‘वेडिंगचा शिनेमा’ : ‘ड्रामा’ आणि ‘कॉमेडी’ या निकषांवर सिनेमा चांगला आहे.
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
धनंजय श्रीराम सानप
  • ‘वेडिंगचा शिनेमा’चं पोस्टर
  • Sat , 13 April 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie वेडिंगचा शिनेमा WeddingCha Shinema

आयुष्यात महत्त्वाचे निर्णय घेताना प्रत्येकाचा त्या निर्णयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. लग्न हा असाच एक महत्त्वाचा विषय आहे. एकत्र येणाऱ्या दोन व्यक्ती आपल्या ‘पार्टनर’ला अनेकदा गृहीत धरत असतात. दोघांची भावनिक पातळीवर मनं जुळली तरी बहुतांश वेळा व्यावहारिक पातळीवर दोघांच्याही मनात थोडाफार गोंधळ असतोच. कधीकधी हा गोंधळ अनपेक्षितपणे वादळासारखा सगळं काही उद्ध्वस्त करू पाहतो. भविष्यातील स्वप्न, अपेक्षा आणि जबाबदारी ओझं वाटू लागतं. मात्र अशा प्रसंगी दोघांतला संवाद आणि जवळची माणसं यांची भूमिका महत्त्वाची असते.

एकत्र येण्याची इच्छा असेल तर माणसं आपोआप तडजोड करायला लागतात. त्यातून मिळणारा आनंद हा दोघांच्या नातेसंबंधाला घट्ट करत असतो. तर तडजोडी करण्यात कमीपणा वाटणारे लग्नाच्या बंधनात स्वतःला अडकवू पाहत नाहीत. लग्नही ‘इंडिपेंडेंट’ आणि ‘करिअर’ यांना धोक्यात आणणारी व्यवस्था आहे, असा समज असणारा वर्ग, त्याच्यात असणारे दोन प्रवाह, हा सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘वेडिंगचा शिनेमा’ या सिनेमाचा गाभा आहे.

एकीकडे हे सगळं सुरू असताना दुसरीकडे लग्न समारंभाच्या संकल्पना बदलत आहेत. काळानुरूप त्यात नवनवीन ‘फॅशन ट्रेंड’ येत आहेत. ‘प्री-वेडिंग शूट’ हा त्यातलाच एक भाग. दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांनी या नव्या विषयाला हात घालून तो चांगल्या पद्धतीनं मांडला आहे. हा सिनेमा विशिष्ट अशा वर्गाचं जगणं मांडत असला तरी वास्तवाची दिलेली जोड त्याला सर्वोमुखी करते.

मोठमोठ्या गोष्टींचा पाठलाग करताना छोट्या-छोट्या गोष्टींचा आनंद घेता येत नाही. त्यातून व्यक्तीचा स्वभाव एकांगी होतो. छोट्या वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टीला माणसं अशा वेळी जाणीवपूर्वक दुर्लक्षित करतात. खचलेली मनं स्वतःला सिद्ध करू पाहतात. स्वतःला सिद्ध करणं अवघड होऊन बसतं. म्हणून वेगळं काहीतरी करण्याच्या धुंदीत त्या गोष्टींना रेटण्याचा प्रयत्न केला जातो. एखाद्या छोट्या घटनेनं नकळत स्वत्वाची ओळख होते. मग स्वतःला सिद्ध करणं थांबतं, प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याची हीच खरी सुरुवात असते. या सगळ्या गोष्टी सिनेमाच्या कथेत अगदी सहजरीत्या आणि विनोदी शैलीत मांडलेल्या आहेत.

सिनेमाची कथा ग्रामीण आणि शहरी यांच्यातला मध्यबिंदू गाठण्याचा प्रयत्न करते. मात्र त्यात बऱ्याच उणिवा आहेत. आर्थिकदृष्ट्या सधन असलेल्या दोन पिढीतला संवाद दिग्दर्शकानं चांगला पकडला आहे. कथा फार प्रभावी नसली तरी कथेची विनोदी पद्धतीनं केलेली मांडणी सिनेमात मजा आणते. प्रत्येक संवाद दुसऱ्या संवादाशी ‘कनेक्टेड’ आहे. हलकेफुलके पण तितकेच विनोदी संवाद सिनेमाला पूरक ठरतात. तांत्रिक गोष्टींचा वापरही चांगला केला आहे. मात्र त्यातला चढउतार पडद्यावर दिसून येतो. संगीत आणि अभिनय यामुळे सिनेमा गुंतवून ठेवतो. दिग्दर्शक म्हणून सलील कुलकर्णी यांचा हा पहिलावहिला सिनेमा आहे. त्यांनी सिनेमासाठी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे.

पूर्वार्धात कथा संथ होते, उत्तरार्धात मात्र ती गती पकडते. कथेची मांडणी ज्या पद्धतीनं केली आहे, त्यामुळे सिनेमा ‘ब्रेक’ होत नाही. सलग पद्धतीनं चाललेली कथा आपल्या मनात प्रसन्नता निर्माण करते. क्लिष्ट गोष्टी दिग्दर्शकानं जाणीवपूर्वक टाळल्या आहेत. त्यामुळे सिनेमा पाहताना खळखळून हसू आल्याशिवाय राहत नाही.   

या सिनेमाची सगळ्यात तगडी बाजू आहे, ती अनुभवी कलाकारांची. मुक्ता बर्वे, सुनील बर्वे, शिवाजी साटम, अलका कुबल, अश्विनी कळसेकर, संकर्षण कऱ्हाडे, प्रवीण तरडे, भाऊ कदम यांचा अभिनय सिनेमात पाहायला मिळतो. रुचा इनामदार आणि शिवराज वैचल या जोडीनं दर्जेदार अभिनय केला आहे. ही सगळी तगडी टीम घेऊन सलील कुलकर्णी यांनी केलेला प्रयोग चांगला झाला आहे.

थोडक्यात सिनेमा आजच्या तरुण पिढीबद्दल अत्यंत विनोदी शैलीत भाष्य करतो. कथेला साजेशी मांडणी आणि अभिनयाची साथ सिनेमाला पुढे घेऊन जाते. एकूण ‘ड्रामा’ आणि ‘कॉमेडी’ या दोन्ही निकषांवर सिनेमा चांगला आहे.

.............................................................................................................................................

‌लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.

dhananjaysanap1@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......