थरथरत्या आवाजाचा ‘थरारून’ टाकणारा गायक!
कला-संस्कृती - गाता रहे मेरा दिल
आफताब परभनवी
  • तरुणपणातील तलत मेहमूद
  • Sat , 04 March 2017
  • गाता रहे मेरा दिल Gaata Rahe Mera Dil आफताब परभनवी Aftab Parbhanvi तलत मेहमूद Talat Mahmood

तो कधीही खूप लोकप्रिय असा गायक नव्हता. त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धो धो पैसे कमावले नाहीत. त्याची गाणी अंताक्षरी खेळताना आठवत नाहीत. त्याच्यासाठी संगीतकार अडून बसले, नायक त्याचा आवाज हवा म्हणून हट्ट करून बसले असंही कधी घडलं नाही. सहज ओठांवर त्याची गाणी येत नाहीत. एखाद्या सायंकाळी दाटत जाणाऱ्या अंधारासोबतच व्यक्त करावं, पण व्यक्त करता येऊ नये असं काही तरी काळजात दाटत जातं आणि आपल्याही नकळत त्याच्या गाण्याचे सूर आपल्या मनात भरून राहतात-

शाम-ए-गम की कसम

आज गमगीन है हम

आ भी जा आ भी जा आज मेरे सनम

आणि मग मात्र दुसरं काहीच सुचत नाही. एका मागोमाग एक त्याची गाणी आठवत जातात. आपल्याही नकळत आपल्या मनाच्या तळाशी ती साठलेली असतात. सगळा तळ ढवळला जातो आणि मग पुढे बराच वेळ त्याचा आवाज आपली सगळी समज ताब्यात घेऊन टाकतो. मग दुसरं काहीच ऐकायची मन:स्थिती शिल्लक राहत नाही. फार तर त्याच्यासोबत अप्रतिम अशी लता आपण ऐकू शकतो, दुसरं काहीच नाही. 

हे असं घडत जातं तलत मेहमूदच्या गाण्यांबाबत. माधव मोहोळकरांनी आपल्या ‘गीतयात्री’ पुस्तकांत तलतबाबत फार उत्कटतेनं लिहिलं आहे. विशेषत: त्याच्या आवाजाचा पोत स्पष्ट करताना त्यांनी म्हटलं आहे, “कंप आणि थरथर यातील फरक असा आहे की, कंप हा दोष आहे तर थरथर हे मात्र वैशिष्ट्य ठरतं.” थरथरता आवाज हेच तलतचं बलस्थान ठरलं. ज्या संगीतकारांनी हे ओळखलं त्यांनी त्याचा अतिशय चपखल वापर आपल्या गाण्यांमध्ये करून घेतला.

दोनच भावना प्रामुख्याने तलतच्या आवाजातून जास्त परिणामकारकतेने प्रगट होतात. पहिली, प्रेमातलं दु:ख आणि तेही परत कुठेही आक्रस्ताळं नसलेलं. दुसरी, निखळ अशी प्रेमाची कबुली, परत तीही अतिरेकी आनंदानं व्यक्त न होणारी. दोन्हीकडेही एक शांत मध्यम सूर लागलेला असतो. 

तलतच्या अगदी सुरुवातीच्या काळातला ‘बाबूल’ (१९५०) हा बॉक्स ऑफिसवर हिट झालेला चित्रपट. त्यात शमशाद सोबतचं त्याचं गाणं ‘मिलतेही आँखे दिल हुआ दिवाना किसी का, अफसाना मेरा बन गया, अफसाना किसी का’ गाजलं. पण शमशाद सोबत तलतचे सूर जुळत नाहीत हे स्पष्टपणे जाणवतं. याच वर्षी नुकत्याच गाजू लागलेल्या राज कपूर- नर्गिसच्या ‘जान पेहचान’मध्ये तलतचं गीता दत्तसोबत एक गाणं आहे- ‘आरमान भरी दिल की लगन तेरे लिये है’. पण तेही आज विशेष वाटत नाही. पण याच वर्षी ‘अनमोल रतन’मध्ये गुणी संगीतकार विनोदने तलत-लताच्या आवाजात ‘शिकवा तेरा मैं गाऊ दिल मे समाने वाले, भूलेसे याद करले ओ भूल जानेवाले’ हे गाणं दिलं. आणि तलतच्या आवाजाला केवळ लताचाच आवाज जुळतो हे समीकरण सिद्ध करून दाखवलं. पुढे बहुतांश संगीतकारांनी ही जोडी यशस्वीरीत्या वापरली.

प्रेमात विफल झालेला किंवा जगापासून दूर जाऊ पाहणारा नायक, त्याचं दु:ख व्यक्त करण्यासाठी पडद्यावर दिलीपकुमारने रंगवला, त्याची ही प्रतिमा तयार करण्यात तलतच्या आवाजाचा मोठा वाटा आहे. 

‘आरजू’ (१९५०) या तेव्हाच्या यशस्वी चित्रपटात अनिल विश्वास यांनी तलतच्या आवाजात ‘ए दिल मुझे ऐसी जगा ले चल’ गाऊन घेतलं. गाणं तर लोकप्रिय झालंच, पण दिलीपकुमारची ‘ट्रॅजेडी किंग’ ही प्रतिमा ठसली गेली.

‘दाग’ (१९५२)मध्ये ‘ए मेरे दिल कही और चल’ (संगीत - शंकर जयकिशन) पडद्यावर आलं आणि दिलीपकुमारच्या या प्रतिमेवर शिक्कामोर्तबच झालं. प्रेमभंग झालेला नायक म्हणजे तलतचाच आवाज हे पक्कं झालं. 

तलतचं सगळ्यात गाजलेलं गाणं ‘शाम-ए-गम की कसम’ १९५३ च्या ‘फुटपाथ’मधलं आहे. तेव्हा नुकत्याच सुरू झालेल्या ‘बिना का गीतमाला’मध्येही हे गाणं हिट ठरलं. दिलीपकुमारच याही चित्रपटाचा नायक होता. संगीत मात्र खय्याम यांचं होतं. पहिल्या दोन-चार वर्षांतच तलतबाबत एक गोष्ट स्पष्ट झाली. संगीतकार कुणीही असो (अनिल विश्वास, शंकर जयकिशन, खय्याम) त्याची म्हणून एक शैली तयार झाली, ती बदलता येत नाही किंवा उलटही असेल की तलतच्या या शैलीच्या मोहातच संगीतकार पडत गेले. अगदी पुढे ओ.पी.नय्यरसारखा पंजाबी ठेकावाला संगीतकारही तलतसाठी ‘प्यार पर बस तो नहीं मेरा लेकिन, तू बात दे के तुझे प्यार करू या ना करू’ (सोने की चिडीया, १९५८) सारख्या साहिरच्या शब्दांना नाजुक चाल देतो आणि तलतही त्याचं सोनं करतो.

‘फुटपाथ’मध्येच एक गाणं प्रेमलतासोबत खय्यामने संगीतबद्ध केलं आहे. दु:खाच्या आर्तस्वरांसोबतच तलतच्या आवाजात प्रेमाची अस्फुट भावना आनंदी सुरावटीत शोभून दिसते, हे ओळखून ‘पवन चले’सारखं आनंदी गाणं दिलं. पण ‘शाम-ए-गम’च्या प्रचंड प्रभावात ते झाकोळून गेलं.

खरं तर याही आधी ‘सीने में सुलगते है आरमां’ (तराना, १९५१) या लतासोबतच्या गाण्यानं तलतच्या आवाजात प्रेमाची भावना सुंदर फुलते हे समोर आलं होतं. दु:खी गाण्यांसारखंच तलतचा हा सूरही सर्व संगीतकारांपाशी असाच लागतो. ‘समा के दिल में हमारे’ (अनहोनी-रोशन), ‘दिल में समा गये सजन’ (संगदिल-सज्ज्जाद), अपनी कहो कुछ मेरी सुनो (परछाई-सी.रामचंद्र), ‘जब जब फुल खिले’ (शिकस्त- शंकर जयकिशन) ही याच काळातली काही उदाहरणं.

ग़ज़ल हा तर तलतचा खास प्रांत. तलत हा एकमेव पार्श्वगायक असा आहे की, ज्याच्या गैरफिल्मी रेकॉर्ड अतिशय लोकप्रिय झाल्या आणि मग तो हिंदी चित्रपटात गायक म्हणून आला. त्याच्यासारखी गैरफिल्मी गीतांना लोकप्रियता तेव्हा कुणाही दुसऱ्या गायक-गायिकेला मिळाली नव्हती. या गाण्यांमध्ये ग़ज़ला जास्त होत्या. 

स्वाभाविकच १९५४ मध्ये सुरैय्या-प्रदीप कुमार यांचा ‘मिर्झा ग़ालिब’ पडद्यावर आला, तेव्हा त्यात तलतचा आवाज होता. ग़ालिबच्या ग़ज़लांना बऱ्याच जणांनी पुढे सुंदर चाली दिल्या. त्यांना लोकप्रियताही लाभली, पण ‘मिर्झा ग़ालिब’मधील सुरैय्या-तलतच्या ‘दिल-ए-नादान तुझे हुआ क्या है, आखिर इस दर्द की दवा क्या है’ या ग़ज़लेची मोहिनी काही कमी होत नाही. 

तलतच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर यश लाभलं नाही. १९५५ला ‘बारादरी’ पडद्यावर आला. शौकत देहलवी नाशाद (नौशाद नाही, बऱ्याच ठिकाणी ही गल्लत होते) याने तलतच्या आवाजात ‘तस्वीर बनाता हूँ, तस्वीर नहीं बनती’ हे गाणं गाऊन घेतलं. त्याला लोकप्रियताही लाभली. चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चालला, पण त्यानंतर मात्र तलतचा उतरता काळ सुरू झाला. 

पुढे वसंत देसाईच्या ‘मौसी’मधलं लता-तलतचं अप्रतिम प्रेमगीत ‘टिम टिम टिम तारों के दिप जले, नीले आकाश तले’ ‘बिना का…’त हिट झालं. ओ.पी.नय्यरच्या ‘सोने की चिडीया’मधील ‘प्यार पर बस तो नहीं है मेरा लेकीन’ हेही ‘बिना का…’त  गाजलं, पण चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोसळला. 

एस.डी.बर्मन यांचा ‘सुजाता’ हा गाजलेला चित्रपट. यातील ‘जलते है जिसके लिये, तेरी आँखो के दिये, धुंड लाया हू वोही गीत मैं तेरे लिये’ हे तलतचं गाणं ‘बिना का…’त ही हिट ठरलं. हे जवळपास तलतसाठी शेवटचं यशस्वी गाणं सिद्ध झालं. खरं तर नंतरही कितीतरी सुंदर गाणी तलतची आली. सलिल चौधरीचे सदाबहार ‘अहा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिये’ हे १९६० ला आलेलं गाणं तलत-लताच्या सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एक आहे. 

१९६४ ला मदन मोहनचा ‘जहांआरा’ पडद्यावर आला. बरोब्बर दहा वर्षांपूर्वी तलतचे ‘शाम-ए-गम की कसम’ आलं होतं. त्याची आठवण म्हणून असावं मदन मोहनला -

फिर वोही शाम, वोही गम, वोही तनहाई है 

दिल को समझाने तेरी याद चली आयी है

ची चाल सुचली. राजेंद्रकृष्णने सुंदर शब्द लिहून दिले आणि परत तलतप्रेमींना एक त्यांच्या आवडत्या तलतशैलीतलं गाणं भेटलं. 

पिळवटून टाकणारं पण व्यक्त न करता येणारं दु:ख किंवा प्रेमाची अस्फुट गोड भावना जी अर्धवट शब्दांत मांडली जाते किंवा जिथे शब्दच अपुरे पडतात, अशा दोनच भावनांना तलतच्या गाण्यात ठळक जागा मिळाली. इतर भावभावना त्यात व्यक्त होताना परिणाम साधत नाहीत. हेच त्याचं बलस्थानही असावं.

जेमतेम सव्वाचारशे चित्रपट गीतं, दोनशेच्या जवळपास गैरफिल्मी ग़ज़ला, गीतं आणि शंभराच्या आसपास आकाशवाणी आणि इतरत्र गायलेली गीतं इतकीच जायदाद तलत मागे ठेवून गेला. 

‘रूप की रानी चोरों का राजा’ (१९६२) मध्ये देखणा देवआनंद वहिदासाठी तलतच्या सुरात गातो- 

तुम तो दिल के तार छेड कर हो गये बेखबर

चांद के तले जलेंगे हम ए सनम रातभर

तुमको निंद आयेगी तुम तो सो ही जाओगे

किसका ले लिया है दिल ये भी भूल जाओगे

शैलेंद्रकडून शंकर जयकिशनने देवआनंदची प्रतिमा ओळखून हे खट्याळ शब्दांत लिहून घेतलं. तशी गोड चालही दिली, पण आज तलतच्या चाहत्यांना याच ओळी तलतसाठी आठवतात.

२४ फेब्रुवारी १९२४ ला जन्मलेला आणि ९ मे १९९८ ला या पृथ्वीवरून निघून गेलेला तलत नावाचा तारा त्याच्या चाहत्यांना सदैव स्मरणात राहील. 

 a.parbhanvi@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......