टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • वंदे मातरम, नरेंद्र मोदी, स्मृती इराणी, एकनाथ खडसे, बिमल जालान आणि ब्ल्यू व्हेल गेम
  • Fri , 11 August 2017
  • विनोदनामा टपल्या वंदे मातरम Vande Mataram नरेंद्र मोदी Narendra Modi स्मृती इराणी Smriti Irani एकनाथ खडसे Eknath Khadse बिमल जालान Bimal Jalan ब्ल्यू व्हेल गेम Blue Whale Game

१. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा मुखवटा घातलेल्या मंडळींचा फोटो शेअर केल्याबद्दल ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ (पीटीआय) या प्रतिष्ठित वृत्तसंस्थेला माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. या छायाचित्रावर आक्षेप घेतल्यानंतर ते ‘पीटीआय’नं डिलिट केलं. या छायाचित्रासाठी पीटीआयनं स्मृती इराणींची माफीदेखील मागितली. मात्र मुखवटा घातलेल्या छायाचित्रात आक्षेपार्ह किंवा भावना कशा दुखावल्या जाऊ शकतात, असा सवाल उपस्थित होत आहे.

पीटीआयनं हे लोटांगण घेण्याचं काय कारण होतं? मोदी आणि नितीश हे मित्र नाहीत का? मोदी आणि राहुल यांचे मुखवटे घालून फ्रेंडशिप डे साजरा केला असता, तर त्यांना चाललं असतं का? मुळात, मोदींचे मुखवटे घातलेले कार्यकर्ते भाजपच्या सभांमध्ये कौतुकानं फिरत असतात. जे लोकप्रिय असतात, त्यांचेच मुखवटे लोक घालतात. स्मृतीबाईंचा मुखवटा तर खुद्द त्यांनीही कधी घातला नसेल. माहिती आणि प्रसारण खात्यासारख्या संवेदनशील खात्यात या काय धुमाकूळ घालणार आहेत, याची ही कुचिन्हं आहेत. त्यांच्यासाठी ‘बिनखात्याच्या मंत्री’ असं पद निर्माण करायला लागणार बहुतेक.

.............................................................................................................................................

२. लागोपाठ सुरू असणारे परदेश दौरे असोत किंवा निवडणूक प्रचाराच्या सभा असोत, पंतप्रधान नरेंद्र मोदी न थकता अनेक तास काम करतात. त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांनाही हाच कित्ता गिरवण्याचं आवाहन केलं आहे. स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षांत म्हणजे २०२२ सालापर्यंत आरोग्य, शिक्षण, रस्ते, गरिबी निर्मूलन यांसारख्या क्षेत्रांमध्ये ठोस बदल दिसून येणं अपेक्षित आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी अधिक निष्ठेनं काम करण्याची गरज आहे, हे सांगताना पंतप्रधान मोदींनी सरकारी अधिकाऱ्यांपेक्षा एक तास अधिक काम करण्याचं वचन दिलं.

मुळात सरकारी अधिकारीही पंतप्रधानांच्या बरोबरीने, कधीकधी त्यांच्यापेक्षा जास्तही काम करतात. फक्त तसं ‘मोटिव्हेशन’ असायला लागतं. जी फाइल हलल्यानंतर खात्यातल्या लोकांचा हप्तेबंद उत्कर्ष होणार असतो, ती फाइल कशी विद्युतवेगानं हलते, तिच्यासाठी सरकारी यंत्रणा कशी २४ तास राबते, हे मोदी यांनी पाहिलेलं नसावं. २०२२ सालापर्यंत त्यांना जे बदल अपेक्षित आहेत, ते खरं तर १९८२ सालीच पूर्ण व्हायला हवे होते. या अधिकाऱ्यांच्या, यंत्रणांच्या आणि सरकारांच्या निवडक ठिकाणीच विद्युतवेगानं आणि अहोरात्र काम करण्याच्या सवयींमुळे ते उद्दिष्ट ३०२२पर्यंतही पूर्ण होण्याची शक्यता नाही. त्यात तुम्ही जास्त वेळ काम करायला सांगताय, हे सामान्य माणसाच्या मनात धडकीच भरवणारं आहे.

.............................................................................................................................................

३. ब्ल्यू व्हेल गेम खेळण्याच्या नादात मुंबईत एका शाळकरी मुलानं इमारतीच्या गच्चीवरून उडी मारल्याची घटना ताजी असतानाच या खेळातील आव्हान (टास्क) स्वीकारत खेळ खेळणारा सोलापूरमधील चौदा वर्षीय शाळकरी मुलगा बेपत्ता झाला. बसमधून तो भिगवण परिसरात आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं त्याला ताब्यात घेतल्यामुळे अनर्थ टाळला. मुंबई-पुण्यापाठोपाठ राज्यातील अन्य शहरात या खेळाचं लोण पसरत चालल्याचं या घटनेवरून उघडकीस आलं आहे. मुलगा बेपत्ता झाल्यानंतर पालकांनी शोधाशोध सुरू केली. मुलाकडे मोबाइल असल्यानं पोलिसांनी तांत्रिक तपासावर लक्ष केंद्रित केलं. मुलगा बसमधून पुण्याच्या दिशेनं निघाल्याची माहिती मिळाल्यावर पुणे पोलिसांनी भिगवण स्थानकात त्याला ताब्यात घेतलं.

बघा. शाळकरी वयातच ध्येयाप्रती कशी जाज्वल्य निष्ठा निर्माण झाली या मुलामध्ये. ब्लू व्हेल तर ब्लू व्हेल, गेम तर गेम, पण एकदा हातात घेतलेलं काम त्यानं टाकलं नाही. काहीही झालं तरी टास्क पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, या त्याच्या चिकाटीच्या वृत्तीबद्दल खरं तर सत्कार केला पाहिजे त्याचा... आणि त्यानंतर त्याच्या हातातून शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोबाइल काढून घेतला पाहिजे!!!

.............................................................................................................................................

४. ‘वंदे मातरम्’ या शब्दात मोठी ऊर्जा आहे. ते न म्हणण्याची भूमिका मुस्लीम समुदायाची नाही, परंतु काही बोटावर मोजण्याइतपत समाजकंटक धर्माच्या आड येऊन जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करतात, असं मत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं. भारतात जन्म घेऊन संपूर्ण जीवन भारतातच व्यतीत करणाऱ्यांना ‘वंदे मातरम्’ म्हणायला काय हरकत आहे, असा प्रश्न उपस्थित केला.

थोडक्यात, जे ‘वंदे मातरम’ म्हणत नाहीत ते समाजकंटक आहेत, असंच खडसे यांना म्हणायचं आहे. या गीताला विरोध करणाऱ्यांचा विरोध का आहे, हे समजून घेण्याचीही त्यांची इच्छा नाही. किंबहुना, भारतातच जन्मला असाल तर अमुक करायला हरकत काय, हा त्यांचा प्रश्न मासलेवाईक आहे. भारतात जन्मलेल्यांनी काय करायचं, हे तुम्ही कसं काय ठरवणार? इथं जन्मलेला प्रत्येक जण भारतीय म्हणून समान आहे. एकानं दुसऱ्याला शहाजोगपणे वर्तनसारणी शिकवायची गरज नाही.

.............................................................................................................................................

५. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशातील जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. नोटाबंदीचे सकारात्मक परिणामही दिसून येत आहेत. पण मी जर रिझर्व्ह बँकेच्या सर्वोच्च पदावर असतो तर नोटाबंदीला मान्यता दिलीच नसती, असं स्पष्ट मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर बिमल जालान यांनी व्यक्त केलं आहे. काळ्या पैशांच्या समस्येचा निपटारा करणं गरजेचंच आहे, पण त्यासाठी मुळावरच घाव घातला पाहिजे. जोपर्यंत कोणतंही मोठं संकट कोसळत नाही, तोपर्यंत मी नोटाबंदीला मान्यता दिली नसती, असं ते म्हणाले. नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला, त्यावेळी असं कोणतंही संकट ओढवलं नव्हतं, असं स्पष्ट केलं.

अंमळ पंचाईतच केलीये या गृहस्थांनी. कोण हे जालान, त्यांना काय अक्कल आहे, असं म्हणण्याची सोय नाही. कारण, ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते आणि नंतर काही काँग्रेसच्या सरकारचे पंतप्रधान झालेले नाहीत. त्यामुळे त्यांची गलिच्छ शब्दांत रेवडी उडवणं कठीण आहे. शिवाय, हे गव्हर्नर होते अटलजींच्या कार्यकाळात. त्यामुळे, खांग्रेसी वगैरे शिवीगाळही करता येत नाही. माणूस असेल विद्वान पण आता वय झालंय, हे कसं वाटतं?

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सुरेश प्रभू : “कदाचित देशातले पहिले मराठी पंतप्रधान नाना दंडवते झाले असते, पण माझी घोडचूक झाली. माझ्याकडून न विसरता येणारी, अशी एक चुकीची गोष्ट झाली…”

पहाटे चार-पाच वाजता निकाल जाहीर झाला. नानांनी रिटर्निंग ऑफिसरकडे माईक मागितला आणि भाषण केलं. त्यांनी मला थांबवून माझं जाहीरपणे अभिनंदन केलं. खरं सांगतो, मला निवडून आल्याचा आनंद होण्यापेक्षा नाना पडल्याचं दुःख जास्त झालं. कारण नाथ पै आणि मधु दंडवते या नेत्यांनी लोकसभेचं स्थान एवढ्या उंचीवर नेलं होतं की, असा माणूस संसदेत नसणं, हे लोकशाहीचं नुकसान आहे, असं मला वाटलं. माझ्या मनाला ते खूप लागलं.......