टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • राज ठाकरे, देवेंद्र फढणवीस, उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, अमित शहा आणि जय शहा
  • Sat , 14 October 2017
  • विनोदनामा टपल्या Taplya अमित शहा Amit Shah जय शहा Jay Shah राज ठाकरे Raj Thakre देवेंद्र फढणवीस उद्धव ठाकरे अशोक चव्हाण

१. नोटाबंदी आणि वस्तू व सेवा करमुळे (जीएसटी) अर्थव्यवस्थेत आलेली मरगळ जवळपास संपुष्टात आली आहे, असा दावा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. अमेरिकेत उद्योगपतींच्या एका परिषदेत ते बोलत होते. सरकारनं आतापर्यंत घेतलेल्या सुधारणावादी निर्णयांमुळे अर्थव्यवस्था मजबूत, टिकाऊ आणि संतुलित विकास करण्यास सज्ज आहे, असं ते म्हणाले. ऑगस्टमध्ये औद्योगिक उत्पादनात वाढ झाली आहे. जीएसटी लागू केल्यामुळे अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम कमी होतोय, हे यावरून लक्षात येतं, असं ते म्हणाले. एप्रिल-जूनच्या तिमाहीमध्ये देशाचा विकास दर घटून ५.७ टक्के वर आल्यानंतर सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार २०१६-१७ मध्ये भारतात विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण वाढलं आहे. यावरून भारतीय अर्थव्यवस्थेवर जगाचा विश्वास वाढत असल्याचं दिसून येतं.

खरं तर जेटली यांनी इतकी सारवासारव करण्यात वेळ घालवायला नको; असंही अर्थशास्त्रात गती असलेला जगातला कोणताही माणूस त्यांच्या या सोयीस्कर आकडेवाऱ्यांची फेकाफेक करणाऱ्या खुलाशांवर विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे एवढी उस्तवार करण्यापेक्षा त्यांनी एका जय शहांचं उदाहरण द्यावं. त्यांचा घवघवीत विकास सगळ्यांची तोंडं बंद करायला पुरेसा आहे. सौ सुनार की, एक लुहार की!

.............................................................................................................................................

२. भाजपला धूळ चारून नांदेड महापालिकेमध्ये माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मिळवलेल्या बलाढ्य यशाचं कौतुक करण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना चोवीस तास लागले. त्यातही त्यांनी अभिनंदन केलं ते प्रदेश काँग्रेसच्या कामगिरीचं. चव्हाण यांचा स्पष्ट उल्लेख त्यांना टाळला. एकीकडे ग्रामपंचायतींमध्ये भाजपनं मिळवलेल्या तथाकथित यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं जाहीर अभिनंदन दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं असताना दुसरीकडे राहुल यांनी चव्हाणांचं अभिनंदनसुद्धा केलं नाही. शिवसेनेनंही चव्हाणांचे अभिनंदन केलं आहे. राहुल यांनी काँग्रेसचे शक्तिमान ‘खजिनदार’ अहमद पटेल यांच्या विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन आजतागायत केलेलं नाही.

ही सरंजामशाहीची मानसिकता सुटणार नसेल, तर राहुल आणि त्यांच्या पक्षाला भविष्यात यश मिळालं तरी काही उपयोग नाही. चव्हाण यांचं नाव आदर्श घोटाळ्यात आल्यापासून हायकमांडनं त्यांच्या बाबतीत हे धोरण ठेवलं आहे. आपल्याला नीतीमूल्यांचा एवढा पुळका आहे, तर त्याच वेळी चव्हाणांना पक्षातून नारळ द्यायला हवा होता. त्यांना प्रदेशाध्यक्ष बनवायचं, नांदेडची सगळी धुरा त्यांच्यावर सोपवायची, पण त्यांनी विजय मिळवला, तर अभिनंदनातही कद्रूपणा करायचा, हा शुद्ध दुटप्पीपणा आहे.

.............................................................................................................................................

३. कायम निवडणुकीच्या धुंदीत राहणाऱ्या भाजप सरकारनं आता थोडीफार जनतेचीही सेवा करावी. घोषणा भरपूर होतात. परंतु, प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी होत नसल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. नांदेड महापालिका निवडणुकीत भाजप नेत्यांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केला. परंतु, अशोक चव्हाण यांनी प्रामाणिकपणे केलेले काम आणि काँग्रेसचं योगदान यावर मतदारांनी विजयाची मोहोर उमटवली, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. शिवसेनेनं आणि राष्ट्रवादीचेच बलाढ्य नेते अजित पवार यांनीही चव्हाणांचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

अशोक चव्हाणांचे पिताश्री शंकरराव चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे कायम विरोधक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाणांनी नांदेडमध्ये ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण सफाया केला, त्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांचं इतकं उघड गुणगान करणं सुखद धक्कादायक आहे. काँग्रेसच्या नवउदयमान नेतृत्वाला चव्हाणांच्या गुणांची कदर असल्याचं दिसत नाही. त्यावेळी राष्ट्रवादी एकदम कदरदान होते आहे... ये क्या खिचडी पक रही है?

.............................................................................................................................................

क्लिक करा - http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

४. भाजपच्या खेळीला शह देण्यासाठी शुक्रवारी शिवसेनेच्या मास्टरस्ट्रोकमुळे मनसेला मोठा धक्का बसला. भाजपकडून ऐनवेळी होणारा दगाफटका टाळण्यासाठी शिवसेनेनं मनसेच्या सहा नगरसेवकांना गळाला लावलं. मुंबईतील मनसेच्या सातपैकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्यानं मनसेचं मोठे राजकीय नुकसान होणार आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांमध्ये राज ठाकरे यांनी सरकारविरोधात अनेक मुद्द्यांवरून आक्रमक भूमिका घेतली. एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीच्या निषेधार्थ त्यांच्या नेतृत्त्वाखाली भव्य मोर्चाही काढण्यात आला होता. यानिमित्तानं मनसेचं मोठं शक्तीप्रदर्शन पाहायला मिळालं. त्यामुळे आगामी काळात राज ठाकरे गमावलेली पत पुन्हा मिळवतील, अशी चर्चा होती. याशिवाय राज यांच्या आंदोलनानं मनसेला नवसंजीवनी मिळेल, अशी भाकीतंही वर्तवण्यात येत होती. मात्र, शिवसेनेच्या अनपेक्षित खेळीनं मुंबईतील मनसेचं अस्तित्व होत्याचं नव्हतं झालं आहे. ज्यांना राज यांनी ओळख मिळवून दिली, त्यांनी अशी वर्तणूक करणं अयोग्य असल्याच्या प्रतिक्रिया मनसेच्या गोटातून ऐकायला मिळत आहेत.

मनसेच्या यार्डात गेलेल्या इंजिनात आता कुठे जरा धुगधुगी भरली जात होती, तर तेवढ्यात मागचे सगळे डबेच पसार झाले आहेत. राज ठाकरे यांना व्यंगचित्र काढायला हा चांगला विषय मिळाला आहे. मात्र, राज यांचा करिष्मा अजूनही अबाधित आहे. आपल्या पक्षाच्या ध्येयधोरणांमध्ये आणि आपल्या कार्यपद्धतीमध्ये त्यांनी बदल घडवून आणला, तर अजूनही लोक त्यांच्या पाठिशी उभे राहतील आणि ‘राजाची साथ’ सोडणाऱ्या गद्दारांना घरी बसवतील.

.............................................................................................................................................

५. मुलाच्या कंपनीची उलाढाल एका वर्षात १६ हजार पटींनी वाढल्याचं समोर आल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुलाच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. मुलाच्या कंपनीत कोणताही अनागोंदी कारभार झालेला नाही. जयनं सरकारी पैसा घेतला नाही किंवा जमीनही घेतलेली नाही, त्यामुळे यात भ्रष्टाचाराचा प्रश्नच येत नाही, असंही शहा यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप झाले. मात्र यातील एकाही प्रकरणात काँग्रेसनं मानहानीचा खटला दाखल केला का? त्यांची खटला दाखल करण्याची हिंमत झाली का? असा सवालच त्यांनी विचारला. जयनं स्वत:च मानहानीचा खटला दाखल करत चौकशीची मागणी केली आहे.

सरकारी पैसे खाल्ले किंवा सरकारी जमीन हडपली, तरच भ्रष्टाचार होतो, ही शहा यांची भ्रष्टाचाराची कल्पना गंमतीशीर आहे. एकानं आपल्या पदाचा, सरकारमधल्या वजनाचा किंवा सत्तेशी जवळिकीचा लाभ दुसऱ्याला मिळवून द्यायचा आणि त्याबदल्यात दुसऱ्यानं पहिला सांगेल त्या माणसाला उपकृत करून परतफेड करायची, हा भ्रष्टाचाराचा प्रकार त्यांच्या गावीच नसावा? आपल्या मुलानं दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याच्या पहिल्याच दिवशी त्याचा वकील का गैरहजर राहिला, याचाही खुलासा त्यांनी करायला हरकत नव्हती.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सुरेश प्रभू : “कदाचित देशातले पहिले मराठी पंतप्रधान नाना दंडवते झाले असते, पण माझी घोडचूक झाली. माझ्याकडून न विसरता येणारी, अशी एक चुकीची गोष्ट झाली…”

पहाटे चार-पाच वाजता निकाल जाहीर झाला. नानांनी रिटर्निंग ऑफिसरकडे माईक मागितला आणि भाषण केलं. त्यांनी मला थांबवून माझं जाहीरपणे अभिनंदन केलं. खरं सांगतो, मला निवडून आल्याचा आनंद होण्यापेक्षा नाना पडल्याचं दुःख जास्त झालं. कारण नाथ पै आणि मधु दंडवते या नेत्यांनी लोकसभेचं स्थान एवढ्या उंचीवर नेलं होतं की, असा माणूस संसदेत नसणं, हे लोकशाहीचं नुकसान आहे, असं मला वाटलं. माझ्या मनाला ते खूप लागलं.......