‘द क्वीन’स गॅम्बिट’ : एका बुद्धीबळपटूच्या थरारक आयुष्याचा मागोवा
कला-संस्कृती - चलत्-चित्र
सुहास किर्लोस्कर
  • ‘द क्वीन’स गॅम्बिट’चे एक पोस्टर व त्यातील एक प्रसंग
  • Sat , 02 January 2021
  • कला-संस्कृती चलत्-चित्र द क्वीन’स गॅम्बिट The Queen's Gambit नेटफ्लिक्स Netflix

बेथ हार्मन ही एक ‘चाईल्ड प्रॉडीजी’ म्हणजेच असामान्य बुद्धीची मुलगी होती. नऊ वर्षाच्या बेथच्या आईचे निधन एका कार अपघातामध्ये झाल्यानंतर तिची रवानगी एका अनाथाश्रमात झाली. तिथल्या शाळेत शिक्षण घेताना तिने तळमजल्यावर एक गृहस्थाला पटावर काही सोंगट्या मांडून एकट्याने कोणतातरी खेळ खेळताना बघितले. बेथने त्या अबोल गृहस्थाशी परिचय करून घेतला आणि तो खेळ शिकवण्याची गळ घातली. तळमजल्यावर एकटाच बुद्धीबळ खेळणारा इमारतीचा राखणदार शेबेल याने बेथला बुद्धीबळ शिकवण्याचे मान्य केले आणि त्याच्या लक्षात आले की, तिची आकलनशक्ती अफाट आहे. 

पुढे काय खेळायचे हे तिच्या डोळ्यासमोर उभे रहायचे. शाळेत शिक्षक काय शिकवतात याकडे लक्ष न देता ती शेवटच्या बाकावर बसून बुद्धीबळ या विषयावर असलेली पुस्तके वाचायची. सगळ्यांच्या नजरा चुकवून बेथ तळमजल्यावर तासनतास हा खेळ खेळायची, नवे नियम शिकायची. अशातच एक दिवस तिला एका दाम्पत्याने दत्तक घेतले. तिथे घराची जागा मोठी असली तरी बुद्धीबळ नव्हते. पट–सोंगट्या विकत घेण्यासाठी तिला झगडावे लागले. बेथ हार्मन बुद्धीने तल्लख असूनही तिला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अनेक संकटांचा सामना करावा लागला. काही संकटे तिने ओढवून घेतली तर काही तिच्या वाट्याला आपसूकच आली. पैसे मिळवण्याच्या आमिषाने ती स्पर्धेत भाग घेऊ लागली आणि हळूहळू तिला स्पर्धा जिंकण्याची सवय होऊ लागली. 

एक स्त्री बुद्धीबळपटू आहे आणि ती भल्या भल्या पुरुष स्पर्धकाना नामोहरम करत आहे, याला चांगल्या आणि वाईट दोन्ही बाजू होत्या. त्याचा सामना करता करता तिचे सामने जगज्जेत्या बुद्धीबळपटूबरोबर होण्यास सुरुवात झाली. असा हा एका बुद्धीबळामधील राणीचा जुगार ती कसा खेळली, त्या पटावरील आणि पटाबाहेरील सामन्यांची कथा म्हणजे  ‘द क्वीन’स गॅम्बिट’.

नेटफ्लिक्सवर अलीकडेच रिलीज झालेली ही सात भागांची वेबसिरीज अनेक कारणांसाठी बघण्यासारखी आहे. कथेचा ऐवज जेवढा आहे, तेवढेच भाग ‘पाणी न वाढवता’ दाखवणे, हे अलीकडे दुर्मीळ होत असलेले वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

वॉल्टर टेव्हीस यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित स्कॉट फ्रँक, अलन स्कॉट यांनी लिहिलेली बांधीव पटकथा तुम्हाला या खेळातील बारकावे माहीत नसले तरीही बांधून ठेवते. प्रत्येक पात्राच्या स्वभावाप्रमाणे लिहिलेले संवाद हे आणखी एक वैशिष्ट्य नजरेआड करून चालणार नाही.

वेबसिरीज बेथ हिने केलेल्या चालीवर नसून तिच्या मानसिकतेचा घेतलेला मागोवा आहे. अर्थात या कथेमध्ये दाखवल्याप्रमाणे १९५०-६०च्या दशकामध्ये अशी कोणतीही स्त्री बुद्धीबळपटू अस्तित्वात नव्हती कारण १९८०पर्यंत स्त्रियांना जागतिक बुद्धीबळ सामन्यात खेळण्याची परवानगी नव्हती.

ही विलक्षण कथा ‘बायोपिक’ नसली तरी वेगवेगळ्या बुद्धीबळपटूच्या आयुष्यातील अनेक प्रसंगाच्या मालिकांची गुंफण आहे. कादंबरीकार वाल्टर टेव्हीस स्वतः उत्तम बुद्धीबळपटू असल्यामुळे त्याने लिहिलेल्या बेथ हार्मनच्या कथेत आपल्याला बॉबी फिशर, बोरिस स्पास्की, अॅन्टोली कारपॉव अशा अनेक उत्तमोत्तम ग्रँडमास्टर्सच्या आयुष्यातील प्रसंग सापडतात. 

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

त्या काळात बुद्धीबळावर रशियाचे राज्य होते आणि ‘शीत युद्धा’मधील वर्चस्व टिकवण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न करण्यात आले, त्याचे धागेदोरे आपल्याला या वेबसिरीजमध्ये बघता येतात. स्कॉट फ्रँक यांनी दिग्दर्शन करताना विषयाशी इमान राखले आहे, अन्यथा बेथच्या आयुष्यात काय संकटे आली याबद्दल सांगता सांगता बुद्धीबळ बाजूला राहिले असते, तसे होऊ दिले नाही. अर्थात यात मायकेल टेसोरो यांच्या संकलनाचा वाटाही आहेच.

अन्या टेलर-जॉय या अभिनेत्रीने बेथची भूमिका कमालीच्या कौशल्याने केली आहे. अनेक वेळा तिने जाणूनबुजून चेहरा निर्विकार ठेवला आहे. बेथ हार्मन आपल्या भावभावनाचे जाहीर प्रदर्शन करण्यावर विश्वास न ठेवणारी होती. त्यामुळे अनेक कठीण प्रसंगात ती प्रयत्नपूर्वक चेहरा कोरा ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसते. त्याच वेळी समोरच्या खेळाडूच्या चेहऱ्यावरील हावभाव वाचताना दिसते. इस्ला जॉनस्टनने शाळेतील बेथची भूमिका तितक्याच समरसतेने केली आहे.  खरे तर एकामागोमाग एक भाग बघताना लहान बेथ मोठी कधी झाले हेच आपल्याला जाणवत नाही. अमेरिकन खेळाडू असो वा रशियन, बेथला दत्तक घेणारे पालक असो वा शिक्षक, या सात भागात आपण अनेक पात्रे बघतो, ती लक्षात राहतात त्या कलाकारांच्या नैसर्गिक अभिनयामुळे.  

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

स्टीव्हन मेझलर यांचा कॅमेरा कसा फिरतो ते आवर्जून बघण्यासारखे आहे.

शेवटच्या सामन्याच्या वेळी आपण सामने आयोजित केलेली जागा बघतो, ती बेथच्या नजरेमधून... आणि त्याचे कारण आपल्याला थोड्याच वेळात समजते. कार्लोस राफेल रायव्हेरा यांचे पार्श्वसंगीत संस्मरणीय आहे. 

मूळ कादंबरीमधील खेळाच्या तपशीलातील अचूकता येण्यासाठी चित्रपट पटकथाकार-दिग्दर्शकाने प्रख्यात ग्रँडमास्टर्सचा सल्ला घेतल्याचे सांगण्यात आले, त्याचे प्रत्यंतर वेबसिरीज बघताना वारंवार येते. वेशभूषेपासून खेळातील बारकावे टिपण्यात अचूकतेचा ध्यास घेणारी अशी वेबसिरीज अनुभवल्यानंतर आपल्याला जाणवते की आपण इतक्या तपशिलात जाऊन अभ्यासपूर्वक काम करण्यात किती मागे आहोत आणि केवढा मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे.      

..................................................................................................................................................................

लेखक सुहास किर्लोस्कर सिनेअभ्यासक आहेत.

suhass.kirloskar@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......