टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • गुजरात पाठ्यपुस्तक, एकनाथ खडसे, सुरेश जैन, राधाकृष्ण विखे पाटील, देवेंद्र फडणवीस, मनोहर आजगावकर आणि एअर इंडिया
  • Wed , 12 July 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या गुजरात पाठ्यपुस्तक Gujarat Hindi textbook एकनाथ खडसे Eknath Khadse सुरेश जैन Suresh Jain राधाकृष्ण विखे पाटील Radhakrishna Vikhe Patil देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis मनोहर आजगावकर Manohar Ajgaonkar एअर इंडिया Air India

१. मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्यातील उपवास अर्थात रोजा म्हणजे ‘संसर्गजन्य आजार’ असल्याचं वर्णन गुजरातच्या पाठ्यपुस्तक मंडळाने हिंदीच्या पाठ्यपुस्तकातील एका धड्यात केला आहे. काहीच दिवसांपूर्वी गुजरात शिक्षण मंडळाने एका पुस्तकातील पाठात येशू ख्रिस्ताला ‘सैतान’ संबोधले होते. गुजरात पाठ्यपुस्तक मंडळाच्या इयत्ता चौथीच्या हिंदी पुस्तकात पान क्रमांक १३ वर प्रेमचंद यांची ‘इदगाह’ ही कथा आहे. या कथेच्या शेवटी शब्दार्थ दिले आहेत. त्यात ‘रोजा’ या शब्दाचा अर्थ दिला आहे. ‘रोजा म्हणजे एक संसर्गजन्य रोग असून त्यामुळे जुलाब आणि उलट्या होतात,’ असे म्हटले आहे. गुजरात शिक्षण मंडळाने ही ‘प्रिटिंग मिस्टेक’ असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. ‘हैजा’ (कॉलरा) या शब्दाऐवजी चुकून रोजा हा शब्द टाईप झाला आहे, असे मंडळाचे अध्यक्ष नितीन पेठाणी यांनी सांगितले.

मुळात ‘ईदगाह’ असं शीर्षक असलेली, भले प्रेमचंदांची का असेना, कथा गुजरातच्या पाठ्यपुस्तकात निवडली कशी जाते, याची उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी. उद्या मुसलमान हे अशा कथांच्या आधारे आपण या देशाचे नागरिक असल्याचा दावा करू लागतील. या देशात असेही धर्मनिरपेक्षता, परधर्मसहिष्णुता, शांततामय सहजीवन असे बरेच संसर्गजन्य आजार पसरलेले आहेत सामान्य लोकांमध्ये. त्यात या हैजाची भर नको.

.............................................................................................................................................

२. मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाच्या भूमिपूजन समारंभाच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी भाजप नेत्यांचे गोडवे गायल्याचे प्रकरण ताजे असतानाच, गेल्या सरकारपेक्षा आताचे मंत्री अधिक जवळचे वाटतात, असे विधान विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केल्याने त्यांच्या राजकीय भूमिकेबद्दल तर्कवितर्क व्यक्त केले जाऊ लागले आहेत. त्यातच विखे-पाटील यांच्याबाबत भविष्यात काहीही घडू शकते, अशी गुगली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकल्याने संशय अधिकच बळावला आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे झालेल्या समारंभात विखे-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर आपली मैत्री आहे, हे सांगताना आघाडी सरकारच्या कारभारावर टीका केली होती.

काय विलक्षण योगायोग पाहा. नाथाभाऊंना खासगीत विचारलंत, तर तेही सांगतील की आताच्या मंत्रिमंडळातल्या एकेकाळच्या स्वपक्षीय सहकाऱ्यांपेक्षा गेल्या वेळच्या आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातले मंत्री त्यांना अधिक जवळचे वाटतात. विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांचा बडा विरोधक मंत्री यांच्यात अशी स्नेहभावना असल्याशिवाय सरकारच्या भानगडी बाहेर निघत नाहीत आणि विरोधी पक्षनेत्यांची ‘कामं’ही होत नाहीत.

.............................................................................................................................................

३. राजकारणात कोणीही कायमस्वरूपी एकमेकांचे शत्रू अथवा मित्र राहात नाहीत, हे नुकतंच जळगावात आयोजित कार्यक्रमातून पुन्हा एकदा दिसून आले. एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी म्हणून ओळखले जाणारे भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे माजी आमदार सुरेश जैन हे सात वर्षांनंतर भजी महोत्सवानिमित्त एकत्र आले. एवढेच नव्हे, तर सुरेश जैन यांनी खडसे यांना बटाटा भजी भरवली आणि खडसेंनी जैन यांना मिरची भजी भरवली. खडसे-जैन यांच्यातील राजकीय वैर राज्याला नवे नाही. विधान परिषद निवडणुकीत खडसे यांचे पुत्र निखील यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते ईश्वरलाल जैन यांचे पुत्र मनीष जैन यांनी अपक्ष उमेदवारी केली होती. सुरेश जैन यांनी मनीष यांना निवडून आणले होते. पुढे जळगाव पालिकेतील घरकुल घोटाळा प्रकरणी सुरेश जैन यांना साडेचार वर्षे कारागृहात काढावी लागली. या काळात जिल्ह्यात ताकद वाढविण्यासाठी खडसेंनी जोरदार प्रयत्न केले. या पार्श्वभूमीवर या प्रेमाने लोकांच्या हृदयाचा ठाव घेतला आहे.

बातमीदाराने एका महत्त्वाच्या तपशिलाकडे दुर्लक्ष का बरं केलं असेल? सुरेशदादा जैन बिचारे हळव्या हृदयाचे, सालस स्वभावाचे. त्यांनी आपल्या मृदू स्वभावाला जागून नाथाभाऊंना आपल्यासारखीच सौम्य प्रकृतीची बटाट्याची भजी भरवली. पण, नाथाभाऊंचा तिखटपणा अजून गेलेला नाही. स्वपक्षातील स्वजनांनीच त्यांची ही अवस्था केली आहे म्हणा. त्यामुळेच की काय त्यांनी मात्र सुरेशदादांना चक्क् मिरचीची भजी भरवली. आता ती खाऊन सुरेशदादा हासहूस् करत असताना नाथाभाऊंनी त्यांना पाणी पाजण्याची संधी साधली की नाही, हेही या अर्धकच्च्या बातमीदाराने लिहिलेलं नाही.

.............................................................................................................................................

४. गोव्यात गोमांसावर बंदी नाही, गोव्यात येणारे पर्यटक त्यांना हवे ते खाऊ शकतात, असे गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी म्हटले आहे. ‘केंद्र सरकारने पशू हत्या रोखण्यासाठी त्यांच्या विक्रीवर निर्बंध आणले आहेत. मात्र त्याचा गोव्यातील पर्यटनावर कोणताही परिणाम होणार नाही,’ असे पर्यटनमंत्री म्हणाले. गोमांस सेवन आणि गोमांस विक्रीवर देशभरात भाजप सरकारांनी बंदी घातली आहे. मात्र, ईशान्य भारताप्रमाणे गोव्यात या पक्षाने नेहमीच पलटी मारली आहे. ‘गोव्यात हिंदू, मुस्लिम, कॅथलिक लोक अनेक वर्षांपासून आनंदाने एकत्र राहतात. गोव्यातील वातावरण अतिशय सलोख्याचे आहे,’ असे पर्यटनमंत्री आजगावकर त्यामुळेच म्हणाले.

गोव्यात सक्तीची धर्मांतरं घडवून सनातन धर्माची शक्ती वाढवण्याची काही सोय नाही. तसं काही करायला गेलं तर हे महत्त्वाचं राज्य हातातून जायचं. त्यामुळे हा सलोखा टिकवावाच लागतो. मजबुरी आहे. तरीही हळूहळू, वेगवेगळ्या मार्गांनी कुरापती काढत काढत ताकद वाढवण्याचे आणि ती दाखवण्याचे प्रयत्न सुरू असतात. ते यशस्वी झाले की गोवाही हिंदुराष्ट्राचा भाग बनल्याशिवाय राहणार नाही.

.............................................................................................................................................

५. आर्थिक अडचणीत सापडलेल्या एअर इंडिया विमान कंपनीने प्रवाशांना 'नाखूश' करण्याचा आणखी एक निर्णय घेतला आहे. एअर इंडियाच्या इकॉनॉमी क्लासमधील प्रवाशांना दिले जाणारे 'नॉनव्हेज' पदार्थ न बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढं एअर इंडियाच्या विमानानं देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 'नॉनव्हेज' पदार्थांना मुकावे लागणार आहे. कॉस्ट कटिंग होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला आहे. कंपनीचा तोटा खूप वाढला आहे. तसेच एअर इंडियाचे काही भाग विकण्याचा विचार केंद्र सरकारकडून सुरू आहे, त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे.

अस्वलाचं वजन कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या काही विफल उपायांची आठवण करून देणारा असा हा निर्णय आहे. मुळात एअर इंडिया ही प्रवाशांच्या सुखसुविधांसाठी तत्पर एअरलाइन्स म्हणून ओळखली जात नाही. ती ‘अतिविशिष्ट’ प्रवाशांची काळजी घ्यायला आणि सरकारपुढे लोटांगणं घालायला तत्पर असते. अशावेळी व्हीआयपी मंडळींचे चोचले बंद करण्याचा मार्ग पत्करण्याच्या ऐवजी आधीच नाराज असलेल्या सर्वसामान्य प्रवाशांच्या खानपानात भेदाभेद करण्याचा मार्ग आत्मघातकी ठरेल. शिवाय या निर्णयाला शाकाहारश्रेष्ठत्वरूपी नव्या वंशश्रेष्ठत्वाचा दुर्गंधही येतो आहेच.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......