घड्याळाचे काटे उलटे फिरवून ‘रन लोला रन’ या चित्रपटाच्या कथेवरून हिंदी चित्रपट कसा करता येईल? तर ‘लूप लपेटा’सारखा!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
सुहास किर्लोस्कर
  • ‘रन लोला रन’ या जर्मन चित्रपटाचे आणि ‘लूप लपेटा’ या हिंदी चित्रपटाचे पोस्टर
  • Thu , 10 February 2022
  • कला-संस्कृती हिंदी सिनेमा रन लोला रन Run Lola Run टॉम टायकर Tom Tykwer लूप लपेटा Looop Lapeta आकाश भाटिया Aakash Bhatia तापसी पन्नू Taapsee Pannu ताहिर राज भसिन Tahir Raj Bhasin

टॉम टायकर दिग्दर्शित ‘रन लोला रन’ हा जर्मन चित्रपट (जर्मन नाव, ‘Lola Rennt’) १९९८ साली रिलीज झाला. त्याचे जगभरात नाव झाले, ते त्यामधील कल्पक व नाविन्यपूर्ण हाताळणीमुळे. नुकताच या चित्रपटाचा आकाश भाटिया दिग्दर्शित हिंदी रिमेक ‘लूप लपेटा’ नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. घड्याळाचे काटे मागे सरकवण्याची संकल्पना ‘रन लोला रन’ या चित्रपटामध्ये अभिनवरित्या आणि अतिशय प्रभावीपणे वापरली होती. त्यामुळे हा चित्रपट काय आहे, हे समजून घेण्यापूर्वी मूळ चित्रपट काय होता, हे माहीत करून घ्यायला हवे.

१२ वाजायला २० मिनिटे कमी असतात आणि २० मिनिटांत ‘लोला’वर एक अवघड कामगिरी करण्याची जबाबदारी येते- एक लाख मार्क (जर्मन चलन)ची तजवीज करून तिच्या प्रियकराच्या हाती सुपूर्त करायचे असतात, अन्यथा त्याच्या जीवावर बेतणार असते. लोला तत्परतेने विचार करते आणि कोणाकडून पैसे मिळवता येतील त्यांचे चेहरे तिच्या (आणि प्रेक्षकांच्या) नजरेसमोर येतात. ती पळत पळत बँकेत जाते, जिथे वडील अधिकारी पदावर आहेत, परंतु त्यांच्याबरोबर कोणीतरी स्त्री आहे, ती कोण आहे याचा विचार न करता ती प्रश्न सांगते, काही ‘जुगाड’ करून तिला पैसे मिळतात आणि ती पळते. पळता पळता काही अपघात घडल्यामुळे, बँकेत काही ‘उद्भवल्यामुळे’ लोला २० मिनिटांपेक्षा इच्छित स्थळी उशिरा पोहोचते आणि तिच्या लक्षात येते की, आपण आपल्या प्रियकराला गमावणार. त्याच वेळी तिला वाटते घड्याळाचे काटे उलटे फिरवून बँकेतून पैसे दुसऱ्या मार्गाने मिळवले तर? आपण पुन्हा मागे जातो.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

तर, १२ वाजायला २० मिनिटे कमी आहेत आणि घड्याळाचे काटे उलटे फिरवून ‘रन लोला रन’ चित्रपटाच्या कथेवरून वेगळा हिंदी चित्रपट कसा करता येईल? २० मिनिटांत ‘लोला’ला २० लाख रुपये गोळा करायचे आहेत असा चित्रपट काढता येईल, लोलाचे नाव बदलून हिंदी चित्रपटाला साजेसे असे नाव बदलून घेता येईल, २० मिनिटांचा वेळ वाढवून घेऊ, कारण प्रत्येक लूपमध्ये एक गाणे ‘टाकायचे’ असेल, तर पळण्यासाठी वेळ फारच कमी मिळेल.  अध्येमध्ये गाणी टाकणार असू तर अनधिकृत ‘रिमेक’ आहे, असा संशय कोणाला येईल का?

शिवाय लोलाचे प्रेम कसे जमले ते मूळ जर्मन चित्रपटात दाखवलेलेच नाही.  भारतीय प्रेक्षकांना ते समजेल का? त्याना समजले नाही तर ते चित्रपट बघणार नाहीत. आपला चित्रपट चालला नाही तर? त्यापेक्षा लोला आणि तिचा प्रियकर यांची प्रेमकथा मध्यंतरापूर्वी दाखवू आणि शेवटच्या अर्ध्या तासात नायिकेला पळवू.

यामुळे अधिकृत रिमेक करण्याची रॉयल्टी वगैरे द्यावी लागणार नाही. त्या वाचलेल्या पैशांत आपण दोन गाणी टाकू. लोला पळता पळता एकदा डान्स बारमध्ये जाते, असे दाखवले तर एखादे आयटेम साँगही टाकता येईल. पण घड्याळाचे काटे उलटे किती वेळा फिरवायचे? तसे फिरवले तर लोकांना हल्ली लगेच समजते आणि ते मूळ चित्रपटाशी तुलना करतील. त्यापेक्षा रिमेक करू.

तर, १२ वाजायला २० मिनिटे कमी आहेत आणि घड्याळाचे काटे उलटे फिरवून ‘रन लोला रन’ चित्रपटाचा रिमेक करताना हरिदासाची कथा पुन्हा मूळ पदावर येते. त्यामुळे त्याला ‘लूप लपेटा’ असे नाव देऊ. हिंदी चित्रपट असल्यामुळे ‘रन लोला रन’सारखा ८० मिनिटांत संपवण्याऐवजी सव्वा दोन तासाचा करू. २० मिनिटांऐवजी ४० किंवा ५० मिनिटे आहेत, असे दाखवू आणि  ‘लोला’ला ५० लाख रुपयांची तजवीज करायची आहे, असे दाखवू. भारतातल्या प्रेक्षकांना अक्कल जरा कमीच आहे, त्यामुळे त्यांना सगळे झटपट घडलेले झेपणार नाही.

८० मिनिटांच्या मूळ चित्रपटात जरा मसाला टाकू, पाणी वाढवू. भारतीय प्रेक्षक चार घटका करमणूक करवून घेण्यासाठी चित्रपट बघतो, त्यांना डोके वापरण्याची सवय नसते. उगाच त्यांना पूर्णवेळ टेन्शन कशाला द्यायचे? दोन-चार विनोदी पात्रे वाढवल्यास प्रेक्षकांना तेवढाच रिलीफ. अलीकडेच पळण्याचा रोल तापसी पन्नूने उत्तम केला आहे. त्यामुळे तिलाच ‘कास्ट’ करू. तिच्या प्रियकराची भूमिका ताहीर राज भसीन करू शकेल.

‘रन लोला रन’मध्ये काही पात्रांचे फोटो दाखवले आहेत, काही पात्रांना दोन तीन मिनिटांचेच फुटेज आहे. भारतीयीकरण करताना त्यांच्या भूमिकांची लांबी वाढवू. रिमेक असला म्हणून काय झाले, आपली काहीतरी हुशारी दाखवायलाच हवी. मूळ जर्मन दिग्दर्शकाला जे जमलेले नाही, ते आपण हिंदीत करून दाखवू. मूळ चित्रपट सुरू होताच १०व्या मिनिटाला लोला पळायला सुरुवात करते. पात्रपरिचय करून न देता इतक्या लगेच विषयाला हात घालून कसे चालेल? आपण जरा निवांत अर्धा तास वेळ घेऊन सर्वांची प्रेक्षकाना ओळख करून देऊ, ते प्रियकर-प्रेयसी आहेत हे दाखवायचे असेल तर त्यांची पूर्वी भेट कशी झाली, हे प्रेक्षकांना समजायलाच हवे. ती जीव द्यायला जाते, तो तिला वाचवतो असे दाखवू. त्यांचे ‘पहेला पहेला प्यार’ असे काहीतरी गाणे टाकू, त्या गाण्यामधेच चुंबन, बेड सिन्स दाखवू. एकदा तिने धावायला सुरुवात केली की, असे काही आपल्याला दाखवता येणार नाही.

जर्मन चित्रपटातले पहिले ‘लूप’ ३०व्या मिनिटाला संपते आणि लोला लगेच दुसऱ्या पद्धतीने पळण्याचा विचार करण्यास सुरुवात करते. इतका वेग आपल्या प्रेक्षकाना सहन होणार नाही.  पहिली कथा एक तासभर चालवू आणि त्यानंतर दुसऱ्या ‘लूप’ला सावकाश सुरुवात करू.  

तर, १२ वाजायला २० मिनिटे कमी आहेत आणि घड्याळाचे काटे उलटे फिरवून घडलेली घटना पुन्हा घडवून, त्यात नवी काही घडवण्याचा प्रयत्न करणे, हा अनेक चित्रपटकर्त्यांचा आवडता विषय आहे. ‘Groundhog Day’, ‘Source Code’ अशा काही चित्रपटांमध्ये ही संकल्पना फार उत्कृष्टरीत्या मांडली आहे. ख्रिस्तोफर नोलानचा हा आवडता विषय, परंतु ‘टेनेट’मध्ये त्याचा अतिरेक झाला होता.

भारतीय चित्रपटामध्ये हा विषय अजूनही प्रभावीपणे मांडलेला नाही, कारण आपले प्रेक्षक हुशार नाहीत असा अनेक निर्माता-दिग्दर्शकांचा गैरसमज आहे. २०२१ मध्ये रिलीज झालेल्या ‘मानाडू’ या तमिळ चित्रपटात ही संकल्पना उत्तमरीत्या वापरली आहे.    

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

‘लूप लपेटा’ चित्रपट पूर्णपणे बघू शकण्याचे श्रेय तापसी पन्नू व ताहीर राज भसीनच्या अभिनयाचे, यश खन्ना यांच्या अप्रतिम सिनेमटोग्राफीचे आहे. चित्रपटाच्या अनोख्या थीममुळे भडक रंगांच्या पार्श्वभूमीवर ‘हटके’ कॅमेरा अँगल  वापरण्याचे मिळालेले स्वातंत्र्य यश खन्ना यांनी सत्कारणी लावले आहे. संतोष विश्वकर्मा यांचे कला दिग्दर्शन अनोख्या संकल्पनेला साजेसे आहे. मूळ जर्मन चित्रपटाच्या पटकथेमध्ये आकाश भाटीया, विनय चवाल, अर्णव नंदुरी, केतन पेडगावकर आणि पुनीत चढ्ढा यांनी अनेक पात्रे घुसवली आहेत, मूळ कथेला अनेक उपकथानके जोडली आहेत, ज्यामुळे रसभंग होतो आणि चित्रपट मूळ कथानकापासून दूर पळतो. थ्रिलर कम कॉमेडी कम टाईम ट्रॅव्हल असा सर्वगुणसंपन्न चित्रपट करण्याच्या नादात एक ना धड भाराभर चिंध्या हाती येतात.

‘रन लोला रन’मध्ये नायिका त्याच वाटेने पळताना दाखवताना कॅमेरा अँगल कसे बदलले आहेत, संकलन कसे उच्च दर्जाचे केले आहे, अॅनिमेशन वापर केव्हा आणि कोणत्या उद्देशाने केला आहे, हे वारंवार बघण्यासारखे आहे. त्यामुळे दर्जेदार आणि नावीन्यपूर्ण काही बघण्याची इच्छा असेल आणि तुमच्यात घड्याळाचे काटे उलटे फिरवण्याची क्षमता नसेल, तर मूळ जर्मन चित्रपट पुनःपुन्हा बघणे केव्हाही श्रेयस्कर.

.................................................................................................................................................................

लेखक सुहास किर्लोस्कर सिनेअभ्यासक आहेत.

suhass.kirloskar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......