परोक्ष : अंगावर काटा आणणारा थरारक लघुपट
कला-संस्कृती - चलत्-चित्र
महेंद्र तेरेदेसाई
  • ‘परोक्ष’ या लघुपटाचं एक पोस्टर
  • Sat , 22 July 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti चलत-चित्र महेंद्र तेरेदेसाई Mahendra Teredesai परोक्ष Paroksh गणेश शेट्टी Ganesh Shetty

पर(आड) + अक्ष(डोळे) = परोक्ष. म्हणजे डोळ्याआड घडलेले आणि अ + पर + अक्ष = अपरोक्ष म्हणजे डोळ्यासमोर घडलेले. मराठीत हे दोन शब्द नेमके विरुद्ध अर्थाने वापरले जातात. मुळात परोक्ष ही संस्कृतात व्याकरणातील संज्ञा आहे, Remote past tenseसाठी वापरली जाणारी. म्हणजे रामायण-महाभारतकालीन कथा सांगायची तर ती परोक्ष भूतकाळात सांगितली जाते. आणि त्यासाठी क्रियापदाची वेगळी रूपे वापरली जातात. ‘गेल्या दशकात भारतीय क्रिकेटवर तेंडुलकरने राज्य केलं’ आणि ‘रामानं आयोध्येवर राज्य केलं’ मराठीत या दोन्ही वाक्यांत ‘केलं’ हेच क्रियापद वापरलं जातं, पण संस्कृतात तसं होत नाही. साध्या भूतकाळात ‘आकरोत्’ तर परोक्ष भूतकाळात ‘चकार’ हे क्रियापद वापरलं जातं.

गणेश शेट्टीचा ‘परोक्ष’ नावाचा लघुपट पाहिला आणि त्या नावाचा, त्या शब्दाचा नेमका अर्थ शोधावासा वाटला. एखाद्या कलाकृतीची श्रेष्ठता, ती तुमच्या स्मृतीत किती काळ राहते, त्याचबरोबर ती तुम्हाला किती अंगाने भिडते यावर अवलंबून असते. तेरा मिनिटांचा ‘परोक्ष’ असाच अनेक दिवस तुमच्या मनात रेंगाळत राहतो, तो त्यातल्या वातावरण निर्मिती (दृश्य आणि श्राव्य), योग्य पात्र-रचना आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गोष्ट सांगण्याचे कसब.    

हल्ली लघुपटांचे आणि त्यांच्यातल्या स्पर्धाचे पेव फुटले आहे. तसे ते होणारच, कारण तुम्ही आता कॅमेरा म्हणून तुमचा फोनही वापरू शकता. आणि शुटिंग म्हणजेच सिनेमा हा जर, काही व्यावसायिक(?) दिग्दर्शकांचाच समज असेल, तिथे या हौशी ‘फिल्ममेकर्स’ची काय कथा?

नाटक नाही लिहिता येत तर एखादी एकांकिका लिही असा सल्ला देणारे काही प्रथितयश असतात, तसेच ते या हौशी फिल्ममेकर्सना भेटतात.

‘अरे, पूर्ण सिनेमा करण्याआधी एखादी शॉर्ट फिल्म करून बघ ना!’

‘का?’

…तर ती स्वस्तात आणि कमी कष्टात(?) होते म्हणून?

नाटकापेक्षा एकांकिका लिहायला सोप्पी असते हा जसा गैरसमज आहे, तसाच हा एक गैरसमज आहे. अर्थात यात चांगला अथवा प्रामाणिक, हा प्रयत्न वा दर्जा अभिप्रेत आहे.  

लघुपट कसा करायचा? तर, फुटकळ सामाजिक, राजकीय किंवा बेगडी देशप्रेमावरचा एखादा किस्सा (शेतकरी, शौचालय, स्वच्छतापासून ते बेटी बचावपर्यंत) घ्यायचा आणि करायचं शुटिंग. आणि गल्लीतल्या कुठल्या तरी चित्रपट महोत्सवात त्याची वर्णी लावायची. त्यांनाही असे भाग घेणारे महाभाग हवेच असतात. मग त्या महोत्सवाची पिसे सोशल मीडियावर मिरवायची. त्याला दणादण लाईक मिळवायचे. ‘ग्रेट भावा’, ‘बढते रहो दोस्त’ अशा कमेंटही मिळतात.  

तीस सेकंद किंवा काही मिनिटाची जाहिरातही तुम्हाला एक पूर्ण लांबीचा चित्रपट बघितल्याचा आनंद वा समाधान देऊ शकते. उदा. गुगलची ही जाहिरात. ज्यात फाळणीमुळे विलग झालेल्या दोन मित्रांची कथा साडेतीन मिनिटांत दाखवली आहे.

ज्या भावना, जे नाट्य, रंगवायला काहींना अनेक रिळं (हल्ली जीबी) घालवावी लागतात, ते या जाहिरातीत साडेतीन मिनिटांत दाखवले आहे.

एका सत्य घटनेवर आधारित ‘परोक्ष’मध्ये तीच ताकद आहे.

आपल्या चि. त्र्यं. खानोलकर किंवा श्री.ना. पेंडसे यांच्या कादंबरीत शोभेल अशी दक्षिणेकडील किनारपट्टीजवळची नारळी-फोफळीची एक वाडी. नवरा शेखर, बायको सुजया आणि त्यांची सात-आठ वर्षांची मुलगी अनन्या. एक खातं-पितं कुटुंब.

वाडीतली ती रम्य सकाळ. माडावरून नुकतेच उतरवलेले नारळ सुजया उचलून परसात ठेवतेय. वाडीतली नित्य-नेमाची सकाळची कामे उरकते आहे. चरायला सोडलेल्या गायीला निगुतीने परत गोठ्याकडे घेऊन जात असतानाच ती गाय खिळते. हंबरते. सुजया तिला खेचू पाहते आणि अचानक वाडीत एका लहान मुलीच्या रडण्याचा भयाण आवाज घुमू लागतो. सुजया दचकते. रडणे काही थांबत नाही. सुजया सर्वत्र बघते. झाडावर… माडावर... तिला कुठेच काही दिसत नाही. काही वेळाने रडणे थांबते. घाबरलेली सुजया पुन्हा कामाला लागते. ती धसकलेली असते.

काही वेळाने बाजारात दूध विकायला गेलेला शेखर अनन्याला शाळेतून घेत एम-८०वरून परततो. तिच्या हातात पैसे देतो. भैसटलेल्या तिच्या हातातून ते पैसे खाली पडतात. शेखर आवाक्. ‘काय झालं?’ तिला विचारतो. ती त्याला चाचरत सांगते. तो विश्वास ठेवत नाही. जिथून आवाज आला होता, ती जागा सुजया त्याला दाखवते. तो नीट पाहतो. मग सगळ्या शक्यतांचा विचार करत तिला खोटी पाडतो. दोघे घराकडे परततात. त्याच संध्याकाळी दिवे-लागणीच्या वेळात शेखर परसात नारळ सोलत असतो. सुजया, देवा जवळचा दिवा घरभर फिरवत शेखरकडे येते. तो नुकत्याच न्हालेल्या सुजायाची छेड काढतो. ती त्याला डोळ्याने दटावते आणि इतक्यात दिवे जातात. हे खरे तर गावखेडी नेहमीचच. पण आज सुजया भयभीत होते. शेखर मात्र सहजपणे अंगणातला कंदिल लावतो आणि तत्क्षणी तो भयाण रडण्याचा आवाज सुरू होतो. आता तो फक्त सुजयालाच नाही तर शेखरलाही ऐकू येतो. आणि सुरू होतो आपल्या कोकणासारखा तो भास-आभासाचा खेळ. घाबरलेल्या सुजयाच्या सांगण्यावरून शेखर ताबडतोब आपल्या भावाला बोलावून घेतो. भाऊ त्याच्या गड्याला घेऊन त्वरित तिथे येतो. आणि शोध सुरू होतो त्या अज्ञाताचा.

जेव्हा गोष्टी तर्काने सुटत नाहीत, तेव्हा त्यातल्या अतर्क्याचा शोध सुरू होतो. जो आपल्यासारख्या सामान्यांच्या बुद्धिपलीकडचा असतो. म्हणून मग दुसऱ्याच दिवशी भगताला पाचारण केले जाते. असे काय आहे जे त्या वाडीत घुटमळतेय? रडतेय? कोणाची चूक? कुठला प्रमाद कोणाकडून नकळत तर घडला नाही ना? आणि असेलच तर तो केव्हा? आज, वर्तमानात? की भूतकाळात? की परोक्ष भूतकाळात? की हे आपले कर्म नसून दुसऱ्याच कोणाची करणी तर नाही ना? आणि असलीच तर या करणीवर तोडगा काय? यातले गूढ उकलायचे कसे?

आणि शेवटी जेव्हा ते उकलते तेव्हा आपण अवाक् होतो. अज्ञानात सुख असते, पण अज्ञाताची मात्र भीती वाटते. आणि भीतीने ग्रासलेले हे मन सैरभैर होत नको ते डोक्यात आणते. आणि शेवटी परामानसशास्त्रापर्यंत गेलेली मानसिकता जेव्हा वास्तवावर आदळते, तेव्हा मात्र आपण खजील होतो. जमिनीवर येतो.

सिनेमा आधी कागदावर लिहिला जातो आणि मग तंत्रांच्या साहाय्याने तो अनेक अंगांनी साकारला जातो. बजेट वा त्याची लांबी ही त्याची मर्यादा असू शकत नाही, तर अज्ञान आणि आळस हेच तुमचे अडसर असू शकतात. आणि त्यासाठी तुम्हाला किमान माध्यमाच्या सौंदर्याचे, त्याच्यातल्या ताकदीचे ज्ञान होणे महत्त्वाचे असते आणि ते आळस झटकल्याशिवाय होत नाही.

आधीच सांगितल्याप्रमाणे या लघुपटाचे यश त्याच्या ‘स्टोरी टेलिंग’मध्ये आहे. या गोष्टीचा शेवट हीच बहुधा ती ‘सत्यघटना’ असावी. ज्यावर ‘Reverse Engineering’ तंत्राने पूर्ण गोष्ट बांधली गेली असावी. गोष्ट बांधताना जी पात्रे उभी केली आहेत, ती अस्सल वाटतात. त्यासाठी योजलेले कलाकार आणि त्यांचा अभिनय गोष्ट गडद व्हायला मदत करतात. एकामागून एक रंगत जाणारे प्रसंग. त्यांची नेमकी दृश्य विभागणी. त्याचे संकलन. त्या दृश्य संकलनाला पूरक असे ध्वनी संकलन. गाईचे हंबरणे- त्याचवेळेस हंबरणारी गाय दिसणे आणि लगेच तो लहान मुलीच्या रडण्याचा आवाज घुमू लागणे. त्याचवेळेस त्या वाडीचा शॉट. या दृश्य आणि ध्वनी संकलनामुळे तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.

जेव्हा शेखरचा भाऊ गवताची चूड पेटवत (पेटलेल्या चुडीचा चरचरणारा आवाजसुद्धा एक परिणाम साधतो) रात्रीचा त्या वाडीत जाऊन त्या आवाजाचा शोध घेऊ लागतो, तेव्हासुद्धा असाच परिणाम साधला जातो. सिनेमात दृकश्राव्य माध्यमातल्या सर्व कलांचा समावेश करता येतो हे खरे आहे, पण बऱ्याच वेळेला तो करायचा कसा हेच कळत नाही. पण जेव्हा तो नेमकेपणाने केला जातो, तेव्हा त्याचा जो परिणाम साधला जातो तो या लघुपटात आपल्याला अनुभवायला मिळतो.

या लघुपटाची प्रत्येक चौकट, त्यातले घटित, त्यामुळे निर्माण होणारा आवाज, त्यातून साधलेला परिणाम हे सगळे अपघाती नसून नियोजित आहे. आधीच सांगितल्याप्रमाणे चूड पेटवून घेतलेला शोध, सुजयाचे स्वप्न दृश, महिषासुर आणि अनन्याचा खेळ, भगताने घातलेली मांड, तो विधी या सगळ्याची रचना फारच वेधक आहे. जी तो लघुपट पाहूनच अनुभवता येईल.

एक आग्रहाची विनंती हा लघुपट कुठेही बघा, अगदी तुमच्या मोबाईलवरही चालेल, पण हेडफोन शिवाय पाहू नका.

गोष्ट, कहाणी, किस्सा अनेक सांगतात. बऱ्याच काळ तो आपल्या आठवणीतही राहतो. पण ते सांगण्याची पद्धतच त्याचा परिणाम तुमच्या मनात दीर्घकाळ राहायला मदत करते.

हा लघुपट बघताना एक लक्षात येते की, एखाद्या घटनेकडे आपण अर्ध कलुषित जाणीवांतून बघतो अथवा ‘परोक्ष’ लाभलेल्या नेणीवेतून.

लेखक चित्रपट व नाट्यदिग्दर्शक आणि लेखक आहेत.

mahendrateredesai@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......