‘जे ‘अ-क्षर’ असेल, ते टिकणारच!’ - अरुण साधू
संकीर्ण - मुलाखत
संवादक : आल्हाद गोडबोले
  • अरुण साधू (१७ जून १९४१ - २५ सप्टेंबर २०१७)
  • Mon , 25 September 2017
  • संकीर्ण मुलाखत अरुण साधू Arun Sadhu महाराष्ट्र फाउंडेशन Maharashtra Foundation सिंहासन मुंबई दिनांक मुखवटा

मराठी व इंग्रजी वृत्तपत्यांतून पत्रकार-संपादक या नात्याने सतत पुरोगामी विचारांचा प्रचार-प्रसार करणे आणि कथा व कादंबऱ्या या माध्यमांतून मराठीतील ललित साहित्यात काही मूलभूत व महत्त्वाच्या विषयांना हात घालणे हे काम अरुण साधू यांनी मागील जवळपास ५० वर्षे केले आहे. मराठी भाषेच्या संदर्भात व महाराष्ट्र राज्याच्या संदर्भात त्यांची अशी ठोस भूमिका आहे आणि महानगरी विश्व कादंबऱ्यांच्या माध्यमांतून रेखाटणे व मराठीत राजकीय कादंबऱ्यांचे दालन खुले करणे, यासाठी त्यांना गतवर्षी महाराष्ट्र फाउंडेशनच्या जीवनगौरव सन्मानाने गौरवण्यात आलं. त्यानिमित्ताने ‘साधना’ साप्ताहिकाच १४ जानेवारी २०१७ रोजी विशेषांक प्रकाशित झाला. त्यातील अरुण साधू यांची मुलाखत... साधूंची ही बहुधा शेवटची मुलाखत असावी.

...................................................................................................................................................................................................

जन्मजात मिळालेले नाव-आडनाव आणि व्यक्तिमत्त्व यांत साधर्म्य क्वचित आढळते. पण साहित्याच्या क्षितिजावर अर्धशतकापूर्वी उगवलेल्या अरुण साधू नावाच्या साधुपुरुषाने आपल्या कर्तृत्वाने आणि लिखाणातून ते सार्थ केले आहे. मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये नावाजलेले ज्येष्ठ अभ्यासू पत्रकार, साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, प्रसिद्ध कादंबरीकार ही त्यांची ठळकपणाने ओळख; पण कादंबरीखेरीज कथा-पटकथा, नाटक-एकांकिका, अनुवाद, समकालीन इतिहास आणि चरित्रलेखन असे चतुरस्त्र लिखाण त्यांच्या नावावर आहे. ‘मुंबई दिनांक’ या पहिल्याच कादंबरीने आणि ‘सिंहासन’ चित्रपटाने त्यांना ‘वेगळ्या वाटेवरचा राजकीय कादंबरीकार’ अशी ओळख मिळाली. पण ती अपुरी ठरावी, असे वास्तववादी आणि वैश्विक भान असलेले लिखाण पुढील अर्धशतकात करून मराठी सारस्वतातील आपले स्थान त्यांनी अढळ केले. समकालीन राजकीय जीवनातील जीवघेणी सत्तास्पर्धा, सत्तेच्या पटावरील सोंगट्या खेळविताना केले जाणारे विधिनिषेधशून्य डावपेच आणि हे सारे चालू असताना जगण्याच्या धडपडीत रोज बळी जाणारा सामान्य माणूस यांचे जिवंत आणि मर्मभेदक चित्रण साधूंनी या दोन कादंबऱ्यांत केलेले आहे.

मराठी कथा-कादंबरी स्वप्नरंजनांत गुरफटलेल्या अवस्थेत असताना विशीतील या तरुणाने आसपासचे सर्वसामान्य माणसाचे जगणे शिक्क्याप्रमाणे तटस्थपणे टिपून घेतले आणि संवेदनेच्या शाईसह ते साहित्यातून उमटवले. त्यातील वास्तवाची धार तत्कालीन साहित्यविश्वाला खडबडून जागे करणारी होती. त्यांच्या दीर्घकाळच्या पत्रकारितेतील अनेक अनुभव प्रभावी साहित्यकृतींचा आकार धारण करून त्यांच्या कादंबऱ्यांतून प्रकटले. बूटपॉलिशवाल्या शेकडो पोरांचे प्रतिनिधित्व करणारा त्यांच्या कथेतील झिपऱ्या असो, कादंबऱ्यांतील राजकारणी असो, अथवा दिगू टिपणीससारखा पत्रकार असो; बातमीदारी करता-करता आपल्याला असे लिहिता आले पाहिजे, असा एक आदर्श साधूंनी पुढील पिढ्यांसाठी घालून दिला. मात्र लौकिक लाभूनही त्यांची लेखणी साच्यात अडकली नाही. फिडेल कॅस्ट्रोचे गव्हेरा यांच्यासारख्या बंडखोर जागतिक नेत्यांची साधूंना भुरळ पडली, तसेच सहकार चळवळीचे अध्वर्यू विठ्ठलराव विखे, द्रष्टे नेते यशवंतराव चव्हाण, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा-स्वतःला भावलेल्या- व्यक्तिरेखा त्यांनी चरित्र-पटकथादि फॉर्ममध्ये शब्दबद्ध केल्या. विक्रम सेठच्या ‘अ सुटेबल बॉर’चा अनुवाद केला आणि ‘त्रिशंकू’ ही चिंतनगर्भ तसेच ‘मुखवटा’ ही सर्वांगीण महाकादंबरी लिहिली.

दर्जाशी तडजोड न करता सातत्यपूर्ण लिखाण केलेल्या अरुण साधू यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार लाभतो आहे, ही मराठी साहित्यरसिकांच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे.

प्रश्न - एकीकडे स्वच्छंदवाद, दुसरीकडे कलेसाठी कला की जीवनासाठी- असे वाद झडत असतानाच्या काळात आपण कथा लिहायला सुरुवात केलीत, ती थेट वास्तववादी. वास्तवाचं हे प्रखर भान कुठून, कसं लिखाणात आलं?

- माझं वाचन काही फार विस्तृत नाही; पण किशोरावस्थेत मराठी साहित्याची ओळख झाली ती हरी नारायण आपटे, साने गुरुजी, नाथमाधव, बाबूराव अर्नाळकर इत्यादिकांची पुस्तकं; आणि चांदोबा, नंतर अधे-मधे थोडे खांडेकर-फडके आदी वाचून. पण ते वाचताना ‘हे असं नाही, असं नसतं’ असं वाटायचं. आसपास दिसायचं तेही कथा-कादंबऱ्यांसारखं नसायचं.

शाळेत निबंध लिहिण्यासाठी शिक्षक विषय द्यायचे तेव्हा सांगायचे, ‘या विषयावर मनात जे येतं ते जसंच्या तसं लिहा. कोणाची नक्कल करू नका’. ते मनात ठसलं होतं. त्यातून बाहेर जगात जे आणि जसं दिसतं ते मांडण्याची भूमिका घडत गेली.

प्रश्न - आपल्या लिखाणावर कोणते प्रभाव आहेत?

- घरात महर्षी व्यास, वाल्मीकी वगैरे होते, ते लहानपणी वाचले. तसे इंग्रजीतील डिकन्स, टॉलस्टॉय, डोस्टोवस्की, अलेक्झांडर पुष्कीन, आर्थर कॉनन डायल, सात्रर्, कामू आदी बहुधा पूर्ण न समजता थोडे-थोडे वाचले होते. पण पहिल्या कादंबरीवर- ‘मुंबई दिनांक’वरदेखील यातल्या कुणाचा प्रभाव होता, असं मी म्हणणार नाही.

प्रश्न – ‘मुंबई दिनांक’चा ‘फॉर्म’ कसा ठरवलात?

- ‘फॉर्म’चा जाणीवपूर्वक विचार करण्याची आवश्यकता वाटली नाही. -‘फॉर्म’च्या प्रयोगाने वाचक दुरावतात. जसे सुचते तसे लिहायचे. ओढून-ताणून -‘फॉर्म’चा आविर्भाव घेतला की कृत्रिमता येते. ‘मुंबई दिनांक’ अशी सहजच कागदावर उतरली.

प्रश्न - कलावाद व जीवनवाद यांच्यापेक्षा वास्तववाद आपल्या लिखाणाची प्रेरणा ठरला, असे वाटते का?

- वास्तववाद मला अधिक भावला. जीवनेच्छा ही आदिम प्रेरणा आहे. अगदी अमिबापासून ते माणसापर्यंत ही प्रेरणा जबरदस्त असते. वंशसातत्याची सनातन ओढ... तिचं मला कायमच आश्चर्य आणि आकर्षण वाटत आलं आहे. त्यामुळे वास्तव कितीही भयाण असलं तरी जगण्याची धडपड चालूच असते, हे टिपण्याचा प्रयत्न केला.

प्रश्न - अरुण साधू म्हटलं की, ‘मुंबई दिनांक’ आणि ‘सिंहासन’चा उल्लेख होतो. किंबहुना, राजकीय कादंबरीचा मानदंड त्यांनी मराठीत घातला, असं म्हटलं जातं. काय कारण?

- मराठी माणसांचा महाराष्ट्र अस्तित्वात आल्यावर, मराठी वाचनसंस्कृती ऐन भरात असताना ‘मुंबई दिनांक’, ‘सिंहासन’ या कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. त्यांचे विषय मराठी कादंबरीसाठी नवे होते आणि आज एवढ्या वर्षांनंतर महाराष्ट्रातलं राजकारणही त्याच वळणांनी जाताना दिसतं... वाचकांना ते भिडत असावं.

प्रश्न -‘बहिष्कृत’, ‘त्रिशंकू’, ‘शोधयात्रा’ या तुमच्या पुढच्या कादंबऱ्या ‘नाही रे’ वर्गाचं जगणं चितारणाऱ्या. ‘त्रिशंकू’ तर तुम्हाला स्वतःला भावलेली. पण तुम्हाला ‘त्रिशंकू’कार म्हटलं गेलं नाही...

- त्रिशंकू १९८० मध्ये प्रसिद्ध झाली, तेव्हा अनेकांना आवडली. तिच्यावर हिंदीत लेख छापून आले. पण एकाही मराठी वृत्तपत्राने त्यावर लिहिले नाही. एकही समीक्षात्मक लिखाण प्रसिद्ध झालं नाही. मराठी समीक्षकांकडूनच तिची अशी उपेक्षा झाली, तिथे आणखी काय अपेक्षा ठेवणार?

प्रश्न - ‘मुखवटा’ ही त्यानंतर १८-२० वर्षांनी आलेली; त्रिशंकूप्रमाणेच श्रेष्ठ म्हणावी अशी. एका अर्थानं सामाजिक, खूप मोठा पट असलेली, तुम्हाला वेगळी ओळख देणारी महाकादंबरी. पण तुम्हाला ‘मुखवटा’कार असंही म्हटलं जात नाही...

- ‘मुखवटा’बाबतीतही तेच घडलं. कादंबरी १९९९ मध्ये प्रसिद्ध झाली, तेव्हा प्रतिष्ठित नियतकालिकांनी तिच्याकडे साफ दुर्लक्ष केलं. जाणकार समीक्षकांनी तर तेव्हा आणि नंतरही कधी दखल घेतली नाही. तिची पुढे चार-पाच पुनर्मुद्रणे झाली. पण इतर कादंबऱ्यांइतकी ती चर्चिली गेली नाही, हे खरं. ‘मुखवटा’ला वाचकांचा प्रतिसाद मात्र समाधानकारक होता. पत्रे येत ती कार्डावर किंवा इनलँण्डवर नव्हे, तर आठ-दहा पानी. इंटरनेटच्या प्रसारानंतर हे प्रमाण वाढलं. पण मला वाटतं, विसाव्या शतकाअखेरीस संगणकीय-डिजिटल क्रांतीचा बऱ्यापैकी प्रसार होऊन तरुणांचं वाचनावरून लक्ष उडू लागलं होतं. त्याचं धक्का देणारं प्रत्यंतर त्या वेळी आलं.

प्रश्न - ‘मुखवटा’मध्ये आत्मकथन किती आहे?

- वाचकांना कथाविषयाला लेखकाच्या आत्मचरित्राशी जोडण्याची सवय असते. मला ते पटत नाही. प्रत्यक्ष अनुभव ही दुय्यम बाब आहे. हे खरं की, ‘मुखवटा’चं मुख्य कथाविेश्व ज्या भौगोलिक प्रदेशात उभं राहतं, त्या परिसरात माझा जन्म झाला- बालपण गेलं. त्यामुळे प्रतिक्षिप्त प्रेरणेतून माझ्याकडून तो परिसर निवडला गेला असावा. पण तपशील भरण्यासाठी मला बऱ्यापैकी अभ्यास करावा लागला.

प्रश्न - तुमच्या दृष्टीनं ‘मुखवटा’चं वेगळेपण काय?

- ‘मुखवटा’ ही बहुपदरी आणि नात्यांची, जिव्हाळ्याच्या संबंधांची गुंतागुंत असलेली महाकादंबरी आहे. वंशसातत्याची सनातन ओढ हा तिचा गाभा आहे. शिवाय किती तरी ताणेबाणे. जातिकारण, समाजकारण, राजकारण, संस्कृतिकारण, धर्मकारण यांचं विलक्षण रसायन, गुंतवळे, कालौघाची वाढलेली गती, गावाचा बदलता भूगोल व वातावरण, सुधारणांमुळे वेगाने बदलणारं गाव, बदलती माणसं आणि त्यांचे बदलते स्वभाव... असा संथ पण विलक्षण भोवऱ्यांनी घुसळून निघणारा कालौघ. गीतेमध्ये श्रीकृष्णाने नित्यानित्य संसाराला ऊर्ध्वमूल अध:शाखा म्हणजे वर मुळं व खाली फांद्या असलेल्रा अश्वत्थ वृक्षाची उपमा दिली, त्याची आठवण देणारा हा विशाल वटवृक्ष. हाच तो अश्वत्थ म्हणजे बदलाच्या भोवऱ्यातील समाज म्हणावा किंवा एक उदाहरण म्हणून अक्षीकरांचं परिवर्तनाच्या झपाट्यात सापडलेलं विस्तीर्ण कूळ म्हणावं...

प्रश्न -‘साहित्य अकादमी’ची मोहोर निदान ‘मुखवटा’वर उमटायला हवी होती- असं आपल्या चाहत्यांना, साहित्यिकांनाही वाटतं...

- यावर मी काही भाष्य करणार नाही.

प्रश्न - आपण आणखी एका महाकादंबरीच्या नोंदी आणि मजकूर १९९१ पासून ठेवत आहात, असं दोन वर्षांपूर्वी वाचलं होतं...?

- हो, ठेवल्या होत्या; पावणेतीनशे-तीनशे पाने लिहूनही झाली होती...

प्रश्न - होती, म्हणजे?

- १९९२ ते ९६ या काळात लिहीत होतो. या काळात खूपच झपाट्याने गोष्टी घडत गेल्या. त्या आणि जागतिक घडामोडींसह आपल्या देशांतला अनेक क्षेत्रांतला बदलता माहोल नोंदवत होतो. उदाहरणार्थ- वंशद्वेष, वर्णद्वेष हे सगळं त्यात होतं. अर्थात त्यात माझी विज्ञाननिष्ठता आणि धर्मनिरपेक्षता होती. पण अयोध्येपाठोपाठच्या घटनांनी कादंबरीतील मध्यवर्ती सूत्राला असा काही धक्का बसला की, लिखाणच थांबलं. याच काळात अन्य लेखनाला प्राधान्य दिलं गेलं. उदाहरणार्थ- विखे पाटील, शाहू महाराज यांच्यावरील पुस्तकांचे काम, यशवंतरावांवरील चित्रपटाची पटकथा... शिवाय स्वतःचे आजारपण वगैरे. सन २००२ मध्ये तर मोठीच उलथापालथ झाली. त्या सगळ्या घटना एका झपाट्यात लिहून काढायला हव्या होत्या, ते जमलं नाही. मनाशी ठरवल्याप्रमाणे लिखाण लिहून झालं नाही. मग आपलं लिखाण निरर्थक वाटायला लागलं. हे सारं लिहायलाच हवं का, असं वाटायला लागलं. अखेर एक दिवस तो ड्राफ्ट टाकून दिला...

प्रश्न - एका महाकादंबरीचा असा अपमृत्यू तुमच्या चाहत्यांनादेखील रुखरुख वाटायला लावणारा नाही का?

- पाहू, ते बीज आहे अजून मनात...

प्रश्न - आपल्या कादंबरीवर ‘सिंहासन’ चित्रपट आला, तशी ‘झिपऱ्या’ही पडद्यावर येणार, अशी बातमी आहे...

- हो, बूटपॉलिश करणाऱ्या मुलांच्या आयुष्यावर लिहिलेली ‘झिपऱ्या’ ही पहिली कथा पुढे नायक तोच ठेवून मालिकेच्या रूपात साकारली गेली आणि आता लवकरच मोठ्या पडद्यावर ती झळकणार आहे. पुण्यातील निर्माती अश्विनी दरेकर हा चित्रपट काढते आहे.

प्रश्न - पटकथाकार म्हणूनही आपण परिचित आहात. ‘यशवंतराव चव्हाण : बखर एका वादळाची’ या चित्रपटाची पटकथा आपण लिहिलीत. मात्र या चित्रपटास अपेक्षित यश लाभले नाही. काय कारणे असतील?

- या चित्रपटाची निर्मिती स्वतंत्रपणे झाली असती, तर खूप वेगळ्या गोष्टी झाल्या असत्या. यशवंतरावांचे सगळेच आयुष्य- लहानपणापासून ते मृत्रूपर्यंतचे मांडणे अपेक्षित होते. एवढा मोठा पट अडीच-तीन तासांच्या चित्रपटात आणताना खूप गडबड होऊ शकते. मला अधिकार असता तर मी त्यांच्या १९५६ ते १९६२ एवढ्याच काळाची मांडणी केली असती. त्यांच्या कारकिर्दीतील या सर्वोच्च काळाला मी प्राधान्य दिले असते. सर्वाधिक नाट्यमयता या काळात होती.

प्रश्न – ‘पडघम’ वगळता नाट्यलेखनाकडे, एकांकिकांकडे आपण फारसे वळला नाहीत…का?

- खरं तर शाळेमधे स्वत: उत्स्फूर्ततेनं लिहिलेली नाटकं केली, ती त्या वेळच्या प्रेक्षकांना बऱ्यापैकी भावली. एक प्रहसन तर विद्यार्थ्यांनी डोक्यावर घेतलं. त्यामुळे पुढे जाऊन आपण नाटकं लिहू, असा होरा होता. पुण्यात नाटकं पाहिली. पण जात्याच असलेल्या न्यूनगंडामुळे कुठल्या नाट्यसंस्थेशी संपर्क केला नाही. शिवाय त्याच काळात विद्यापीठात गणिताचा अभ्यास आणि पत्रकारितेचा पेशा या झपाट्यात हे इरादे मनातच राहिले. पुढे जब्बार पटेलांची ओळख झाली. ‘पडघम’चा प्रयोग त्यांच्या थिएटर अॅकडमीने असा भव्य-दिव्य केला की, मी चाट पडलो. पण लक्षात आलं की आपण काही शेक्सपिअर नव्हे. शेक्सपिअरच्या संहिता अशा घट्ट असतात की, नाटकात कोणी कितीही स्वातंत्र्य घेतलं तरी आशय बदलता येत नाही.

प्रश्न – नाटकापेक्षा कथा-कादंबरीतून व्यक्त होणं अधिक चांगलं वाटतं का?

- कथा-कादंबरीत लेखक आणि वाचक यांच्यात शब्दांखेरीज दुसरं काही माध्यम नसतं. लिहिलेले शब्द फक्त लेखकाचेच असतात. ते कोणी बदलू शकत नाही. त्यांचा तुम्ही काहीही अर्थ काढा, तफावत पडत नाही. कदाचित ही थेट अभिव्यक्ती मला अधिक पसंत पडत असावी. शिवाय आपले कथाविश्व साकारताना आपल्या पात्रांचा स्वभाव, त्यांच्या वागण्याचा आलेख यांचे चित्रण आपल्याला अचूक व अलगदपणे चितारता येऊ शकते...

प्रश्न - तुम्ही तुमच्या काही कथांचे इंग्रजीत भाषांतर केले होते, त्याविषयी...

- अमेरिकेत असताना मी ‘बहिष्कृत’चे स्वतःच भाषांतर केले होते. तिथल्या एका प्राध्यापकांनी ते वाचून चांगले असल्याचा अभिप्राय दिला होता. मात्र त्याचा आणखी विस्तार करावा लागेल, अशी सूचनाही केली होती. तीस-चाळीस वर्षांपूर्वी न्यूयॉर्कच्या एका मासिकात दोन कथा छापून आल्या होत्या. तेथील संपादिकेनं ‘आणखी कथा द्या’, असे कळवले होते. प्रसिद्ध झालेल्या कथांपैकी एक झिपऱ्यावरची आणि दुसरी झोपडपट्टीतल्या विश्वाशी संबंधित होती. तिसरी कथा पाठवली ती शहरी मानसिकतेशी निगडित होती. त्यांनी सांगितले की, ‘आमच्याकडे अशा मध्यमवर्गीय, शहरी जाणिवेवरच्या कथा पुष्कळ असतात. आम्हाला शोषितांची, वंचितांची, दुःख-दारिद्रयाची कथा हवी आहे.’ कदाचित अमेरिकेत आणि युरोपात त्यांना या भारताचं चित्रण-वर्णन करण्याची गरज भासत असावी.

प्रश्न - गद्यलेखनातली आपली तटस्थ, कठोर लेखनशैली आपल्याला कोरडीही वाटते. कवितेला ती पोषक नाही, असे वाटते का? की आपल्यातील संवेदनशील मन काहीशा तटस्थ कठोरपणे दूर ठेवण्यासाठी कवितेकडे पाठ फिरवली?

- शक्य आहे... कविता लिहिल्याच नाहीत, असं नाही. पूर्वी एक समज होता की कविता ही भावुक, हळवी वगैरे असायला हवी. खरं तर तसं काही नसतं. दहावीत हस्तलिखितासाठी ‘गीतांजली’तल्या एका कवितेचा अनुवाद मी शार्दुलविक्रीडितमध्ये केला होता. माझे मित्र माझ्या कविता त्यांच्या म्हणून संमेलनांत वाचायचे... आणि माझी लेखनशैली कठोर असली तरी माझ्या लिखाणातील काही वर्णने काव्यमय आहेत. तटस्थता असली तरी त्या-त्या पात्रांच्या दृष्टीने आवश्यक ते तरल भाव लिखाणात आलेले आहेत.

प्रश्न – उदाहरणार्थ?

- ‘मुखवटा’मधील कविता मीच लिहिल्या आहेत.

प्रश्न - तरीपण ‘अ सूटेबल बॉय’मधल्या ‘अि’त’च्रा कवितांचा अनुवाद अरुण साधू नावाच्या ‘कवी’ने केल्याचा आनंद मराठी रसिकांना मिळाला होता. हा कवी पन्नास वर्षं दडूनच राहिला...

- असं काही नाही. ‘त्रिशंकू’मध्येही माझ्या पुष्कळ कविता आहेत.

प्रश्न - आज ‘मुखवटा’ वाचताना काय वाटते?

- स्वत:ची पुस्तकं वाचणं क्लेशकारक. सुरुवातीला उल्लेखलेल्या गाजलेल्या कादंबऱ्या कधी कामासाठी चाळल्यास त्यास होतो. ‘मुखवटा’चं तसं नाही. ‘मुखवटा’ चाळली की, ‘अहं’ सुखावतो. आपल्या लिखाणावर प्रसन्न होण्याची संधी क्वचितच लाभते. ‘मुखवटा’सारखी कादंबरी हातून लिहून झाली याचं समाधानयुक्त आश्चर्य वाटतं. असं क्वचित होतं. ते टिकेल, अशी खात्री वाटते.

प्रश्न - आज मराठीत उदंड साहित्य प्रकाशित होते आहे. पण त्यातील किती टिकेल?

- जे ‘अ-क्षर’ असेल, ते अक्षर राहणार; टिकणारच!

प्रश्न - पण आता वर्तमानपत्रेसुद्धा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत; असे असताना...

- वृत्तपत्रे २००-२५० वर्षांपूर्वी निर्माण झाली. वृत्तपत्रांच्या जन्माआधीपासून शेकडो वर्षे साहित्य आहे आणि वृत्तपत्रे यदाकदाचित मृत झाली तरीही त्यानंतर ते टिकणार आहे. वृत्तपत्रांनी दखल घेतली तरच साहित्य जिवंत राहते, अशा भ्रमात आपण राहू नये. ज्ञानेश्वर, तुकाराम, कालिदास, होमर, शेक्सपिअर आदी कवी, लेखक, नाटककार आपल्या साहित्याविषयी लिहून यायला वृत्तपत्रेच नाहीत म्हणून रडत बसले नव्हते. साहित्य हे त्याच्या अंत:शक्तीवर जिवंत राहते व विकसित होते.

आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. साहित्यनिर्मितीत मंदी आली आहे असे मराठीत तरी दिसत नाही. नियतकालिकांची आणि साहित्य प्रकाशनांची संख्या दरसाल वाढतेच आहे. कवी, कादंबरीकार, नाटककार यांचीही संख्या भरमसाट वाढते आहे. मला हे चित्र आशादायक वाटते.

प्रश्न – मूळचे विदर्भातले असूनही आपली भूमिका स्वतंत्र विदर्भाच्या विरोधात का?

- विदर्भातील जनतेने सार्वमताने स्वतंत्र विदर्भ मिळवला, तर आपण विरोध करू शकत नाही. पण त्यानंतरच्या फार तर दोन-तीन निवडणुका होईपर्यंतच मराठीपण थोडंफार दिसेल. मग उत्तर प्रदेशी किंवा अ-मराठी नेताच तिथला मुख्यमंत्री होईल. मराठी संपेल. हिंदीचा प्रभाव वाढेल. आत्ताही वाढतो आहे. त्यामुळे मराठीपण टिकवून ठेवायचे असेल, तर विदर्भ महाराष्ट्रातच राहायला पाहिजे.

प्रश्न - मराठी भाषा टिकेल का पण?

- इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांनी ७५ वर्षांपूर्वी लिहून ठेवलं होतं की, इंग्रजी वापरण्याचा सोस मराठीच्या मुळावर येऊन भाषा नष्ट होईल. तो दिवस जवळ आला आहे आणि तो वृत्तपत्रांनी आणला आहे. भाषेचे प्रमाणरूप आणि दर्जा हे त्या भाषेतल्या प्रसारमाध्यमांतून घडत असते. संस्कृतीला वळणही माध्यमे देत असतात. हे भान आता सुटत चालले आहे.

प्रश्न - तुमच्या लिखाणात प्रखर वास्तववाद आणि वैश्विक भान ही वैशिष्ट्ये ठळकपणानं येतात. मग मराठीबाबत अशी निराशा...

- इथंही वास्तव पाहायला हवं. आज संवाद साधताना, शहरी भागात एकमेकांशी बोलताना आपण मराठी भाषक आहोत हे विसरून हिंदी किंवा इंग्रजी भाषेतून संवाद साधतो. हेच लोण आता ग्रामीण भागातही वाढत आहे. इंग्रजी भाषा आवश्यक असली तरी आपली मातृभाषा आपण हरवत चाललो आहोत. आपल्या राज्यभाषेला अभिजात मापदंड मिळण्यासाठी ती अंगीकारणं तितकंच जरुरीचं आहे. तसंच मराठीचा ज्ञानभाषा म्हणून विकास करण्याची गरज आहे. मराठीच्या विकासासाठी स्वतंत्र कोशनिर्मिती करणारी संस्था उभी करावी लागेल. या संस्थेचं कार्य सातत्याने सुरू राहणं आणि कोशवाङ्मयात सातत्याने आवश्यक बदल करणं महत्त्वाचं आहे.

प्रश्न - ते सरकारी पातळीवर झालं…

- मराठीच्या विकासासाठी केवळ शासनस्तरावर प्रयत्न पुरेसे ठरणार नाहीत, तर आपली सर्वांचीच मानसिकता बदलली पाहिजे. आपली हृदयाची भाषा मराठी आहे, हे विसरता कामा नये. पण नव्या पिढीला याची जाणीव नाही. आजच्या डिजिटल क्रांतीने आपण खूप बदलत चाललो आहोत. जगात अनेक देशांना परस्परसंवादासाठी इंग्रजी भाषेशिवाय पर्याय नाही, हे जरी खरे असले; तरी आपण संकुचित होऊन आपल्याच भाषेला दुरावत चाललो आहोत. याळे आपली भाषाच नव्हे तर माणूसपणही हिरावले जाईल, असे वाटते.

प्रश्न - साहित्यसेवेचे अर्धशतक ओलांडल्यानंतर ‘महाराष्ट्र फाउंडेशन’कडून मानाचा जीवनगौरव पुरस्कार लाभत असताना काही राहून गेल्याची भावनाही मनात येत असेल...?

- काही कादंबऱ्या लिहायच्या होत्या, त्या राहून गेल्या.

प्रश्न - कृतार्थता आणि खंत यांची काही उदाहरणे...

- मला जे लिहावंसं वाटलं, ते मी लिहिलं. मात्र कामाच्या धबडग्यात शाहू महाराजांवर कादंबरी लिहायची राहून गेली. पत्रकारिता सोडली ती लेखनासाठीच. पण पत्रकारिता सोडल्यानंतरही मी माझे आवडते विषय लिहिले- ‘ड्रॅगन जागा झाल्यावर’ आणि ‘तिसरी क्रांती’. बंडखोरपणाचं मला स्वभावतःच आकर्षण. बंडखोरपणा पाहिजेच अंगात. शिवार ज्या कादंबरीला सुरुवात केली होती, ती समूहाची कादंबरी होती. यशवंतरावांचे चरित्र तीन-चार वर्षे

सविस्तर संशोधन करून लिहायचे होते. त्याची आखणीही केली होती. पण प्रत्यक्षात काही घडले नाही. पुढे मी बाकीच्या कामांत गुंतलो. माझ्या दृष्टीने जे चांगले लिखाण होते, ते लोकांपर्यंत पोहोचले, स्वीकारले गेले याचे समाधान आहे.

प्रश्न - तसेच अजून काही लिहिण्याची उर्मी-उमेदही असेलच... सध्या काय लिहिताय? रसिकांनी प्रतीक्षा करावी असे काही...

- काही छोट्या कथा लिहिल्या आहेत. ज्या महाकादंबरीची बीजे मनात होती आणि ती तेव्हा पूर्ण झाली नाही... पण ते सूत्र अधूनमधून स्मरतं. मग ते जुने संदर्भ पुन्हा जुळवतो. लिहितो, काही नोंदी संगणकावरही आहेत... तर, असो.

(शब्दांकन : राधिका कुंटे)

अरुण साधूंच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Alhad Godbole

Wed , 27 September 2017

एका महाकादंबरीचा असा अपमृत्यू त्यांच्या चाहत्यांना रुखरुख वाटायला लावणारा आहेच, पण एका महान साहित्यिकाला आपले लिखाण निरर्थक का वाटले असेल, हा प्रश्न अधिक अस्वस्थ करणारा आहे. -आल्हाद गोडबोले