बेबी नंदा : माझ्या मनातली आदर्श प्रेयसी
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
आदित्य कोरडे
  • बेबी नंदा
  • Sat , 07 January 2017
  • हिंदी सिनेमा Hindi Cinema बेबी नंदा Baby Nanda मास्टर विनायक Master Vinayak व्ही. शांताराम V. Shantaram देव आनंद Dev Anand मनोजकुमार Manoj Kumar

ओळखलात का हा फोटो? ही आहे बेबी नंदा. हे नाव ऐकल्यावर कदाचित काही जुन्या माणसांचे डोळे स्मृतीच्या कवडशांनी चमकू लागतील. बाकीच्यांना ती नंदा म्हणून माहीत असेलच. मास्टर विनायक या मराठीतल्या अत्यंत नावाजलेल्या अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्मात्याची ती मुलगी. त्यांच्याच अनेक चित्रपटांत ती बाल कलाकार म्हणून चमकल्यामुळे त्या काळी ती बेबी नंदा या नावानेच प्रसिद्ध झाली. माझे आई-बाबा नेहमी तिला ‘बेबी नंदा’ म्हणत. त्यामुळे मलासुद्धा तिच सवय लागली. इतकी की, कुणी नंदा म्हटलं तर तो नक्की कुणाबद्दल बोलतो आहे, याचा मला संभ्रम पडे. (तीच गोष्ट बेबी शकुंतलाची. खरं तर ही अत्यंत सौंदर्यवती मराठी अभिनेत्री, पण तिने लवकर लग्न करून चित्रपटसंन्यास घेतला. ती बहुधा तिच्या काळातील सर्वांत सुंदर अभिनेत्री होती. ‘रामशास्त्री’मधली तिची लहानपणच्या रामशास्त्र्याच्या बायकोची भूमिका आणि ‘दोन घडीचा डाव’ हे गीत इतकं गाजलं की, नंतर तिचा उल्लेख कायम ‘बेबी शकुंतला’ असाच होत राहिला!)

मास्टर विनायक आणि त्यांची हंस पिक्चर्स (आधीची ‘नवयुग पिक्चर्स’) ही त्यांच्या काळातली अत्यंत नावाजलेली नावं. ‘ब्रह्मचारी’, ‘डॉ.कोटणीसांची अमर कहाणी’, ‘माया मच्छिंद्र’ असे अनेक गाजलेले चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. ते दीनानाथ मंगेशकरांचे स्नेही होते. दीनानाथांच्या मृत्यूनंतर त्यांनी आर्थिक संकटात सापडलेल्या मंगेशकर कुटुंबाला साह्य केलं आणि १३ वर्षांच्या लताला सुरुवातीच्या काळात जम बसवायला मदत केली. त्यांच्याकडेच लतानं ‘पहिली मंगळागौर’ या चित्रपटात काम केलं होतं. याच चित्रपटात बेबी नंदानं लताच्या लहान बहिणीची भूमिका केली आहे. लताचं पहिलंवहिलं चित्रपटगीत ‘नटली चैत्राची नवलाई’ याच सिनेमातलं. ते बऱ्यापैकी गाजलंही, पण १३ वर्षांच्या लताचा आवाज अजून खूपच कोवळा होता आणि त्याला ‘लतापण’ यायला अजून बराच वेळ व तयारी हवी होती. असो.

तर मराठी मास्तर विनायकांनंतर त्यांच्या या मुलीनं अखिल भारतीय कीर्ती मिळवली. तिच्या काळात नर्गिस, मधुबाला, मीनाकुमारी, नूतन अशा एकापेक्षा एक सुंदर आणि अभिनयकुशल अभिनेत्रींची चलती होती, पण त्यातसुद्धा तिने स्वत:चं अस्तित्व टिकवून ठेवलं. एव्हढंच नाही तर तिची कारकीर्दही खूप मोठी (१९४८ ते १९८३) आणि नि:संशय यशस्वी होती. १९४८ ते १९५६ या काळात तिने बालभूमिका केल्या. त्यासुद्धा मराठीतून. १९५६ साली तिचे मामा, ख्यातनाम अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते व्ही. शांताराम यांनी तिला ‘तुफान और दिया’ या हिंदी सिनेमात संधी दिली. आई वारल्यानंतर अनाथ झालेल्या भावा-बहिणींची ही कहाणी. त्यातली तिची लहान, अश्राप, परिस्थितीशी झगडणाऱ्या भावावर खूप प्रेम करणाऱ्या लहान बहिणीची चटका लावणारी भूमिका हृदयस्पर्शी होती. आजही हा चित्रपट तिच्यासाठी आणि गाजलेल्या गाण्यांसाठीच ओळखला जातो. तिला या पहिल्याच मोठ्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचं फिल्मफेअर पारितोषिकही मिळालं. त्यानंतर आलेल्या ‘भाभी’, ‘ काला बाजार’, छोटी बहन’ या चित्रपटांमध्ये परत तिने लहान बहिणीच्याच भूमिका केल्या. हे सगळे चित्रपट खूप म्हणजे खूपच चालले. नुसते चालले नाही तर त्यातील नंदाच्या भूमिकाही तुफान गाजल्या. काल-परवा आलेली नंदा बलराज सहानी, रेहमान, देवानंद अशा मातब्बर नायकमंडळींसमोर उभी राहायला कचरत तर नव्हतीच, उलट ही कोल्हापूरची पोरगी त्यांच्यापुढे चांगली शड्डू ठोकून उभी राहत होती. कधी कधी त्यांना धोबीपछाडही घालत होती. (‘तुफान और दिया’मधला राजेंद्र कुमार म्हणजे तिच्या पुढे पालापाचोळा होता. तसा तो कुणापुढेही पालापाचोळाच! पण ते असो!) आता ती कायम लहान बहिणीच्याच भूमिकाच करणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. यातून बाहेर पडणं सोपं नव्हतं.

१९६० साली आलेल्या ‘कानून’मध्ये तिने राजेन्द्रकुमारच्या प्रेयसी कम वाग्दत्तवधूचं काम मस्त केलं होतं. दिसलीही छान होती, पण छोट्या बहिणीच्या प्रतिमेचा पगडा अजून इतका होता की, तिची फारशी दखल घेतली गेली नाही. ‘कानून’ खूप चालला, पण तो नाना पळशीकर, ओमप्रकाश, अशोककुमार यांचा अभिनय, कथेचं वेगळेपण, एकही गाणं नसणं अशा अभिनव गोष्टी आणि दिग्दर्शनामुळे. अशात १९६१ साली आलेल्या ‘हम दोनो’मध्ये तिने देवानंदच्या बायकोची भूमिका केली. यात साधना जरी नायिका असली तरी नंदाची भूमिका अगदीच दुय्यम नव्हती आणि मुख्य म्हणजे ती बहीण नव्हती. आता ती अत्यंत सुंदर, मोहक दिसू लागली होती. लहान बहिणीचं निष्पाप कोवळेपण हळूहळू लोप पावत चाललं होतं, पण ती कधीही मादक, उत्तान भासली नाही. नूतन, साधना, नंदा आणि हॉलीवुडची ऑड्री हेपबर्न या अशा नायिका कधीही मादक, उत्तान भासल्या नाहीत. म्हणूनच कि काय त्या लोकांच्या मनात आजही घर करून आहेत.

१९५९ साली आलेल्या ‘बरखा’ या सिनेमातलं ‘एक रात में दो दो चाँद खिले’ या मुकेश आणि लताने गायलेल्या, राजेंद्रकृष्णाने लिहिलेल्या आणि चित्रगुप्तने संगीत दिलेल्या गाण्यात ती अशी दिसली की, त्या काळी प्रत्येकाला आपली प्रेयसी किंवा बायको असावी तर अशीच असावी असं नक्की वाटलं असणार. हे गीत श्रवणीय तर आहेच, पण प्रेक्षणीयही आहे. त्यातले तिचे विभ्रम, संकोच, लज्जा केवळ अप्रतिम!

या गाण्यात नायक अनंत कुमार म्हणजे राम मराठे यांचा भाऊ अनंत मराठे, तिच्या डोक्यावरचा पदर नीट करताना (काढताना नाही) किंचित ढळतो, तेव्हा ती ज्या निगुतीने तो सावरून घेते, ते अफलातून आहे.

१९६५ साली आलेला ‘तीन देवीया’ हा तिचा आणि देवानंदचा तिसरा सिनेमा. यात ती खूपच लोभस आणि सुंदर दिसली आहे. किंबहुना त्यामुळेच मला खूप टेन्शन आलं होतं की, देव आनंद तिला सोडून त्या सामान्य सिमी किंवा कल्पनाशी (खरे तर सिमी गरेवालचा उल्लेख करताना सिम्मी निम्मी असं म्हणावंसं वाटतं, पण निम्मी या चित्रपटात नव्हती आणि ती खूप चांगली नायिका होती. वाक्यात पंच यावा म्हणून असा अन्याय करणं बरं नव्हे!) तर लग्न करणार नाही ना? पण देव आनंदने निराशा केली नाही. (म्हणूनच तर तो देव आनंद आहे!) या पिक्चरमधली त्यांची पुढील दोन गाणी बघण्यासारखी आहेत-

आजदेखील ही गाणी पाहताना मनात कालवाकालव होते.

१९६५ साली आलेल्या ‘जब जब फुल खिले’पासून तिची शशी कपूरबरोबर जोडी जमली. त्याआधीही त्यांचे दोन चित्रपट ‘चार दिवारी’ (१९६१) आणि ‘मेहेंदी लगी मेरे हाथ’ (१९६२) आले होते, पण ते चालले नाहीत. ‘जब जब फूल खिले’ने इतिहास घडवला. त्यातले ‘ ये समा..समा है ये प्यार का’ हे गीत इतकं गाजलं कि, आजही नंदा म्हटल्यावर अनेकांच्या हेच गाणं डोळ्यासमोर येतं. याच वर्षी आलेला मनोजकुमारबरोबरचा ‘गुमनाम’ चालला खरं, पण कौतुक मात्र हेलन व मेहमूदचं जास्त झालं.

नंदाने जितेंद्र, राजेश खन्ना यांच्याबरोबरही काम केलं आणि त्यांच्याबरोबरचे जवळ जवळ सगळे सिनेमे गाजले. ‘इत्तेफाक’मधली तिची भूमिका निगेटिव्ह टच दाखवून गेली, तर १९७० साली आलेल्या ‘नया नशा’मध्ये तिने अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या स्त्रीची शोकात्म भूमिका उत्तम केली होती, पण चित्रपट फार चालला नाही. बहुधा तिच्या प्रतिमेला ती भूमिका शोभली नसावी. (मला तसं वाटत नाही, पण लोकांना तसं वाटलं असणार, नाहीतर सिनेमा खूप चांगला होता. आज सलमान खानचे तद्दन भिकार पिक्चर चालतात आणि असे चांगले चालत नाहीत...लोकांची अभिरुची दुसरं काय!)

१९७० ते १९७४ हा हळूहळू तिचा प्रभाव आणि सौंदर्य उतरत चाललेला काळ होता. ‘शोर’ (पुन्हा मनोजकुमार. हाय रे कर्म!) ‘जोरू का गुलाम’ (राजेश खन्ना ) यांचं यश फसवं होतं आणि हे तिलाही कळत होतं. म्हणून तिने नंतर काम करणं जवळ जवळ बंदच केलं.

१९८२ साली ‘प्रेमरोग’मध्ये कुलभूषण खरबंदाच्या पत्नीची आणि अकाली विधवा झालेल्या पद्मिनी कोल्हापुरेच्या आईची तिने केलेली भूमिका लक्षणीय होती. पोरीच्या काळजीने जीव तुटणाऱ्या आईची तडफड तिने फार उत्तम दाखवली होती.

तिनं कधीही लग्न केलं नाही. तशा प्रिया राजवंश, आशा पारेख, परवीन बॉबी याही अविवाहित राहिल्या, पण नंदाबद्दल कधीही, कुठेही, कसल्याही वावड्या उठल्या नाहीत. तिचं नाव कधी कुणाशी जोडलं गेलं नाही. सिनेजगतात हा एक अपवादात्मकच प्रकार आहे. नंदा, साधना, आशा पारेख, बबिता आणि सायराबानू या जिवलग मैत्रिणी. १९९२ मध्ये त्यांनी तिला मनमोहन देसाईशी लग्न करण्याची गळ घातली होती. ती तयारही झाली होती म्हणे, पण देसाईने घराच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली (की तो अपघात होता कोण जाणे!). पुढे तिनं लग्नच केलं नाही. दोन वर्षांपूर्वी २५ मार्च २०१४ ला ती वारली आणि हिंदी चित्रपटसृष्टीतलं खरंखुरं शालीन, सोज्वळ सौंदर्य लोप पावलं.

असं म्हणतात की, प्रत्येक मुलीच्या मनात स्वप्नाचा एक राजकुमार असतो, तसंच मुलाच्याही मनात एक आदर्श प्रेयसीची प्रतिमा असते. खरं खोटं माहीत नाही. माझ्या मनातली आदर्श प्रेयसी कधी नंदा तर कधी साधनाचं रूप घेऊन येते. (बायको, हे वाक्य फार मनावर घेऊ नको. लेखाचा शेवट जरा बरा व्हावा म्हणून लिहिलेलं आहे. अन्यथा तूच माझ्या स्वप्नांची राजकुमारी... नंदा शप्पथ सॉरी, आईशप्पथ!)

 

लेखक टाटा मोटर्स, पुणे इथं डिझाईन इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.

aditya.korde@gmail.com

Post Comment

ADITYA KORDE

Sun , 08 January 2017

Thanks mukund...


Mukund Dhake

Sat , 07 January 2017

Very Well Written आदित्य ...... Good Job done....


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......