शास्त्रीय संगीतातलं काहीच कळत नसताना मी एका प्रतिभावंत गायकाचा ‘आतला’ स्वर ऐकला होता!
कला-संस्कृती - सतार ते रॉक
राम कोल्हटकर
  • कुमार गंधर्व यांच्या गातानाच्या विविध भावमुद्रा
  • Tue , 29 October 2019
  • दिवाळी २०१९ Diwali 2019 कुमार गंधर्व Kumar Gandharva गोपाळ नीळकंठ दांडेकर गोनिदा गो. नी. दांडेकर Gopal Nilkanth Dandekar

१.

पन्नासपेक्षा जास्त वर्षांपूर्वीची गोष्ट. स.प. महाविद्यालात माझी कॉलेज मैत्रीण वीणा (आधी दांडेकर, नंतर देव) होती. ६४ साली आम्ही स.प. महाविद्यालयात प्री. डिग्री.च्या वर्गात होतो. वीणाची ओळख मी करून घेतली होती. आणि त्याच ओळखीवर मी गो. नी. दांडेकर म्हणजेच आप्पांची ओळख करून घेतली. त्यांची एकच कादंबरी, ‘पवनाकाठचा धोंडी’ आधी वाचलेली होती. त्यामुळे त्यांच्याविषयी कुतूहलही होतं. बाबासाहेब पुरंदरे आणि गो.नी. दांडेकर यांच्याविषयी पुणे-मुंबई या दोन्ही शहरांमध्ये खूप कुतूहल त्या काळात होतं. त्यामुळे आप्पांची ओळख मी अधिक जवळून वीणाच्या माध्यमातून करून घेत होतो. त्यांच्या मिळतील त्या कादंबऱ्या वाचत होतो. ‘पवनाकाठचा धोंडी’नं तर मला भारूनच टाकलं होतं.

कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये वीणाला भेटायला आप्पा नेहमीच येत असत. त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी घरगुती ओळख करून घेतल्यामुळे ते माझ्याही घरी येत असत. त्यांना कधी जेवायलाही बोलवलं होतं. ते १०-१०-३० वाजता जेवत. मुगाचं वरण, भात, भाजी असं साधं ते जेवत. आमच्या घरी १२-१२-३० वाजता जेवण असायचं. आईला दहा वाजता स्वयंपाक करणं म्हणजे शिक्षाच होती! पण ती मी आप्पांच्या प्रेमापोटी तिला देत असे. कधी त्यांना कुठे कुठे त्यांच्या कामांसाठी घेऊन जात असे. माझ्याकडे प्रथम कुठलंच वाहन नव्हतं. तेव्हा माझे मेव्हणे (बहिणीचे यजमान) कृष्णराव वेलणकर यांची Lambretta स्कुटर त्यांना न सांगताच मी घेऊन जात असे. कधी त्यांची जुनी फियाट, नंतर Vanguard नावाची मोठी चार चाकी गाडीसुद्धा. त्यामुळे आप्पा फार प्रेमानं माझ्याशी वागत असत. वास्तविक माझे भाऊ, आई-वडील आणि स्वत: वेलणकर यांना माझ्या या वागण्याचा फार राग येत असे. आप्पांच्या बाबतीत विशेषत: सकाळी लवकर शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवर सोडण्याचंच काम अधिक वेळा असे. त्यामुळे कुणाची अडचण होत नसे, पण एवढं काय गोनिदांना हा सांभाळून घेतो, याबद्दल घरात सगळ्यांनाच तक्रार असायची, पण मला त्यांच्याबद्दल फार आदर, कुतूहल आणि मोठेपणाचा विश्वास होता आणि आजही आहेच.

आप्पांबरोबर फिरत असतानाच अधूनमधून मी कुमार गंधर्वांचं गाणे ऐकत होतो. शिंदे आळीमध्ये आमच्या घराजवळच आमचा पिंगळे नावाचा मित्र राहत असे. त्याच्या घरी रेडिओ होता. दिल्लीहून दर शनिवारी गाण्याचे National Programe प्रसारीत होत असत. आमच्या घरातले सर्वजण तिथं हा Programe ऐकायला नेहमी जात असत. एका शनिवारी पं. कुमार गंधर्वांचं गाणं होतं. मी पण त्या दिवशी गाणं ऐकायला गेलो होतो. साल आठवत नाही, गाणंही आठवत नाही, पण कानडी पद्धतीचं ते गाणं असल्याचं मला जाणवलं आणि ते आवडलं नाही. पण नंतर झालेली पुण्यातील लक्ष्मी क्रीडा मंदिरातील एक बैठक मला आवडली. मी फार गाण्याचा शौकीन नव्हतो. पण कुमारजींच्या बैठकींना मात्र आवर्जून जात असे. कधी कधी माझा मित्र अविनाश (नंदू) साठ्येसुद्धा बरोबर असायचा.

२.

तेव्हा प्रा. अरविंद मंगरूळकर सर संगीत मैफलींविषयी दै. ‘केसरी’मध्ये लिहायचे. (तेव्हाचा रविवारचा ‘केसरी’ बेस्ट होता!) त्यांचे लेख वाचून कुमारांविषयी कळलं. कुमार गंधर्व त्यांच्याकडे येत असत. एकदा सर वर्गात म्हणाले- ‘आज मी लवकर चाललोय, माझ्याकडे कोणी येणार आहेत.’ तेव्हा मी त्यांना विचारलं, ‘कोण, कुमार गंधर्व येणार आहेत का?’ सर ‘हो’ म्हणाले. तेव्हा कुमारांच्या ओळखीला भलतंच प्रेस्टीज होतं. माझ्या मनात आलं, आपण जाऊया का सरांकडे. पण कसं जायचं? पण ही संधी मला मिळायची होती. माझा मित्र राम डिंबळे प्रा. मंगळूरकरसरांचा संस्कृतचा विद्यार्थी होता. सरांच्या साठीच्या निमित्तानं कुमारांचं गाणं होणार होतं, हे मला कळालं. न्यायमूर्ती विनोदांच्या विजयानगरमधील ‘शांती सदना’त हे गाणं ठरलं होतं. मला गाणं ऐकायचंच होतं आणि कुमारजींशी ओळखही करून घ्यायची होती. ही संधी होती. श्री. विनोदांचा आणि माझ्या वडिलांचा (राष्ट्रीय कीर्तनकार भारताचार्य कोल्हटकर बुवांचा) चांगला परिचय होता. त्यामुळे त्यांच्या घरी निरोप वगैरे देण्या-घेण्यासाठी थोडं जाणंही होत होतं. तो हॉलही मला माहीत होता.

कुमारजींच्या गाण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या लक्षात घेता, तो हॉल मला अपुरा वाटत होता. मी तसं राम डिंबळेशी बोललोसुद्धा. मग त्यानं ते सरांच्या कानावर घातलं. ते म्हणाले, ‘कुठे बैठक व्यवस्थित होईल?’ मी एस.पी. कॉलेजच्या स्टुडंटस हॉलचा पर्याय सांगितला. त्या वेळी प्रा. मंगळवेढेकर सर आमचे प्रिन्सिपॉल होते. प्रा. मंगळूरकरांना माझी कल्पना पसंत होती, पण ती जागा मिळेल की नाही, ही शंका होती. मी त्यांना म्हटलं की, प्रा. मंगळवेढेकरांशी आम्ही बोलतो. त्यांनी होकार दिला. मी मंगळवेढेकर सरांच्या घरी गेलो. त्यांना सर्व समजावून सांगितलं. त्यांना मंगळूरकरांच्या साठी (षष्टयब्दी)विषयी काही माहीत नव्हतं, तरी त्यांनी परवानगी दिली. पण ‘हॉल तुम्हीच स्वच्छ करून घ्या’, म्हणाले. मी आणि राम डिंबळेनी कॉलेजच्या शिपायांसह हॉल स्वच्छ करून घेतला. शांती सदनातील कार्यक्रम एस.पी. कॉलेजच्या स्टुडंटस हॉलमध्ये आहे, असा बोर्ड  जुन्या हॉलवर लिहून आलो. सर्व जामानिमा करून कार्यक्रम छान पार पडला. कुमारजींचं गाणं छान झालं. त्यांनी रामपूर घराण्याच्या अनेक बंदिशी ऐकवल्या असं आठवतं. मला गाण्याचं व्याकरण किंवा तांत्रिक बाजू कळत नव्हत्या. पण आसपासचे जाणकार त्या गाण्यानं बेहद्द खुश होते, ते जाणवत होतं. मध्यंतर झालं. आम्ही दोघं ‘स्वयंसेवक’ कुमारजींच्या आसपास फिरत होतो. तेवढ्यात मला कुमारांसाठी तंबाखूचं पान आणायला सांगितलं. मला त्या विषयातलं काहीच गम्य नव्हतं, मग मी भीत भीत कुमारजींना विचारलं, ‘म्हणजे काय आणू?’ त्यांनी काही सांगितलं. मी आणलेलं पान त्यांनी खाल्ले. ‘छान आहे’ म्हणाले. माझं समाधान (?) झालं. पण त्यापेक्षा मी कुमारांशी बोललो, त्यांच्यासाठी काहीतरी केलं, याचा मला जास्त आनंद होता!

३.

एकदा आप्पा म्हणाले, ‘आम्ही दोघं कुमार गंधर्वांकडे राहायला जाणार आहोत, तू बरोबर येशील का?’ मी जायचं ठरवलं. आप्पांच्या बरोबर देवासला जाताना मी कुमारांविषयी खूप वाचत होतो, ऐकत होतो. ‘अनूपरागविलास’ प्रथम खंड १९६५ मध्ये प्रकाशित  झाला. १९६६ साली तो मी विकत घेतला होता. ती. वामनराव देशपांडे यांची प्रस्तावना मी भारावून वाचून काढली होती. त्यातील अनेक बंदिशी आजही पाठ नसल्या तरी हिंदी चित्रपट संगीताप्रमाणे माझ्या तोंडात येतात. त्यामुळे ती. आप्पांबरोबर देवासला जाता येणार या आनंदानं आणि कुमारजींचा व आप्पांचा जवळून सहवास होणार, या विचारानं मी अगदी हरखून गेलो होतो.

मग नीराताई आणि मी भोपाळमार्गे विदिशा आणि तिथून ग्वाल्हेरला जायचं ठरलं. ती. आप्पांची ग्वाल्हेरमध्ये व्याख्यानं होती. ते परस्पर आधी ग्वाल्हेरला पोचले. तिथं त्यांची धाकटी बहीण अनुताई गडकरी आणि तिचा मुलगा राहत होते. त्यांच्याकडेच आम्ही सर्वजण म्हणजे तिघं उतरलो होतो. आप्पांची व्याख्यानं होत होती. मी माझ्या व्यापारी मित्रांना भेटून येत होतो. तानसेनांच्या समाधीलाही जाऊन आलो. ग्वाल्हेरचा किल्ला आप्पांबरोबर पाहिला. राजवाड्यातही जाण्याची व्यवस्था झाली होती. तीन दिवसांची व्याख्यानं संपल्यावर आम्ही देवासला जाण्यासाठी निघणार होतो. आप्पांभोवती ग्वाल्हेरमधील मराठी लोकांचा खूप जमाव जमा होत होता. व्याख्यानंही चांगली झाली असावीत. कारण गर्दी करून मराठी स्त्री-पुरुष व्याख्यानांना आणि ‘गोनीदां’ना पाहायला येत होते.

आम्ही सकाळी लवकरच ग्वाल्हेरहून देवासला जाण्याऱ्या एस.टी.मध्ये बसलो. गर्दी आटोपशीर होती. आपल्याच एस.टी.सारखी ती एस.टी. होती. (कोकणात फिरणाऱ्या एस.टी.सारखी Up to Date) स्वच्छ आणि Leyland शक्तिवान गाडी होती. आम्ही गाडीत चढलो. ड्रायव्हरमागची मोठी सीट आणि तिच्या समोरची दोन जण बसतील अशी आमच्या सीटची व्यवस्था होती. दोन जणांच्या सीटवर खिडकीत आप्पा बसले. आमचे सामान आटोपशीरच होते. आप्पांबरोबर नंतर प्रवास बराच केला. पण पहिल्याच प्रवासात स्वत:ला सांभाळता येईल, अशीच सामानाची त्यांची ‍‌बॅग होती, तशीच मी कायम पाहिली. नीराताईंचेही तेच. आपापल्या सीटखाली आमच्या प्रवासी बॅगा मावल्या. मोठ्या बाकावर खिडकीत नीराताई बसल्या. मी आप्पांच्या शेजारी. काही वेळात एक लेकुरवाळी माता नीराताईंच्या शेजारी येऊन बसली. तिला सोडायला घरची माणसे आली होती. बहुधा इंदूरला माहेरी ती लाल साडीतील उंच देखणी सून चालली होती. सामान बरेच होते, पण सीटखाली सर्व बसले. गाडी ठीक वेळेत निघाली.

मला नवीन प्रदेशात किंवा नेहमीच्या रस्त्यावरसुद्धा परिसर, लोक, पीकपाणी, आर्थिक अंदाज घेण्यासाठी जास्तीत जास्त निरीक्षणाची आवड आहे. (त्यात कधी डोळा लागतो, ते निराळे!) रस्ता छान होता. बसचा वेगही ड्रायव्हरनं छान लयीत पकडला होता. मी परिसर आणि माझे शेजारीपाजारी पॅसेंजर न्याहाळत होतो. गुना, शिवपुरी ही ग्वाल्हेर संस्थानची गावे मागे पडली होती. अत्यंत सुपीक आणि खानदानी परिसर होता. मोहरीची, कोथिंबिरीची (धनिया) लागवड मोठ्या प्रमाणात होती. लांबच लांब शेती क्षितिजापर्यंत दिसत होती. तशी शेती महाराष्ट्रात फक्त विदर्भ भागात आपल्याला  पहायला मिळेल.

मधून मधून मला पेंग येत होती. थोडी डुलकी लागत होती. कधी आप्पासुद्धा डोलत होते. पण मी त्यांच्या शेजारीच बसलो असल्याने थोडा सतर्क होतो. मधूनच ते आपल्या कोपरीतून प्लास्टिकची छोटी पिशवी काढून काही तोंडात टाकत. मला प्रथम काही कळेना. मग लक्षात आले की, ते काही सुकामेवा बाळगून आहेत. नीराताई शांत बसल्या होत्या. शेजारच्या लेकुरवाळ्या बाईंशी आता त्यांची स्त्रीसुलभ दोस्ती झाली होती. त्यांना हिंदी येत होते की नाही, मला माहीत नाही. बाळाशी त्या खेळत होत्या. आग्रा रोडवरून मुंबईकडे चाललो होतो. तो मुंबई -आग्रा रोड आहे, हे आता मला समजले होते. आम्ही शाजापूर भागातून चाललो होतो. देवास जवळच येत होते. (आता मला प्लास्टिकच्या पिशवीमधून काही मिळेल, असे वाटत होते.) समोरची घाऱ्या डोळ्यांची देखणी लेकुरवाळी नीराताईंबरोबर थोड्या गप्पा करत होती. तिच्याकडे न पाहणे शक्यच नव्हते. एवढ्यात आप्पांनी मला हेरले असावे. त्यांनी हळूच मला ढुशी दिली. मला वाटले त्यांचे हात माझ्यावर प्रसन्न झालेत. मी हात पुढे केला तर ते मला म्हणाले, ‘अंह, डोळे काय छान आहेत नं?’ मला अपेक्षाभंग आणि सौंदर्यानुभूतीचा आनंद दोन्ही एकदम झाले. आपल्यालाही बघत राहवंसं वाटतंय, पण आप्पाही त्या सौंदर्याचा आनंद घेत होते.

आता आम्ही देवासच्या जवळ पोचत होतो. आग्रा रोडच्या डाव्या बाजूला गाव आणि उजव्या बाजूला माताजींची टेकडी लांबून दिसू लागली होती. देवासची ओढ पूर्वीच लागली होती. गाडी हायवेपासून जरा आत जाऊन थांबली. तिथे सर्व मिष्टान्नांची दुकाने लागली होती. आम्ही आपापले सामान घेऊन खाली उतरलो. माताजी मंदिर पथ विचारायचा होता. तो मोठ्या हमरस्त्याच्या पलीकडे होता. म्हणून समोर पाहत होतो. तेव्हा लांबून झब्बा-पायजमा घातलेले कुमार गंधर्वांसारखे कुणी दिसले. त्यांनी बहुधा आप्पांना ओळखले होते. त्यांच्याबरोबर एक ठेलेवालासुद्धा येत होता. ते कुमारच होते. मी देवासला कुमारांच्या घरी जाणार होतो, आप्पांबरोबर. तर ते स्वत:च बस स्टँडवर आप्पांना न्यायला आले होते. ठेलेवाल्याला त्यांनी आप्पांचे, नीराताईंचे सामान स्वत: उचलून दिले. माझी बॅग मी ठेवली. त्यांनी ठेलेवाल्याला हुकूम दिला- ‘चलो’. तो निघाला. त्याला बाकी काही सांगायची गरजच नव्हती. घर माहीत होते.

४.

दुपारी चारचा सुमार होता. हळूहळू चालत कुमारजी चालले होते. आप्पा किनऱ्या आवाजात कुमारांची, स्वत:च्या निरनिराळ्या प्रवासाची माहिती देत-घेत होते. त्यांच्या चालीनं कुमारांना चालणं शक्य होत नव्हतं. ते आपल्या लयीत चालले होते. आप्पा म्हणजे दुडकी चाल. मी नीराताई त्यांच्या मागे. आग्रा रोड क्रॉस झाला. ट्रकची वर्दळ होती, पण मध्यम. माताजी मंदिर पथावर लागलो. बोर्ड होता- देवीच्या रस्त्याचा. त्या रस्त्यावर पायथ्याशीच संगीताच्या देवदेवतांचा भक्त राहत होता- ‘भानुकुल’मध्ये. शेजारी बँक. विस्तीर्ण मैदानात व्ह‍ॉलीबॉलचे नेट लावून सुसज्ज ग्राउंड. थोडीशी हलकी वस्ती आणि वरती डोंगरावर देवळाचा कळस! चढा रस्ता. कुमारजींची चाल थोडी धिम्या लयीत चालली होती.

डाव्या हाताला टेकडीच्या पायथ्याशी बँकेच्या शेजारी ‘कुमार गंधर्व’ अशी संगमरवरी फरशीवर काळी शाई भरलेली अक्षरं असलेला दरवाजा. कंपाउंड वॉल. मोठी रिकामी रस्त्यालगतची जागा. आंबा, कडुनिंबाची मोठी झाडं, छान बाग आणि चौथऱ्यावर विस्तीर्ण घर! पिवळी माती लावलेलं. कौलारू पण आतमध्ये पत्र्याचं सिलिंग असलेलं. बहुधा घर नुकतंच शाकारलं असावं. दार उघडून आत आलो. ठेलेवाल्यानं सामान आणून ठेवलं. त्यांच्या पैशाचं काय झालं, मला माहीत नाही.

पायऱ्या चढून चौथऱ्यावरून घरात जाताना दोन पायऱ्या चढून घरात आलो, तर मोठा व्हरांडा. त्यात छान मोठा वापरातला, पण बिनारंग पॉलिश झोपाळा. चांगला दोन-तीन जण बसून लांब लांब  झोका घेऊ शकतील एवढा. त्यावर दोन लोड. मागे अंगणात दोन-तीन वेल. त्यांची चार पानं व्हरांड्यात सहज पडलेली. घराचं दार पूर्वाभिमुख. समोर खूप  झाडं. काही मोठी. काही लहान. पण सगळं हिरवं गार. श्रावणाचे दिवस होते. त्या भागात अजून पाऊस सुरू व्हायचा  होता.

घराचं दार उघडलं तर आतमध्ये दोन विस्तीर्ण हॉल, वर उंचावर तख्त पोशी. छान झुंबर. स्टँडवर लावलेले सात-आठ तानपुरे. एक स्पूल रेकॉर्डर बाजूला ठेवलेला. मोठे फिरवता येईल असे  स्पीकर्सचे खोके. सुरेख नक्षीदार कोच. मध्ये नक्षीदार टीपॉय. चांगला मोठा. भारतीय बैठक. समोर आणि उजव्या बाजूला लाकडी पॉलिश केलेले मोठे तख्त पोशीपर्यंतचे आडोसे. समोर तानपुऱ्यांच्या  शेजारी आत जायचं दार, तिथं डायनिंग टेबल. समोर स्वयंपाक घर. आणि हॉलच्या दरवाज्यातून आत गेल्यावर उजव्या हाताला जमिनीवर स्वच्छ बिना सुरकुतीची सतरंजी. त्यावर पांढरी विस्तीर्ण बेडशीट. भारतीय बैठक. एक मुनीमजींचं डेस्क. बाजूला ठेवलेला घडीचा टेबल लॅम्प. एक तानपुरा कोपऱ्यात ठेवलेला. दोन फोटो- एक अल्लादियाखाँचा आणि दुसरा हिराबाई बडोदेकरांचा. दरवाज्यातून हे सगळं एका दृष्टिक्षेपात दिसत होतं. मी तर हे पाहून भारावूनच गेलो होतो. सर्व शांत, निर्मळ साधं, पण उच्च दर्जाचं. सौंदर्यपूर्ण, पण अतिरेक नसलेलं. आवश्यक आणि उपयुक्त. तेव्हापासून खरं तर मी आप्पांबरोबर कुमारांकडे आलो होतो, हे विसरलोच!

ताईंनी (वसुंधराताई) आप्पांचं आणि नीराताईंचं स्वागत केलं. हातातलं सामान घेऊन घराच्या मागील फरशीच्या अंगणाच्या बाजूच्या गेस्ट हाऊसमध्ये नेलं. तिथं एक मोठी खोली होती. त्यात दोन पलंग होते. तिथं आप्पांची सोय केली होती. त्याला लागून असलेल्या खोलीत माझी सोय होती. आमचं सामान लागलं. थोडी विश्रांती घेऊन लगेच आम्ही खाली आलो.

कुमार टेबलावर आमची वाटच पाहात होते. तिथं आम्हाला बसवलं. काही खाऊ घातलं. बहुतेक उप्पीट होतं. चहा-कॉफी झाली. इकडच्या-तिकडच्या गप्पा होत होत्या आणि कुमारजींनी आप्पांना विचारलं ‘मग, जेवायचं केव्हा? तुम्हाला काय आवडतं?’ क्षणाचाही विलंब न करता आप्पा म्हणाले, ‘मी सात वाजता रोज जेवतो. मुगाचं वरण, भात, तूप, मीठ इतकंच. ८ वाजता झोपतो.’ कुमारजी ताईंकडे बघतच राहिले. पण लगेच म्हणाले, ‘समजले ना?’ मी घर न्याहाळत होतो. सारं ऐकत होतो. आपापल्या क्षेत्रातील दोन सृजनशील व्यक्तींना अनुभवत होतो. शिकत होतो आणि विचारही करत होतो. आनंदही घेत होतो.

आप्पा, मी, नीराताई थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी वर गेलो. ताईंनी ७ वाजता हाक दिली. आम्ही खाली आलो. तीन ताटं तयार होती. कुमार मला म्हणाले, ‘तुही जेवून घे!’ आढेवेढे घेण्याची हिंमतच नव्हती. कुमारजी आणि ताई जातीनं सारं करत होते. आप्पांचं जेवण झालं. नीराताई आणि माझंही. मी कुमारजींना विचारलं, ‘तुम्ही केव्हा जेवणार?’ ते म्हणाले, ‘थोड्या वेळानं. दहा वाजता.’ मग मी इथं बसलो तर चालेल का? ‘हो’ म्हणाले. ८-८-३० वाजता आप्पा, नीराताई झोपी गेले. मी डायनिंग टेबलावरच वेळ काढत होतो. काय बोलायचं, कसं, बोलायचं कळत नव्हतं. मी कुमारांच्या व्यक्तिमत्त्वानं भारावून गेलो होतो. सहज बोलणं, बोलताना आर्जव, अकृत्रिमता आणि समोरच्याचे  विचार, बोलणं समजावून घेणं, हे मला नवीन, दिलदार आणि सभ्य वाटत होतं. मी खरंच  कुमारांवर लट्टू झालो होतो!

दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ वगैरे करून लवकरच तयार झालो आणि खाली आलो. आप्पा लवकरच उठलेले असावेत. कुमारजी उठण्याची वाट पहात होते. कुमारजी आपल्या वेळेत उठले होते. पायजमा, बनियन आणि खांद्यावर एक गमछा. टेबलावर त्यांची जागा ठरलेली होती. त्यांची फिरती खुर्ची होती. त्यावर बसले होते. आम्ही (मी, आप्पा) बाहेर व्हरांड्यात बसलो होतो. कुमारजींची चाहूल आप्पांना लागली. त्यांच्या हातात एक छोटा कागद, बॉलपेन किंवा पेन होते. ते घेऊन त्यांनी हाक मारली. ‘कुमाSSर!’ कुमारजी बाहेर व्हरांड्यात आले. ‘काय आप्पा’! आप्पांनी हातातली चिठ्ठी उंचावत म्हटलं, ‘कुमाSSर, मी सगळं घर बाहेरून फिरलो, झाडं मोजली. एकूण ७० झाडं आहेत.’ कुमारजी आश्चर्यानं त्यांच्याकडे पाहत होते. आणि ‘अस्स?!’ असं म्हणून थोडे कुतूहलानं हसले. मग ही झाडं कशी, कुठली, केव्हा आणली, कशी लावली, संगोपन कसं केलं, हेसुद्धा त्यांनी आप्पांना सांगितलं. पुढे एकदा माझ्याशी बोलताना म्हणाले की, ‘मला माझं घर बेळगाव, शहापूर, सुळेभावी इथं उभं करावंसं वाटत होतं. झाडं लावली की, ते वातावरण तयार होतं, असं आपल्याला वाटेल म्हणून मी नारळ, सुपारीसकट अनेक बेळगाव भागातली झाडं आणून इथं मध्य प्रदेशात लावली. पण इथल्या वातावरणाला जी टिकली, ती टिकली. मग मी मनाची तशी समजूत काढली की, आपण दूर देवासमध्ये आहोत. आप्पांनी मोजलेली आंबा, कडुनिंब, अशी झाडं ती होती. तिथं नारळ, सुपारी अशी झाडं टिकली नाहीत.’    

५.

मग कुमारांबरोबर देवास, इंदूर परिसरात फिरणं सुरू झालं. प्रथम आम्ही देवास दर्शन केलं. टेकडीवर माताजींचं दर्शन आम्ही करून आलो. कुमार आले नव्हते. देवासचा नोट प्रेस पहिला. त्यानंतर उज्जैनला महाकालेश्वर, क्षिप्रा नदी, भर्तृहरीची गुफा या गोष्टी पाहून परत आलो. मध्ये एक दिवस देवासला आप्पांचं व्याख्यानही कुमारांनी करवून घेतलं. आप्पांना कुमारजींनी पूर्ण बांधून ठेवलं होतं. मग इंदूरला गेलो. इंदूरची महत्त्वाची ठिकाणं झाली. तिथं चित्रकार चिंचाळकर गुरुजी, राहुल बारपुते (संपादक – नई दुनिया), बाबा डिके (नाट्यभारती), श्री. मंत्री, चंदू नाफडे आदि कुमारजींच्या मित्रांची भेट झाली. इंदूरमधील इतरही अनेक लोकांना बोलावून त्यांच्याशी कुमारांनी आप्पांच्या ओळखी करून दिल्या आणि तिथंही आप्पांचं व्याख्यान ठेवलं. आणि बहुतेक आप्पांना चार पैसेही दिले असावेत, नक्की माहीत नाही. साहित्यिकाचा म्हणून अतिशय आदर जो करावा लागतो, तो त्यांनी केला.

शिवाय उज्जैनला जेव्हा आम्ही गेलो, तेव्हा तेथील एक प्रसिद्ध हिंदी लेखक श्री. सत्यनारायण व्यास यांची भेट करवली. ते वयस्कर होते. कुमार त्यांच्याकडे मुद्दाम आप्पांना घेऊन गेले, कारण आप्पा तिथं संघाचं काम करत असत. ते माळव्यात संघ प्रचारक होते. त्यामुळे व्यास यांना माहीत होते. त्या दिवशी आप्पांची अस्खलित हिंदी ऐकली. ते व्यास या हिंदी वयस्क लेखकाशी अस्खलित हिंदीत बोलत होते. आप्पांचं हिंदी छान होतं.

कुमारांनी व्यास यांच्या घरी आवर्जून नेल्यामुळे आप्पांनाही खूप आनंद झाला. हे दोघंही संघाचे आहेत, हे कुमारांना माहीत असावं, असं आपलं मला आज वाटतं. मी कुमारांच्या तोंडून संघ, समाजवाद, अमुक, तमुक असं काहीही कधी ऐकलं नाही. आप्पांशीसुद्धा त्यांनी कधी संघाचे आहात का म्हणून विचारलं नाही की, वसंत बापटांनाही तुम्ही समाजवादी आहात का, एस.एम. जोशी काय म्हणताहेत वगैरे काही विचारलेलं मला आठवत नाही. परंतु कुमारांनी त्यावेळेस तरी आप्पा संघाचे आहेत, असं माहीत असल्यामुळे व्यासजींकडे नेलं असावं, असा मी आत्ता विचार करतो आहे. हा माझा तेव्हाचा विचार नाही.

त्या दोघांचं अस्खलित हिंदीमध्ये खूप संभाषण झालं. आप्पांनी त्यावेळेस त्यांनाही सांगितलं की, मी या भागात संघाच्या कामासाठी येत होतो. कुमार त्यांच्यामध्ये बोलत नव्हते, ते गप्प होते. त्यांच्या गप्पा ऐकत होते. ते खूपच चांगले, मोठे साहित्यिक असावेत. जेव्हा त्या साहित्यिकांनी पानदान माझ्यापुढे केलं आणि मी काही घेतलं नाही, तेव्हा मात्र कुमार मला जरा रागावूनच म्हणाले, ‘अरे इतका मोठा माणूस ‘घे’ म्हणतोय, निदान त्यातली लवंग तरी घे. त्यांचा मान ठेवावा आपण.’ हे मला विशेष वाटलं. मग मी लवंग घेतली. नंतर आम्ही त्यांच्या घरून निघालो. इंदूरहून घरी देवासला आलो. सायंकाळ झाली होती. आप्पा जेवून झोपले.

दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे हे मला विशेष वाटलं, कुमारांनी आमची सगळ्यांची तिकीटं माझ्याकडे दिली आणि म्हणाले, ‘थर्ड क्लासची आहेत, स्लीपरची आहेत.’ आणि म्हणाले, ‘देवासमध्येच बसायचंय. आम्ही येऊ तुमच्याबरोबर.’ कलापिनीही स्टेशनवर आली होती सोडायला. आणि म्हणाले, ‘याचे १७० रुपये वगैरे होतायत?’ (त्यांनी आमची तिकीटं काढून ठेवली होती.) मला छान वाटलं. सगळं अगदी हिशोबबिशोब करून व्यवस्थित ठेवलेलं! आम्हाला त्यांनी खूप छान बिदा केलं. तेव्हा कुमारांकडे फोन होता, गाडी नव्हती. अतिशय साधी राहणी.

पुलं साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, त्याच्या आधीचं वर्ष म्हणजे १९७३ साल असावं. कारण देवासनंतर मी कुमारांना त्या संमेलनात भेटलो. माझा उद्देशच तो होता. कुमारांचं गाणं होतं, ते ऐकायचं म्हणून संमेलनात जायचं. मला कुमारांची ओळख करून घ्यायची होती, टिकवायची, वाढवायची होती आणि ती अशा ठिकाणी करून घेतली की, ती त्यांच्या लक्षात राहील. आणि मी त्यांच्या लक्षात आहे का हेही मला पारखून घ्यायचं होतं. म्हणून मी तिथं गाण्यानंतर त्यांना भेटलो, नमस्कार केला. त्यांनी मला लगेच ‘अरे, तू इथं कुठे रे? म्हटलं, ‘मी गाणं ऐकायला आलो होतो.’ ‘अरे, व्वा! छान आहे हं, छान आहे. कसे आहेत आप्पा?’ असं ते माझ्याशी मध्येच बोलत होते. माझ्या लक्षात आलं आणि मी कुमारांना फॉलो करायला लागलो, नियमितपणे. कुमार गाण्यासाठी पुण्याला-मुंबईला यायचे. मुंबईत कार्यक्रम असेल आणि मी मुंबईत असलो, तर मी त्या कार्यक्रमाला जायचो. पण पुण्यात सगळ्या कार्यक्रमांना मी जात राहिलो.

६.

मला आठवतं की, भा. रा. तांब्यांची जन्मशताब्दी होती. त्या कार्यक्रमाला जायचं होतं. ऐनवेळेला तिकीट मिळालं नाही तर, म्हणून मी तिकीट काढून ठेवलं होतं. लक्ष्मी क्रीडा मंदिर पूर्ण भरलं होतं. त्यानंतर अभिनव कला महाविद्यालामध्ये मंगळूरकरांनी गोकुळाष्टमीच्या दिवशी कुमारांचं गाणं  ठेवलं होतं. जरा उशीरा, म्हणजे १२ वाजता कृष्णजन्म होईल अशा बेतानं! ओळखीनंतर मी तो ऐकलेला पहिला कार्यक्रम. कुमारांनी फक्त ‍‌कृष्ण या विषयावरची गाणी (बंदिशी) ऐकवली होती. तेव्हा माझ्या लक्षात आलं, आज कृष्णजन्म आहे म्हणून सगळी गीतं कृष्णाची आणि ते बोलत होते ते फक्त कृष्णाशी संबंधीतच. कृष्णावर निरनिराळ्या प्रकारच्या कविता (बंदिशी) त्यांनी आपल्या गायनात ठेवलेल्या होत्या. असं जेव्हा माझ्या स्वत:च्याच लक्षात यायला लागलं, तेव्हा मी म्हटलं हा गायक निराळा आहे, ते सगळं विशेष आहे. दहा रुपये तिकिट होतं त्या वेळी. म्हणजे तसं महागच होतं. पाऊणएकशे लोक असतील.

तर ते इतकं छान गाणं झालं की, कुमार माझ्यामध्ये भिनायलाच लागले. आपल्याला या व्यक्तीशी संबंध वाढवायचा आहे, हे खरं, पण कसा? त्या वेळी संबंध ठेवायचा हेच महत्त्वाचं होतं. ते पुण्यातही येत असत, पण कळत नसे. त्यांचं गाणं ऐकायचं तर हे माहीत असायला हवं. मुंबईत गाणं असेल तर तेही माहीत व्हायला हवं.

एकदा काही निमित्त काढून मी वसंतराव आचरेकरांच्या घरी गेलो, तर तिथं कुमारही होते. घरी जुजबी थोड्या गप्पा झाल्या आणि मी निघतो म्हटलं. तेव्हा वसंतरावही म्हणाले, ‘आम्हीही निघतो.’

मी वसंतरावांना विचारलं, ‘कुठे कार्यक्रम आहे का?’ पण ते काहीच बोलले नाहीत. मी नंतर सुरेशला (आचरेकर) विचारलं, ‘कार्यक्रम आहे?’ तरी तोही काही बोलला नाही. कुणीही मला सांगितलं नाही की, कुठे गाणं आहे आणि असलंच तर कुठे आहे. नंतर कुमारजी बाहेर आले. एक गाडी त्यांना न्यायला आली. ते गाडीत बसले, गाडी निघून गेली. त्यांनी माझ्याकडे बघितलंही नाही. त्यांनाही मी विचारलं, ‘गाणं आहे का?’ ते काहीही बोलले नाहीत. मला प्रश्न पडला, गाणं आहे असं जरी कळलं, तरी कुठे आहे, हे कसं कळणार? असं नसतं! ते कळणं ही एक गोष्ट असते आणि मग असं कळायला लागलं की, हे कलाकार आहेत आणि कलाकारांचा माग आपण स्वत: काढायचा असतो.

माग काढून गाणं ऐकणं याची एक वेगळी मजा असते. तेव्हाच गाण्याचा खरा आनंद मिळू शकतो. (मात्र दुसरीही एक गोष्ट असते. काही खाजगी कार्यक्रम असतात. तिथं सगळ्यांनी यावं अशी गाणं ठेवणाऱ्यांची अपेक्षा नसते. ‘माझ्याकडे गाण्याला कोण येणार हे मी ठरवणार’, असाही एक आयोजकांच्या स्वभावाचा भाग त्यामध्ये असतो. मी बोलवीन तीच माणसं येतील, असा एक पझेसिव्ह असण्याचा भाग असतो.) हे मी त्या दिवशी शिकलो. हे कुमारांच्या बाबतीत केलं. आता बाकीच्यांचं? बोलावण्याचंही मला नंतर कळालं. त्या दिवशी मुंबईतलं गाणं श्री. बाकऱ्यांच्या घरी होतं. त्यांची माझी ओळखही नव्हती. पण ओळख झाल्यावरही श्री. बाक्रे यांनी मला त्यांच्या घरच्या गाण्याला बोलवलेलं नाही, पण मी गेलो आहे.

मग मी असं करायचो. माझ्याकडे अॅम्बेसेडर गाडी होती. मी आणि विजय सरदेशमुख असं ठरवायला लागलो की, गाण्याला एकत्र जायचं. मी, विजय आणि विलास इनामदार आम्ही १००-१०० रुपये जाण्या-येण्याचे पेट्रोलसाठी काढायचो आणि कुमारांच्या गाण्यासाठी मुंबईला जायचो. थोडी गंमत अशी म्हणजे मीच केली ती. विजय आणि इनामदार वेळेत तिथं पोचतील असं बघायचं, म्हणजे ते तानपुऱ्यावर बसतील आणि मग मला सांगता येईल की, मी त्यांना घेऊन आलो. अशी ती गंमत होती. कुमार सत्यशीलकडे (वाळकेश्वर) उतरत.

विजय सरदेशमुख आणि विलास इनामदार तानपुऱ्यावर बसत. त्यांच्यावर कुमारांचं प्रेम होतं. ते येणार हे कुमारांना माहीत असे. आधी मुंबईतल्या गाण्यांना मी एकटाच जात असे. विजय आणि विलास इनामदारांना हे कळल्यावर, आम्ही मिळून बसनं मुंबईस जाऊ लागलो आणि रात्रीच मुंबई सेन्ट्रलला बस पकडून सकाळी पुण्यात यायचो. कधी ते दोघं रात्री पुण्यात यायचे. माझं मुंबईत काम असलं तर मी राहायचो. मग गाडी आल्यावर सगळं सोयीचं झालं. गाणं झालं की, रात्रीच आम्ही परतायचो. असं करत करत कुमारांच्या शंभरेक गाण्यांचे कार्यक्रम मी ऐकले असतील. खरं तर त्याहीपेक्षा जास्त.

स.प. महाविद्यालयात अरुण पारखे या उद्योगपती म.स. तथा बाबुराव पारखे (पॅपको – खोपोली – कागद मिल) यांच्या चिरंजीवांशी ओळख झाली होती. छान गट्टी झाली. आम्ही म्हणजे त्यांचे कुटुंबीय आणि मी खूप प्रवास करायचो. असं आम्ही एकदा गणपती पुळे, चिपळूण असं करत महाबळेश्वरात आलो. थांबायचं नव्हतं, पण वेण्णा लेकवर थोडा वेळ थांबून पुढे जायचं ठरवलं होतं. त्या वेळी गर्दी फार नसे. गाड्या जरा बाजूला लावून आम्ही खाली उतरलो. चंदू एकदम मला म्हणाला, ‘अरे राम, कुमार गंधर्व’! कुमार लेककडे तोंड करून गर्दीत एकटेच काठीवर रेलून उभे होते. मला अप्रूप वाटलं. मी त्यांच्या मागे जाऊन त्यांना न्याहाळत उभा राहिलो.

त्यांना कुणीच ओळखत नव्हतं. ते काही गुणगुणत होते, लेककडे बघून. त्यांचंही इतरत्र लक्ष नव्हतं. मी अगदी त्यांच्या मागे जवळ जवळ खेटूनच उभा राहिलो. त्यांना असं प्रथमच पाहत होतो. परिचय नव्हताच. जीवाचे कान करून त्यांचं आत्मगान जवळ जवळ ४०-४५  मिनिटं ऐकलं. नाईलाजानं निघणं भाग होतं. पण त्या अर्ध्या-पाऊण तासातली कुमारजींची ती बैठक मी एकटाच ऐकून श्रीमंत झालो होतो!

पुढे देवासला भानुकुलमध्ये (आप्पा) गोनिदांबरोबर जाण्याचा योग आला, तेव्हा मी रंगवून रंगवून ही हकिगत कुमारांनाही पेश केली. त्यांनी पण ती ऐकून घेतली. बाकी श्रोते होते- आप्पा, नीराताई, वसुंधराताई, कलापिनी. मी थांबलो. कुमार म्हणाले, ‘अरे मच्छरांच्या आवाजात पुरी मैफल मी ऐकवू शकतो!’

आता माझ्या लक्षात येतं की, शास्त्रीय संगीतातलं काहीच कळत नसताना मी एका प्रतिभावंत गायकाचा ‘आतला’ स्वर ऐकला होता, तो मला भिडला होता!

.............................................................................................................................................

लेखक राम कोल्हटकर शास्त्रीय संगीताचे जाणकर व विचक्षण वाचक आहेत.

svkolhatkar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......