पंढरपूर - आकारमानानं गाव लहान, पण कीर्ती महान!
कला-संस्कृती - कृष्णकथांजली
श्रीकृष्ण तनया
  • पंढरपूर
  • Sat , 20 April 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti कृष्णकथांजली विठ्ठल Vitthal पंढरपूर Pandharpur

श्रीक्षेत्र पंढरपूर ही सर्व क्षेत्रांची-तीर्थांची मांदियाळी. संतांचं हे माहेरच जणू. विठ्ठूच मायबाप, विठूच बंधू, सखा. विठू म्हणजे सर्व काही, अन्न-पाणी, वस्त्रे-जडजवाहीर. सर्व काही इटू राया. याच्या दृष्टीभेटीसाठी गरिबांतील गरीबही तहानभूक विसरून पंढरीची वाटचाल करतो. मंदिराचं नुसतं शिखर दिसलं तरी इठ्ठलच भेटला असं मानणारी ही जनता आता कुठे आहे? एक दोन नाही तर तब्बल अठ्ठावीस युगे तो एका विटेवर कमरेवर दोन्ही हात ठेवून भक्तांसाठी उभा आहे. रूपरंगानं काळा पण अंतरी नाना कळा असलेला तो रुक्मिणीवर युगानुयुगे उभा आहे. ‘‘स्वामी, आता तरी पंढरी सोडून वैकुंठी चलावं. पुरे झालं ते उभं राहणं. किती दिवस इथं राहायचं? चला आता.’’ या रुक्मिणीच्या विनवणीकडे दुर्लक्ष करून भक्तांकडून कोडकौतुक पुरवून घेण्यासाठी व भक्तांचं ईप्सित पूर्ण करण्यासाठी द्वारकेचं सावळं लेणं एका विटेच्या आधारानं ठामपणे उभं आहे. अंतःचक्षुंनी भक्ताच्या मुद्रेवरील निरागस भावांचं दर्शन घेण्यात त्याला गोडी आहे. त्याला वैकुंठ नको. स्वर्ग नको. अन्य सोपस्कारसुद्धा नकोत.

फक्त भक्त भेटावा ही तळमळ मनी ठेवून जगाच्या प्रलयापर्यंत पंढरपुरात वास्तव्य करण्याचा इरादा मात्र त्या सौभाग्यवतीस मान्य नाही. तिनं मौनव्रत धारण केलं. रुसली. रागावली. पण तरीही तो विटेवरच अटल राहिला. नाहीतरी पत्नी-पतीची कोणतीच गोष्ट परस्परांना पटत नाही, ही तर जगरहाटीच आहे. मग हे दैवीयुगुल याला कसं अपवाद ठरावं! कितीही विनवण्या, मिनतवार्‍या केल्या तरी नवरोजी  येत नाहीत हे पाहून रुक्मिणी रागारागानं त्याच क्षेत्री पण थोडी दूर जाऊन उभी राहिली. तिथं उभी राहून ती आपल्या हट्टी पतीराजाचं भक्तसंप्रदायांनी केलेलं कोडकौतुक निर्मळ मनानं व भावपूर्ण नेत्रांनी अवलोकित आहे.

बाह्यवर्ण काळा पण मन मात्र स्फटिकासारखं निर्मळ असलेला हा विठ्ठल पंढरपुरास आला तरी केव्हा?

फार प्राचीन काळी हे क्षेत्र अत्यंत लहान होतं. मोजकेच उंबरे गावात होते. पण ज्ञानेश्वर-तुकाराम, बहिणा, चोखोबा, सावता, जना व एकनाथ या प्रभृतींमुळे विठ्ठलाला चौदा चौकड्यांचंच राज्य जणू प्राप्त झालं होतं. दिवस उगवो वा मावळतीला जावो, या संतांनी विठूला आपल्या हृदयगाभार्‍यांत बंदिस्त केलं होतं. अगदी कडेकोट बंदिस्त. विठूचीही त्याला हरकत नव्हती. ओठांवर घोळवलं, नेत्रांत साठवलं आणि मनात राहू दिल्यानंतर विठोबा कशाला वैकुंठाला जायचं नाव काढेल! भक्तांबरोबर झिम्मा फुगडी खेळण्यांत, गोफ-शेले विणण्यांत, कीर्तनात नाचण्यांत व त्यांच्या संगे भाजी भाकरी खाण्यांत तो इतका दंग झालाय की, त्याला ना वैकुंठाची याद, ना पत्नीची आठवण.

पुंडलिक नामक भक्तामुळे पंढरपूर क्षेत्र नावारूपाला आलं. ‘पद्मपुराण’ तसं सांगतं. हा पुंडलीक भक्तीमार्गाला लागण्यापूर्वी भवसागरांत गटांगळ्या खाणारा क्षुद्र बाईलवेडा जीव होता. बायकोच्या इशार्‍यावर नाचणारा, तिच्या मुठीत राहणारा दिवटा चिरंजीव होता. बायकोच्या लाडिक तक्रारीवरून तो आई-बापाला छळत असे. पुंडलिकाला सर्व गाव नावं ठेवत असे. पण षड्रिपुंच्या आहारी गेला म्हणजे माणूस कुठलीच हार मानत नाही, तसं याचं झालं. एका धर्मक्षेत्रातील मान्यवर अधिकारी स्वामीनं त्याच्या विषयांध नेत्रांत चांगलं झणझणीत अंजन घातलं. तेव्हा कुठे स्वारी ताळ्यावर आली. पश्चातापदग्ध झालेल्या पुंडलिकानं आमरण माता-पित्याच्या सेवेचं व्रत घेतलं. तहान-भूक विसरून.

एकदा कृष्ण-रुक्मिणी यांच्यात काही कारणानं वाद झाला. कृष्णाला आठ पत्नी होत्या. रोज कुणाशी तरी वाद-मतभेद, रुसवे-फुगवे, मनधरणी व दिलजमाई असे गोड प्रसंग त्याच्या जीवनात सतत येत असत. पण यावेळचा रुसवा त्याला अपवाद होता. देवी रुक्मिणी खरंच रागावली व द्वारका सोडून निघाली ती दिंडीरवनांत आली. कृष्णानं अष्टदिशांना, पाताळात, स्वर्गातही हेर पाठवले आणि स्वतःही तिच्या शोधार्थ निघाला. पण रुक्मिणी शेरास सव्वाशेर निघाली. नवरोबाच्या दिव्य चक्षुंना दिसणार नाही असं अगम्य ठिकाण तिनं निवडलं. तिथंच मुक्काम ठोकला. अखेर ‘रुसवा गेला की येईल, आपोआप परतेल गृही’ असा सर्वसामान्य नवरे विचार करतात, तसाच करून स्वारी एका तीर्थक्षेत्री आली. चालून चालून पाय दमले. शीण आला. कुठेतरी अंमळ विसावा घ्यावा म्हणून ज्या झोपडीजवळ आला, ती झोपडी पुंडलिकाची होती.

त्यावेळेस पुंडलिक आपल्या दैवतांची सेवा करत होता. त्यांचे पाय चेप, तेलानं मर्दन कर, गरम विटकुरानं अंग शेक, पाणी पाज व जेवू घाल असं त्याचं सतत चालू होतं. त्यांत खंड पडण्याचं चिन्ह दिसेना. एक काम संपलं की दुसरं सुरू. कृष्णानं थोडा वेळ वाट पाहिली, पण पुंडलिकाचं त्याच्याकडे लक्षच गेलं नाही. दोघांना जेवू-खाऊ घालून तो लगेच त्यांचे पाय चुरू लागला. दाराकडे पाठमोरा बसलेल्या पुंडलिकाच्या मागेच कृष्ण उभा होता. त्याने प्रथम शुकशुक केलं. मग चुटक्या वाजवल्या, नंतर टाळ्यासुद्धा, पण पुंडलिकाचं लक्ष जराही विचलित झालं नाही. कृष्ण अंमळ मोठ्यानं म्हणाला, ‘‘अरे, मी अतिथी आहे. द्वारकेचा कृष्ण म्हणतात तो मीच. आत येऊ का? थोडा आराम करत म्हणतो.’’ पण पुंडलिकानं मागे वळूनसुद्धा पाहिलं नाही, मात्र जवळच एक पडलेली वीट डाव्या हातानं मागे फेकली व ‘तूर्त यावर उभा राहा. मी कामातून मोकळा झालो की, आतिथ्य करेन.’’ असं म्हटलं. बिचारा कृष्ण त्या विटेवर जो उभा राहिला, तो आजतागायत खाली उतरला नाही.

मात्या-पित्यांची सेवाशुश्रूषा पूर्ण झाल्यावर त्यानं अतिथीकडे नजर टाकली आणि त्याचे नेत्र भक्तीभावानं भरून आले. साक्षात् द्वारकेचं लेणं आपल्या दारात! पितांबर धारण करणारा, मस्तकी सुवर्णरत्नमंडीत किरीट, कानांत मकरकुंडले, गळ्यांत वैजयंती माळांसह रत्नहार, पायांत सुवर्ण तोडे व हातात मुरली असलेलं सुंदर ते ध्यान पाहून पुंडलिकाला विश्वास बसेना. तो कृष्णाभोवती फिरून त्याला न्याहाळू लागला. आपण फेकलेल्या विटेवरच तो उभा असल्याची त्यानं खात्री केली व त्यानं कृष्णचरणी लोळण घेतली. ‘‘देवा, किती मूर्ख मी! तुला ताटकळत ठेवलं आणि आसन काय दिलं तर ही वीट. काय केलं मी हे. देवा, मला क्षमा कर.’’ त्याच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. त्या निर्मळ भावाश्रूत श्रीहरीची सावळी देखणी मूर्ती विरघळू लागली. त्याला दोन्ही हातांनी उठवत श्रीकृष्ण म्हणाला, ‘‘पुंडलिका, अरे वेडा आहेस का तू? तुझी जन्मदात्यांवरील भक्ती-श्रद्धा पाहून मी प्रसन्न झालो आहे. मी काय देऊ तुला? बोल.’’

‘‘देवा, दुसरं काही नको, तुझ्या समचरणी माझा भाव दृढ राहू दे. माझ्या सवंगड्यांना दर्शन देण्यासाठी तू निरंतर इथंच उभा राहा. त्या सर्वांचं इप्सित तू पूर्ण कर. करशील ना? हेच वरदान दे. देवा...!’’

श्रीकृष्ण प्रसन्नपणे हसला. ते अमृतमय हास्य त्या दरिद्री कुटीत चांदण्याप्रमाणे भरून गेलं. अनोखा दिव्य गंध व प्रकाश आसमंतामध्ये पसरला. एक अनोखं पसायदान पुंडलिकाच्या ओंजळीत टाकून कृष्ण अंतर्धान पावला आणि दगडी देखणं शिल्प विटेवर कटेवर हात ठेवून उभं राहिलं.

असा वरप्रसाद मागून पुंडलिकानं कलियुगातील भक्तसंप्रदायावर नकळत उपकारच केले होते. त्याला दिलेला शब्द पाळण्यासाठी तो तिथं उभा आहे. हे गाव तुझ्या नावानं ओळखलं जाईल असाही एक वर कृष्णानं त्याला दिला होता. तेच हे पूर्वीचं लोहतीर्थ पुंडलीकपूर झालं. कालांतरानं उच्चारांत फरक होत होत पंढरपूर झालं.

‘स्कंदपुराणां’तही या क्षेत्रासंबंधी एक कथा आहे.

एकदा भगवान शंकर आपली पत्नी पार्वतीसह वरुणराजाकडे त्याच्या सुखानामक नगरीत चालले होते. निळ्या काळ्या मेघांमधून वृषभश्रेष्ठ नंदी वेगानं चालला होता. आकाशांतून पृथ्वीतलावरील सृष्टीचं अवलोकन करत उभयता पती-पत्नी समाधान व्यक्त करत होती. नंदीसुद्धा मधूनच आपला अभिप्राय देत होता. काही समयानंतर जगन्माता, पार्वतीला तीव्र स्वरूपाची तहान लागली. शंकरानं नंदीला पृथ्वीवर उतर असं सांगितलं. पृथ्वीवर उतरल्यावर शिवानं आपल्या भव्यदिव्य त्रिशूळाच्या आघातानं भूमीत प्रचंड छिद्र पाडलं. पाताळांतील भोगावती नदीनं तात्काळ दर्शन देऊन उभयतांना वंदन केलं. तिच्या हातांतून मृत्तिकेचा जलकुंभ घेऊन पार्वतीनं आपली तृष्णा भागवली व तो कलश त्या ठिकाणी कलता ठेवला. भोगावती नदी तिथूनच वाहू लागली. तिच्या अमृतमय जलानं तो प्रदेश रम्य व सुपीक झाला. भोगावतीचं जल हेच लोहतीर्थ होय. तेच आजचं पंढरपूर. आजही पुंडलिकाच्या समाधीसमोर हे कुंड आहे.

दुसरी एक कथा अशी

गौतममुनींची नक्षत्रांचं लेणं ल्यायलेली पत्नी अहल्या ही ब्रह्मदेवाची मानसकन्या होय. प्रातःस्मरणीय पंचकन्यांमधील पहिली कन्या म्हणजे अहल्या. इंद्रानं गौतमाचंच रूप घेऊन तिची फसवणूक केली. त्या वेळी गौतमांनी तिला शिळा होण्याचा व इंद्राला सहस्त्रक्षतांनी देह विद्रूप होण्याचा शाप दिला. रामावतारात उःशापामुळे श्रीरामचंद्रानं तिचा उद्धार केला. इंद्रानं पूर्ववत् होण्यासाठी विष्णूची कठोर तपश्चर्या केली. विष्णूनं त्याला लोखंडी भरीव दंड देऊन म्हटलं, ‘‘ज्या तीर्थांत हा दंड तरंगेल त्यात स्नान केलंस तरच तू रोगमुक्त होशील.’’ इंद्र त्रैलोकांतील तीर्थांच्या ठिकाणी फिरला. सर्व तीर्थं पालथी घातली, पण लोहदंड जळाच्या तळाशी गेला. परतताना निराश झालेला इंद्र या लोहतीर्थापाशी आला. त्यानं दंड तीर्थात टाकला. एका डुबकीतच दंडानं तळ गाठला, पण वर येऊन तो पाण्यावर तरंगायला लागला. जणू काही काष्ठ दंडच. इंद्रानं आनंदाने तीर्थात उडी टाकली व स्नान करून तो वर आला. दिव्य देह धारण करून त्यानं ऐरावताचं स्मरण केलं आणि तो संतोषानं आकाशमार्गे अमरावतीला गेला.

तेच हे तीर्थ लोहदंड म्हणून मान्यता पावलं. भोगावती तथा भीमा नदीनं या क्षेत्री हुबेहूब चंद्रकोरीसारखे वळण घेतलं म्हणून तिचं नाव चंद्रभागा पडलं. पंढरपूर क्षेत्र शालीवाहन शकाच्या आरंभापासून आहे. भोंगलसत्तेपूर्वी ते इंदापुर परगण्यांत होतं. परगणा आदिलशाही सत्तेखाली होता. नंतर मोगलकाळांत अकलूज ठाण्यांत समाविष्ट झाले. इ.स. १७०९ मध्ये विठ्ठलवाडी नावानं ज्ञात होतं. असे हे आकारमानानं लहान गाव असलं तरी याची कीर्ती महान आहे.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......