एक चित्रकार म्हणून मी वेचलेले सौंदर्यपूर्ण व आनंददायी दृश्यानुभव
कला-संस्कृती - चित्रनामा
गोपाळ नांदुरकर
  • गोपाळ नांदुरकर प्रदर्शनातील काही चित्रं
  • Sat , 25 August 2018
  • कला-संस्कृती Kala Sanskruti चित्रनामा गोपाळ नांदुरकर Gopal Nandurkar जहांगीर कलादालन Jehangir Art Gallery

पुणेस्थित चित्रकार गोपाळ नांदुरकर हे गेली २५ वर्षं इलस्ट्रेशन्स व पेंटिंगच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. अनेक पुस्तकांची मुखपृष्ठं, अंतरंग चित्रं, चित्रकथा, जाहिरात व कॅलेंडरच्या क्षेत्रात त्यांनी काम केलं आहे. तसंच चित्रकलेच्या रंगमाध्यमांचा परिचय करून देणाऱ्या चार पुस्तकांचं त्यांनी सहलेखनही केलं आहे. अनेक समूह चित्रप्रदर्शनं व कार्यशाळा यांत सहभाग घेतला आहे. त्यांचं ‘Transcribing Beauty’ हे चित्रप्रदर्शन मुंबईच्या जहांगीर कलादालनात २८ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळात रसिकांना पाहता येईल. त्यानिमित्तानं त्यांचं हे मनोगत.

.............................................................................................................................................

‘Transcribing Beauty’ हे माझं पहिलं एकल चित्रप्रदर्शन. माझ्या चित्रनिर्मितीमागच्या प्रेरणा, प्रत्यक्ष निर्मिती प्रक्रिया व माझ्या चित्रकृतींद्वारे रसिकांसमोर दृश्यसौंदर्याचा एक अभिरूचीसंपन्न व कलात्मक आनंदाची अनुभूती देणारा आविष्कार मांडण्याचा हा प्रयत्न आहे!

त्याविषयी थोडक्यात हितगुज करण्याच्या हेतूनं केलेला हा शब्दप्रपंच. एक चित्रकार म्हणून चित्रमाध्यमातून कलात्मक भावनांची अभिव्यक्ती करण्यासाठी माझ्याकडे उपलब्ध असते, चित्रकलेची दृश्यभाषा. रेषा, आकार, रंग, छटामूल्य, पोत व अवकाश हे घटक ही या भाषेच्या विचारप्रसारणाची साधनसामग्री. या घटकांच्या अर्थपूर्ण, कलात्मक व प्रतिभासंपन्न वापरातून चित्रकार त्याची चित्रकृती साकारत असतो.

चित्रनिर्मितीच्या प्रेरणा शोधण्यासाठी चित्रभाषेची ही शिदोरी घेऊन जेव्हा मी सभोवतालच्या निसर्गाकडे, मानवी जीवनाकडे चित्रकाराच्या नजरेनं पाहू लागतो, तेव्हा चित्रनिर्मितीच्या शक्यता दिसायला लागतात. कधी समोरच्या दृश्यातला रेषा व आकारांचा आकृतीबंध मनावर ठसतो, तर कधी सूर्यप्रकाशानं उजळलेलं दृश्य आणि त्याचा परिणामस्वरूप तयार होणारा छायाप्रकाशाचा खेळ एक प्रकारचं नाट्य आपल्यासमोर साकारत असतो. काही वेळा समोर रंगांचा प्रखर उजळ उत्सव असतो, तर कधी खूप जवळजवळच्या रंगछटांची एक संयत, सुखद अभिव्यक्ती असते. कधी समोरच्या दृश्यात विविध पोत आणि आलंकारिक आकार प्रकर्षानं जाणवतात. असे हे दृश्यानुभव मला चित्रनिर्मितीची प्रेरणा देऊन जातात.

मग माझ्या स्केचबुकात पटकन काही स्केच स्वरूपाच्या नोंदी मी करतो. अगदी जलद पण महत्त्वाच्या घटकांना प्राधान्य देणारे हे स्केच माझ्या पुढील निर्मितीप्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते. सोबत कॅमेराही असतो. त्याद्वारे समोरचा दृश्यानुभव छायाचित्रित करून घेतो. त्याचाही मला पुढे खूप उपयोग होतो. या सामग्रीच्या आधारे जेव्हा चित्र आकाराला येऊ लागतं, तेव्हा अनेक कलात्मक निर्णय घेतले जातात. चित्ररचना हा चित्राचा आत्मा असतो. ती जास्तीत जास्त निर्दाष करण्याचा प्रयत्न केलेला असतो.

वर उल्लेख केलेल्या चित्रनिर्मितीच्या प्रेरणांमधून चित्राची संकल्पना मिळालेली असते. उदा. लेखासोबतच्या या बैलाच्या चित्रात सौष्ठवपूर्ण व सौंदयपूर्ण असा हा बैल जरी चित्रविषय असला तरी या चित्राची संकल्पना ही सूर्यप्रकाशानं उजळलेलं त्याच्या आकाराचं सौष्ठव व सौंदर्य रसिकापुढे मांडणं ही आहे. एक प्रकारे सूर्यप्रकाशाचा गौरव करणारं हे चित्र आहे.

या प्रदर्शनातील सुमारे ३० चित्रांमधून संवेदनशील मनानं मी घेतलेला दृश्यसौंदर्याचा असा विविधांगी शोध रसिकांसमोर मांडण्याचा माझा प्रयत्न केला आहे. निसर्ग हा चित्रकारांसाठी कायमच फार मोठा प्रेरणास्रोत राहिला आहे. निसर्गाचं अदभुत सौंदर्य आपल्या परीनं कवेत घेण्याचा प्रयत्न सारेच कलाकार करत असतात. चित्रकाराला स्वत:चं अनुभवविश्व जेवढं समृद्ध करता येईल, तेवढा तो अधिक प्रगल्भ होत जातो. त्यासाठी आम्ही सतत अभ्यासचित्रण दौरे करत असतो. या प्रदर्शनात मी राजस्थानातील जयपूर, जोधपूर, जैसलमेर, पोखरण इत्यादी शहरांमध्ये मिळवलेल्या काही चित्रसंकल्पना रसिकांना दिसतील. मानवाकृतीचं चित्रण, व्यक्तिचित्रण व मानवी जीवनाचं चित्रण हे माझे अत्यंत आवडते विषय आहेत.

लमाणी किंवा बंजारा समाजातील स्त्रियांनी स्वत: विणून, शिवून तयार केलेले अत्यंत कलात्मक व आकर्षक पेहराव आणि त्यांचा साजशृंगार हा माझा आवडता विषय आहे. कारण ते चित्रनिर्मितीला फारच पोषक आहे. लमाणी लोकांची होळी अनुभवण्यासाठी मी यवतमाळ जिल्ह्यात मुद्दाम गेलो होतो. तेथील स्थानिक मित्रांच्या मदतीनं मला खूप चांगल्या प्रकारे होळी पाहता आली. अनेक चित्रविषय मिळाले. या चित्रांसाठी ऑईल कलर, अॅक्रेलिक रंग, पेस्टल म्हणजे रंगीत खडू अशी रंगमाध्यमं वापरली आहेत.

मानवी मनाला जीवनाविषयी सकारात्मक ऊर्जा देण्याची, अभिरूचीसंपन्न, उदात्त सौंदर्यदृष्टी विकसित करण्याची फार मोठी ताकद दृश्यकलांमध्ये आहे. या कला आपल्या जीवनाच्या अविभाज्य भाग आहेत. ‘कस्तुरीसुगंध’ आपल्याजवळ आहे याचीच जाणीव आपल्याला नसल्यासारखी वाटते. एक चित्रकार म्हणून मी वेचलेले हे सौंदर्यपूर्ण व आनंददायी दृश्यानुभव प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी या प्रदर्शनाद्वारे उपलब्ध होत आहे.

माझ्या या संवादासाठी उत्सुक असणाऱ्या चित्रांना रसिक तसाच प्रतिसाद देतील असा विश्वास वाटतो.

.............................................................................................................................................

गोपाळ नांदुरकर

gopalnandurkar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......