‘तुंबाड’ : भय, लालसा, रहस्य आणि साहसाची गोष्ट
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘तुंबाड’ची पोस्टर्स
  • Sat , 13 October 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie तुंबाड Tumbbad सोहम शाह Sohum Shah राही अनिल बर्वे Rahi Anil Barve

‘तुंबाड’च्या उराशी असलेलं स्पिरिट पाहता (बहुधा) नेमाडेंच्या ‘हिंदू’मधील एक गोष्ट आठवते. स्मशानाजवळ कुणातरी व्यक्तीला मडक्याच्या आत नाणी ठेवताना/काढताना पाहिलेली व्यक्ती ते मडकं घरी आणते. त्यात नाणं टाकून पाहते. कडांना आदळत जाणारं ते नाणं कधी तळाला पोचतच नाही. त्या मडक्याला अंत तसा नसतोच. त्या अनादि अनंत, तळ नसलेल्या मडक्याने त्याला भुरळ पडते. तो त्यात डोकावून पाहतो. त्या कुठलाही अंत नसलेल्या काळोखात तो हरवून जातो, तो कायमचाच. सकाळी घर न उघडल्याने शेजारीपाजारी घरात आल्यावर मडक्यात डोकं अडकून, जीव गुदमरून मेलेला तो आढळतो. मात्र त्याला आत काय दिसलं हे इतर कुणाला कुठे माहीत असतं?

तसं पाहायला गेल्यास ‘तुंबाड’ भयपट या चित्रपट प्रकारात मोडत नाही. कारण मुळातच तो त्यात गरजेपेक्षा अधिक जम्प स्केअर्स पेरून, भयाचा आभास निर्माण करण्याचा अपयशी ठरण्याची शक्यता असलेला प्रयत्न करत नाही. दिग्दर्शक राही बर्वेला एक गोष्ट सांगायची आहे. जी (वर उल्लेखलेल्या गोष्टीप्रमाणेच) आजीच्या पोतडीतील आहे. ती सुरस आहे, चमत्कारिक आहे आणि भय निर्माण करणारी आहे. भय, रहस्य, काल्पनिकता या बाबी केवळ त्या मूळ गोष्टीला पूरक घटक म्हणून काम करतात. त्यामुळे तो हॉररपेक्षा अधिक फँटसी-मिस्टरी म्हणून परिणामकारक ठरतो. या परिणामात व्हिज्युअल्सना कथेपेक्षा अधिक महत्त्वाचं स्थान आहे. ज्यामुळे नकळतच पुढे काय होईल यापेक्षा ते कसं दाखवलं जाईल याला अधिक महत्त्व प्राप्त होतं. आणि दिग्दर्शक बर्वे हा तांत्रिकदृष्ट्या सजग असल्याने त्याच्या या रहस्याच्या गाठी उलगडण्याच्या सिनेमॅटिक नजरेत ‘तुंबाड’चं खरं यश आहे.

‘तुंबाड’ हे एक शापित गाव आहे. ज्याचं कारण एक देव आहे. जो स्वतःच शापित आहे. त्याचं नाव उच्चारणंही निषिद्ध आहे. ‘मॅजिक कम्स विद अ प्राइस’च्या धर्तीवर शाप आणि वरदान या दोन्ही गोष्टी सोबतच येतात. परिणामी त्यावरील आणि गावावरील शाप हा त्याची माहिती असलेल्या त्यातील मध्यवर्ती पात्रांसाठी मात्र वरदान आहे. वरदान आहे सोनं आणि दडलेल्या खजिन्याचं. ‘तुंबाड’मध्ये काही रहस्यं दडलेली आहेत. जी कथेच्या ओघात थेट पडद्यावर उलगडत जाताना पाहणंच उचित.

हा शापित देव, हस्तर आणि माणसांमध्ये एक समान बाब आहे. ती म्हणजे लालसा. त्याला शाप मिळाला होता तोही या लालसेमुळेच आणि आता कालानुरूप त्याच्याकडील सोन्याकडे आकर्षित होणाऱ्या माणसांनाही या लालसेनंच पछाडलेलं आहे. ‘तुंबाड’मध्ये विनायकच्या (सोहम शाह) निमित्तानं याच लालसेचे बरे-वाईट परिणाम दिसून येतात. सावकाराच्या प्रस्तावाला ‘मैं साहस रखता हूँ’ म्हणणाऱ्या विनायकाला आपण त्याआधी आणि त्यानंतरही साहसी कृत्यं करताना पाहतो. आपला बाप आणि आजीच्या पावलावर पाऊल ठेवत, खजिन्याकडे आकर्षित होणाऱ्या विनायकच्या डोळ्यांत एक विशेष चमक दिसून येते. ती चमक त्याला अधिक गडद छटा मिळवून देते. तो हिरो कधी नव्हताच. आता तो अँटी-हिरो बनतो.

स्वातंत्र्यपूर्व ते स्वातंत्र्योत्तर भारतात घडणाऱ्या १९१८ ते १९४७ च्या कालखंडादरम्यान विनायक आणि तुंबाडच्या गोष्टीची वाटचाल होते. १९१८ मध्ये सरकार आणि आजीच्या रूपातून, गावातील रहस्यमय, भयंकर तरीही आपल्याला भुरळ घालणाऱ्या वातावरणाची निर्मिती केली जाऊन ‘तुंबाड’मधील कथेच्या पहिल्या प्रकरणाची सुरुवात होते. ते संपेपर्यंत आपण त्यात गुंतलेलो असतो.

दिग्दर्शक बर्वे आणि इतर तिन्ही लेखक ‘तुंबाड’ची रचनाच अशा रीतीने करतात की, तो त्यातील बऱ्याच बेसिक म्हणाव्याशा, ‘लोभ वाईट गोष्ट आहे’च्या धर्तीवरील बोध घेऊन वावरणाऱ्या कथेपेक्षा तिच्या वातावरणनिर्मिती आणि उपकरणावर भर देतो. काही जम्प स्केअर्सच्या स्वरूपातील भयनिर्मिती हा त्याचा उद्देश कधी नव्हताच असं दिसून येतं. त्यामुळे तो त्याहून अधिक मोठ्या पातळीवर पोचतो. जिथली रहस्यं आणि कल्पना पाहता भीती वाटणे ही फारच क्षुल्लक मानवी भावना वाटू लागते. अभिनेता-निर्माता सोहम शाह विनायकच्या रूपात हिंदी सिनेमाला एक आद्य अँटी-हिरो देऊन जातो. त्याचा आवाज ‘तुंबाड’च्या गूढतेत भर घालतो. त्याचे डोळे त्याच्या सोन्याच्या आंतरिक ऑब्सेशनला दृश्य रूप देऊन जातात.

दिग्दर्शक राही बर्वे आणि सिनेमॅटोग्राफर पंकज कुमार दोघेही दृश्य स्वरूपाचा विचार करता अविश्वसनीय कामगिरी करतात. बर्वे हा तांत्रिकदृष्ट्या सजग दिग्दर्शक असून त्याच्या क्राफ्टचा विचार करता पुढील कामाची वाट पाहावी असा आहे. जेस्पर किडचा स्कोअर आणि चित्रपटाचं साऊंड डिझाइन या दोन्ही बाबी त्याच्या एकूण परिणामात भर घालतात.

यात उणीवा नाहीत अशातला भाग नाही. तरीही मोठ्या पातळीवर जाऊन विचार करता त्या खटकत नाहीत. त्यामुळे त्याचा एकूण प्रभावही लॉजिकल चुकांच्या जोरावर कमी-अधिक होण्याची शक्यता कमी होते. ‘तुंबाड’ त्यातील भुरळ घालणाऱ्या प्रॉडक्शन डिझाइनसोबतच त्याच्या सिनेमॅटिक चार्मकरिता मोठ्या पडद्यावर अनुभवणं गरजेचं आहे.

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......