‘मी वसंतराव’ : तीन तास खिळवून ठेवतो आणि काही प्रसंगामध्ये डोळ्यांच्या कडा ओलावतात. कारण वसंतरावांची जादू आणि निपुणचं दिग्दर्शन...
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
सुहास किर्लोस्कर
  • ‘मी वसंतराव’ या सिनेमाची पोस्टर्स
  • Mon , 11 April 2022
  • कला-संस्कृती मराठी सिनेमा मी वसंतराव Me Vasantrao राहुल देशपांडे Rahul Deshpande निपुण धर्माधिकारी Nipun Dharmadhikari

वसंतराव देशपांडे या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या खडतर आयुष्याचा मागोवा घेण्याचं शिवधनुष्य दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी उत्तमरीत्या पेललं आहे. मराठीतील एकापेक्षा एक चरित्रपट बघितल्यामुळे ‘मी वसंतराव’ या सिनेमाबद्दल थोडा साशंक होतो, पण तो तीन तास खिळवून ठेवतो आणि काही प्रसंगामध्ये डोळ्यांच्या कडा ओलावतात. याचं कारण वसंतरावांची जादू आणि निपुण धर्माधिकारी यांचं दिग्दर्शन.

वसंतराव देशपांडे यांचं नाव ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकानंतर महाराष्ट्रभर झालं आणि श्रोत्यांनी त्यांच्या अनोख्या गायनशैलीवर भरभरून प्रेम केलं. शास्त्रीय गायनाच्या मैफिलीमध्ये ते श्रोत्यांबरोबर असा काही अनौपचारिक संवाद साधत की, सर्वांनाच त्यांच्याविषयी आपलेपणा वाटायचा. एखादं नाट्यपद कोणत्या बंदिशीवरून घेतलं आहे, ठुमरीचं मराठीकरण कसं झालं, एखाद्या बंदिशीतले शब्द कसे उच्चारावेत आणि कसे गाऊ नयेत, हे दोन्ही प्रकार ते करून दाखवायचे. गायन, तबलावादन, अभिनय, नृत्य अशा अनेक कलांवर त्यांचं कसं प्रभुत्व होतं, त्याबद्दल पु.ल. देशपांडे यांनी अगदी चपखल वर्णन केलं आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

अशा वसंतरावांवर चरित्रपट कशा प्रकारे करता येईल, याचे अनेक पर्याय पटकथालेखक निपुण धर्माधिकारी आणि उपेंद्र सिधये यांच्याकडे असणार, हे नक्की. त्यापैकी वसंतरावांचा ‘कट्यार’पूर्वीचा संघर्ष दाखवण्याचा पर्याय पटकथाकार आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी निवडल्याचं दिसतं. त्यामुळे नंतरच्या काळात रागसंगीताची मैफल सादर करणारे रसिकप्रिय वसंतराव या सिनेमात दिसत नाहीत.

मराठी सिनेमा फारच शब्दप्रधान असतो. यातही कोणतं तरी पात्र कायम बोलत असतं. काही काही वेळा संवादाशिवाय दृश्यमाध्यमाचा वापर करायला अजून आपल्याला बराच पल्ला गाठायचा आहे.

अभिनयाच्या बाबतीत खरी बाजी मारली आहे पु.ल. देशपांडे यांची भूमिका साकार करणाऱ्या पुष्कराज चिरपुटकर यांनी. अनिता दाते (आई), कौमुदी वालोकर (पत्नी), आलोक राजवाडे (मामा) यांचा अभिनयही अप्रतिम. राहुल देशपांडे यांनी गायक वसंतराव उत्तम निभावले आहेत. वसंतरावांची गायकी वसंतोत्सवासह अनेक स्वरमंचावर राहुल देशपांडे सादर करतात, तेव्हा ते दिसतेच. या सिनेमातील अनेक प्रसंगात तो अभिनय काया-वाचा स्वरूपात दिसतो.

एका प्रसंगात वसंतराव लावणी ऐकायला जातात, त्या वेळी त्यांच्या अदा अधिक प्रभावीपणे येऊ शकल्या असत्या असे वाटते. अर्थात बैठकीची लावणी सादर करणाऱ्या शकुंतला नगरकर यांनी तो अभिनय लाजवाब केला आहे. बेगम अख्तर यांची भूमिका दुर्गा जसराज यांना देण्याचं प्रयोजन समजलं नाही. गझल गायिका हार्मोनियमवर हात ठेवून असते, हे विचित्र वाटतं. आपल्याकडे, विशेषतः मराठी चित्रपटात, भूमिकेचा अभ्यास करण्यास आवश्यक तेवढं वाद्य शिकणं का टाळलं जातं?

उस्ताद झाकीर हुसेन यांची भूमिका करण्यासाठी तबलावादकाची केलेली निवड उत्तम. द्रुत तबल्यावर जे बोल वाजतात, तेच बोल पडद्यावर वाजताना दिसतात. तसं अन्यत्र होताना दिसत नाही. अमेय वाघ यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची भूमिका देणं खटकतं, अगदी शरीरयष्टीपासून संवादापर्यंत. ‘कट्यार काळजात घुसली’च्या तालमी होत असताना त्या नाटकाचे संगीत दिग्दर्शक पंडित जितेंद्र अभिषेकी सिनेमात दिसत नाहीत. वसंतरावांचे पंडित कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी यांच्याशी असलेलं मैत्र दिसत नाही. सिनेमातलं कोणतंही पात्र त्यांचा उल्लेखही करत नाही. अर्थात तीन तासांत काय आणि किती दाखवायचं, हा प्रश्न असेल.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

राहुल देशपांडे यांचं उत्तम संगीत ही या सिनेमाची जमेची बाजू. ‘सकाळी उठू’ (श्रेया घोषाल), ‘सूर संगत’ (विजय कोपरकर, अंजली गायकवाड, सौरभ काडगावकर), ‘पुनव रातीचा’ (उर्मिला धनगर), ‘तेरे दर से’ (हिमानी कपूर, राहुल देशपांडे) ही गाणी चित्रपटानंतर पुन्हा ऐकण्यासारखी आहेत. ‘गगन सदन तेजोमय’ या गाण्याचे मूळ ‘विखरी प्रखर तेजोबल’ हे मास्टर दीनानाथांचं गाणं आनंद भाटे यांनी सुरेलरीत्या गायलं आहे.

या सिनेमाचं संगीत संयोजन आणि साउंड डिझायनिंग उत्तम आहे. निरंजन किर्लोस्कर, चंद्रशेखर गोखले, दर्शन देसाई यांनी चित्रपट निर्मितीचा दर्जा उच्च राखला जाईल, याची दक्षता घेतली आहे. या सिनेमाचा शेवट ‘कैवल्य गान’ या गाण्यानं प्रभावीपणे होतो. प्रेक्षक टायटल्स संपेपर्यंत खुर्चीत बसून असतात, वसंतरावांची छायाचित्रं बघतात आणि श्रेयनामावली वाचण्यासाठी थांबतात, हे विशेष.

या सिनेमानंतर वसंतरावांची शेवटची मैफल रसिकांनी पुन्हा ऐकावी. जोगकंस, परज, दादरा, भैरवी गायनाला झाकीर हुसेन यांची तबला साथ, उस्ताद सुलतान खान यांच्या सारंगीसाथीनं रंगवलेली मैफल संस्मरणीय होती, आहे आणि राहील.

हा सिनेमा आवडला की नाही, हे ठरवण्यापूर्वी आपली भूमिका काय, हे ठरवावं लागेल. आपण राहुल देशपांडे यांचे चाहते आहोत? सिनेमा बघून वसंतरावांच्या आठवणींना उजाळा द्यायचा आहे? तसं असेल तर हा सिनेमा उत्तम आहे.

एक उत्तम चरित्रपट बघायचा असेल तर मराठी चरित्रपटांच्या तुलनेत हा पुष्कळच उजवा आहे. सुबोध भावे, महेश मांजरेकर यांच्यासारख्या दिग्गजांनी हा चरित्रपट करण्यापूर्वी राहुल देशपांडे यांनी तो साकारला, याबद्दल त्यांचे आभार.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

ज्यांना वसंतराव देशपांडे यांची गायकी माहीत नाही, त्यांनी हा चित्रपट बघून पूर्णवेळ कलाकार होण्याचं ध्येय उराशी बाळगावं, असा उद्देश असेल तर तो साध्य होणं कठीण आहे, कारण वसंतराव रसिकप्रिय झाले, त्यांना रागसंगीत गायनाच्या मैफली मिळू लागल्या, हे या सिनेमात दिसत नाही.

या सिनेमामुळे राहुल देशपांडे यांचा एक ब्रँड तयार होण्यास मदत होईल, ही जमेची बाजू. परंतु हा चरित्रपट तामिळनाडू, केरळ, बंगाल, लाहोर या ठिकाणी कोणी बघितला, तर त्यांना वसंतराव देशपांडे यांच्या गायकीचं मर्म समजेल का? त्यांच्या गायकीची काय खासीयत होती? त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचे नेमके मुद्दे काय होते? तेव्हाच्या ज्या श्रोत्यांना गायनामधला ठेहराव आवडत होता, त्यांना तानांचा आक्रमकपणा आवडत नव्हता की, त्यांचे काही वेगळे आक्षेप होते? पु.ल. देशपांडे यांचा वरदहस्त हेच त्यांच्या यशाचं गमक होतं की आणखी काही? वसंतराव देशपांडे यांचा चाहता या नात्यानं हे प्रश्न पडले. अर्थात आपण राहुल किंवा वसंतराव यांच्या प्रेमापोटी हा सिनेमा बघितला तर हे प्रश्न पडणार नाहीत.

.................................................................................................................................................................

लेखक सुहास किर्लोस्कर सिनेअभ्यासक आहेत.

suhass.kirloskar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......