टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • रघुराम राजन, शिवाजी महाराज आणि अमित शहा
  • Mon , 11 September 2017
  • विनोदनामा टपल्या रघुराम राजन Raghuram Rajan शिवाजी महाराज Shivaji Maharaj अमित शहा Amit Shah उद्धव ठाकरे Uddhav Thackeray सचिन खेडेकर Sachin Khedekar जेनएनयू JNU

१. ‘शिकागो विद्यापीठानं रजा नाकारल्यामुळे आपण रिझर्व्ह बँकेचं गव्हर्नरपद सोडलेलं नाही, सुरू केलेली कामं पुढे नेण्यासाठी या पदावर आणखी काही काळ काम करण्याची माझी इच्छा होती, पण सरकारनं मुदतवाढ दिली नाही. त्यामुळे मला अमेरिकेत परत जावं लागलं,’ असं स्पष्टीकरण रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिलं आहे. ते म्हणाले, ‘रिझर्व्ह बँकेत आणखी काम करून बँकांचा कारभार आणखी स्वच्छ करण्याचं आपलं उद्दिष्ट होतं, पण सरकारनं तीन वर्षांची मुदत गेल्या वर्षी चार सप्टेंबरला संपल्यानंतर मुदतवाढीचा प्रस्ताव दिला नव्हता. मी मुदतवाढीसाठी सरकारच्या दाराशी गेलो नाही, पण बँकांची अनुत्पादित कर्जं कमी करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पदावर राहण्याची तयारी दर्शवली होती.’

राजनबाबू, या सगळ्या जर-तरच्या गोष्टींना काहीच अर्थ नाही. तुम्हाला बँका स्वच्छ करायच्या होत्या, त्यांना अर्थव्यवस्था ‘साफ’ करायची होती. डॉ. मनमोहन सिंहांच्या लायब्ररीत डोकावण्याऐवजी ते त्यांच्या न्हाणीघरात डोकावले. त्यातून अर्थज्ञान कितीसं लाभणार? पण, एकंदर ‘प्रयोग’ करण्याची हौस दांडगी. त्यात अर्थशास्त्रात काही गम्य असलेल्या आणि त्या बाबतीतल्या अर्धवटांचे अर्धवट आदेश पाळण्याची तयारी नसलेल्या कोणाचाही अडथळाच झाला असता.

.............................................................................................................................................

२. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास गुजराती भाषेतून लिहिणार आहेत. त्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून विविध पुस्तकांचा अभ्यास त्यांनी सुरू केला आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी दिली आहे. सहस्रबुद्धे म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीही ते त्यांच्यावर गुजरातीमधून पुस्तक लिहिणार आहेत. महाराजांची सुरतेची लूट एवढंच चित्र गुजरातमध्ये रंगवलं जात आहे. हे चित्र बदलण्यासाठी ते पुस्तक लिहिणार असून गेल्या सहा महिन्यांपासून विविध विषयांच्या पुस्तकांचा त्यांनी अभ्यासही सुरू केला आहे.’

अरे देवा! महाराजांवर फारच मोठा दुर्धर प्रसंग ओढवला म्हणायचा. आता त्यांच्या नावाखाली कोणत्या नव्या पुड्या बांधल्या जातील, ते सांगता येत नाही. अर्थात त्यांच्या हयातीत आणि त्यांनंतरही, खासकरून गेल्या साठ-सत्तर वर्षांत, महाराजांवर आप्तस्वकीय म्हणवणाऱ्यांनीच असे अनेक दुर्धर प्रसंग आणले होते. त्यातून हा रयतेचा राजा सहीसलामत निसटून पुन्हा पुन्हा उजळून निघाला आहे. विद्यमान चाणक्याची मुत्सद्देगिरी त्यावर डाग लावण्याइतकी मोठी नाही.

.............................................................................................................................................

३. भाजपची मुंबईतील मोर्चेबांधणी आणि शिवसेनेतील आमदार, नगरसेवक, शाखाप्रमुख यांच्यामध्ये स्थानिक पातळीवर सुरू असलेले वाद यामुळे त्रस्त ‘मातोश्री’ला आता, आतापर्यंत अडगळीत पडलेल्या, कार्यालय प्रमुखांचं स्मरण झाले असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यालय प्रमुखांना जवळ करत शिवसेनेला नवसंजीवनी देण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू केल्या आहेत. तर कार्यालय प्रमुखांमार्फत स्थानिक पातळीवरील अनेक बित्तंबातम्यांचे खलिते ‘मातोश्री’वर पोहोचते होण्याच्या शक्यतेने स्थानिक नेत्यांच्या पोटात भीतीनं गोळा उठला आहे. ‘मातोश्री’च्या या खेळीमुळे कार्यालय प्रमुख विरुद्ध शिवसेनेतील स्थानिक पदाधिकारी असा नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत.

स्थानिक पातळीवर सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये सामंजस्य असेल, तर पक्षप्रमुख राज्य कुणावर आणि कशावर करणार? असंही त्यांच्या हातात आता उरलंय काय? राज्याच्या सरकारमध्ये, केंद्र सरकारमध्ये राहायचं आणि वर आपणच प्रमुख विरोधक असल्याच्या थाटात सत्ताधाऱ्यांवर तोंडसुख घेऊन खऱ्या विरोधकांना डोकं वर काढू द्यायचं नाही, हा खेळ खेळण्याशिवाय कसलीही भूमिका उरलेली नाही. स्थानिक पातळीवरच्या मांडवळ्या आता वेगळ्या ‘शाखां’कडे जायला लागल्या आहेत. अशा वेळी स्थानिक पातळीवरचा मुख्य आधार असलेले कार्यालय प्रमुख आठवणारच.

.............................................................................................................................................

४. चित्रपटानं हसवावं, गुदगुल्या कराव्यात, एवढ्यापुरतीच मनोरंजनाची कल्पना सीमित झाली आहे, असं मत प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांनी रविवारी व्यक्त केलं. विचार मांडणारा, अंतर्मुख करायला लावणारा चित्रपटही करमणूक करतो, ही संकल्पना बाद झाली आहे. त्यामुळे चित्रपट कसा पाहावा हे शिकवत रसास्वाद घेणाऱ्या प्रेक्षकांची संख्या वाढली पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं. फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडिया आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातर्फे आयोजित चित्रपट रसास्वाद कार्यशाळेचं उद्घाटन खेडेकर यांच्या हस्ते झालं, तेव्हा ते बोलत होते. ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक डॉ. श्यामला वनारसे यांनी संपादित केलेल्या ‘चित्रपट रसास्वाद : काही मूलभूत संकल्पना’ या डीव्हीडी संचाचं प्रकाशन करताना खेडेकर म्हणाले की, आपल्याकडे मनोरंजनाची संकल्पना खूप मर्यादित आहे. गंभीर चित्रपट दाखवा, परंतु हसत खेळत दाखवा, असं प्रेक्षकांना वाटते. त्यातूनच दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण चित्रपट तयार व्हावेत, अशीही मागणी केली जाते. दुसरीकडे मनोरंजनाने भरलेले चित्रपट चालत नाही. एवढंच नाही, तर राष्ट्रपतिपदक विजेत्या ‘रिंगण’ चित्रपटाला यश मिळत नाही. चांगले गुणात्मक चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत. अशाही परिस्थितीत गेल्या दोन दशकांत मराठी चित्रपटांनी मोठं यश मिळवलं आहे. मात्र, चित्रपट कसा पाहावा हे शिकवण्याचं काम अशा कार्यशाळांमधून होतं. त्यामुळे गुणात्मक चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या वाढण्यास मदतच होते.

केवळ चित्रपटच नाही, तर जगण्याच्या अन्य सगळ्याच क्षेत्रांमध्ये ही उथळ मनोरंजनाची अपेक्षा प्रबळ होऊन बसली आहे. लोकांना राजकारण, समाजकारण या सगळ्यामध्ये सगळं काही असं हलकं फुलकं करून हवं असतं. तसं करणारे लोक यशस्वी होतात. ज्यांचं जगणं इतकं उथळ आहे, त्यांच्या मनोरंजनाच्या कल्पना सखोल कशा असतील? मात्र, म्हणून आशयघन सिनेमे बनण्याचं थांबता कामा नये. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वस्त आणि प्रभावी प्रसार आणि प्रचाराची सोय झाली आहे. नवी पिढी अधिक दृक्साक्षर आहे. त्याचा फायदा घ्यायलाच हवा.

.............................................................................................................................................

५. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या (जेएनयूएसयू) निवडणुकीत एकीकृत डाव्या आघाडीनं चारही जागा मोठ्या मताधिक्यानं जिंकल्या आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डाव्या आघाडीच्या उमेदवार गीता कुमारी यांनी अभाविपच्या निधी त्रिपाठी यांचा ४६४ मतांनी पराभव केला. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत एआयएसएच्या सिमोन झोया खान (१८७६) यांनी अभाविपचे दुर्गेश कुमार (१०२८) यांचा पराभव केला. सरचिटणीसपदी डाव्या आघाडीचे दुग्गिराला श्रीक्रिशा तर सहसचिवपदी डाव्या आघाडीचे शुभांशु सिंग (१७५५) निवडून आले. या विजयाचे श्रेय विद्यार्थ्यांना जातं, कारण लोकशाहीवादी संस्थांचं रक्षण केलं जावं असं लोकांना वाटतं, असं गीता कुमारी म्हणाल्या.

डाव्या आघाडीचा विजय झाला, यापेक्षा, जवळपास ५० टक्क्यांच्या फरकानं का होईना अभाविप दुसऱ्या क्रमांकावर आहे, ही यातली लक्षणीय बातमी आहे. जेएनयूसारख्या ठिकाणी दोन हजार मतदात्यांपैकी नऊशे ते हजार मुलांना भाजपच्या विचारधारेवर शिक्कामोर्तब करावंसं वाटतंय, ही यातली मुख्य घडामोड आहे. आता थोडी रणगाड्यांची साथ मिळाली की, हे समर्थन वाढून मधला पल्ला पार करू शकेल.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......