‘पळशीकरांच्या निमित्ताने... एक टीजर’ - मेंदूच्या मशागतीचा पहिला राउंड
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
विजय तांबे
  • ‘पळशीकरांच्या निमित्ताने... एक टीजर’ या लघुपटाचं एक पोस्टर
  • Fri , 14 July 2017
  • ग्रंथनामा Granthnama वाचणारा लिहितो पळशीकरांच्या निमित्ताने... एक टीजर Palshikaranchya Nimittane - Ek Teaser वसंत पळशीकर Vasant Palshikar समीर शिपुरकर Sameer Shipurkar विजय तांबे Vijat Tambe

‘पळशीकरांच्या निमित्ताने... एक टीजर’ हा लघुपट बघायचा म्हणून पहिला टीजरचा डिक्शनरीतला अर्थ शोधून काढला. डिक्शनरी सांगते की, नवीन उत्पादनांविषयी लोकांची उत्सुकता वाढवण्याकरता प्रसिद्ध केलेली जाहिरात. माझ्या माहितीप्रमाणे हे जे टीजर असतात, ते १५ सेकंदापासून जास्तीत जास्त तीन मिनिटांपर्यंत असतात.

इथं हा दिग्दर्शक दीड तासाचा टीजर बनवतोय? काय करतोय काय हा माणूस? लोकांना बोअर करणार की काय? असे प्रश्न डोक्यात पटापट उगवणं नैसर्गिक आहे. आपल्यापैकी कोणाच्याही डोक्यात येतील ते.

पण हे प्रकरण झटपट प्रश्न विचारण्यासारखं सोपं नाही. आपण जरा याची पार्श्वभूमी बघू. वसंत पळशीकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत होते. त्यांनी साहित्य, समाजकारण, राजकारण, अर्थशास्त्र, धर्म, परंपरा, पर्यावरण आदी अनेक विषयांवर रूढ चौकटीत न मावणारं सखोल लिखाण केलं. परखड चिकित्सा करतानाही त्यांनी सहृदयता कायम ठेवली. आपल्याला सर्वांमध्येच परिवर्तन करायचं असल्यानं संवादाचे आणि चर्चेचे मार्ग कायम मोकळे ठेवले. त्यांच्या प्रदीर्घ लेखांची संख्या सुमारे सातशेच्या आसपास आहे. त्याचबरोबर अंदाजे चाळीस वर्षं त्यांनी महाराष्ट्र आणि देशातील विविध ठिकाणच्या समाज कार्यकर्त्यांचं वैचारिक पोषण करण्याचं मोठं काम केलं. नुकतंच काही महिन्यांपूर्वी त्यांचं निधन झालं.

अशा या आवाक्यात न मावणाऱ्या माणसावर लघुपट बनवण्याचं आव्हान समीर शिपूरकरने उचललं, याचं कारण पळशीकर यांच्या विचारांचं त्याला पटलेलं महत्त्व. आज ते विचार कसे पोचवायचे, हा प्रश्न त्याला पडला असणारच...

समीर शिपूरकरने सुरुवातीला दोन कामं केली. पळशीकरांचं लेख गोळा करून वाचलं आणि स्कॅन केलं. त्यांच्या विचाराचा गगनाला गवसणी घालणारा आवाका लक्षात आला आणि आता हे मांडायलाच हवं असं त्याच्या मनानं घेतलं. स्कॅन केलेले साडेचारशे लेख हे एक वेगळंच प्रकरण आहे. तो झाला या लघुपटाचा तिसरा भाग. (यातील काही लेख वाचण्यासाठी पहा - http://www.arvindguptatoys.com/)

यातून समीर शिपूरकरची कोंडी नक्कीच वाढली. मग त्यानं पळशीकरांचं विचारदर्शन मांडणाऱ्या मुलाखती घेतल्या. महाराष्ट्र आणि देशातील दिग्गज विचारवंतांच्या सविस्तर मुलाखाती झाल्या. हा झाला या लघुपटाचा दुसरा भाग.

हे सगळं झालं तरी शिपूरकरांचा अस्वस्थपणा संपेना. त्याची मानसिक घुसमट वाढत गेली. मला जे प्रश्न सतावत आहेत, डोक्याला धक्के देत आहेत, त्या त्रासातून माझ्या डोक्यातल्या प्रश्नांची व्याप्ती माझ्या व्यक्तीगत पातळीपासून समाजापर्यंत भिडते. या प्रश्नांतून माझ्या परंपरागत धारणांना तडे जात आहेत. नव्या संकल्पना स्वीकारायला धाडस करायला लागत आहे. हे सर्व पळशीकरांचे लेख वाचून होत आहे, हा अनुभव मला येत आहे. ते सर्व मी आता सर्जकतेनं दृकश्राव्य माध्यमातून कसं मांडू ही खरी घुसमट आहे. या सगळ्या प्रचंड घुसळणीतून निर्माण झाला हा टीजर.

टीजरच्या सुरुवातीला एक गोष्ट सुरू होते. काय चाललंय हे सगळं असं आपण खळबळलेल्या डोक्यानं त्रासिकपणे बोलतो. पण हळूहळू डोकं शांत होत जातं आणि आपण स्वस्थपणे पुढचं बघायला तयार होतो. त्यानंतर वसंत पळशीकर, त्यांचं लिखाण आणि त्यांची विचार मांडण्याची पद्धती याबद्दल थोडक्यात माहिती देण्यात येते. नंतर सुरू होते पळशीकरांच्या विचारावर आधारित वेगवेगळ्या गोष्टींची मालिका. आपल्याच आसपासच्या जगण्यातल्या, राष्ट्रीय प्रश्नांच्या, भाषेच्या, देशाभिमानाच्या, शहरांच्या या गोष्टी रंजक आहेत, काळजाला चिरणाऱ्या आहेत, भयानक वास्तव उघडं करणाऱ्या आहेत.

या गोष्टींची भाषा आजची आहे. फेसबुक, व्हॉटसअप, स्मायलींची. केबीसीच्या प्रश्नांची. रेडिओ जॉकी मधाळ गोड भाषेत बोलते, तर प्रसन्न झालेली भारतमाता राष्ट्रवादाची चर्चा करते. असं खूप काही सोप्या भाषेतून होतं. कुठल्याही वैचारिक बाजाशिवाय. गोष्टींतून तुम्ही प्रश्नांपर्यंत कधी पोचता ते समजत नाही. हे सगळे प्रश्न तुमच्या डोक्यातल्या संकल्पनांबद्दल पुन्हा एकदा विचार करायला लावतात. शेवटी समीर शिपूरकर त्याच्या मनातली घुसमट तुमच्या डोक्यात सोडतो. तुम्ही अस्वस्थ होता. थोडक्यात, तुम्ही पळशीकर वाचावेत याची मशागत करायचं काम समीर शिपूरकर करतो.

अरे हो, पण या लघुपटामध्ये लोक कुठे दिसत नाहीत, भरपूर दृश्यं नाहीत, मग ही फिल्म कसली यार? प्रश्न बरोबर आहे, पण कशाला हवेत सारखे लोक आणि दृश्यं. किती ताण द्यायचा डोळ्यांना? डोक्याला स्थिरता देऊन तजेला आणायला जेवढी आवश्यक असतील, तेवढीच मोजकी दृश्यं आहेत. गोष्टी सांगणारा बोलत असतो. त्याच्या सोबत काही आकृत्या आणि चित्र दिसतात आपल्याला. नेमकी आणि पुरेशी दृश्यात्मकता हे या लघुपटाचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. ही दृश्यात्मकता तुम्हाला शांततेचा अनुभव देते. विचाराला प्रवृत्त करते. त्याच वेळी डोक्यातल्या प्रगती आणि समृद्धीच्या गोड गुळगुळीत पाटीवर प्रश्नांचे चरे उमटतात.

हा तासाभराचा टीजर लघुपट चांगला की वाईट, कॅमेरा, ध्वनी कसा वापरलाय, शॉट्स कसे घेतलेत वगैरेपेक्षा खूप वेगळा आहे. सोप्या, रसाळ शैलीत सर्जकतेनं विचारवंताच्या विचारांची ओळख करून देतानाच प्रेक्षकाला वास्तवाबाबत भानावर कसं आणावं याचा हा वस्तुपाठ आहे.

आपण संवेदनाशील आहात, आसपास घडणारं नीट उघड्या डोळ्यांनी बघत आहात. अस्वस्थ आहात. मात्र तुम्हाला या सगळ्याचं भावनेच्या आहारी न जाता योग्य विश्लेषण करायचं असेल, जग अधिकाधिक समग्र भावनेनं समजून घेत प्रगल्भ व्हायचं असेल तर या कामात समीर शिपूरकर दिग्दर्शित ‘पळशीकरांच्या निमित्ताने... एक टीजर’ तुम्हाला नक्कीच मदत करेल.

लेखक कथाकार आहेत.

vtambe@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......