‘अमावस’ : आर्थिक यशाचा विचार करून बनवलेला एक आळशी चित्रपट
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘अमावस’ची पोस्टर्स
  • Mon , 11 February 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie अमावस Amavas सचिन जोशी Sachin Joshi नर्गिस फाक़री Nargis Fakhri

‘अमावस’ची निर्माती कंपनी असलेल्या ‘वायकिंग मीडिया अँड एंटरटेनमेंट’ आणि सदर चित्रपटातील नायक (आणि निर्मात्या व्यक्तीचा पती) सचिन जोशी या दोन्हींच्या नावात दोन ‘आय’ आहेत. त्यामुळे न्यूमरॉलॉजी आणि तत्सम गोष्टींवर इतक्या मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहण्याची सवय पाहता या चित्रपटात ‘अगर दुनिया में भगवान हैं, तो शैतान भी हैं’ अशा संवादांचा आणि त्याहूनही अधिक रटाळ आणि मानवी मेंदूच्या बौद्धिक पातळीला नको तितक्या खालावून ठेवणाऱ्या दृश्यांचा समावेश असेल यात नवल ते काय!

अर्थात इथं प्रश्न श्रद्धा-अंधश्रद्धा यांचा नसून निर्माते त्या संकल्पनेला किती परिणामकारकपणे समोर आणू इच्छितात याचा आहे. कारण जगभरात आणि अगदी भारतातही उत्तमोत्तम भयपट निर्माण होत असताना, ‘स्ट्रेंजर थिंग्ज’ किंवा ‘द हॉन्टिंग ऑफ हिल हाऊस’सारख्या मालिका जगभरात पाहिल्या जात असताना भट कॅम्प पाचपन्नास गाणी, सॉफ्टकोअर पॉर्न दृश्यं, सतराशे साठ चित्रपटांतील गोष्टी एकत्र आणून जे काही समोर आणू पाहतात, ते भयपट या प्रकारातील चित्रपट ठरण्याच्या न्यूनतम पातळ्यांवरही खरं उतरेल असं वाटत नाही. अर्थात, जोवर त्याला प्रेक्षक मिळतो आहे, तोवर भट आणि मंडळींच्या या चित्रपटांना मरण नाही.

करण अजमेरा (सचिन जोशी) हा लंडनमध्ये राहणारा एक उच्चवर्गीय भारतीय. तो त्याची सध्याची प्रेयसी आणि लवकरच होणारी बायको, आहाना (नर्गिस फाक़री) हिच्यासोबत पॅरिसला रवाना होण्याच्या मार्गावर असतो. दरम्यान आहानाला त्याच्या समर हाऊसचा फोटो सापडतो आणि ती ‘पॅरिसला जाणं किती क्लिशेड आहे’ असं म्हणत त्याऐवजी ‘त्या’ घरात जाण्याचा अट्टाहास करते. (ती पॅरिस सोडून या भयाण घरात जाण्याची मागणी अशी करते जणू हे अजिबात म्हणजे अजिबातच क्लिशेड नाहीये. तिनं बहुधा भट कॅम्पचे चित्रपट पाहिले नसावेत!) करणची आईदेखील याला अनुमोदन देते आणि करणला आहानासोबत या घरी यावं लागतं. अर्थातच या घराचा भयकारक (असणं अपेक्षित असलेला) इतिहास आहे. ज्यात करणची माया (नवनीत कौर ढिल्लन) नामक प्रेयसी आणि समीर (विवान भाटेना) यांचाही संबंध आहे.

या मूलभूत बाबींची कल्पना दिल्यानंतर चित्रपट आवाज करणारे दरवाजे, चालू-बंद होणारे दिवे, भल्यामोठ्या घरातील पडदे आणि ऐकू येणारे आवाज अशा रटाळ गोष्टींकडे वळतो. मात्र, त्यातील समस्या अशी आहे की, तो आणि त्याचे लेखक स्वतःला गरजेपेक्षा हुशार समजतात (जे ते नाहीत). नोलनच्या ‘इन्सेप्शन’वजा ट्विस्ट्सच्या निर्मितीचे असफल आणि हास्यास्पद प्रयत्न याचा दाखला देण्यासाठी पुरेसे आहेत. शिवाय ते वेळोवेळी इतके अपेक्षित ठरतात की, विचारता सोय नाही. ज्यामुळे कुणालाही चित्रपट पाहताना कल्पना येईल की, हे प्रकरण कोणत्या दिशेनं वळण घेणार आहे.

याखेरीज तो या तथाकथित ट्विस्ट्सवर इतका अवलंबून राहतो की, त्याला तार्किकता आणि मूलभूत कथन या दोन्हींचा विसर पडतो. परिणामी साधारण दीडेक तास भूत या संकल्पनेच्या नावाखाली त्यानं घातलेला गोंधळ एका तथाकथित रहस्याच्या उकलीनंतर चित्रपटाच्या विश्वाभोवतीच प्रश्न निर्माण करणारा ठरतो. त्यामुळे तर्काचा अभाव असलेलं हे सगळं प्रकरण अधिकच्या लांबीमुळे नको तितकं हास्यास्पद ठरतं.

जोशी, फाक़री किंवा अगदी भाटेनाच्या अभिनयाबाबत कोणीच काही बोलू शकत नाही. जी गोष्ट मुळात अस्तित्वातच नाही, तिच्याबाबत बोलण्यात काय अर्थ आहे? अली असगर विनोदी भूमिका म्हणून जे काही करतो, त्याला अभिनयाचा प्रयत्न म्हणावं की हतबलता? ‘अमावास’ आणि त्याच्या दिग्दर्शकाची या माध्यमावरील पकड इतकी वाईट आहे की, तो मोना सिंगकडूनही वाईट काम करवून घेऊ शकतो. त्यामुळे आसपास जे काही घडतं त्याला पाहून हसू फुटू नये याचाही प्रयत्न तिला करावा लागतो. भट कॅम्प कायमच एकीकडे मुख्य भूमिकेतील पात्रांनी प्रयत्नही न करणं आणि दुसरीकडे मोनासारख्या कलाकारानं हास्यास्पद कृती करतानाही न हसण्याची कसरत करणं, या दोन टोकांच्या दरम्यान आपलं अस्तित्व टिकवून ठेवताना आढळत आलेला आहे.

असं असलं तरी चित्रपटाचा शेवटचा अर्धा तास म्हणजे ‘सो बॅड इट्स गुड’ प्रकारच्या चाहत्यांसाठी मेजवानी म्हणता येऊ शकते. म्हणजे हा भाग इतका निर्बुद्ध आहे, की त्याचं वर्णन शब्दातीत आहे. या अर्ध्या तासात जे काही घडतं ते रामसेंच्या ‘आत्मा’ (२००६) या चित्रपटात जे काही घडतं त्याच्या समांतर रेषेवर, त्याला आणि इतरही अनेक भाषिक चित्रपटांची नक्कल करत तयार झालेलं आहे. आणि ते हास्यास्पदही आहे.

‘अमावस’ हा दिग्दर्शकाच्या आधीच्या चित्रपटांचं यश आणि भयपटांना मिळणारा प्रतिसाद यांना पुन्हा एकदा आर्थिक यशात रूपांतर करण्याचा लेखन (जे नवीन वा कल्पक नाहीच), दिग्दर्शन अशा सर्वच पातळींवरील एक आळशी प्रयत्न आहे.

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......