‘मार्क्स इन सोहो’ : ‘मला इथे यायचेच होते आणि हा मी तुमच्यासमोर आहे…’
कला-संस्कृती - नाटकबिटक
दीपक बोरगावे
  • ‘मार्क्स इन सोहो’ या नाटकाची पोस्टर्स
  • Wed , 12 October 2022
  • कला-संस्कृती नाटकबिटक मार्क्स इन सोहो Marx in Soho हावर्ड झिन Howard Zinn कार्ल मार्क्स Karl Marx

‘मार्क्स इन सोहो’ हे इतिहासतज्ज्ञ, तत्त्वज्ञ, नाटककार आणि कवी हावर्ड झिन यांनी १९९७ साली लिहिलेले मूळ इंग्रजी नाटक आहे. १९८५मध्ये कार्ल मार्क्स सोहोमध्ये अवतरतो, अशी कल्पना या नाटकात केलेली आहे (इंग्रजीत ‘SoHo’ असे लिहिले जाते- South of Houston Street. अलीकडे ‘Soho’ असेही लिहिले जाते.) या इंग्रजी नाटकाचे साहिल कल्लोळी यांनी मराठी रूपांतर केले असून शरद भुताडिया यांनी दिग्दर्शन केले आहे. कोल्हापूरच्या ‘प्रत्यय’ या नाट्यसंस्थेतर्फे या नाटकाचे सध्या प्रयोग होत आहेत.

अमेरिकेतल्या न्यूयॉर्कजवळच्या या सोहो जिल्ह्यावजा ठिकाणी विशेषकरून कलाकार, कवी, लेखक, आर्किटेक्चर अशी माणसे राहतात. राजकीय आणि सांस्कृतिक विकासाच्या दृष्टीने गेल्या काही दशकांत सोहोला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. मार्क्स म्हणूनच बहुतेक इथे उतरला असावा. मार्क्सला त्याच्या प्रत्यक्ष आयुष्यात न्यूयॉर्कला जायला मिळाले नाही, म्हणून तो या नाटकात म्हणतो, ‘मला इथे यायचेच होते आणि हा मी तुमच्यासमोर आहे’.

स्वतः मार्क्स आपल्याला सांगतो, ‘‘मी परत आलो आहे. माझ्याकडे एक तासभर वेळ आहे. मला काही बोलायचे आहे. मला काही सांगायचे आहे. माझेच विचार चुकीच्या पद्धतीने सांगितले जात आहेत. चुकीची आंदोलन छेडली जात आहेत. त्यामुळे मी काही बोलणार, काही सांगणार आहे. तुमच्याशी मला काही संवाद करायचा आहे. तुम्ही म्हणाल की, अरे, हा मेलेला माणूस परत जिवंत कसा काय? फार फार तर हे एक डायलेक्टिक्स (द्वंद) आहे असे समजा. ‘द्वंद’ म्हणजे- मी मेलेलो आहे हे खरे आहे. पण मी जिवंत आहे हेही खरे आहे आणि हेच अधिक खरे आहे.”

या दीड तासाच्या दोन अंकी नाटकात मार्क्स स्वतःच्या जीवनातील काही प्रसंगांबद्दल बोलतो. त्याची पत्नी जेनी आणि त्याची मुलगी एलिनार, जिवलग मित्र फ्रेडरिक एंगल्स आणि मित्र, अनुयायी यांच्याबद्दल बोलतो. औषधे वेळेवर न मिळाल्याने प्रचंड थंडी आणि गारठ्यामुळे आपली मुले कशी दगावली, याबद्दल बोलतो. ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’, ‘जर्मन आयडियालॉजी’, ‘दास कॅपिटल’ या त्याच्या जगप्रसिद्ध ग्रंथांबद्दल बोलतो.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

भयंकर अशा परिस्थितीत मार्क्स कसा जगला? जेनीच्या घरातून आलेल्या वस्तू बाजारात वेगवेगळ्या ठिकाणी तो गहाणवट ठेवत असे आणि घरातली परिस्थिती कशीतरी निभावून नेत असे. तो ‘द न्यूयॉर्क ट्रायब्यून’ या अमेरिकेतील नियतकालिकात लेख लिहीत असे. त्यातून त्याला काही पैसे मिळत.

प्रत्येक देशाने मार्क्सला हद्दपार केले. त्याची जन्मभूमी जर्मनी. येथून त्याला हाकलून लावले. काय कारण? मार्क्स म्हणतो, ‘सर्वांत क्रांतिकारक कृती जर कोणती असेल तर ती आहे- ‘सत्य बोलणे’ ’. तो एका वृत्तपत्राचा संपादक होता. त्यातील एका लेखामुळे त्याला या प्रसंगाला सामोरे जावे लागले. जर्मनीनंतर पॅरिस, पण तिथेही पोलीस पोचले. नंतर बेल्जियम आणि मग शेवटी लंडन, असा त्याचा देशांतराचा प्रवास झाला. मार्क्स पत्नीसह लंडनला बराच काळ राहिला. त्याचे वृत्तपत्रीय आणि ग्रंथलेखन तिथेच झाले.

एंगेल्स आयुष्यभर मार्क्सला मदत करत आला, पण त्याच्यावर आर्थिक भार पडू नये म्हणून त्याने एकदा नोकरीसाठी अर्ज केला. हा एक प्रसंग या नाटकात आहे. रेल्वेच्या नोकरीसाठी केलेल्या या अर्जाचे उत्तर रेल्वे विभागाकडून येते. जेनी ते पत्र उघडून वाचते. तिला वाटते की, बहुतेक मार्क्सला रेल्वेत कारकुनाची नोकरी मिळाली. पत्रात लिहिलेले असते- ‘‘मिस्टर मार्क्स, तुम्ही पाठवलेल्या या अर्जाबद्दल आम्हाला खूप आनंद झाला आहे. तत्त्वज्ञान या विषयात आपण डॉक्टरेट ही पदवी मिळवली आहे. तरीही तुम्हाला ही नोकरी देण्यामध्ये आम्हाला खूप आनंद झाला असता. पण या नोकरीसाठी हस्ताक्षर चांगले असणे आवश्यक आहे. तुमचे हस्ताक्षर खूप खराब आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला ही नोकरी देऊ शकत नाही. याबद्दल आम्हाला खूप खेद वाटतो आहे.’’ हे पत्र वाचून दोघेही खळाळून हसू लागतात.

एंगल्सच्या सहकार्यामुळे आणि जेनीमुळे आयुष्यभर आपण काम करू शकलो आणि काही निर्मिती करू शकलो, याची कृतज्ञ भावना मार्क्सच्या मनात सतत झळकत राहते. एक अत्यंत प्रेमळ बाप, चांगला नवरा आणि तेवढाच चांगला मित्र म्हणून तो आपले सहृदयी म्हणणे आपल्यासमोर ठेवतो.

मुलगी एलिनारबद्दलच्या काही आठवणी सांगतो. १५ वर्षांची एलिनार तीक्ष्ण बुद्धीची होती. तिची राजकीय जाणीव अत्यंत संवेदनशील होती. आयरिश अस्मितेबद्दल तिच्या भावना तीव्र होत्या. शेक्सपिअरचे ‘रोमिओ अँड ज्युलियट’ हे तिचे आवडते नाटक होते. रोमिओचे काही संवाद मार्क्स तिला म्हणून दाखवायचा. ती मार्क्सच्या लिखाणातील काही गोष्टींवर बोट ठेवायची. उदाहरणार्थ, त्याच्या एका लेखातील ज्यू धर्माबद्दल उपस्थित केलेल्या काही प्रश्नांवर तिने वाद घातला होता.

जेनीदेखील मार्क्सच्या लेखनाची कठोर समीक्षक होती. या नाटकात एक प्रसंग आहे, तो असा - ‘दास कॅपिटल’ हा ग्रंथ आपल्याला समजत नाही, अशी तिची सरळ तक्रार असते. ती हे मार्क्सला स्पष्टपणे सांगते. ‘हा जणू काही एक हत्ती आहे’ असे म्हणते. त्यावर मार्क्सचे म्हणणे असते, ‘हे एक विवेचन आणि विश्लेषण आहे. हा सिद्धान्त आहे. हा असाच लिहिला जातो’. त्यावरची जेनीची प्रामाणिक प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे. ती म्हणते, ‘ठीक आहे. पण यातून तुला जे काही म्हणायचे आहे ते सामान्यांपर्यंत पोहोचत नाही. ‘कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा’मध्ये जसे सर्व आले आहे, असेच यामध्ये यायला हवे होते. क्रयवस्तू, अतिरिक्त मूल्यांचा सिद्धांत वगैरे वगैरे सर्व डोक्यावरून जाणारे आहे’. त्यावर मार्क्स म्हणतो, “ ‘कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा’ हे सर्वसामान्य कामगारांसाठी लिहिला होता. तो जाहीरनामा आहे आणि हा सैद्धान्तिक ग्रंथ आहे’. पण जेनीला ते काही पटत नाही.

साम्यवाद म्हणजे काय? धर्म म्हणजे काय? समाजात असणारे धर्माचे स्थान काय? व्यक्तीचे असणारे स्वातंत्र्य म्हणजे काय? कला, विज्ञान, तंत्रज्ञान या गोष्टींचे नेमके समाजात स्थान काय? कुणाच्या बाजूने काय निर्माण केले जाते आणि का निर्माण केले जाते? भांडवली समाजामध्ये विचारसरणी नावाची गोष्ट कशी व्यवस्थितपणे स्वतःचे हितसंबंध जपण्यासाठी सतत कार्यरत ठेवली जाते? या व अशा अनेक प्रश्नांचे अपभ्रंशीकरण आणि अतिरंजित अशी चित्रे निर्माण केली गेली जातात. गेल्या दीडशे वर्षांत या जगात काय काय घडले आणि पुढे काय घडणार आहे, याबद्दल मार्क्स आपल्याला सांगतो.

नाटकातील काही तुकडे-

धर्म - “माझे एक वाक्य नेहमी उद्रेक केले जाते आणि ते म्हणजे- ‘धर्म ही अफूची गोळी आहे’. मात्र याचा मागचा-पुढचा संदर्भ पाहिला जात नाही. त्यामुळे एकूणच माझे जे म्हणणे आहे, ते विकृत केले जाते.” धर्माबाबतचे आपले म्हणणे मार्क्स या नाटकात परत एकदा सांगतो. म्हणतो, “धर्म ही लोकांची अफूची गोळी आहे. धर्म हे हृदयहीन जगाचे हृदय आहे. मानवाची स्वतःची जाणीव आणि स्वाभिमान म्हणजे धर्म. या मानवाने अजून स्वतःला हशील केलेले नाही. त्याने स्वतःला पुन्हा हरवले आहे. मानव ही काही अमूर्त संकल्पना नाही. शासन आणि समाज हे मानवाने बनवलेले जग आहे. शासन आणि समाज धर्म निर्माण करतात. धर्म या जगाचे उफराटे भान असते. जगाचे लोकप्रिय तर्कशास्त्र म्हणजे धर्म. जगाची नैतिक मंजुरी आणि उत्साह म्हणजे धर्म. धर्म ही स्वप्नरंजित जाणीव आहे. धर्मात खरा माणुसकीचा गाभा अजून अस्तित्वात यायचा आहे. म्हणून ते नेहमी म्हणत राहतात- ‘जीझस हा परत अवतरणार आहे’. मी जीझसला चांगला ओळखतो. तो कधीही परत येणार नाही.”

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

युद्ध - अमेरिकेतील वृत्तपत्र हातात घेऊन राष्ट्राध्यक्ष बुश यांनी इराकवर पुकारलेल्या युद्धाचा उल्लेख मार्क्स करतो. युरोप, आफ्रिका, पॅलेस्टाईन या ठिकाणची मुलं अन्न नसल्यामुळे भुकेने मरत आहेत. सीमा आणि राष्ट्रवाद या प्रश्नांवरून लोक एकमेकांना ठार करत आहेत. दीडशे वर्षांपूर्वी या गोष्टींचा मी उल्लेख केला होता, असे मार्क्स म्हणतो. राष्ट्रवाद, देशाच्या सीमा या गोष्टी मानवनिर्मित, कृत्रिम आणि हास्यास्पद आहेत. पासपोर्ट, व्हिसा, स्थलांतर, देशाचे झेंडे, राष्ट्राच्या अस्मिता, सीमेवरील सैनिक, देशप्रेमाच्या शपथा, देश नावाची गोष्ट, हीच मुळी कृत्रिम रचना आहे. ‘जगातील कामगारांनो एक व्हा’ ही मार्क्सची घोषणा याच पार्श्वभूमीवर दिली गेली आहे. दीडशे वर्षांपूर्वी मार्क्सने सांगितलेल्या सर्व समस्या आजही जिवंत आहेत. उत्पन्नामध्ये असणारी विषमता, दारिद्र्य, चुकीच्या पद्धतीने पोसली जाणारी राष्ट्रीय अस्मिता, या सर्व गोष्टी आजही तशाच आहेत. सर्व श्रमिकांनी एकत्र येण्याची म्हणूनच आजही गरज आहे.

भांडवलवाद आणि भांडवली व्यवस्था - “औद्योगिकीकरणाबरोबर भांडवली व्यवस्थेने या जगाचा चेहरा बदलला. युद्ध जिवंत ठेवण्यासाठी उद्योग व्यवस्था कामाला लागली. १८४८मध्ये भांडवलवाद हा संपणार आहे (कदाचित दोनशे वर्षांनी) हे जे मी सांगितले होते, ते चुकीचे होते, हे आज माझ्या लक्षात येत आहे. वर्तमानातील प्रत्येक व्यवस्था ही भूतकाळातील रचनेबरोबर विकसित होत जाणारी गोष्ट असते. समाजातील लोक मूर्ख नसतात. मानवी जीवनातील सभ्यता, न्याय, स्वातंत्र्य, समतेबद्दल असणारी आस्था या गोष्टी सर्वसाधारण लोकांमध्ये ‘कॉमन सेन्स’च्या रूपात कायम उपस्थित आणि जिवंत असतात. ही कॉमन सेन्स नावाची गोष्ट सामान्य माणसाला नेहमी जागृत ठेवत असते.”

एके ठिकाणी मार्क्स अब्राहिम लिंकनचे शब्द उदधृत करतो- सर्व लोकांना तुम्ही सर्व वेळ मूर्ख बनवू शकत नाही. हे खरेच आहे. आणि याचमुळे सगळे लोक एकत्र येण्याच्या शक्यता घनदाट होत जातात. हे इतिहासात खूप वेळा झाले आहे आणि परत परत मोठ्या प्रमाणात होऊ शकते. अशा वेळी राज्यकर्ते, त्यांची सैन्यव्यवस्था, त्यांच्या सगळ्याच दमणव्यवस्था निकामी होत जातात. मात्र लोकांना एकत्र येण्यापासून कुठलीही शक्ती अडवू शकत नाही. भांडवली व्यवस्थेने अशा प्रकारची अनेक आश्चर्य आधुनिक मानवी इतिहासात घडवून आणली आहेत. ही व्यवस्था म्हणूनच स्वतःची कबर खोदत आहे. लोभासाठी अधिकाधिक अनावश्यक वस्तूंची निर्मिती होऊ लागते. क्रयवस्तूंनी आपल्याला घेरतात. भांडवली व्यवस्थेचा हा विकास आहे. कामगार आणि श्रमिकांबरोबरच कला, साहित्य, संगीत, विज्ञान, सौंदर्य यांचीही क्रयवस्तू म्हणून खरेदी-विक्री होते.

या व्यवस्थेत स्वतः माणूसच एक क्रयवस्तू होतो. केवळ कारखान्यातील कामगारच नव्हे, तर डॉक्टर, वैज्ञानिक, वकील, कवी, चित्रकार सर्वांना जगण्यासाठी स्वतःचे श्रम विकून टिकून राहावे लागते. पण आपल्या सर्वांचा शत्रू हा एकच आहे, ही गोष्ट जेव्हा सर्वांच्या लक्षात येईल, तेव्हा सर्व जण एकत्र येतील. भांडवलशाहीला जागतिक बाजारपेठ हवी असते. अधिकाधिक फायदा मिळवण्यासाठी मुक्त बाजारपेठ हा तिचा आक्रोश असतो. या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये भांडवलशाही अनिश्चेने का होईना, एक जागतिक संस्कृती निर्माण करत आहे. मानवी इतिहासामध्ये ही कधीही न घडलेली गोष्ट आहे. आज कल्पनेच्या पलीकडे जगातील लोक अनेक देशांच्या सीमा ओलांडत आहेत. ते आपल्याबरोबर विचारदेखील घेऊन जातात. यातून विचारांची देवाणघेवाण होते. नव्या गोष्टींची निर्मिती होते. ही एक अपरिहार्य गोष्ट आहे.

‘पॅरिस द् कम्यून’ - ही इतिहासातील एक अभूतपूर्व अशी घटना आहे. १८ मार्च ते २८ मे १८७१ म्हणजे जवळपास दोन महिने दहा दिवस एवढाच काळ हे सरकार जिवंत राहिले. खरं तर हे सरकार नव्हते. काहीतरी भव्य दिव्य अशा प्रकारचा हा समाजवादी आणि लोकशाहीवादी प्रयोग होता. खऱ्या अर्थाने गरिबांची प्रतिनिधत्व करणारी ही व्यवस्था होती. ‘कम्यून’ म्हणजे लोकांची मानवतावादी आणि सर्जनात्मक सामूहिक शक्ती, सामूहिक ऊर्जा. अशा प्रकारच्या सामूहिक शक्तीला जगातले प्रत्येक सरकार घाबरत असते. या अल्पजीवी सरकारने स्त्रियांसाठी खास शिक्षणाची व्यवस्था सुरू केली होती. सर्व कला दालने, नाट्यगृह खुली केली होती. शाळांमधून शिक्षणाचा प्रश्न ताबडतोबीने गांभीर्याने हाताळायला सुरुवात केली होती. या काळात पॅरिसच्या रस्त्यावर स्त्री-पुरुषांची गर्दी होती. लोक चर्चा करत. हास्य, आनंद, एकमेकांबद्दलचे प्रेम, सहचार्य आणि आदर या सर्व गोष्टी लोकांच्या चेहऱ्यावर झळकत. आपल्याकडील वस्तू ते एकमेकांना शेअर करत. पॅरिसच्या रस्त्यावर एकही पोलीस नव्हता. पोलीस यंत्रणाच अस्तित्वात नव्हती. याची मुळी गरजच नव्हती. हा आहे खरा समाजवाद. पण ही समाजवादी आणि लोकशाही व्यवस्था फ्रेंच रिपब्लिकला धोकादायक वाटली. हे त्यांना नको होते. म्हणून त्यांनी ती ताबडतोब नष्ट केली.

सर्व सीमांवर तैनात असलेले फ्रेंच रिपब्लिकचे सैनिक शहरात घुसले. ‘कम्यून’च्या सर्व नेत्यांना आणि ३० हजार कार्यकर्त्यांना ठार मारले गेले. काही‌ समर्थकांना ताब्यात घेतले गेले, तर काहींवर खटले भरले गेले. काही विद्रोही आणि क्रांतिकारक पॅरिस सोडून दुसऱ्या देशात पळून गेले. समाजवाद आणि लोकशाहीचा हा प्रयोग जगभरात प्रेरणादायी ठरेल, ही भीतीदेखील या पाठीमागचे एक प्रमुख कारण होते. फ्रेंच रिपब्लिकला ‘कम्यून’ची किती दहशत आणि भीती होती, याचेच हे प्रदर्शन होते..

साम्यवाद संपला आहे? - रशियातला साम्यवाद कोसळला म्हणजे आता जगामध्ये साम्यवाद राहिलेला नाही, असा एक बाळबोध आणि मूर्खासारखा अर्थ नेहमी सांगितला जातो. साम्यवाद ही अशा प्रकारची एक व्यवस्था आहे की, जिथे मानवतावादी दृष्टीकोनातून व्यक्तीला स्वतःचा विकास करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले जाते. तुम्ही काय म्हणता हे मान्य न करणाऱ्या व्यक्तीला गोळ्या घालून ठार करणे म्हणजे ‘साम्यवाद’? हा तर सरळ सरळ गँगस्टरचा प्रकार झाला. मार्क्स म्हणतो, ‘रशियातील सर्वेसर्वा शक्तींनी माझे सर्व विचार एखाद्या माथेफिरू धर्ममार्तंडासारखे वापरले असतील, तर याला साम्यवाद म्हणता येणार नाही.’ मार्क्सचा प्रत्येक शब्द अंतिम आहे, असे समजणाऱ्या अनेक कॉम्रेड्सना गोळ्या घालून ठार मारण्यात आले. हे करण्याअगोदर मार्क्सचे एक पत्र त्यांना वाचायला दिले होते. का? ‘द न्यूयॉर्क ट्रीब्यून’ला मार्क्सने एक पत्र पाठवले होते. त्यामध्ये त्याने स्पष्टपणे असे म्हटले होते, “कोणत्याही सुसंस्कृत समाजामध्ये मृत्युदंडाची शिक्षा कुठल्याही परिस्थितीमध्ये मान्य करता कामा नये. जो कोणी आपल्या विचाराविरुद्ध जाणारा आहे आणि म्हणून तो आपला शत्रू आहे आणि त्याला गोळ्या घालून ठार मारले पाहिजे म्हणजे समाजवाद/साम्यवाद असा अर्थ जर कोणी काढत असतील, तर हा शुद्ध मूर्खपणा आहे.”

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

या नाटकातील एक प्रसंग विलक्षण आहे. मार्क्सचा एक कवी मित्र (जो त्याच्या संघटनेचा सदस्यही आहे) त्याला भेटायला येतो. तो म्हणतो, ‘‘तू जे काही सांगतो आहेस- ‘जगातील कामगारांनी एक व्हा’; ‘कामगारांची हुकूमशाही’ वगैरे वगैरे- हे सर्व अतिरंजित आणि कधीही न घडणारे असे आहे. या कुठल्याच गोष्टींवर माझा विश्वास नाही.’’ मार्क्सचे या मित्रासोबत कडाक्याचे भांडण होते. हा मित्र उद्विग्न आणि क्रोधित होऊन म्हणतो, ‘‘मी तुझ्या विचारांवर आणि सिद्धान्तनांवर थुंकतो.” तेवढ्याच संयमाने मार्क्स म्हणतो, “तू माझ्या विचारांवर आणि सिद्धान्तनावर जरूर थूक. पण ज्या फरशीवर तू थुंकला आहेस, ती फरशी आधी स्वच्छ कर,” असे म्हणत तो त्याला फडके देतो.

या मराठी रूपांतरणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे, यामध्ये ‘तरुण मार्क्स’ आणि ‘वृद्ध मार्क्स’ असे दोन भाग आहेत. त्याचा एक वेगळा प्रभाव पडतो. मार्क्सची पत्नी जेनी, मुलगी एलिनार, जिवाभावाचा मित्र एंगल्स, आणखी दोन मित्र, या पात्रांमुळे हे नाटक जिवंत आणि रसरशीत झाले आहे. लंडनमधील घरातील अनेक प्रसंग पाहत असताना तरुण मार्क्स कोणत्या परिस्थितीमध्ये लेखन करत होता आणि घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींसोबत कसा रमत होता, याचा प्रत्यय ठळक होत जातो.

डॉक्टर शरद भुताडिया यांनी उभा केलेला मार्क्स लक्षात राहण्यासारखा आहे. त्यांनीच या नाटकाचे दिग्दर्शनही केले आहे. ‘प्रत्यय’ या कोल्हापूरच्या नाट्यसंस्थेने हा आनंद मिळवून दिला, याबद्दल त्यांना खूप धन्यवाद.

...............................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

Post Comment

Ravi Go

Wed , 12 October 2022

छान लेख व ओळख. भारतात ज्यांनी समाजवादाचा पाठपुरावा केला, निदान प्रयत्न केले त्या नेत्यांबद्दल व विचारवंताबद्दल या नाटकात काही आहे का? (कदाचित मूळ लेखनाचे भाषांतर असल्यास ते शक्य झाले नसावे).


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......