ध्वनीसंयोजक हा एक प्रकारे स्टोरीटेलरच असतो. वेगवेगळ्या आवाजांच्या माध्यमातून तो गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो.
कला-संस्कृती - चलत्-चित्र
सायली जोशी-पटवर्धन
  • ‘पुष्पक विमान’ या चित्रपटाचं पोस्टर आणि मंदार कमलापूरकर सुबोध भावे, जयंत सावरकर यांच्यासह
  • Tue , 17 September 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti चलत्-चित्र मंदार कमलापूरकर Mandar Kamalapurkar पुष्पक विमान Pushpak Vimaan उबुंटू Ubuntu साऊंड Sound ध्वनिसंयोजन पार्श्वसंगीत बॅकग्राऊंड म्युझिक Background music

केनियाच्या चित्रपटातील दृश्यात दिसणाऱ्या टिटवीला सोलापूरच्या सांगोला गावातील टिटवीचा आवाज असू शकतो किंवा उसाच्या गुऱ्हाळातील घुंगरांचा आवाज लहान मुलाच्या मनातील भावनांचे चित्रण करण्यासाठी चित्रपटात वापरले जाऊ शकतात, असे आपल्याला कोणी सांगितले तर आपला त्यावर विश्वास बसणार नाही. पण प्रत्यक्षात चित्रपटाचे ध्वनिसंयोजन म्हणजेच साऊंडवर काम करताना अशा गोष्टी कल्पकतेने केल्या जातात. साधारणपणे चित्रपट पाहताना आपण त्यातील पात्रांची कला, संगीत, दिग्दर्शन, छायाचित्रण याकडे लक्ष देतो. पण चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ध्वनिसंयोजनाकडे मात्र आपले म्हणावे तितके लक्ष जात नाही. ‘पुष्पक विमान’ या चित्रपटाच्या ध्वनिसंयोजनासाठी उत्कृष्ट ध्वनिसंयोजक म्हणून राज्य पुरस्कार मिळालेल्या मंदार कमलापूरकर या मराठमोळ्या तरुणाशी मारलेल्या गप्पांमधून हा विषय उलगडत जातो.

कोणत्याही चित्रपटात ध्वनिसंयोजन करणे हे चित्रपटातील कथा, पटकथा, दिग्दर्शन, संगीत, प्रकाशयोजना यांच्याइतकेच महत्त्वाचे असते असे मंदार आवर्जून संगतो. एखाद्या दिग्दर्शकाला ज्याप्रमाणे कथेवर, पात्रांवर, शूटिंगच्या ठिकाणावर काम करावे लागते, त्याचप्रमाणे एखाद्या चित्रपटाचे ध्वनिसंयोजन करताना ध्वनिसंयोजकालाही बारीकसारीक गोष्टींचा विचार करावा लागतो. यातही चित्रपटाचे चित्रीकरण होण्याआधी ध्वनिसंयोजनाचे काम सुरू केले आणि चित्रीकरण पूर्ण झाल्यावर ध्वनीसंयोजन करणे यामध्ये फरक असल्याचे तो नमूद करतो. चित्रिकरणाआधी ध्वनीसंयोजनाचे काम सुरू केल्यास प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या ठिकाणी जाऊन साऊंडसाठी आवश्यक असणाऱ्या अनेक गोष्टी सुचवता येतात. हेच चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर ध्वनिसंयोजनाचे काम सुरू केल्यास मात्र काही मर्यादा येतात. मात्र इतकेच सांगून तो थांबत नाही तर अशा प्रकारचे काम अधिक आव्हानात्मक असल्याचे सांगताना त्याच्या चेहऱ्यावर नव्याने काहीतरी करू पाहण्याची ऊर्मी दिसून येते. त्याच्यातील याच सकारात्मक वृत्तीमुळे त्याच्याकडून कल्पक काम कसे घडत असेल याचा अंदाज आपल्याला देते. या सगळ्या प्रक्रियेत दिग्दर्शकाचीही भूमिका आणि त्याचा पाठिंबा, तसेच ध्वनीची जाण हेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे मंदारचे म्हणणे आहे. तो म्हणतो, ‘’दिग्दर्शकाला ध्वनीचे महत्त्व नेमके समजत असेल तर तो या विषयाला योग्य पद्धतीने न्याय देतो; ज्यामुळे बारकाईने आणि नेमके हवे तसे काम करत येते. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे ‘पुष्पक विमान’ या चित्रपटात सुबोध आणि गौरी समुद्रकिनारी बसलेले आहेत, प्रसंग गंभीर आहे. वातावरणाचा भाग म्हणून समुद्रकिनारी हेलिकॉप्टरचा आवाज टाकलेला आहे. मात्र दिग्दर्शकाच्या सुचनेनूसार, प्रसंगाच्या शेवटी हाच आवाज पुन्हा टाकला जातो. त्यामुळे प्रसंगाचे गांभीर्य आणखी वाढते. अशा रीतीने दिग्दर्शकाची ध्वनीची जाण हा महत्त्वाचा भाग ठरतो.

‘नदी वाहते’, ‘उबुंटू’, ‘डोंबिवली रिटर्न’ यांसारख्या चित्रपटांचे साऊंड डिझाईन, ‘बॉबी जासूस’, ‘वेटिंग’, ‘वेलकम होम’, ‘तुंबाड’ यांसारख्या चित्रपटांचे सिंक साऊंड आणि ‘न्यूड’, ‘कट्यार काळजात घुसली’ यांसारख्या चित्रपटांचे डबिंग मंदारने केले आहे. कामाचा इतका दांडगा अनुभव असलेला मंदार कोणतेही काम करताना समयसुचकता किती महत्त्वाची असते, हे अगदी सहज सांगून जातो. मंदार म्हणतो, ‘‘उबुंटू चित्रपटाचा लहान मुलगा अतिशय गोंधळा आणि चंचल आहे. एकदा तो घाईघाईत आपले संवाद म्हणत असताना ‘पंतप्रधान’ म्हणायच्या ऐवजी ‘प्रंतप्रधान’ म्हणतो. त्यावेळी त्याला संवाद पुन्हा म्हणायला न लावता लहान मूलाकडून बोलताना नैसर्गिकपणे अशी चूक होऊ शकते, हे लक्षात घेऊन त्याचा तोशब्द चित्रपटात तसाच ठेवण्यात आला. एका चित्रपटात अभिनेता टीव्हीसमोर बसलेला आहे, थोडा वेळाने टीव्हीचा आवाज अचानक बंद होतो आणि बाजूला दुसरा प्रसंग सुरू होतो. यावेळी अभिनेत्याच्या हातात रिमोटही नसतो. पण मग आवाज अचानक गायब होऊन कसे चालेल असा प्रश्न मला पडला. मग ही गोष्ट मी दिग्दर्शकाच्या लक्षात आणून दिली.’’ या घटनांमधून मंदारमधील प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करण्याची वृत्ती, तसेच परिपूर्णतेचा आग्रह आपल्याला दिसून येतो. यात कोणताही साऊंड घेऊन तो जोडणे इतकेच अभिप्रेत नसते, तर मंदारचा साऊंडविषयाचा असलेला सर्वंकष अभ्यास यातून आपल्याला दिसून येतो.

शेवटच्या क्षणाला येणाऱ्या अडचणी या कोणत्याही चित्रपटासाठी नवीन नसतात. एका चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या अगदी शेवटच्या क्षणाला सेन्सॉरमुळे उडालेली धांदल आणि त्यावर केलेली मात सांगताना तो प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. त्याचे काम, त्यातून त्याला आलेले अनुभव असं सगळं सांगतानाही आपण खूप काही केल्याचा अभिनिवेश त्याच्या चेहऱ्यावर अजिबात नसतो. इतकेच नाही तर चित्रपट हे कोणा एकट्याचे काम नसून ते टीम वर्क असते, याची जाणीव त्याला असल्याचे त्याच्या बोलण्यातून येत होते. ध्वनिसंयोजन हा चित्रपटातील अगदी शेवटच्या टप्प्यातील भाग असल्याने त्यामध्ये अनेक मर्यादा येत असल्याची खंतही तो व्यक्त करतो. चित्रपटाची संपूर्ण टीम सुरुवातीला खूप उत्साहात असते. शुटिंगपर्यंत हा उत्साह टिकतो, फार तर काही वेळा एडिटिंगपर्यंत तो असतो, मात्र त्यानंतर पेशन्स, पैसे आणि वेळ हे सगळेच संपलेले असल्याने त्या परिस्थितीत चांगला ध्वनी देणे, हे आव्हानात्मक असते. त्यातही भारतात ध्वनीला म्हणावे तितके महत्त्व दिले जात नाही, हे सांगताना तो हॉलिवुडमधील ध्वनीबाबतची स्थिती सांगतो. त्या ठिकाणी मोठी टीम साधारण तीन महिन्यांसाठी साऊंडवर काम करत असते,  तर भारतात जेमतेम दोन-तीन जण एक महिन्यासाठी साऊंडवर काम करतात. त्यामुळे आपल्याकडे आणखी बराच मोठा पल्ला गाठण्याची आवश्यकता असल्याचे तो नमूद करतो.

साऊंडची चित्रपटातील भूमिका सांगताना मंदार म्हणतो, मुद्दाम लक्ष वेधून घेईल असा आवाज उपयोगाचा नसतो तर ध्वनी हा चित्रपटाच्या कथानकाला पूरक असायला हवा. आपल्याकडे अनेकदा विनोदी चित्रपटांमध्ये विनोदाच्या वेळी मुद्दाम ‘टॉइंगsssss’ असा ध्वनी टाकतात. मात्र तो दरवेळी गरजेचा असतोच असे नाही. दरवेळी मोठा आवाज केल्यानेच प्रेक्षकांपर्यंत एखादी गोष्ट पोहोचते असे नाही, तर त्यांचे कान थकू न देण्याची जबाबदारी आम्हा ध्वनीसंयोजकांची असते असे मंदार अगदी मोकळेपणाने सांगतो. सध्याची एकूण परिस्थिती मांडताना तो सांगतो, सध्या जगभरात Loudness War सुरू असून त्याचा सर्वांनाच त्रास होत आहे. व्यक्तीजन्मापासून असंख्य आवाज ऐकत असतो. तसेच जन्मापासून मृत्यूपर्यंत जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर संगीत आपल्या कानावर पडत असल्याने आपल्याला सतत आवाज ऐकायची सवय असते. त्यामुळे आपण आवाजांना गृहित धरतो आणि नेमके आवाज ऐकण्यात कमी पडतो, अशी खंतही तो व्यक्त करतो. साऊंडचे महत्त्व आपल्याला समजून घ्यायचेच असेल तर एक छोटा प्रयोग करा. कोणताही चित्रपट लावा आणि आवाज बंद ठेवा. ते पाहताना आपल्याला काहीतरी वेगळेच वाटते, त्यामुळे साऊंडला गृहीत धरून उपयोग नाही.

मंदार जेव्हा चित्रटावर काम करत नसतो, तेव्हाही त्याचा साऊंडचा अभ्यास सुरूच असतो. गृहीत धरुन उपयोग नाही. असेल तर एक छोटा प्रयोग करा. कोणताही चित्रपट लावा आणि आवाज बंद ठेवा. ते पाहताना आपल्याला आजुबाजूला घडणाऱ्या घटना, त्यांचे संदर्भ आणि नैसर्गिक व कृत्रिम साऊंड यांचा अभ्यास त्याच्या पद्धतीने सुरू असतो, त्यामुळे ही निरंतर प्रक्रिया आहे हे समजून घ्यायला हवे. त्यामुळे प्रत्यक्ष काम करताना एखाद्या गोष्टीचा बारकाईने आणि कल्पकतेने विचार करण्याची प्रक्रिया सहज शक्य होत असावी. चित्रपटात ध्वनीवर काम करताना कलाकाराच्या पायात चप्पल आहे की बूट आहेत, खाली फरशी आहे की माती आहे की लाकडी काही आहे, त्या कलाकाराचा मूड कसा आहे, कलाकार चार भिंतीच्या आत आहे की बाहेर आहे, अशा सर्व बारीकसारीक गोष्टींचा विचार करावा लागतो.

त्यामुळे ध्वनीसंयोजक हा एक प्रकारे स्टोरीटेलरच असतो, वेगवेगळ्या आवाजांच्या माध्यमातून तो गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो. आपल्याकडे कॅमेराबाबत काही प्रमाणात जागरूकता आहे. चित्रपटातील एखादे दृश्य भावले तर कॅमेरा चांगला लावला असे आपण अगदी सहज म्हणून जातो. मात्र ध्वनीच्या बाबतीत आपल्याकडे पुरेशी जाणीव आणि जिज्ञासा नसल्याने त्याची नोंदही घेतली जात नसल्याचे आपल्याला दिसते.

जाता जाता मंदार म्हणतो, या राष्ट्रीय पुरस्कारामुळे माझी काम करण्याची ताकद कित्येक पटीने वाढली आहे. तसेच या पुरस्कारामुळे माझ्यावरची उत्तमोत्तम देण्याची जबाबदारीही वाढली आहे. माझ्या कामावर दाखवलेला हा विश्वास मी निश्चित सार्थ करेन, असे सांगताना भविष्याची स्वप्न पाहणारे मंदारचे डोळे खूप काही सांगून जातात.

साऊंड (ध्वनिसंयोजन) आणि बॅकग्राऊंड म्युझिक (पार्श्वसंगीत) मधील फरक

अनेक लोकांना साऊंड आणि म्युझिक यातील नेमका फरक माहिती नसल्याने बरेचदा गोंधळ होतो. मात्र गाणी तसेच पार्श्वसंगीत तयार करणे हे पूर्णतः स्वतंत्र काम असून त्यासाठी संगीतकार हा वेगळा माणूस काम करतो. त्याने दिलेले संगीत हे दिग्दर्शकाच्या मागणीनुसार लावणे आणि योग्य प्रमाणात इतर आवाजांसोबत मिक्स करणे हे काम साऊंड डिझायनर आणि मिक्सिंग इंजिनीअर करतात. साऊंड डिझायनरला संगीत वगळून संवाद, फॉली, साऊंड इफेक्ट्स, वातावरणाचे आवाज (अम्बियन्स) या सर्व गोष्टींवर काम करावे लागते. यापैकी कुठलाही आवाज प्रेक्षकांना वाटतो तसा ‘आपोआप’ ऐकू येत नाही. संवाद रेकॉर्ड करण्यासाठी स्टुडिओतले डबिंग किंवा प्रत्यक्ष शूटिंग लोकेशनवर सिंक साऊंड असे दोन पर्याय असतात. इतरही आवाज स्टुडिओत किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन रेकॉर्ड करावे लागतात आणि ते चित्रपटात नैसर्गिक वाटतील अशा पद्धतीने वापरावे लागतात. यात जितकी आव्हाने आहेत, तितकाच आनंदही!

.............................................................................................................................................

लेखिका सायली जोशी-पटवर्धन राज्य मराठी विकास संस्थेत जनसंपर्क व विपणन अधिकारी आहेत.

5.sayali@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......