देव ‘आनंद’ वाटायला कायमचा उभा राहिला आणि अमर दीप झाला!
कला-संस्कृती - चलत्-चित्र
सतीश बेंडीगिरी
  • देव आनंद
  • Mon , 28 October 2019
  • दिवाळी २०१९ Diwali 2019 देव आनंद Dev Anand

नुकताच लता मंगेशकर यांचा वाढदिवस साजरा झाला (२८ सप्टेंबर) आणि वर्तमानपत्रांत त्यांच्याबद्दल रकाने भरभरून माहिती छापून आली. त्यांच्या फक्त दोन दिवस अगोदर म्हणजे २६ सप्टेंबर रोजी सदाबहार अभिनेते देव आनंद यांचा वाढदिवस होता, परंतु त्याची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही. लता मंगेशकर यांच्या स्वराला तोड नाहीच. जागतिक पातळीवर नावाजलेल्या गायिका आहेत त्या! परंतु देवनेही अभिनय क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली आहे, यात शंका नाही.

हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला ‘अँटी हीरो’ अथवा ‘अँग्री यंग मॅन’ कोण असं विचारलं तर तुम्ही अमिताभ बच्चन याचं नाव घ्याल, यात दुमत नाही. पण नायक म्हणजे साधनशुचिता असणारा आणि सभ्य माणूस या प्रतिमेला तडा दिला तो देवनं. त्यानेच ‘अँटी हीरो’चा ट्रेण्ड सुरू केला. ‘बाजी’ चित्रपटातला मदन आठवा. आजारी बहिणीसाठी अट्टल जुगारी बनलेला देव. ‘हाऊस नंबर ४४’मधला अशोक म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसांचा नायक आणि अट्टल गुन्हेगार. ‘टॅक्सी ड्रायव्हर’मधला मंगल म्हणजे गुन्हा करण्यासाठी स्वतःची गाडी वापरू देणारा इसम. ‘काला बाजार’मधला रघुवीर म्हणजे सिनेमाच्या तिकिटांचा काळा बाजार करणारा आणि सभ्यतेचा बुरखा पांघरून वावरणारा शरीफ बदमाश. ‘ये रात ये चांदनी फिर कहां’ असं म्हणत मारियाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवणारा आणि नंतर तिच्याशी सतत खोटं बोलणारा ‘जाल’मधला टोनी... संपूर्ण व्यक्तिरेखा खलनायकाची. ‘गाईड’मध्ये साधू बनेपर्यंत तो खलनायकच आहे. ‘बंबई का बाबू’मधील पहिला बाबू आणि नंतर एका निष्पाप कुटुंबाला फसवण्यासाठी कुंदन बनलेला देव. ही व्यक्तिरेखा देवनं फार ताकदीनं रंगवली आहे.

नैतिक अधःपतन झालेली, समाजाने न स्वीकारलेली आणि वाळीत टाकलेली अशी पात्र देवने खुबीनं उभी केली. अमिताभची ‘जंजीर’मधली ‘अँग्री यंग मॅन’ची भूमिका अगोदर देव आनंदलाच ऑफर झाली होती, यातच सारं काही आलं!

‘देव अभिनेता नाही, दिलीपकुमार खरा अभिनेता’ अशीच धारणा होती, कारण दिलीप ‘ट्रॅजेडी किंग’ होता. ट्रॅजेडी सीन्स जो वठवेल तो खरा अभिनेता असा समज होता आणि देवला ट्रॅजेडी सीन्स जमत नाहीत, अशी टीका देववर होत असे. पण हा केवळ गैरसमज होता. ‘बंबई का बाबू’ या चित्रपटात नायिकेचा भाऊ बनावं लागतं, पण तिच्या प्रेमात पडल्याची भावना तिच्यापर्यंत पोहोचवताना झालेली तगमग देवनं अशी व्यक्त केली आहे की, तसं दिलीपकुमारलाही जमलं नसतं. शेवटचाच सीन पहा. सुचित्रा सेन पालखीत बसून सासरी जायला निघते, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरची जीवघेणी ओढाताण बघताना देवला ट्रॅजेडी व्यक्त करता येत नाही, असं म्हणणारेही त्याची तुलना दिलीपकुमारशीच करतील. 

‘तेरे मेरे सपने’मधला डॉक्टर आनंद. डॉक्टर होताना जे आदर्श पाळायचे असे ठरवले, ते वास्तविक जीवनात पाळणं कठीण होऊन बसल्यावर होणारी दोलायमान अवस्था देवनं अत्यंत परिणामकारकरित्या दाखवली आहे. ‘हम दोनो’मध्ये देव नंदाला सांगू शकत नसतो की, तो मेजर वर्मा नाही आणि साधनाला समजावू शकत नाही की, तो नंदाकडे का जातो. तेव्हा त्याची होणारी कुचंबणा त्यानं काय ताकदीनं उभी केली आहे! मेजर वर्मा आणि कॅप्टन आनंद या दोन भूमिका त्याच्या कारकिर्दीतील मैलाचे दगड ठरतात! अशी दुहेरी भूमिका केवळ देवच करू जाणे! मेजर वर्माची देहबोली तर भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची आठवण यावी अशी आहे! ‘गाईड’ हा चित्रपटच ट्रॅजेडी आहे

देवच्या यशात गाण्याचा वाटा खूप मोठा आहे. पण गाणं म्हणताना जो मुद्राभिनय करावा लागतो, त्यात देव आनंदला तोड नाही. अभिनेते जेव्हा पडद्यावर गाणं गातात, तेव्हा पार्श्वगायकाच्या गायकीनुसार ओठांची हालचाल करतात, त्याला इंग्रजीत ‘लिपसिंकिंग’ असं म्हणतात. गाण्याबरहुकूम ओठांची हालचाल आणि चेहऱ्यावर उमटणारे भाव, यात अभिनेत्याचा कस लागतो. गायकाचा आवाज टिपेला जातो, तेव्हा साहजिकच कपाळावर आठ्या उमटल्या पाहिजेत, पण हिंदी सिनेमातील पट्टीचे अभिनेते म्हणजे राज कपूर आणि दिलीपकुमारही या छोट्याशा गोष्टीकडे कानाडोळा करत असत. त्यामुळे मोहम्मद रफी साहेब, कोणता अभिनेता आहे हे पाहून त्याच्या अभिनयाच्या जातकुळीनुसार पार्श्वगायन करत. हिंदी सिनेमातील काही ठोकळाछाप अभिनेते तर संगीताच्या आणि रफीसाहेबांच्या आवाजानं तारले गेले. उदा. ‘बैजू बावरा’ आणि ‘ताजमहल’ हे चित्रपट आणि त्यातील अभिनेते!

लिपसिंकिंग आणि चेहऱ्यावरचा हावभाव हुबेहूब करण्यात देवचा फार वरचा क्रमांक आहे. गाणं कळणाऱ्या मोजक्या अभिनेत्यापैकी तो एक होता. गाण्यातल्या शब्दांनुसार खांदे, हात, पाय यांच्या हालचाली आणि त्याही लयीत व्हायला हवेत, हे कसब त्याच्याकडे होतं. म्हणूनच किशोरकुमार, मोहम्मद रफी, तलत मेहमूद, हेमंत कुमार आणि मन्ना डे यांचा आवाजही त्याला चपखल बसत असे.

उदाहरणादाखल देवचा ‘जॉनी मेरा नाम’ हा चित्रपट पाहा. यातील ‘पलभर के लिए’ हे गाणे म्हणजे लिपसिंकिंग, चेहरा आणि शारीर अभिनयाचा उत्कृष्ट नमुना आहे. यातली एक जागा ‘सुन सुन कर तेरी नहीं नहीं अपनी निकल जाए’ यात ‘नहींsss नहींsssss’ म्हणताना उचललेलं शरीर, ‘जाँsss’ म्हणताना एकदम खाली येतं आणि ‘अपनी निकल जाए…’च्या वेळी हसताना त्याच्या दातातील फट दिसते, तेव्हा हेमामालिनीबरोबर आपलीही जान जाते. ‘माना तू सारे हसीनों में हसीं है, अपनी भी सूरत बुरी तो नहीं हैं’ असं म्हणताना  ‘ए, तू असशील ड्रीम गर्ल, उगीचच नखरे करू नकोस’ असं हेमा मालिनीला देवच सुनवू शकतो. ‘माया’ चित्रपटातील ‘तस्वीर तेरी दिल में हैं’ गाणं पहा. मुद्राभिनयाचा उत्कृष्ट नमुना आहे.

संवादफेक करण्यात देवची हातोटी विलक्षण होती. त्याच्या बोलण्याची लकब वेगळ्या पद्धतीची असायची, पण त्यामुळे व्यक्तिरेखेला वेगळाच उठाव मिळत असे. ‘तेरे मेरे सपने’मधला डॉक्टर देव डॉक्टर जगन्नाथ कोठारीला त्याच्या नशेबद्दल जाब विचारताना म्हणतो- ‘मेरे लिये अभी ये जान लेना बहुत जरुरी है...ठर्रे की ये बदबुदार बोतल देखता हूं तो एम.आर.सी.ओ.जी. लंडन, समझ में नहीं आता. (एम.आर.सी.ओ.जी.मधलं प्रत्येक अक्षर एकदा देवच्या शैलीत म्हणून बघा!).’ किंवा ‘जॉनी मेरा नाम’मध्ये ‘जॉनी बुरा काम तो करता है लेकिन इमानदारी के साथ, तुम्हारे लिए चांद बेच सकता हूं, इमान नहीं.’ ‘ज्वेल थीफ’ पाहिलात का? तनुजाच्या वडिलांच्या दुकानात तनुजाला दागिने विकताना देवची सेल्समनशिप बघा,  बालियों के बगैर कान कितने सुने सुने लगते हैं, ऐसा हार पेश करता हूं की, आपके गले से लगकर हार नहीं जीत लगेगी. इस मखमलसे गोरे गले में सच्चे मोतियोंका सफेद हार ऐसा लगता है, जैसे चांदनी से धुले हुए आसमान में आकाशगंगा लहरा रही हैं. मालूम होता है दूध की झील है और सोने की पत्तो में लाल कमल खिले है. झिलमिलाती हुई किरने आपके गलेसे लिपट गई है.’ हे ऐकताना असं वाटतं की, पु. ना. गाडगीळांच्या दुकानात देव आनंद सेल्समन असता तर महाराष्ट्रातल्या सगळ्या सोन्या-चांदीच्या दुकानांचं दिवाळं वाजलं असतं! इन्फोसिस फाउंडेशनच्या एक संस्थापक आणि प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांचा ‘ज्वेल थीफ’ हा आवडता सिनेमा आहे!

नायक आणि नायिका प्रणयाराधन करतात, तेव्हा नायक म्हणून प्रणयाचा अभिनय कसा करावा याचा क्लास देवकडे लावायला हवा. उगीच मिठ्या मारणं किंवा हिसका देणं किंवा पावसात लोळणं असा प्रकार देवनं कधी केला नाही. ‘काला बाजार’मधलं ‘रिमझिम के तराने लेके’ हे गाणं आठवा. एकाच छत्रीत, पण तो योग्य अंतर राखून चालला आहे. उगीच अंगाशी झोंबाझोंबी नाही. ‘कुतुबमिनार’मधून वरून खाली येताना नूतनला ‘दिलका भंवर करे पुकार, प्यार का राग सुनो’ असं सांगताना त्याचं प्रणयाराधन पहा ‘तेरे घर के सामने’ या चित्रपटात. ‘पेईंग गेस्ट’मध्ये नूतनच्या डोळ्यांना तो ‘ओ निगाहे मस्ताना’ असं म्हणतो आणि ‘नौ दो ग्यारह’मध्ये कल्पना कार्तिक ‘आंखों में क्या जी’ विचारते तेव्हा तो ‘रुपहला बादल’ म्हणतो. ‘ओ लडकी आंख मारे’ असं म्हणण्याइतक्या खालच्या दर्जाला जाण्याची देवची जातकुळीच नाही. शिवाय कल्पना कार्तिक तर त्याची बायकोच. तो तिचा पदर ओढू शकला असता, झोंबलाही असता, पण तो अतिशय सभ्य कलाकार होता, याबद्दल त्याच्या झाडून सगळ्या नायिकांचं एकमत आहे… तो रोमँटिक नायक होता तरीही.

हे झालं देवच्या अभिनयाबद्दल, पण तो माणूस म्हणून कसा होता, याबद्दल त्याच्या सहकाऱ्यांनी म्हटलंय की कुणाचा राग धरणं हे त्याच्या स्वभावातच नव्हतं. रॉयल्टीच्या संदर्भात रफीसाहेब आणि लता यांच्यात झालेले मतभेद सर्वश्रुत आहेच. मोहम्मद रफीसाहेब जेव्हा उषा टिमोथी, कमल बारोट, मुबारक बेगम, शारदा राजन आणि सुमन कल्याणपूर यांच्यासोबत गात असत, त्या संगीत दिग्दर्शकाकडे लताबाई गात नसत. अशा तऱ्हेनं लताबाईंनी बऱ्याच गायिकांची कारकीर्द संपवली. एका संगीत महोत्सवात लताबाई थकून विंगेत विश्रांती घेत असताना कार्यक्रम चालू ठेवावा, या उद्देशानं एका लहान मुलाला आयोजकांनी संधी दिली. त्या मुलाला टाळ्या आणि वन्स मोअर मिळत गेले, ते लताबाईंना जड गेलं. त्या मुलाला त्यांनी तिथून जायला सांगितलं. हा मुलगा पुढे हरिहरन या नावानं प्रसिद्ध झाला! 

देवनं मात्र अनेक नवोदित नायिकांना नाव आणि कीर्ती मिळवून दिली. मुमताजसारखी बी ग्रेड  नायिका ‘तेरे मेरे सपने’मध्ये देवनं निवडली आणि मग तिचा प्रवास ए ग्रेडकडे लवकर सुरू झाला. त्याचप्रमाणे लोकांना न आठवणाऱ्या नटांना पुन्हा पडद्यावर आणून नवसंजीवनी प्राप्त करून दिली. प्रेमनाथकडे ‘जॉनी मेरा नाम’नंतर पुन्हा खलनायकी भूमिकांसाठी निर्माते त्याचे उंबरे झिजवू लागले. मधुबाला चित्रपटात काम करू लागली, तेव्हा तिला इंग्रजीची भीती वाटायची. देवनं तिला मार्गदर्शन केलं. त्याची इंग्लिश, हिंदी आणि उर्दू यांवर अस्सल पकड होती. शत्रुघ्न सिन्हा याला ‘प्रेम पुजारी’मध्ये महत्त्वाची भूमिका दिली आणि त्यानंतर ‘गॅम्बलर’मध्ये. शत्रुघ्न सिन्हाची कारकीर्द त्यानंतर बहरत गेली.

पन्नासच्या दशकात देव जेव्हा चित्रपटसृष्टीत अबकड शिकत होता, तेव्हा एका इंग्रजी नियतकालिकात त्याच्याविषयी एक वाक्य छापून आलं होतं- ‘आजपासून पाच दहा वर्षांनंतर कोण हा देव आनंद असं म्हणावं लागेल. तो कोणाला आठवणारही नाही.’ देव मात्र आनंद वाटायला कायमचा उभा राहिला आणि अमर दीप झाला.

.............................................................................................................................................

लेखक डॉ. सतीश बेंडीगिरी औरंगाबाद येथील मॅनेजमेंट कॉलेजचे निवृत्त संचालक असून हिंदी तसेच पाश्चात्य चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

bsatish17@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......