“जेव्हा प्रस्थापित होईन, तेव्हा नवाजुद्दीन, इरफान किंवा नासीर यांच्यासारख्या भूमिका करेन” - कैलास वाघमारे
कला-संस्कृती - चलत्-चित्र
अभिषेक भोसले
  • कैलास वाघमारेच्या विविध भावमुद्रा
  • Sat , 26 August 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti चलत-चित्र कैलास वाघमारे Kailash Waghmare

रविवारची सुट्टी पकडून कैलास वाघमारेची मुलाखत करायचं ठरलं होतं. त्याला फोन केला आणि योगायोगानं तो गावाकडंच असल्याचं कळलं. जालना – सिल्लोड रोडवर राजूरपासून सात किलोमीटरवर कैलासचं गाव चांदई. तसा हा भाग दुष्काळग्रस्त. या वर्षीही दुष्काळाचं सावट आहेच. पण सकाळपासून पावसानं चांगलाच जोर धरलेला. फुलंब्री, राजूर करत कैलासचं गाव गाठलं.

कैलासची अनेक वेळा भेट झालीय, पण ती पुण्या–मुंबईत. त्याच्या विचारातला आणि बोलण्यातला ग्रामीण ‘टच’ त्याच्याशी संवाद साधताना सतत जाणवत असतो. आज थेट त्याच्या गावाकडं जाऊन त्याचा प्रवास, त्याच्या भागातल्या कलेबद्दलच्या संकल्पना, त्या कलांचा प्रभाव, त्याचा विस्तारत जाणारा अवकाश समजून घ्यायचा होता. कैलासची नाळ अजून मातीशी जोडलेली आहे. ते थेट पाहायला मिळणार होतं.

कैलासच्या घरी पोहचलो. गावच्या एकदम पलीकडच्या बाजूला कैलासचं घर. बाहेर दणकावून पाऊस. घरातल्या एका कोपऱ्यात मुगाच्या शेंगाचा ढीग लागलेला. अस्सल ग्रामीण अनुभव देणारं घर. हे ग्रामीण वास्तव त्याच्या जाणिवेतून निघणं अवघडच आहेच. म्हणून कैलास आमच्या पिढीच्या मराठी नाट्यसृष्टीतला आणि सिनेसृष्टीतला महत्त्वाचा कलाकार वाटतो.

कैलासशी त्याच्या गावापासून मुंबईपर्यंतच्या रंगभूमी आणि चित्रपटांपर्यंतच्या प्रवासाविषयी मारलेल्या या गप्पा.

.............................................................................................................................................

अभिषेक - कैलास आज आपण तुझ्या गावकडं आहोत, तिथूनंच सुरुवात करूयात. तुझ्या अनेक मुलाखतींमध्ये मी टुरिंग टॉकीजबद्दल वाचलंय. त्यामुळं तुला सिनेमाची आवड निर्माण झाली. सोबत इतर ग्रामीण कलाप्रकारही आहेत. तुझ्या घरात आणि या भागात कलेकडं कसं पाहिलं जातं?

कैलास - मी राजूरला शाळेला शिकायला होतो. राजूरला टुरिंग टॉकीज होती. घरून बससाठी पैसे मिळायचे. मग आम्ही गावातून रस्त्याला आलो की, लिफ्ट मागून लोकांच्या दुचाकीवर जायचो. मग तेवढे बसचे पैसे उरायचे आणि उरलेल्या पैशातून चोरून सिनेमा बघायला जायचो. दर शनिवारी तर आर्धी शाळा बुडवून १२ ते ३ चा पिक्चर पाहायला जायचोच. तिथं मिथून चक्रवर्तीचा ‘अहंकार’ नावाचा एक सिनेमा लागलेला असायचा. कित्येक वेळा तो एकच सिनेमा बघितलाय.

दुसरीकडं इथं आमच्या राजूरला तमाशाही लागायचा. मग तमाशाही बघायला जायचो. साधारणता: एक समज असतो तमाशा पाहून माणसं बिघडतात, पण आमच्या भागातलं ‘कल्चर’ जरा चांगलं आहे. तमाशाकडं कला म्हणूनच पाहिलं जातं. बाया सोडून सगळेच म्हणजे लहान पोरंदेखील तमाशाला जायचे. माझ्या वडिलांनी मला पहिला तमाशा दाखवला. माझ्या घरी बँडची पार्टी होती. त्यात मीही बँड वाजवायचो. बँड वाजवताना लोकं नव्या नव्या गाण्याची मागणी करतात. तमाशातही तसंच असतं. गाणं ऑफर केलं जातं. त्यामुळं सगळीकडूनच मी कलेशी बांधलो गेलो होतो.

राजूरला गणपतीचं मंदिर आहे. तिथं मोठी जत्रा भरते. राजूरच्या जत्रेतील टुरिंग टॉकीज म्हणजे आमच्यासाठीचा फिल्म फेस्टीव्हलच होता. म्हणजे कसं पुण्या–मुंबईत आपण फेस्टिव्हलला जातो. वैविध्यपूर्ण सिनेमे पाहतो, तसंच इथंही व्हायचं. ९-१० टुरिंग टॉकीज असायच्या. सलग सहा-सहा शो चालायचे. हे असं ‘कल्चर’ मला कलाकार म्हणून घडवण्यात खूप कारणीभूत ठरलं. ही जत्रा आमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरते. ग्रामीण जत्रांमधून माझ्यासारखे कलाकार जसं घडले, तसे कीर्तनकारही तयार झाले. जत्रेकडं पाहण्याच हा एक वेगळा दृष्टिकोन असू शकतो. जत्रा माणसाला समृद्ध करणारी असते, ती सर्वार्थानं माणसाला माणूस बनवते. ती माणूस घडवते. त्याचं ध्येय गाठण्यासाठी ती त्याला प्रेरणा देत असते.

अभिषेक - तू बँड वाजवायचास. त्यानंतर तू कलेकडं, नाटकाकडं वळलास. तेव्हा तुझ्या घरच्यांच्या, आजूबाजूच्या लोकांच्या प्रतिक्रिया कशा होत्या? कारण ग्रामीण भागात सिनेमा पाहणं किंवा तमाशा पाहणं ही वेगळी गोष्ट, पण त्यात काम करणं याचे संबंध नैतिक वगैरेशी आजही ग्रामीण भागात जोडले जातात.

कैलास - बरोबर यात गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे, कितीही काहीही झालं तरी सातत्यानं आपण नाकारलेले लोक आहोत. ती आपली पार्श्वभूमी आहे. नाकारलेपण तुमच्यातल्या विद्रोहाला जन्म देतं. त्यामुळं कुणाला काय वाटतंय, कोण काय म्हणतंय हे कधी पाहिलं नाही. ज्यांनी आपल्याला नाकारलं त्यांना आपण का स्वीकारायचं? आपण त्याला धुडकावून लावायचं. कोण काय म्हणतंय, काय विचार करतंय? याकडं कधी लक्षच दिलं नाही.

मी बँड वाजवायचो. त्यांचं विश्वच वेगळं आहे. आपला सिनेमा, आपल्या कादंबऱ्या आणि साहित्य त्यापर्यंत अजून पोहचलं नाही. सिनेमात जे काही त्या अनुषंगानं आलंय, ते ग्लॅमरस करूनच आलंय. मी जेव्हा बँड वाजवायचो, तेव्हा मला लाज वाटायची. तिथं मला नावं ठेवल्याचा ‘फिल’ यायचा. अरे यार, हे करण्यासाठी मी आलेलो नाही किंवा हे माझं क्षेत्र नाहीये, असं वाटायचं.

मी कायम लक्षात ठेवलं होतं की, मला कशानं मान मिळतो? गावात दहावी-बारावी पास झालो, तेव्हा सगळ्यांना अप्रुप वाटलं होतं. म्हणजे पास झाल्यावर सगळे आपल्याला छान म्हणतात. म्हणजे शिक्षण चांगलं आहे हे लक्षात आलं होतं. अकरावी-बारावीत गाणं म्हणायला लागल्यावर सगळे जण छान म्हणायचे. कॉलेजातल्या ४०० पोरांमध्ये आपल्याकडं लक्ष वाढायला लागलं, म्हणजे हे नक्की छान आहे आणि आपण याच्याकडं लक्ष द्यायला हवं. मग गाण्याकडं जास्त लक्ष दिलं. मग पुढं भाषण करायला लागलो. भाषणानं सगळेच कौतुक करायला लागले.

कुठं कार्यक्रम असला की, सर मला घेऊन जायला लागले. मग तिथंही लोकं छान म्हणायला लागली. मग हळूहळू पेपरमध्ये नाव यायला लागलं. गावचं नाव पेपरात येतं, तेव्हा एक गोष्ट छान होतं, गावातले लोक जात-धर्म-पंथ विसरतात. त्या एक तासापुरतं का होईना ते विसरतात. जसं देशाचं नाव आलं की, देशभक्ती जागृत होते ना, तसं गावभक्ती जागृत होते!

त्यामुळं मी जेव्हा गाव सोडून जालन्याला शिकायला गेलो, तेव्हा शिक्षण तर घेतच होते. पण जास्त लक्ष गाणं, भाषणं, कथाकथन कसं चांगलं करता येईल याकडं देत होतो. एकांकिका, वादविवाद स्पर्धा कशा करेन. कसं बक्षीस मिळेल आणि माझं नाव पेपरमध्ये येईल. पेपरात नाव येण्यासाठी जे जे करता येईल ते मी करत गेलो. हळूहळू जाणिवा व्हायला लागल्या, गोष्टी समजायला लागल्या. लहानपणापासून आतून हे होतंच, पण स्पष्ट नव्हतं की आपल्याला सिनेमात जायचंय वगैरे. कारण तसं स्वप्नही पाहू शकत नव्हतो. कारण ते स्वप्नाच्या पलीकडचं होतं.

शिक्षणानं मान आहे कळल्यामुळं जास्तीत जास्त शिक्षण घेत गेलो. नवीन कुठं शिक्षण घ्यायचं याचा शोध घ्यायचो. आईचा पाठिंबा प्रचंड होता. घरी बसून जरी राहिलो तरी आई हटकायची. पैशाची अडचण असेल तर काही मार्ग काढायची. गळ्यातले सोन्याचे मनी गहाण ठेवून शिकवत राहिली. आई, भाऊ आणि वडिलांचा पाठिंबा होता. पेपरामध्ये नाव येत असल्यानं गावातली लोकं घरच्यांना सांगायची. त्यांनाही बरं वाटायचं. त्यामुळं सिनेमात जाण्याच्या निर्णयानं कुणी नावं ठेवली नाहीत. कारण तशी पार्श्वभूमी तयार झाली होती.

अभिषेक - कैलास वाघमारेची ओळख महाराष्ट्राला झाली, ती ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकामुळं. वैचारिक अधिष्ठान असणारं नाटक ‘मेन स्ट्रीम’ बनणं हे क्वचितच घडतं. त्याबद्दल काय वाटतं?

कैलास - प्रेक्षक वाढत जातो, तेव्हा नाटक मुख्य प्रवाहातीलच बनतं. तुमचा इश्शू कमर्शिअल पॉइंटनं मांडणं गरजेचं आहे. तसंच झालं पाहिजे. ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ हे नाटक तसंच होते. ते मनोरंजन करतं, पण सांगायचा तो संदेश देऊन जातं. ते विचारांचा डोस जबरदस्तीनं देत नाही. शिवाजी महाराज असेच होते, तसेच होते, यांचे शत्रू नव्हते किंवा त्यांचे होते हे सांगण्याची त्याची पद्धत मनोरंजनात्मक आहे. म्हणजे काय तर त्या त्या माध्यमाचा साचा आपल्याला घेता आला पाहिजे. हे आम्हांला त्या नाटकामुळं कळायला लागलं.

अभिषेक - सध्या तू अनेक वैविध्यपूर्ण भूमिका करत आहेस. एकाच वेळी समांतर आणि व्यावसायिक रंगभूमीवर वावरत आहेस. सिनेमा करत आहेस. ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’मधली तुझी भूमिका आक्रमक होती, तर ‘मनातल्या उन्हात’ सिनेमातली शांत होती. ज्या सामाजिक वास्तव आणि पार्श्वभूमीतून आपण जातो, त्याची अशा वैविध्यपूर्ण भूमिका साकारताना किती मदत होते?

कैलास - खरं तर मला खूपच छान वाटतंय की, मी गावामधून गेलो. त्याचा फायदा मला नक्कीच होतो. दिग्दर्शक सांगण्याआधीच मला कळतं की, करायचं काय आहे, मग फक्त टेक्निक समजून घेतो. अनुभव घेत जगल्यामुळं जे ‘जिस्ट’ आहे, ते आधीच तयार असतं. माझा लहानपणापासूनचा प्रवास ग्रामीण भागात झालाय. माझी ‘मनातल्या उन्हात’ सिनेमातली भूमिका बघितली, तर त्यातलं जे आहे ते मी वास्तवात भीषण स्वरूपात बघितलंय, अनुभवलंय. त्याची तीव्रता मला माहिती आहे. दुष्काळामुळं गावाकडं कशी वाताहात होते, जगण्याची मारामार कशी होते, कुटुंबं कशी विस्थापित होतात, हे मला माहिती आहे. त्यामुळं ते साकारताना आपोआप अनुभवातून आणि आतून आलं.

याच्याच विरोधी ‘शिवाजी अंडरग्राऊंडइन भीमनगर मोहल्ला’मधली भूमिका आहे. आम्ही संभाजी भगत यांच्यासोबत जलसा करत होतो. तेव्हा गावोगावी फिरलो. तिथं चळवळ काय असते बघितली आहे, अनुभव घेतला आहे. चळवळीतली माणसं बघितली आहेत. चळवळीच्या दृष्टीकोनातून समाज बघितला आहे. चळवळीचा कार्यकर्ता म्हणून जगलेला अनुभव ती भूमिका करताना कामी आला.

खूप वेळा सिनेसृष्टीतल्या रंगभूमीवरच्या लोकांमधून असं बोललं जातं की, मी या अमुक अमुक भूमिकेवर काम करतोय. सर्च चालू आहे. मला अद्याप तरी असं सांगायची आणि करायची गरज पडली नाही. जेव्हा एखादी कार्पोरेट भूमिका करेन, तेव्हा गरज वाटू शकेल, कारण सध्या मी ज्या भूमिका करतोय, त्या मी अनुभवलेल्या वास्तवाशी जवळच्या आहेत.

सध्या मी ‘शिवाजी अंडरग्राउंडइन भीमनगर मोहल्ला’ हे मराठी नाटक करतोय आणि ‘लोरेटा’ हे इंग्रजी नाटक करतोय. हा अनुभव खूप महत्त्वाचा आहे. ही दोन्ही नाटकं आणि अनुभव प्रचंड वेगळा आहे.

एकदा बेंगलोरमध्ये आमचा ‘लोरेटा’चा प्रयोग होता. मुंबईतून विमानानं बेंगलोरला पोहचलो. तिथं सगळ्या कलाकारांना न्यायला रॉयल कार आल्या होत्या. राहायची व्यवस्था फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये बुफे जेवण. सकाळी बरोबर सराव केला. दुपारी थिएटरमध्ये सराव केला. संध्याकाळी शो केला. रात्री परत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आलो. राहिलो. आणि विमानानं वापस मुंबई..

त्याच बेंगलोरमध्ये, त्याच रंगशंकरा थिएटरमध्ये ‘शिवाजी अंडरग्राऊंडइन भीमनगर मोहल्ला’चा प्रयोग करायला गेलो होतो. तो अनुभव ‘लोरेटा’च्या एकदम विरोधी. या प्रयोगासाठी मुंबईवरून बेंगलोरला बसनं दोन दिवस प्रवास करून गेलो. कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. सगळे प्रवासानं थकलेले. सरावाला कोणी तयार नाही. राहायचं हॉटेल लांब. थिएटर ते हॉटेल प्रवास बसनंच. भारी वाटणारं बेंगलोर शहर ट्राफिकमध्ये अडकल्यावर कसं आहे ते कळालं. तेव्हा कसल्या आल्यात रॉयल गाड्या! शो संपल्यावर सगळ्यांना जेवायला बिर्याणीची पॉकिटं.  आणि परत दोन दिवस प्रवास करून मुंबईला वापस. एवढा फरक आहे! पण हे दोन्ही अनुभव प्रगल्भ बनवत आहेत. असे वेगवेगळे अनुभव एकाच वेळी घेता येतात. त्यातून घडत आहे.

अभिषेक - तू ग्रामीण भागातून सिनेसृष्टीत गेलास. सिनेसृष्टीचं एक विशिष्ट सौंदर्यशास्त्र आहे. त्याला ‘ब्राह्मणी सौंदर्यशास्त्र’ असंही अनेक वेळा म्हटलं जातं. त्यामुळं तिथं अस्तित्व निर्माण करण्याचा संघर्ष कसा होता? ग्रामीण भागातून गेलेल्या कलाकारासाठी हा संघर्ष कसा असतो?

कैलास - काय आहे या संदर्भात दोन गोष्टी असतात. एक तर तुम्ही स्वत:कडं ‘अँक्टर’ म्हणून पाहता की, ‘हिरो’ म्हणून पाहता, हे महत्त्वाचं आहे. तुम्ही स्वत:ला हिरो म्हणून पाहत असाल तर तुम्हांला त्रास असतो. तुम्हाला सातत्यानं त्याचा सामना करावा लागतो. मी स्वत:ला ‘अँक्टर’ म्हणून पाहतो. त्यामुळं स्वच्छंदीपणे काम करतो. माझं माझ्या स्वत:कडं हिरो म्हणून बघणं अजून तरी सुरू झालेलं नाही.

माझी सध्याची धडपड ही तुमच्यात म्हणजे इंडस्ट्रीत कलाकार म्हणून घ्या यासाठीची आहे. ज्या वेगवेगळ्या भूमिका मिळत जातील त्या मी स्वीकारत चाललोय. ‘मनातल्या उन्हात’नंतर ‘हाफ टिकिट’मधला ‘पोक्या’ केला. तो सिनेमाही समांतर सिनेमासारखाच झाला. सध्या माझा ‘भिकारी’ हा सिनेमा थिएटरमध्ये चालू आहे. त्यातही माझी वेगळीच भूमिका आहे. ‘मेनस्ट्रीम’मधली माझी कडक भूमिका म्हणजे ‘ड्राय डे’ सिनेमातली. तो लवकरच प्रदर्शित होतोय.

जेव्हा पूर्णत: प्रस्थापित होईन, तेव्हा नवाजुद्दीन सिद्दीकी, इरफान खान किंवा नासीर भाई यांच्यासारख्या भूमिका करेन.

दुसरीकडं आपल्या इथल्या ऑडियन्सची मानसिकता विचित्र आहे. पण त्यात त्यांचीही चूक नाही. सिनेमा काढणाऱ्या लोकांनी ती मानसिकता बनवली आहे. ती ब्रेक करणं अवघड आहे. जेव्हा ‘फॅन्ड्री’त जब्यासारखं कॅरॅक्टर साकारलं गेलं, तेव्हा त्याच्यात्याच्या रंग आणि रूपावर व्हॉट्सअपवर जोक सुरू झाले.

आजही नवाजुद्दीन सिद्दीकीला हिरोचा रोल मिळत नाही. त्याला ‘कॅरक्टर बेस्ड’ रोल मिळतो. म्हणजे तो एक स्ट्राँग कॅरॅक्टर म्हणून लोकांपर्यंत जातो. तसंच माझ्यासारख्याच्या बाबतीत आहे. मी जेव्हा हिरो म्हणून जातो, तेव्हा सामान्य प्रेक्षक ते स्वीकारत नाहीत. कारण त्यांना ‘हिरो’ म्हणून ‘चॉकलेट बॉय’ हवा असतो. ‘फँटसी’मध्ये जगणारा आजचा प्रेक्षक आहे. आपल्या अवतीभोवती जे वास्तव नाही, ते त्यांना पाहायचंय. प्रत्येकाच्या आयुष्यात ते झालं पाहिजे असं वाटतं. त्यामुळं त्यांना हिरो गोरा, हिरोईन ‘हॉट’च पाहिजे असते आणि त्या कॅटॅगिरीत आपण बसत नाही. आपण अँक्टरच्या कॅटॅगिरीत परफेक्ट बसतो. हिरो आणि कॅरॅक्टर आर्टिस्ट म्हणून काम करण्यात भरपूर तफावत आहे. भारतात आठवड्याला आठ सिनेमे रिलिज होतात. जो चालतो तो ठेवला जातो. नाही, तो लगेच काढला जातो. त्यामुळं निर्माते रिस्क घेत नाहीत.

अभिषेक - तुला असं वाटता की लोकांना सिनेमातून वास्तव पाहायचंच नाही?

कैलास - लोकांना फँटसी हवीय. आपल्याकडं सिनेमा फँटसी म्हणूनच सादर केला गेलाय. सिनेमा बघणं म्हणजे वाह्यातपणा. “काय खरंय त्या पोराचं, पिक्चर पाहतं, गाणं म्हणत फिरतंय” असं सर्रास बोललं जातं. म्हणजे सिनेमा हा परिवर्तनासाठी नाही असंच रूजवलं गेलंय. तो फक्त मनोरंजनासाठी आहे. सिनेमा म्हणजे बिघडवणारं ‘कल्चर’ अशी आपली आजही मानसिकता आहे. त्यामुळं सिनेमामुळं माणूस बदलतो, काहीतरी भारी होतं, असं कोणालाच वाटत नाही.

जालन्यातले उच्चभ्रू लोक जालन्यात सिनेमा पाहत नाहीत, तर ते औरंगाबादला जाऊन सिनेमा पाहतात, हे मला परवाच एका कार्यक्रमात कळालं. जालन्यामध्ये चार वेगवेगळी चांगली चित्रपटगृहं आहेत. पण तिथं सिनेमा बघितला जात नाही, कारण सिनेमाकडं पाहण्याचा सामाजिक दृष्टीकोन. मला वाटतं, सिनेमाकडं परिवर्तनाचं माध्यम म्हणून पाहायला हवं.

याला दुसरी बाजूही आहे, चळवळीतल्या लोकांचं काय झालंय? सतत सिनेमा, पुस्तकं यातून चळवळीला काय मिळतंय याच दृष्टिकोनातून पाहिलं जातं. त्यानुसार त्याची चिकित्सा केली जाते. पण सामान्य प्रेक्षकांना सिनेमाकडून तसं काही अपेक्षित नसतं. सामान्य प्रेक्षकांना त्या सिनेमामुळं मला चार दिवस चावडीवर बसून गप्पा मारता येतात का, हे अपेक्षित असतं.

अभिषेक - कला किंवा सिनेमा हे परिवर्तनाचं माध्यम आहे, याची जाणीव तुला कशी झाली? त्यासंबंधीची तुझी काही विशेष आठवण आहे का?

कैलास - २००६मध्ये खैरलांजी जातीय अत्याचाराचं प्रकरण घडलं होतं. आम्ही कॉलेजमध्ये असताना खैरलांजीवर युवक महोत्सवासाठी वगनाट्य बसवलं होतं. परिवर्तनासाठी सिनेमा वगैरे आपल्याला खूप प्रगल्भ झाल्यावर कळतात. पण तेव्हा फक्त काहीतरी चुकीचं घडतंय एवढं कळायचं आणि ते मांडायचं असं होतं.

आज मला त्याचा विचार करताना खूप बरं वाटतं. त्यावेळी चळवळीची पार्श्वभूमीही नव्हती. पण आम्ही ते वगनाट्य बसवलं होतं. त्या वगनाट्यामध्ये खैरलांजीची घटना प्रतीकात्मक पद्धतीनं मांडली आणि केंद्रस्थानी भोतमांगेंना ठेवलं होतं. हे वगनाट्य आमच्या सर लोकांनी नाकारलं. त्यांच्या मताप्रमाणं हा विषय ज्वलंत होता. शेतकऱ्यांचं वगैरे करा म्हणजे जे सगळ्यांचं असेल. खैरलांजी हे कसं दलितांचं आहे, असं त्याचं म्हणणं होतं. त्यातून जाणवायला लागलं की, काहीतरी चुकीचं घडतंय. मग विचार करायला लागलो, त्यातून कला ही कशी परिवर्तनासाठी असते ते समजायला लागलं.

अभिषेक - तुला कोणता अभिनेता आवडतो? नवाजुद्दीन सिद्दीकीबद्दल तर तू बोललासच. समांतर आणि व्यावसायिक सिनेमाकडं, त्यातल्या कलाकारांकडं तू कसं पाहतोस? त्यात तू स्वत:ला कुठं पाहतोस?

कैलास - सध्या मी व्यावसायिक आणि समांतर सिनेमा या दोन्ही ठिकाणी वावरतोय. त्यामुळं मला कोणीच चूक वाटत नाही. व्यावसायिक सिनेमातील कलाकारही प्रचंड कष्ट घेतोच. त्यामुळं त्यांना चूक म्हणता येत नाही. त्यांचे सिनेमे कमर्शिअल असतात ही वेगळी गोष्ट.

मला इरफान खान प्रचंड ‘मोटिव्हेट’ करतो. तो ‘हॉलीवुड’ला आपलं समजतो. स्वत:ला ‘हॉलीवुड’मधला समजतो. तो मुक्त आहे. स्वता:ला बंधनं घालून तो जगत नाही. मलाही तेच वाटतं. स्वत:ला मराठीपुरतंच मर्यादित करावं, हे मला पटत नाही. म्हणून मी इंग्रजी नाटकही करतोय. तसाच मला वैश्विक सिनेमाही करायचाय... जो सिनेमा जगातल्या सर्वांना आवडला पाहिजे.

कैलासचा हा प्रवास थक्क करणारा आहे. तो त्याच्या प्रत्येक रोलला अनुभवाशी जोडू पाहात होता. तेवढा त्याचा अनुभव त्याच्या बोलण्यातून जाणवत होताच. हा प्रवास फक्त कैलासचा नाहीये तर त्याला लाभलेल्या ग्रामीण सांस्कृतिक अवकाशाचाही प्रवास आहे. स्वप्नाच्या दुनियेत न रमता कष्टाच्या आणि जैविक अनुभवाच्या जोरावर इथंपर्यंत पोहचल्यामुळंच त्याचे पाय आजही गावच्या मातीत आहेत. म्हणूनच तो पावसानं झालेल्या चिखलातून अनवाणी मला निरोप द्यायलाही बिनदिक्कत येतो.

.............................................................................................................................................

लेखक अभिषेक भोसले मुक्त पत्रकार आहेत.

bhosaleabhi90@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Heena khan

Sat , 26 August 2017

Good interview abhishek...


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......