित हवेबद्दल क्रिकेटपटू हरभजन सिंगनंही ट्विटर अकाऊंटवरून चिंता व्यक्त केली आहे. दिल्लीचं कबरस्तान होत चाललंय, अशी खंत व्यक्त करून त्यानं पर्यावरणाचा समतोल राखण्याचं आपल्यालाही भान असायला हवं, असं बोलून दाखवलं आहे.

भान वगैरे वेडगळ गोष्टी कोण बाळगतो भज्जी. अरे, आम्ही तर फटाके वाजवतो बोल बिनधास्त. चिनी फटाके आमच्या हिंदू अस्मितेचं प्रतीक कसे झाले आणि कधी झाले, याचं उत्तर आम्हाला माहिती नाही. पण, आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पुंगळी करून फटाकेही वाजवतो आणि वर वाहनांमुळे, कारखान्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या तुलनेत दिवाळीच्या उत्सवी प्रदूषणाचं प्रमाण किती कमी आहे, याच्या आकडेवाऱ्याही सांगतो. शेणाच्या प्रमाणाची गोष्ट माहिती आहे ना तुला? ते टोपलीभर खातात तर आम्ही चमचाभर तरी खाणारच, असा सार्वत्रिक हट्ट आहे आमचा... सगळ्याच बाबतीत!

​​​​​​​.............................................................................................................................................

४. ‘भारताचं रन मशीन’ अशी ख्याती कमावलेल्या आणि टॉपचा क्रिकेटपटू बनलेल्या विराट कोहलीनं शीतपेयांची जाहिरात करायला नकार दिला आहे. कोणत्याही खेळाडूसाठी शीतपेय चांगलं नसतं, असं विराट कोहलीचं मत आहे. याच कारणासाठी काही महिन्यांपूर्वी विराटनं पेप्सीची जाहिरात करायला नकार दिला होता. ज्या पदार्थांचं सेवन मी करत नाही, त्यांची जाहिरात करून लोकांना तो पदार्थ वापरण्याचा सल्ला देणं मला पटत नाही, असं तो म्हणाला.

विराटच्या या विचारांचं स्वागत करायला हवं. शीतपेयांच्या बाबतीत त्यानं हा निर्णय केला असेल, तर आनंदच आहे. पण, विराटचा मुखडा एका दारूच्या जाहिरातीतही झळकताना दिसतो. ते पेय खेळाडूंसाठी आदर्श आहे, अशी त्याची समजूत नसावी. शिवाय, कोणतीही नामवंत अभिनेत्री लक्स सौंदर्य साबण वापरत नाही; सलमान खान, अक्षयकुमार आणि सैफ अली खान हे रूपा, लक्स कोझी किंवा माचो वगैरे ब्रँड वापरत नसतात, हे ही उत्पादनं त्यांच्या जाहिराती पाहून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना माहिती नसतं का?

​​​​​​​.............................................................................................................................................

५. शिस्तबद्ध पक्ष अशी ओळख सांगणाऱ्या भाजपला उत्तर प्रदेशात मोठा धक्का बसला आहे. कानपूर महापालिकेतील एका समितीच्या अध्यक्षपदाची उमेदवारी न मिळाल्यानं खुद्द राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सूनबाई दीपा कोविंद यांनी भाजपविरोधात बंड केलं आहे. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून त्यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवाराला आव्हान दिलं आहे. दीपा या रामनाथ कोविंद यांचे पुतणे पंकज यांच्या पत्नी आहेत. कानपूर महापालिकेच्या झीझक नगर समिताच्या अध्यक्षपदासाठी त्या इच्छुक होत्या. त्यासाठी त्यांनी जोरदार तयारीही केली होती. मात्र, पक्षानं ऐनवेळी सरोजिनी देवी कोरी यांना उमेदवारी दिली.

बघा बघा, या पक्षात कणभरही घराणेशाही नाही, याचं याहून मोठं कोणतं उदाहरण हवं आहे विरोधकांना? साक्षात राष्ट्रपतींची सून असूनही त्यांना उमेदवारी नाकारली गेली आहे. त्यामुळे साक्षात पक्षाध्यक्षांचा मुलगा असला तरी त्याची चौकशी झाल्याशिवाय राहील का? बाकी मान्यवर राष्ट्रपतींना सार्वजनिक समारंभांमध्ये पंतप्रधानांसमोर कसं वागवलं जातं, हे पाहिल्यानं या सूनबाईंनी बंड केलं असेल काय?

.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.