मातलीचं वरसंशोधन आणि गरुडाचं गर्वहरण
कला-संस्कृती - कृष्णकथांजली
श्रीकृष्ण तनया
  • विष्णू गरुडासह
  • Sat , 13 October 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti कृष्णकथांजली विष्णू मातली सुमुख नारद इंद्र

देवराज इंद्राचा कुशल सारथी मातली व त्याची पत्नी सुधर्मा यांना दोन अपत्यं होती- गुणकेशी व गोमुख. गुणकेशी नावाप्रमाणेच गुणवान, सालस आणि सौंदर्याची पुतळी होती. तिचं बालपण चतुरासारखे गेलं व यौवनाचं फुलपाखरू नाना रंग लेवून विवाहाच्या उंबरठ्यावर कधी येऊन उभं ठाकलं ते मातापित्याला कळलंसुद्धा नाही. तिच्या विवाहाची चिंता उभयतांना लागली. गुणकेशीप्रमाणे गोमुखही विवाह योग्य झाला होता, पण आधी भगिनीचा विवाह करून देण्याचं त्यानं ठरवलं व तशी पावलंही उचलली.

इंद्राबरोबर प्रवास करताना मातलीचं चौफेर लक्ष असे. जावयाच्या दृष्टिकोनातून तो उपवर तरुणांची मनातच परीक्षा करत असे. पण एकही युवक त्याच्या पसंतीस उतरला नाही. गोमुखही त्रिभुवनांत वरसंशोधन करत होता. माता सुधर्मानं गुणकेशीला गृहस्थधर्माचं उचित शिक्षण दिलं होतं. स्त्रीसुलभ गुणांनी अलंकृत केलं होतं. सौंदर्याला बुद्धिमत्तेची साथ होती. त्यामुळे होणारा जावई तिला साजेसाच हवा, अशी तिघांची इच्छा होती.

मातलीनं गोमुखासह देवलोक व मृत्यूलोक पालथे घातले, पण मनाजोगा वर आढळला नाही. देव, असूर, किन्नर, यक्ष यांनीही त्यांची निराक्षा केली. तेव्हा त्यानं आपल्या परिवाराशी विचारविनिमय करून वासुकीनागाच्या भोगावती नगरीत जाण्याचं ठरवलं.

शुभमुहूर्तावर मातलीनं गुणकेशीची तसबीर व कुंडली घेऊन रसातळाकडे प्रस्थान ठेवलं. वाटेत नारदमुनींची गाठ पडली. ते वरुणाच्या सुखानगरीत चालले होते. मातलीनं मुनींना कन्येसाठी वरसंशोधनात मदत करण्याची विनंती केली. दोघंही पृथ्वीच्या गर्भात खोलपर्यंत गेले. वरुणाच्या पुष्करतिर्थमालिनी सभेत त्यांनी प्रवेश केला. हीच सुखानगरी. शंभर योजने लांबरूंद असणारी ही नगरी वर्णनातीत होती.

सभेत आल्यावर मातलीनं वरुणाला व वरुणानं नारदांना प्रणाम करून आसन ग्रहण करण्याची विनंती केली. मातलीनं सभेत सभोवार शोधक नजर टाकली. लोकमाता गंगा-जमुना, सरस्वती-नर्मदा, इरावती व तापी या नद्या आपापल्या सुवर्णासनावर विराजमान झाल्या होत्या. वासुकी, तक्षक, धृतराष्ट्र, कुमुद इत्यादी महाविखारी नागश्रेष्ठी तिथं उपस्थित होते. बहुधा वरुणाला ते भेटण्यासाठी आले होते. ठाई ठाई नवरत्नांच्या राशी विखुरल्या होत्या. त्यांच्या प्रकाशात नानाविध जलचर मुक्तपणे विहार करत होते. वरुणाचं वाहन असलेला महाकाय शरीराचा व भयानक मुद्रेचा मगर वरुणाजवळच स्थानापन्न झाला होता.

काही वेळानं मातलीनं नारदाला चलण्याविषयी खूण केली. सर्वांचा विनयानं निरोप घेऊन दोघंही नगरीतून बाहेर पडले. वरुणाच्या सभेत नागांबरोरच हरीभक्त प्रल्हाद व दानवीर बळीराजाही उपस्थित होते, पण मातलीला ते पसंत पडले नाहीत. कारण त्यांचं असुरकुल होतं.

नंतर नारदांनी त्याला यमसभेत नेलं. ही सभा ‘संयमनी’ या नावानं ज्ञात होती. हिचा विस्तार सुखानगरी एवढाच होता. नहुष, ययाती, मांधाता, शिबी, भरत, श्रुतश्रवा आदी सत्यप्रिय व उच्चकुलीन राजे त्या सभेत असूनही मातलीच्या कपाळावर नापसंतीची आठी उमटली. चित्रगुप्त तसा बरा होता, पण तो कायम पापपुण्याचा हिशोब करण्यातच गुंतल्यावर स्वतःच्या विवाहासाठी तरी याला वेळ मिळेल किंवा नाही याची खात्री नव्हती. हा गुणकेशीला काय वेळ देणार? यमधर्मालाही दक्षप्रजापतीनं दहा कन्या पत्नीस्वरूपांत दिल्या होत्या. म्हणून यम व चित्रगुप्त जावयांच्या यादीतून वगळले गेले. एकंदरीत तिथलं गंभीर व शिरशिरी आणणारं वातावरण आणि यमाचा वाहन असलेला महाकाय रेडा त्याला आवडला नसावा.

नारद म्हणाले, ‘‘बा मातले, आपण आता ब्रह्मसभेत जाऊ. तिथं तरी तुझी इच्छा पूर्ण होईल अशी आशा करतो. फारच बुवा चिकित्सक तू!’’

‘‘मुनिवर्य, स्पष्टच बोलतो. आपल्याला कसला पाश नाही तेव्हा आम्हा गृहस्थांच्या मनोव्यथा आपल्याला अशा कळणार? कन्या सुस्थळी पडावी व येणारी सून सर्व दृष्टीनं योग्यतेची असावी अशीच मातापित्यांची इच्छा असते. आपल्याला कंटाळा आला असेल तर...!”

‘‘कंटाळा? अन् मला? मुळीच नाही मातले. माझ्या बोलण्याचा असा विपर्यास करून घेऊ नकोस. चल. ब्रह्मसभेत जाऊ.’’ दोघंही शिघ्रगतीनं ब्रह्मसभेत आले. या सभेचं नाव- मनोहारिणी. अत्यंत देखणी, रम्य व मनाचा शीण दूर करणारी सभा. या सभेला कुठेही एकही आधारस्तंभ नाही, हे हिचं वैशिष्ट्य. सभेचा स्वामी ब्रह्मदेव असून सप्तर्षी, सहा ऋतू, अकरा रुद्र, पंचमहाभूतं, नवग्रह, अष्ट वसु, पितर, चंद्रसूर्य नित्य हजेरी लावण्यासाठी येतात. अश्विनीकुमार इथं वास्तव्य करतात. क्षण, लव, मुहूर्त, रात्र आणि दिवस ब्रह्माची सेवा करतात. कारण ब्रह्मा हा सृष्टीचा कर्ता आहे. अशी बरीचशी माहिती नारदानं मातलीला सांगितली, पण तो तिथं थांबली नाही. त्यानं पुन्हा वरुणाच्या नगरीत चला असं मुनींना विनवलं. मातली इतका उतावळेपणा कशाला करतो असा मुनींना प्रश्न पडला, पण त्यांनी त्याला नाराज केलं नाही. सभेच्या बाहेरच उभं राहून मातलीनं पुन्हा पुन्हा वरुणाला निरखून पाहिलं. त्यावेळी जळाचा स्वामी वरुण पत्नी गौरीसह रत्नजडीत सिंहासनावर विराजमान झाला होता. ते सिंहासन सर्वतोभद्र नामक निवासस्थानी होतं. जवळच्याच आसनावर वरुणाचे गोपती व पुष्कर नामक दोन देखणे तरुण पुत्र बसले होते. भवनाच्या दालनात देवांनी असुरांची जिंकून आणलेली विविध शस्त्रास्त्रं ठेवली होती. त्यांचा प्रकाश पाण्याच्या माध्यमातून सर्वत्र विखुरला होता. तिथं पुन्हा आलेल्या मातलीला विशेष काही आढळलं नाही. नारदासह तो परतला. नंतर ते राक्षस व पिशाच्च निवासांत गेले. तेथील विशाल सरोवरात धूमविरहीत अग्नीनिवास करत होता. त्याचं दर्शन घेऊन नारदांनी मातलीला रत्नजडीत गांडीव धनुष्य दाखवलं व तिथं न थांबता त्यांनी पाताळलोक गाठला. तिथं आसुर नामक अग्नी निवास करत होता. तो देवताद्वारे रक्षिलेला असल्यानं त्याचं वास्तव्य मर्यादित होतं. सागरमंथनप्रसंगी निर्माण झालेले अमृत- जे देवगणांनी प्राशन करून उरलं होतं ते - लाखो सैनिकांच्या देखरेखीखाली ठेवलेलं होतं. त्या रत्नजडीत सुवर्णकलशाचं तेज त्या निवासात भरून राहिलं होतं. पंचाग्नी साधन करणारे ऋषी, फक्त वायू व फेसच भक्षण करणारे मुनी व गोव्रताचे पालन करणारे जपीतपी यांचं तिथं वास्तव्य होतं, पण मातलीला एकही पसंत पडला नाही.

नारदांनी मातलीसह हिरण्यपूर नामक नगराला भेट दिली. हे नगर विश्वकर्म्यानं निर्माण केलं होतं. नावाप्रमाणेच इथले वाडे-वास्तू व मंदिरं सुवर्णमय असून विविध रत्नांनी मढवली होती. संपूर्ण नगरी मायावी असल्यानं इंद्र, कुबेर, यम वरुणादी देवांचं इथं काहीही चालत नसे. इथं विवातकवच व कालखंड नामक असुर राहात होते. त्या असुरांची मातलीला चांगलीच ओळख होती. कारण यांनी खूप वेळा इंद्राचा पराभव केला होता. यांची भवनं बरीच मजल्यांची व अर्थातच सुवर्णांची होती. सर्व भिंतींना व सोपानांच्या पायऱ्यांना वैड्रर्य, हिरे-मोती जडवले होते. स्फटिकांच्या मण्यांमुळे तेजाची अप्रतिम प्रभा रात्री नेत्रांचं पारणं फेडत होती. त्याच प्रकाशांत रात्रीचे व्यवहार होत होते. दगडामातीच्या वास्तुंनाही चपखलपणे रत्नं जडवली होती. भवनाभोवतालची उद्यानं सदाहरित फळाफुलांनी बहरली होती. ‘‘या स्थळी’’ गुणकेशीला द्यायची का असं मुनींनी विचारल्यावर मातलीनं नकारासह स्पष्टीकरण दिलं, ‘‘मुनिवर्य, कितीही मायावी, ऐश्वर्यसंपन्न व बलशाही असुर असले तरी ते देवांचे शत्रु आहेत हे विसरून चालणार नाही. शत्रुच्या घरी कन्या कशी द्यायची?’’

मातलीचा स्वामी इंद्र देवांचा राजा होता. देव-दानव बंधू-बंधू असले तरी हा संबंध जुळावा असं मातलीला वाटेना व मुनींना ते पटलं. नंतर ते दोघं चंद्राच्या विभावरी नगरीत गेले. सत्तावीस राण्यांमध्ये चंद्रावर रोहिणीचा जास्त प्रभाव पाहून मातलीनं त्याला यादीतून वगळलं. त्यातून दक्षकन्यांनी चंद्राविरुद्ध तक्रार केल्यानं दक्षानं चंद्राला क्षयी बनवलं. शिवाय देवगुरु बृहस्पतींची पत्नी तारा हिच्याशी चंद्राचे असलेले संबंध जगजाहीर होतेच. मुनींना चंद्राविषयी निर्वाळा देता येईना. रोहिणीमुळे चंद्रानं गुणकेशीची उपेक्षा करावी असं मातलीला वाटेना. जास्त खोलात न शिरता मुनी त्याला गरुड पक्ष्यांच्या राज्यांत घेऊन आले. बघत राहावे असे ते बलवान पक्षी पाहून मातलीऐवजी नारदच प्रसन्न झाले. भगवान विष्णूनं वाहन म्हणून याच कुलातील गरुडाची निवड केली, याचं त्यांना कौतुक वाटलं. मातलीला इथं नक्कीच जावई मिळेल अशी त्यांनी आशा व्यक्त केली.

वैनतेय तथा गरुड हा कश्यप व विनीता यांचा पुत्र. सुनेत्र, सुमुख, सुबल, सुवर्चा व सुनामा हे गरुडाचे सहा पुत्र. यांच्यामुळे त्या भवनाला तर अवर्णननीय सौंदर्य प्राप्त झालं होतं. भक्कम चोच, सुदृढ खांदे, पंख, तीक्ष्ण नखं व सक्षम दृष्टी व घ्राणेंद्रिय यांच्यामुळे त्यांना खग तथा वि-नायक हे नाव शोभत होतं. खग म्हणजे आकाशाच्या अनंत पोकळीत यशस्वी विहार करणारा आणि वि-नायक म्हणजे आकाशीचा सम्राट. किती सार्थ अर्थ. पण मातलीनं त्यांच्यापैकी कुणाला पसंत केलं तर अर्थ, नाही तर व्यर्थ. गरुड कुल विप्र असूनही त्यांची दिनचर्या कुलीन क्षत्रियाप्रमाणे विरोचित होती. कद्रुचे पुत्र सर्प-नाग हेच त्यांचं मुख्य अन्न. वास्तविक सर्प-गरुडांचं बंधुत्वाचं नातं पण त्यांच्या आयांच्या सवतीमत्सरानं त्यांच्यात वितुष्ट निर्माण झालं. (ते कलियुगाच्या शेवटी संपणार.) या पक्षीराजांचं अवलोकन करून मातलीनं त्यांचा पक्ष नाकारला.

यक्षसम्राट कुबेराची मंदाकिनी नगरीही दोघांनी पालथी घातली. मंदाकिनी ही भारद्वाजमुनींची कन्या असून कुबेराची माता. या नगरात सुंदर रमणींच्या व अप्सरांच्या घोळक्यांत कुबेराला पाहून गुणकेशीची तिथं केव्हा वर्णी लागणार याचीच मातलीला चिंता वाटली. कुबेर देवांचा कोषाध्यक्ष असला तरी त्याच्या कृपादृष्टीसाठी कन्येला याचकाच्या ठिकाणी बघणं ही कल्पनाही त्याला दुःसह वाटली. विवाहानंतरच्या पहिल्या रात्रीनंतर गुणकेशीही त्या स्त्रियांच्या घोळक्यात! ‘‘छेः छेः मुनीवर चला इथून.’’ असं म्हणून मातली घाईघाईनं सभेतून बाहेर पडला. मुनींनी संयम राखून त्याला रसातळांत नेलं.

तिथं अमृतमंथनातून निर्माण झालेली कामधेनू सुरभी वास्तव्य करत होती. तिच्या मधुर अमृततुल्य दुग्धापासून क्षीरसागर निर्माण झाला होता. इथंच भगवान विष्णू लक्ष्मीसहवर्तमान निवास करत होते. याच सागर मंथनांतून चौदा दिव्य रत्नं निघाली होती. तिथले व्रतस्थ ऋषीमुनी आणि नामवंत प्रभृतीसुद्धा मातलीच्या मनांत भरल्या नाहीत. सुरभीप्रमाणेच सुरुपा, सुभद्रा व हंसका तथा सर्वकामदुधा या चार कामधेनू चार दिशांचे भरणपोषण करतात, अशा समृद्ध व चिरतरुण प्रदेशांतही कन्या देण्यास मातलीनं नकार दिला. मग ते नागलोकांत प्रविष्ट झाले.

ही नगरी भोगावती नावानं ओळखली जाते व वासुकी हा नगरीचा शास्ता होता. इंद्र-ब्रह्मा यांच्या नगरीप्रमाणेच ही नगरी वैभवसंपन्न होती. लक्ष्मीचं अनोखे तेज, सरस्वतीचा वास व पार्वतीची कृपा या नगरीत असल्याचं मातलीला जाणवलं. कन्या, स्त्रिया व पुत्र यांच्या रूपात सर्वत्र चैतन्य व आरोग्य तिथं सळसळत होतं. इथंच शेषनागाचं वास्तव्य होतं व शेष शय्येवर विष्णू विराजमान झाले होते. शेषाच्या सहस्त्रमस्तकांच्या फंडावर पृथ्वीदेवी विराजमान झाली होती. त्याच्या सहस्त्र द्विजिव्हा सतत लवलवत होत्या व माणकांप्रमाणे असलेल्या नेत्रांवाटे लालसर तेज आसमंतात विखुरलं होतं. रसातळाचा विराट हिस्सा शेषनागाच्या शरीरानं व्यापला होता.

नगरीत कोट्यवधी नागसर्प संचार करत होते. त्यांच्या शरीरावर कमंडलू, स्वस्तिक, मणि, चक्र आदी शुभ चिन्हं होती. काही नागांना पाचशे, शंभर, सात, पाच व तीन मुख होते. काळे, पांढरे, रंगीबेरंगी, निळे, लाल वर्णाचे नागही होते. काहीच्या अंगावर बोट बोट लांबीचे केस होते. सर्वत्र फुत्कार ऐकू येत होते. विविध नाग मुगुटादी अलंकार धारण करून डोलत बसले होते. काही नाग विविध वाद्यं वाजवत होते. धृतराष्ट्र, अग्जन, वामन, कुमूद, ऐरावत इत्यादी दिग्गज नाग आपापल्या लावण्यखनी पत्नीसह सुखेनैव विहार करत होते. भवनाचे स्तंभ, छत, गवाक्ष, झरोके, द्वारं भूमी व सोपान जिकडे बघावे तिकडे नागच नाग दिसत होते. शक्ती प्रदान करणाऱ्या रसाच्या कुंडांनाही नागांनी विळखा घातला होता. बाहेर वृक्षवेली वरसुद्धा नाग हिंडत होते. या सर्वांतून वाट काढणं मातलीला मुश्कील झालं, पण नारदांमुळे जमलं.

मातलीनं प्रत्येकाला श्वशुराच्या दृष्टीनं निरखून पाहिलं. एका नागानं त्याचं लक्ष वेधून घेतलं. मातलीच्या नेत्रांत खुषीची चमक उठली. नारदांचा हात धरून त्यानं एका तरुण नागाकडे अंगुलीनिर्देश केला. इतर नागांप्रमाणे चुळबुळ व वळवळ न करता तो सुवर्णासनावर वेटोळं घालून स्वस्थपणे बसला होता. कसलं चिंतन करत होता ईश्वर जाणे! त्याचं नाव सुमुख होतं. ऐरावताच्या वंशांत त्याचा जन्म झाला होता. त्याच्या पित्याचं नाव चिकुर व आर्यक. तेच पितामह होते. नारदानं आर्यकाची भेट घेऊन मातलीच्या येण्याचं कारण सांगितलं व गुणकेशीची जन्मकुंडली आणि तसबीर आर्यकाच्या पुढे ठेवली. दोन्हीवर दृष्टीक्षेप टाकून आर्यक म्हणाला, ‘‘मुनी कुंडली जुळते व कन्याही सुंदर आहे, परंतु सुमुखाच्या पित्याला म्हणजे चिकुराला गरुडानं काही दिवसांपूर्वीच भक्ष बनवले व सुमुखही त्याच मार्गानं जाणार. थोडक्यात सुमुख अल्पायुषी असताना आपल्या कन्येला मी होकार कसा देऊ? सुतश्रेष्ठा, जरा विचार कर.’’ त्यावर मातली त्याला म्हणाला, ‘‘श्रेष्ठ हो, सुमुखाला मी जामात म्हणून पसंत केलं आहे. माझी एकुलती एक कन्या या भवनांत देवी शची, स्वाहा व लक्ष्मीप्रमाणे शोभून दिसेल. तेव्हा याला दिर्घायुष्य मिळावं म्हणून आपण देवेंद्राकडे जाऊ.’’

मातलीच्या प्राथनेनुसार आर्यक व सुमुखासह दोघं इंद्राच्या सभेत आले. दैवयोगानं विष्णूही तिथंच होते. नारदांनी सुमुखाविषयी इंद्राजवळ रदबदली करून त्याला अमृत देण्याची विनंती केली. इंद्रानं गरुडाचं सामर्थ्य जाणून विष्णूलाच तशी प्रार्थना केली. विष्णूनं इंद्राची स्तुती करून ते काम इंद्रावरच सोपवलं. इंद्रानं सुमुखाला अमरत्वाऐवजी दीर्घायुष्य देण्याचं मान्य केलं.

मातलीच्या मनासारखं झालं. एवढी पायपीट करून अखेर जावई मिळाला. गुणकेशीनेही होकार दिला. मातली व सुधर्मानं शुभमुहूर्तावर तिचं सालंकृत कन्यादान केलं. सर्व मान्यवर देव-देवता, नाग, दानव-असुर, यक्ष अप्सरांच्या लक्षणीय उपस्थितीत गुणकेशी आणि सुमुखाचा विवाह पार पडला. गुणकेशी इतमामानं भोगावतीस रवाना झाली.

विवाहकार्य पार पडल्यावर इंद्रानं सुमुख नागाला दीर्घायुष्य दिल्याचं गरुडाला कळलं. तो त्रिमंडळ हादरवीत क्रोधानं इंद्राच्या नगरीत आला. इंद्राला याबद्दल काहीच कल्पना नव्हती. त्यावेळी इंद्र राणी शची व निवडक अप्सरा व गंधर्वांसह नंदनवनांत विहार करत होता. एकाएकी झंझावात सुटल्यासारखं वातावरण झाल्यामुळे इंद्रानं सर्वत्र शोधक नजर टाकली, तो एका वृक्षज्ञवर गरुड आवेगानं पंखांची उघडझाप करत असलेला दिसला. तो वृक्षसुद्धा त्याच्या भारामुळे कंप पावत होता. त्याचा अवतारही नेहमीप्रमाणे सौम्य वाटत नव्हता. इंद्र एकटाच त्या वृक्षाजवळ गेला व त्यानं गरुडाला येण्याचं प्रयोजन विचारलं. तेव्हा गरुडानं इंद्रावर प्रश्नांची तोफच डागली-

‘‘देवेंद्रा, माझ्या इच्छेनुसार भक्ष्य निवडण्याचं स्वातंत्र्य तू मला दिलंस, मग माझ्या तोंडचा घास का काढून घेतलास? सुमुखाच्या मृत्युच्या दिवसांत हस्तक्षेप का केलास? त्या महाकाय नागावर मला माझ्या कुटुंबाचं पोषण करावयाचं होतं, पण तुझ्यामुळे माझे मनोरथ धुळीला मिळाले. मी आता प्रायोपवेशन करतो. साऱ्या त्रिभुवनात माझ्यासारखा श्रेष्ठ नाही. देवांसाठी अमृत आणण्याचं साहस व कष्ट मीच घेतले. भगवान विष्णू माझ्याच पाठीवरून नभांत विहार करतात. त्यांचा भार माझ्याशिवाय कोण पेलू शकेल? साऱ्या गगनाला गवसणी घालणारा मी आता उपाशीच राहाणार.’’ असं म्हणत तो उद्यानांत वावटळीसारख्या भराऱ्या मारू लागला. त्याला काय उत्तर देऊन शांत करावं ते इंद्राला सुचेना. त्यानं अखेर विष्णूंचं स्मरण केलं. विष्णू प्रगट झाले. त्यांनी गरुडाची दर्पोक्ती ऐकलीच होती. त्यांना गरुडाचा राग आला व त्यांनी त्याला समोर उभं राहण्यास फर्मावलं. ते गरुडाला म्हणाले, ‘‘बा काश्यपा. दुर्बळानं उगाच बळाचा टेंभा मिरवू नये. माझ्यासमोर शक्तीच्या वल्गना करू नकोस. तिन्ही लोकही माझा भार वाहू शकणार नाहीत. अधिकार, शक्ती व तेज माझ्यामुळेच तुला प्राप्त झालं आहेत. सुमुखाशिवाय अन्य सर्प नाहीत काय? त्याला गृहस्थधर्म पाळायचा आहे म्हणून दीर्घायुष्य दिलं. अमरत्व नव्हे. उपाशी राहाण्याचा कांगावा करू नकोस. तुला तुझ्या शक्तीचा एवढा गर्व असेल तर वैनतेया, माझी एकच भुजा खांद्यावर ठेवून बघ.’’ असं म्हणून विष्णूंनी आपला उजवा हात गरुडाच्या पंखावर टेकवला, मात्र त्या भारानं गरुड भूमीवर कोसळला. त्याच्या पंखांची पिसं विस्कळीत झाली. डोळे गरगर फिरू लागले. चोच विलग होऊन देखणा गरुड विद्रूप दिसू लागला. त्याचा गर्व क्षणांत नाहीसा झाला. त्यानं धडपडत पंख पसरले व मस्तक विष्णूच्या पायांवर ठेवून त्यांची व इंद्राची क्षमा मागितली. त्यांची करुणा भाकली. स्तुती केली. तेव्हा विष्णूंनी त्याचे पंख पूर्ववत केले. त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला. वातावरणातील उत्पात निवळल्यावर शची अप्सरांसह त्या स्थळी आली. सर्वांनी विष्णूंना प्रणाम केला. नंतर इंद्र-शची यांचा निरोप घेऊन गरुडाच्या पाठीवरील पुष्पक विमानांत बसून वैकुंठाला गेले.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................