‘चुंबक’ माणसातल्या विवेकावरचा विश्वास अधिक दृढ करत नेतो!
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
श्रीराम मोहिते
  • ‘चुंबक’ची पोस्टर्स
  • Sat , 04 August 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie चुंबक Chumbak स्वानंद किरकिरे Swanand Kirkire साहिल जाधव Sahil Jadhav संग्राम देसाई Sangram Desai

स्वार्थ, हव्यास आणि सूड यातून हाती लागणारं सुखही तितकंच पोकळ आणि कुरूप असतं. अशा ‘इन्स्टंट’ सुखासाठी चटावलेला भवताल निरागस माणूसपणाला सतत बोचकारत राहतो. नितळ विश्वासाला पायदळी तुडवत राहतो. अशा वेळी माणूस म्हणून आपल्यातल्या मौल्यवान निरागसतेला जपत राहणे, ही एक मोठी कसोटी ठरते. प्रामाणिकपणाला कालबाह्य ठरवणाऱ्या आणि निरागसतेची खिल्ली उडवणाऱ्या व्यवस्था इतक्या प्रस्थापित आणि बलदंड झालेल्या आहेत की, त्यात विवेकाचा संयत स्वरही पुरता नेस्तनाबूत होतो आहे. आपल्याकडे जे नाही ते हिसकावून घेण्याला ‘हक्कांचे’ गोंडस नाव दिले जात आहे. आपले हरवले तर ते शोधण्याचा विवेक हरवतो आहे. आपले हरवले तर दुसऱ्याचे ओरबाडून घेण्यालाच ‘न्याय’ म्हणण्याचे चलाख प्रयत्न होतात. मान्यताप्राप्तही ठरत जात आहेत. अशा कोसळत्या भवतालात मानवी संवेदना आणि निरागसता जपण्याचे मोल अधिकच वाढत जाते.

‘चुंबक’ हा संदीप मोदी दिग्दर्शित आणि सौरभ भावे लिखित चित्रपट हे मोल जपण्याचं अत्यंत कलात्मक आवाहन करतो. हाताळणीच्या बाबतीतही हा चित्रपट पारंपरिक ठरीव आडाखे तोडत स्वतःची वाट शोधत जातो आणि म्हणूनच सहजपणे त्यात यशस्वीही ठरतो. व्यावसायिक आणि समांतर अशा दोन सरळसोट प्रकारात कोणताही चित्रपट बसवण्याचा जो प्रयत्न केला जातो, त्याला बऱ्याच अंशी छेद देणारा आणि या दोन्ही प्रकारातली म्हणता येतील अशी वैशिष्ट्ये वापरूनही वेगळा ठरणारा सिनेमा साकारता येऊ शकतो, याचे ‘चुंबक’ हे अलीकडच्या काळातले एक महत्त्वाचे उदाहरण म्हणता येईल.

मुंबईमध्ये हॉटेलात वेटरचे काम करणारा आणि गावाकडे रसवंतीगृह सुरू करण्याचे स्वप्न बाळगणारा एक संवेदनशील मुलगा भालचंद्र उर्फ बाळू (साहिल जाधव), त्याला या स्वप्नपूर्तीसाठी मदत करणारा टपोरी मित्र डिस्को (संग्राम देसाई) आणि या दोघांच्या धडपडीत त्यांना भेटणारा एक भोळाभाबडा मित्र प्रसन्न ठोंबरे (स्वानंद किरकिरे) या तीन मध्यवर्ती पात्रांभोवती फिरणारी ही तशी साधीशी गोष्ट आहे.

पुढाऱ्याच्या वशिल्यामुळे बाळूच्या गावाकडे एसटीचा मोठा थांबा होणार आहे. बाळूला तिथं रसवंतीगृह टाकायचंय आणि स्टँडमधल्या गाळ्यासाठी लागणारे सोळा हजार रुपये लवकरात लवकर जमवायचे आहेत. नाहीतर गाळा दुसऱ्याला जाणार असतो. या निर्णायक प्रसंगात मित्राच्या सांगण्यावर विश्वास ठेवून बाळू एका झटपट पैसे मिळवून देणाऱ्या फसव्या ‘दामदुप्पट स्कीम’मध्ये स्वतःकडे असणारे पैसेही गमावून बसतो. साध्या सरळ बाळूला जगाच्या विश्वासघाताचा हा पहिला कडवट अनुभव येतो.

या सगळ्या छक्क्यापंज्यात मुरलेला त्याचा मित्र डिस्को त्याला पैसे मिळवण्याचा नवा भन्नाट मार्ग सुचवतो. आरबीआयच्या गव्हर्नरकडून एक कोटीची लॉटरी लागल्याचा एक बनावट मेसेज लोकांना पाठवून प्रोसेसिंग फी म्हणून वीस हजार रुपये अकाऊंटला भरून घेण्याची त्याची आयडिया असते. या आयडियातून त्यांच्या गळाला लागणारा पहिला आणि एकमेव ‘विजेता’ असतो प्रसन्न ठोंबरे हा गतिमंद इसम. वयानं वाढलेला पण तरीही या दुनियादारीचा स्पर्श नसणारा प्रसन्न अतिशय भोळाभाबडा असा माणूस. प्रसन्नला फसवण्याच्या झटापटीतून घडणारा पुढचा नाट्यमय प्रवास आणि त्या प्रवासाअंती बाळूला येत जाणारं माणूसपणाचं विलक्षण समंजस भान हा चित्रपटाचा गाभा आहे.

‘चुंबक’ हा वरवर एक अतिशय साधा, वास्तववादी आणि मनोरंजक सिनेमा वाटू शकतो. त्याचं तसं वाटणंही एका दृष्टीनं त्याचं यशच आहे. पण ‘चुंबक’चं खरं यश हे आहे की, तो सरधोपट मनोरंजनातून खूपसा पुढे जात जगण्यातल्या काही अनवट अशा पेचांना प्रगल्भपणे स्पर्श करतो. त्यातल्या बारकाव्यांनिशी केलेल्या हाताळणीमुळे तो ढोबळ वास्तववादी न राहता अनेक सूचक आणि प्रतीकात्मक जागा निर्माण करतो. ज्या या चित्रपटाला आशयदृष्ट्या अतिशय ताकद देणाऱ्या आहेत.

चित्रपटातील तीन प्रमुख व्यक्तिरेखांच्या निमित्तानं मानवी प्रवृत्तींचे तीन प्रातिनिधिक नमुने उभारून त्यांच्यातील आंतरसंबंधातून, टकरावांमधून या नैतिक प्रश्नांचे सूक्ष्म धागे अतिशय अलवारपणे गुंफत लेखक-दिग्दर्शकानं या माध्यमावरची आपली पकड सिद्ध केली आहे. स्वार्थाचा, बनेलपणाचा लवलेशही नसणारा प्रसन्न माणसामधल्या एका नितळ निरागसतेचं दर्शन घडवणारा आहे. तर दुसरीकडे भोवतीच्या बनेल दुनियादारीत पुरेपूर मुरलेला डिस्को जगाला जशास तसं उत्तर देण्याच्या भूमिकेचा अस्सल प्रतिनिधी आहे. डिस्कोची भूमिका आजच्या काळाच्या संदर्भात तर खूपच आवाहक ठरेल अशी आहे. तिच्यातला बेधडकपणामुळे तिच्या समर्थकांची संख्या समकाळात सतत वाढती असल्याचं जाणवतं.

मात्र लेखक-दिग्दर्शकानं या दोन्हींच्या मधे असणाऱ्या बाळूला या कहाणीचं नायकत्व देण्याची योजना करून या नाट्यातले अनेक अर्थपूर्ण पैलू उलगडले आहेत, हे या चित्रपटाचं महत्त्वाचं यश म्हणावं लागेल. बाळू एक पापभिरू म्हणता येईल असा एक प्रामाणिक मुलगा आहे. डिस्को त्याला सतत दुनियादारीच्या मुर्दाडपणाकडे खेचतो आहे, पण बाळूचं हळवं, पापभिरू मन त्याला सतत मागे खेचतं आहे. बाळूला प्रसन्नमधली निरागसता सतत खेचते आहे. डिस्को बाळूमधल्या चांगुलपणामुळे आणि बाळू प्रसन्नमधल्या चांगुलपणामुळे ओढला जातोय. प्रत्येकात दडलेलं हे ‘चुंबकत्व’ माणूसपणाच्या या अर्थशोधाला वेगवेगळी अर्थपूर्ण परिमाणं देत जातं.

प्रसन्न आणि बाळू यांच्यामध्ये घडणारे अनेक प्रसंग आपली अंगभूत दृश्यलय राखत आशयाचा विलक्षण प्रत्यय देणारे आहेत. गावातल्या हॉटेलच्या उदघाटनाच्या पोस्टरवर दगड मारण्याचा प्रसंग यादृष्टीनं खूपच सुरेख जमून आला आहे. या प्रसंगातील अभिनय, भावना आणि टायमिंग अक्षरशः अफलातून आहेत. या एकाच प्रसंगात प्रसन्न ही अख्खी व्यक्तिरेखा उभी राहते, हे दिग्दर्शकाचं मोठं यश म्हणावं लागेल.

अशा अनेक छोट्या छोट्या दृश्यांमधून पटकथाकार आणि दिग्दर्शकानं केलेली ‘बिटवीन द लाईन्स’ विधानं हे या चित्रपटाचं एक मोठं वैशिष्ट्य मानता येईल. आजी आणि प्रसन्न यांच्यात बाळूच्या घरी घडणारा एक मिश्किल संवाद यासंदर्भात पाहण्यासारखा आहे. केवळ फोनवरच्या मोजक्या संभाषणातून उभी राहणारी आणि उत्कंठा ताणत नेणारी प्रसन्नच्या बायकोची व्यक्तिरेखा, हे या चित्रपटाचं एक लक्षणीय वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारची पात्रयोजना मराठी चित्रपटात अपवादात्मक आढळते.

बाळूला पडणारी स्वप्नदृश्यं, त्यांचा एकंदर पोत चित्रपटाच्या दृश्यात्मक अनुभवाला वेगळं परिमाण देणारा आहे. बाळूच्या व्यक्तित्वाच्या प्रवासातील दोन महत्त्वाच्या टप्प्यांचं सूचक दर्शन घडवणारी ही स्वप्नदृश्यं चित्रपटाच्या एकूण आशयाच्या दृष्टीनंही मोलाची भर घालतात. अर्थनिर्णयाच्या विविध कलात्मक जागा निर्माण करणारे अनेक प्रसंग चित्रपटाचा अनुभव अधिकच गडद करत जातात.

अतिशय बारकाव्यांनिशी लिहिलेली पटकथा, सूचकपणे येणारे आणि चित्रपटाच्या या गाभ्याकडे घेऊन जाणारे अचूक संवाद, पात्रांची अचूक निवड, अतिशय सशक्त अभिनय, उत्तम छायालेखन आणि अतिशय अर्थपूर्ण असा शेवट, ही या चित्रपटाची बलस्थानं आहेत. मध्यंतरापूर्वीची चित्रपटाची काहीशी सैल हाताळणी आणि रेंगाळणारी गती वगळता त्यानंतर मात्र तो आपली आशयावरची पकड सिद्ध करतो आणि एक गोळीबंद आणि परिपूर्ण अनुभव देण्यात यशस्वी ठरतो.

प्रसन्न ठोंबरेच्या भूमिकेत स्वानंद किरकिरे यांनी अक्षरशः कमाल केली आहे. देहबोलीचा अप्रतिम वापर, अचूक टायमिंग आणि भूमिकेची आतून-बाहेरून अशी विलक्षण समज यामुळे ही भूमिका संस्मरणीय ठरते. प्रसन्नचा बाळूला लाडू देण्याचा प्रसंग, विशिष्ट वेळी भूक लागण्याची सवय अशा तपशीलांमधून पटकथाकारानं या व्यक्तिरेखेच्या बारकाव्यांवर केलेलं कामही यातून लक्षात येतं. साहिल जाधवनं बाळूच्या व्यक्तिरेखेचा प्रवास समजून घेऊन अतिशय अप्रतिम काम केलंय. डिस्कोच्या बाबतीत मात्र भाषेचा काहीसा गोंधळ जाणवतो. टायमिंगच्या काही उणिवा वगळता संग्राम देसाईनं या भूमिकेत उत्तम काम केलंय. प्रसन्नची बायको (विभावरी देशपांडे) आणि बाळूचा मामा या भूमिका छोट्या असल्या तरी लक्षात राहतात हेच त्यांचं यश ठरतं. या चित्रपटाच्या यशात छायालेखनाचाही मोठा वाटा आहे. यातल्या स्वप्नदृश्याचं चित्रण, बाळूच्या गावी जाताना उत्तरार्धात घडणाऱ्या प्रवासाचं चित्रण, या प्रवासात बॅंडवाल्यांसोबत घडणारा प्रसंग हे छायाचित्रणातील कल्पकतेमुळे संस्मरणीय ठरतात. यादरम्यानच्या अनेक ‘फ्रेम्स’ खूप काळ लक्षात राहणाऱ्या आहेत.

नाना प्रकारचं चुंबकत्व आपल्याला सतत खेचत असतं. कधी ते स्वार्थाचं असतं, कधी सूडाचं, तर कधी हव्यासाचं. त्यातून तात्पुरतं सुख मिळाल्यासारखं वाटतंदेखील. पण त्याचं शल्य मात्र सतत डाचत राहतं, आतून कुरतडतं. त्याच वेळी एक दुसरं चुंबकत्व आपल्याला आतून खेचत असतं- निरागसतेचं, विश्वासाचं आणि माणूसपणाचं. जे आपल्या वाट चुकलेल्या मनाला विवेकाचा मौल्यवान रस्ता दाखवतं आणि नितळ माणूसपणावरचा विश्वास अबाधित राखतं. ‘चुंबक’ हा चित्रपट माणसातल्या विवेकावरचा हा विश्वास अधिक दृढ करत नेतो. 

.............................................................................................................................................

लेखक श्रीराम मोहिते साहित्य आणि चित्रपट अभ्यासक आहेत.

shrirammohite@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......