‘अंग्रेजी मीडियम’ : मोठ्या स्टारकास्टच्या बडेजावाखाली दडलेले विस्कळीत कथानक आणि आक्षेपार्ह विनोद! 
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘अंग्रेजी मीडियम’चं पोस्टर
  • Sat , 14 March 2020
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie अंग्रेजी मीडियम Angrezi Medium करिना कपूर Kareena Kapoor इरफान खान Irrfan Khan दीपक डोब्रियाल Deepak Dobriyal पंकज त्रिपाठी Pankaj Tripathi

‘हिंदी मीडियम’ (२०१७) हा साकेत चौधरी दिग्दर्शित चित्रपट भारतातील शिक्षणव्यवस्था आणि वर्गव्यवस्था या दोन्हींबाबत काहीएक मतं मांडत असताना एक रंजक चित्रपट म्हणून काम करतो. याचं कारण म्हणजे केवळ काही उथळ विनोद करणं हा त्याचा उद्देश नव्हता. त्यात एक उत्कट भावनिक आवाहन होतं, एका मनापासून बनवलेल्या कलाकृतीतून निर्माण झालेले आनंददायक क्षण होते. याउलट या चित्रपटाचा स्पिन-ऑफ सीक्वेल असलेल्या ‘अंग्रेजी मीडियम’मध्ये पहिल्या चित्रपटात असलेले अभिनेते आणि काही समान मुद्दे असले तरी तिथला सहजभाव इथे नाही. इथलं कथानक आणि विनोद या दोन्ही घटकांत काहीशी बनावट, कृत्रिमता आहे. हे कमी म्हणून की काय, पण वंशद्वेषाकडे झुकणारा विनोदही इथे अस्तित्वात आहे. 

तारिका (राधिका मदन) या राजस्थानमध्ये राहणाऱ्या मुलीला लहानपणापासूनच परदेशाचं आकर्षण राहिलेलं आहे. एकल पालकत्वाची जबाबदारी उचललेल्या चंपक (इरफान) या तिच्या पित्याने लहानपणी कधीतरी तिच्या या इच्छेला ‘तुम्हारे बडे होने के बाद चले जायेंगे’ असं म्हटलेलं असलं तरी ती हे विसरणार नाही, हे तेव्हा त्याच्या लक्षात आलं नव्हतं. त्यामुळे आता ती उच्चशिक्षणासाठी इंग्लंडला जाण्याबाबत बोलून दाखवते, तेव्हा आपलं प्रेम आणि काळजीपोटी असं घडू नये, अशीच त्याची इच्छा असते. इथवर सगळं लक्षात घेण्यालायक आहे. काहीशी विचित्र का असेनात, पण पात्रं प्रेमळ आहेत. मात्र, त्यांच्या अर्धपरिपक्व आणि उथळ समस्या तितक्याच विस्कळीत रूपात समोर दिसू लागतात. 

एकतर समस्यांचं अतिसुलभीकरण तरी केलं जातं किंवा मग त्या सोडवत असताना अतिविचित्र मार्गांचं अवलंबन तरी केलं जातं. आता हे काही प्रमाणात ‘हिंदी मीडियम’मध्येही घडलं असलं तरी इथला प्रकार त्याच्या एक पाऊल पुढे जाणारा आहे. राजस्थानमध्ये घडणाऱ्या, आहे त्याहून अधिक लांबलचक आणि कंटाळवाण्या भासणाऱ्या पूर्वार्धानंतर उत्तरार्धामध्ये बऱ्याच अतर्क्य घडामोडी घडत जातात. बेकायदेशीर मार्गांनी इंग्लंडमध्ये जाणे, तिथे पोलिसांपासून पळ काढत सर्वत्र फिरणे, अशा बऱ्याचशा कृती इथली पात्रं करतात. ज्या तार्किक पातळीवर अर्थपूर्ण ठरत नाहीत. सामान्यीकरण करण्याचा धोका पत्करत म्हणायचं झाल्यास, हिंदी चित्रपट ज्या भावनिकतेच्या जोरावर प्रेक्षकांकडून तर्क बाजूला ठेवण्याची अपेक्षा ठेवतात, तशा भावनांचाही इथे अभाव आहे. कारण, प्रत्येक दृश्यात शाब्दिक, प्रासंगिक विनोद यायलाच हवेत, असा चित्रपटकर्त्यांचा दृष्टीकोन आहे. 

‘अंग्रेजी मीडियम’मध्ये काही मोजकेच, पण सुरेख क्षण आहेत. बाप-लेकीतील नात्यावर लक्ष केंद्रित करणारी, कला दिग्दर्शनातून समोरील पात्रं, त्यांच्या महत्त्वाकांक्षा, भावभावना याबाबत अधिक काही सांगू पाहणारी दृश्यं आहेत. उदाहरणार्थ, तारिकाच्या बेडरूममध्ये तिच्या परदेशप्रेमाचं नि आकर्षणाचं प्रतिनिधित्व करणारी भरपूर पोस्टर्स, चित्रं आणि इतरही वस्तू आहेत. ब्रुनो मार्सचं पोस्टर आहे, ‘आय लव्ह न्यू यॉर्क’ लिहिलेला कॉफी मग आहे आणि अगदी ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ची प्रतिकृतीदेखील आहे. पण, हे सगळं अगदी क्वचित घडणारं, प्रभावीपणे जाणवणारं आहे.

इतर वेळी चित्रपट भडक मांडणी असणाऱ्या (तथाकथित) विनोदी दृश्यांवर पात्रं आणि कथानकाहून अधिक लक्ष केंद्रित करणारा आहे. चित्रपटातील पात्रं राजस्थानमधून इंग्लंडमध्ये जातात, दर दृश्यागणिक इथली परिस्थिती तीव्रपणे बदलत जाते. कलात्मक सफाईदारपणा आणि कौशल्यं दिसणारी दृश्यंदेखील तुलनेने कमीच आहेत. चित्रपटातील संकल्पनात्मक, कथात्म बाबींवर लक्ष केंद्रित करणाऱ्या दृश्यांपेक्षा रटाळ उपकथानकांवर अधिक भर दिलेला आहे. 

एका दृश्यात पडद्यावर बराच गोंधळ सुरू असताना ‘अंग्रेजी मीडियम’मधील एक पात्र म्हणतं, “आखिर ये चल क्या रहा हैं?” चित्रपट अर्धाअधिक उरकायच्या आधीपासूनच ही भावना पाहणाऱ्याच्या मनात निर्माण होईल, याची व्यवस्था दिग्दर्शक होमी अडजानिया आणि इथले चार लेखक घेतात. याचं मुख्य कारण अर्धपरिपक्व कथानक आणि  विस्कळीत (तथाकथित) विनोद यांत दडलेलं आहे. 

भारतीय चित्रपट आणि वंशद्वेष या दोन्हींचं तसं गहिरं नातं आहे. इथे दर दुसरा चित्रपट या ना त्या प्रकारे विनोदाच्या नावाखाली एखादं लिंग, एखादा वंश अशा या ना त्या सामाजिक घटकाबाबत आक्षेपार्ह विधान करत असतो. ‘हॅपी फिर भाग जाएगी’पासून ते ‘हाऊसफुल ४’पर्यंत उदाहरणं द्यावी तितकी कमी आहेत. ‘अंग्रेजी मीडियम’मध्येही अशा टिप्पण्या होतात. त्यातही पुन्हा पंकज त्रिपाठीचं पात्र जरा अधिकच उथळ आहे. 

इरफान खान, दीपक डोब्रियाल यांच्या कामगिरीबाबत बोलणं म्हणजे केवळ त्यांचं कौतुक करणं इतपत सहजता आणि कौशल्य एव्हाना त्यांच्या कामगिरीत दिसून येते. त्यामुळे इथले स्वीकारार्ह विनोद समोर आणत असतानादेखील ते त्यात एक प्रकारच्या उत्स्फूर्ततेचा भाव आणतात. कदाचित त्यामुळेच अडीच तासांचा हा लांबलेला चित्रपट जरासा रंजक ठरतो.

इरफान-डोब्रियाल यांच्यासोबतच राधिका मदन, इरफान आणि डोब्रियाल यांच्यातील दृश्यांमध्ये चांगली केमिस्ट्री दिसते. बाकी डिंपल कपाडिया, करिना कपूर, रणवीर शौरीपासून ते तिलोत्तमा शोम, मनुरिशी चढ्ढापर्यंत भरपूर कुवतीचे अभिनेते इथे केवळ हजेरी लावून जातात. पण मुळात प्रमुख भूमिकेतील अभिनेते आणि हे इतर अभिनेते असं कुणाच्याच कौशल्याला, कुवतीला न्याय देऊ शकेल असं लिखाण नाही. अनिल मेहतांच्या छायाचित्रणाबाबतही फार काही बोलता येईल अशी परिस्थिती नाही. 

हेच एकूण ‘अंग्रेजी मीडियम’ला लागू पडेल. तो इतर बऱ्याच सीक्वेल्सप्रमाणे निर्मात्यांना आधीच्या चित्रपटाच्या नावावर आर्थिक यश मिळवायचं असल्याने केवळ अस्तित्वात असायचं म्हणून आहे. 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार  चित्रपट अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......