पहिलं महायुद्ध हे विसाव्या शतकातलं पहिलं संकट होतं, ज्यानं नंतर संकटांची साखळी निर्माण केली!
दिवाळी २०१८ - संकीर्ण
रवींद्र कुलकर्णी
  • पहिल्या महायुद्धावरील एका लघुपटाचं पोस्टर
  • Wed , 24 October 2018
  • दिवाळी २०१८ संकीर्ण पहिले महायुद्ध World War I दुसरे महायुद्ध World War II

ब्रिटनमधल्या पॅडिंग्टन स्टेशनवर सार्जंट जॅगरचा पूर्णाकृती ब्रांझचा पुतळा १९२२ पासून उभा आहे. अंगावर लष्करी कपडे असले तरी त्याने गळ्याभोवती गुडाळलेला स्कार्फ हा त्याच्या लष्करी गणवेशाचा भाग नाही. तो स्कार्फ त्याला कोणीतरी पाठवलेला आहे. त्याच्या हातात बंदूक नाही. तो पत्र वाचत आहे. ते पत्र त्याला नुकतेच आलेले आहे किंवा ते पत्र त्याने अनेक वेळा खंदकामध्ये आधी वाचलेले आहे. ते पत्र कोणाकडून आले आहे, त्यातला मजकूर काय आहे, हे अनभिज्ञ आहे. पण तो पत्र वाचण्यात हरखून गेला आहे. रेल्वे कंपनीचे कर्मचारी जे सैनिक म्हणून लढताना पहिल्या महायुद्धात मारले गेले त्यांचा प्रतिनिधी म्हणून हा पुतळा उभा आहे. या स्मारकाला केंद्रस्थानी ठेवून पहिल्या महायुद्धाच्या प्रारंभाला १०० वर्षे झाल्याच्या निमित्ताने ‘अनामवीरास पत्र’सारखे उपक्रम जाहीर झाले आहेत. यात कोणीही भाग घेऊ शकतो. ते ‘ब्रिटन वॉर सिमेट्री’सारख्या अनेक संस्थांमार्फत आयोजित करण्यात आले आहेत. तरुणांना विशेष आवाहन करण्यात आले आहे. युरोपातही अनेक ठिकाणी व्याख्यानमालेपासून ते सैनिकांच्या दफनभूम्या दुरुस्त करण्यासाठी निधी गोळा करण्यापर्यंतच्या अनेक कार्यक्रमांची रेलचेल आहे.

पहिले महायुद्ध विसरून जावे एवढे जुने नाही आणि त्याची आठवण करून देण्याची गरज नसावी इतके ते ताजेही नाही. विसाव्या शतकात नंतर घडलेल्या अनेक घटनांचा पदरव या युद्धात ऐकू येतो. पहिले महायुद्ध हे विसाव्या शतकातले पहिले संकट होते, ज्याने नंतर संकटांची साखळी निर्माण केली.

२५००० पेक्षा जास्त पुस्तके व अभ्यासपूर्ण लेख या विषयावर प्रकाशित झाले आहेत. या युद्धामुळे अ‍ॅस्ट्रो हंगेरियन साम्राज्य मोडून पडले, ‘सिक मॅन ऑफ युरोप म्हणून ओळखले जाणारे ओटोमान साम्राज्य व रोमोनोव्ह, हॅब्सबर्गसारखी राजघराणी लयाला गेली. झेकोस्लोव्हाकियासारखे काही देश नव्याने जन्माला आले आणि कम्युनिझमचा एक वेगळी राजकीय व्यवस्था म्हणून उदय झाला. मध्य पूर्वेतल्या आजच्या अस्थिरतेची कारणे पहिल्या महायुद्धाच्या परिणामात आहेत. उद्योग जगताची मदत या युद्धात पहिल्यांदा सैन्याला झाली. क्रपच्या महाकाय तोफा प्रथम यावेळी वापरल्या गेल्या, ज्यांचे वजन ९८ टन व पल्ला १२० किलोमीटरचा होता. त्या चालवायला २०० जण लागत. औद्योगिकदृष्टया पुढारलेल्या देशांमधले युद्ध हे काही चमत्कृतीने थांबवता येत नाही. मशीनगन व त्वरेने मारा करणाऱ्या तोफांवर उपाय शोधायला वेळ लागणार होता, हे सेनापतींना समजले. त्यावेळी तरुण असलेले व पहिल्या सहा महिन्यांतच दोनदा जखमी झालेले द गॉल म्हणतात, “असले युद्ध युरोपने कधी पाहिलेले नव्हते.” हे सारे राजकीय नेतृत्वाला समजायला बराच काळ जावा लागला. नंतर लेखक म्हणून नावारूपाला आलेला रॉबर्ट ग्रेव्ह या युद्धात लढला होता. तो लिहितो, “आमचा दोन गोष्टीवर अतूट विश्वास होता. एक म्हणजे हे युद्ध कधीच संपणार नव्हते व शेवटी आम्हीच जिंकणार होतो.” ते थांबले तोपर्यंत सैनिक व नागरिक मिळून एक कोटी साठ लाख लोक मरण पावले आणि दोन कोटी दहा लाख जखमी झाले. नंतर मिळालेल्या उपचारांनी या जखमा भरून येण्यासारख्या नव्हत्या. विषेशत: टोकाचे नैराश्य व भयानक अनुभवातून गेल्यामुळे आलेला मानसिक ताण यावर कोणतेही उपचार नव्हते. त्या जखमा पुढे आयुष्यभर त्यांनी वागवल्या. हे युद्व संपले नाही, तर ते थांबले व हळूहळू दुसऱ्या महायुद्धात परावर्तीत झाले.

पहिल्या युद्धाची भव्यता व त्याच्या सर्वव्यापीपणामुळे हे सारे का व कसे घडले? आणि हे टाळता आले नसते काय? समान संस्कृती असलेल्या या देशांनी एकमेकांचे गळे घोटण्यावर का उतरावे आणि त्यांना अंधारात उडी मारण्याचे धोके दिसण्याऐवजी त्याचे आकर्षण का वाटावे? असे प्रश्न आपल्याला अस्वस्थ करतात. न लढणाऱ्या माणसाला तर सर्वच युद्धे आकर्षक असतात. तसे हे युद्धही आहे. याचे वेगळेपण हे की, याची सुरुवात ही या युद्धातल्या इतर घटनाक्रमांपेक्षा जास्त नाट्यपूर्ण आहे. चर्चिल लिहितात, ‘‘संपन्न राष्ट्रांच्या प्रचंड सैन्यसंख्या. त्यांचे एकत्र येणे. नंतर त्यांच्या दलांच्या नेमक्या स्थानाबद्दल व हलचालीबाबत एकमेकांना असलेली अनिश्चितता. आणि या सर्वांच्या मागे असलेली समजू शकणारी आणि कधीच न समजणारी कारणे सुरुवातीचा प्रसंग नाट्यमय करतात.”

विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात बऱ्याचश्या युरेापिअन देशात जाण्यासाठी पासपोर्टची गरज नसे. चलनांची अदलाबदल सहज होत असे. बँकिंग क्षेत्राचा भरपूर विकास झाला होता. बेल्जियमसारख्या छोट्याश्या राष्ट्राचा आर्थिक आघाडीवर जगात सहावा क्रमांक होता. रेल्वेचे पसरत चाललेले जाळे, वाफेच्या इंजिनावर चालणाऱ्या मोठ्या आगबोटी, दक्षिण आफ्रिकेतले सोने आणि हिरे, भारतातल्या कापड गिरण्या, मलायातली रबराची लागवड यांच्या व्यापारातून युरोपात संपन्नता आली होती. “आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करून आपण लोकांना आनंद देतो असे त्या काळच्या नशिबवान लोकांना वाटे,” असे जेम्स लाव्हेर या ब्रिटिश इतिहासकाराने लिहिले, पण त्याचबरोबर ज्यांना कसलाही आवाज नाही, असे ४० कोटी प्रजाजन विविध सम्राटांच्या पंखाखाली होते.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा -

https://www.booksnama.com/client/book_list_by_category

.............................................................................................................................................

‘द वर्ल्ड ऑफ यस्टरडे’ हे स्टिफन झ्वाइगचे आत्मचरित्र १९व्या शतकाच्या अंताचे व विसाव्या शतकाच्या प्रारंभाच्या युरोपचे चित्र आपल्या डोळ्यापुढे स्पष्ट उभे करते. तो लिहितो, “सुरक्षिततेची भावना हा लाखो लोकांच्या आयुष्याचा प्रमुख भाग बनून राहिली होती. चलनाची किंमत निश्चित होती. तुमच्याकडे असलेल्या संपत्तीवर किती व्याज मिळेल, तसेच कॅलेंडरकडे पाहून तुम्हाला बढती कधी मिळेल आणि तुम्ही निवृत्त केव्हा होणार हे तुम्हाला माहीत असे. प्रत्येक कुटुंबाचा वर्षाच्या खर्चाचा ताळेबंद ठरलेला असे. जेवण, राहणे, आजारपणे, सहली, हुंडा, कौटुंबिक सोहळे यासाठी ठरावीक रक्कम बाजूला काढली जात असे. घर, जमीन यांसारखी स्थावर मालमत्ता एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतर होत असे. सत्तेच्या परम स्थानावर सम्राट बसलेला असे. तो मेला तर दुसरा त्याची जागा घेणार हे ठरलेले होते. सामान्यांनी त्यात कधी डोके घातले नाही. जीवनातल्या कोणच्याही प्रसंगाला तोंड देण्याची क्षमता या व्यवस्थेत आहे असा एकोणविसाव्या शतकाच्या अंतातल्या पिढ्यांचा विश्वास होता…”

झ्वाइगचा जन्म १८८८ चा. तो ज्यू होता. श्रीमंत बापाचा मुलगा होता. ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना या ठिकाणी हे कुटुंब राहत असे. व्हिएन्ना ही साऱ्या युरोपची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाई. जर्मन, इटालिअन, स्लाव्ह, हंगेरीअन, स्पॅनिश आणि फ्रेंच या साऱ्या संस्कृतींचे एक अजब मिश्रण या शहरात झाले होते. ते डन्युबच्या तीरावर व आल्पसच्या उतारावर वसले होते. बिनघोड्याच्या गाड्या व विजेचे दिवे नुकतेच वापरात येत होते. कोसिमा वॅग्नर ही नामवंत जर्मन संगीतकार, वॅग्नरची पत्नी, तत्त्वज्ञ नित्शेची लहानखुरी बहीण एलिसाबेथ फॉस्टर आणि टॉलस्टॉयच्या मांडीवर खेळलेली ओल्गा मोनेद अशा अनेक प्रसिद्ध व्यक्ती झ्वाइगला तेथे भेटत असत. त्यांचे केस पिकले होते, पण ही माणसे म्हणजे झ्वाइगसाठी युरोपच्या संपन्न सांस्कृतिक वारश्याकडे पाहण्याच्या खिडक्या होत्या. येथल्या शॉनब्रन राजवाड्यात नेपोलिअन राहून गेला होता. युरोपमधील सारी ख्रिश्चन राजघराणी येथल्या सेंट स्टिफन कॅथड्रलमध्ये त्यांची तुर्कांपासून मुक्तता केल्याबद्दल प्रार्थना करण्यासाठी ठरावीक दिवशी एकत्र येत. बौद्धिक उत्सुकता असलेल्या लोकांचे ते शहर होते. आइनस्टाईन आणि फ्राइड यांचे वास्तव्य या शहरात होते. व्यापारी, लष्करी वा राजकीय घडामोडींना येथल्या लोकांच्या जीवनात तसे दुय्यम स्थान होते. या शहराचे पहिले प्रेम संगीत व नाटक होते. ग्लक, हायडेन, ब्राम्हस्, मोझार्ट आणि बिथोवन अशा संगीतकारांनी येथे हजेरी लावली होती. येथल्या ऑपेरा हाऊसमध्ये एखादा न लागलेला वा विसंवादी सूर लगेच टिपण्यात येई. सांस्कृतिक जगतात स्थान मिळवणे व टिकवणे अवघड होते. झ्वाइग लिहितो, “माझे वडील, काका, शिक्षक वा दारावर आलेला सेल्समन सगळे त्यांच्या व्यवस्थित राखलेल्या दाढीवरून हात फिरवत सावकाश व संथ आवाजात बोलत आणि मंद गतीने चालत. मोठ्याने बोलणे वा घाईने कोणचीही गोष्ट करणे हे अशिष्टपणाचे व अप्रगल्भतेचे लक्षण होते. व्हिएन्नावासीयांना वाटे ‘माणसे प्रगल्भ नव्हती तेव्हाचा काळ हा दुष्काळ, युद्धे व क्रांत्या यांचा होता’. चर्चिलने याला दुजोरा दिला आहे, ‘राजे आणि राजपुत्र मोठ्या दिमाखाने राष्ट्रांच्या व साम्राज्यांच्या सिंहासनावर बसले होते. युरोपिअन राजकारणात दोन पद्धती (राजेशाही आणि लोकशाही) एकमेकांच्या गळ्यात गळे घालून चालल्या होत्या. त्यांच्यात संघर्ष नव्हता असे नाही, पण पार्लमेंटमधले एखादे वाक्य, राजदूताचे लहानसे निरीक्षण वा सांकेतिक भाषेतला छोटासा निरोप याने सत्तेचा तोल सांभाळला जात असे. हे अस्ताला जाणारे जुने जग पाहणे फार मनोहर होते.’ जेव्हा लोकांचा विश्वास संपादन केला पाहिजे असा मैत्रीपूर्ण सल्ला दुसऱ्या झार निकोलसला देण्यात आला, तेव्हा तो म्हणाला, “प्रजेने माझा विश्वास संपादन केला पाहिजे की मी प्रजेचा?’ जणू अठरावे व एकोणिसावे शतक एकत्र नांदण्याचा प्रयत्न करत होते.”

व्हिएन्नापासून २६ किलोमीटरवर बाडेन हे उष्ण पाण्याचे झरे असलेले पर्यटनस्थळ आहे. रस्त्यांच्या कडेला फुलांचे ताटवे आहेत. बागा, वेगवेगळी हॉटेल्स, कॅसिनो, सिंफनी हॉल्स यांनी ते गजबजलेले आहे. पहिल्या महायुद्धाची ठिणगी पडली, त्याची आठवण झ्वाइगच्या आत्मचरित्रात आहे. ती आठवण या बाडेनमधली आहे. १९१४ सालची गोष्ट स्पष्टपणे त्याला १९४२ सालीही लक्षात होती. तो लिहितो, “बागेत गर्दीपासून जरा दूर बसून मी पुस्तक वाचण्यात बुडून गेलो होतो. पुस्तक माझ्या अजून लक्षात आहे. मेरेशोव्हस्कीचे ‘टॉलस्टॉय अ‍ॅन्ड डोटोव्हस्की’. पुस्तकात मग्न असतानाही लोकांचा गजबजाट, पक्ष्यांचा किलबिलाट, संध्याकाळच्या वाऱ्याच्या मंद झुळका व त्यावर स्वार होऊन बागेच्या एका कोपऱ्यातून येणारे बँडचे मुलायम असे संगीत मला जाणवत होते. यातले बँडचे संगीत अचानक व अनपेक्षितरीत्या थांबले. ते थांबले तसे मी पुस्तकातून वर पाहिले. लोकांची हलचालही थांबली होती व बँडचे वादक वाद्ये गोळा करून जाऊ लागले. लोकांची गर्दी त्या वादकांच्या जागेवर जे पत्रक नुकतेच लावण्यात आले होते, त्या दिशेने जाऊ लागली ऑस्ट्रियाच्या सिंहासनाचा वारस असलेल्या फ्रान्झ फर्डिनांड व त्याच्या पत्नीची सर्बियामधल्या साराजोव्हो येथे राजकीय हत्या करण्यात आल्याचे त्यावर लिहिले होते.”

युरोपिय राजकारणात खुनाचे काही नावीन्य नव्हते. त्यामुळे बाल्कनमधले एखादे वेडगळ कृत्य साऱ्या युरोपला आग लावेल असा इशारा जो बिस्मार्कने दिला होता, त्यातले वेडगळ कृत्य म्हणजे ही हत्या असेल असे त्यावेळी कोणालाच वाटले नाही. मात्र राष्ट्राराष्ट्रांत इशारेबाजी सुरू झाली, पण शेरबाजार स्थिर राहिला. क्वचितच मिळणाऱ्या सूर्यप्रकाशाचा आनंद युरोप घेत राहिला. झ्वाइग आपल्या बॅगा भरून सीमा पार करून बेल्जियममधल्या लि कॉक या ठिकाणी गेला, तेव्हा ते पर्यटकांनी गजबजले होते. त्यात अनेक जर्मनही होते. सर्वत्र आनंदाचे व सुट्टीचे वातावरण होते. हळूहळू उलटसुलट बातम्या येऊ लागल्या. वातावरण गंभीर झाले. लि कॉक रिकामे होऊ लागले. झ्वाइग लिहितो, “तेथून सुटणारी शेवटची गाडी पकडून परत येत असताना जर्मनीत शिरल्यावर आमची गाडी बाजूला घेतली गेली व ती सायडिंगच्या रूळावर थांबली आणि बाजूच्या रुळावरून एकामागोमाग एक अशा जर्मन मालगाड्या बेल्जियमच्या दिशेने जाऊ लागल्या. त्यामध्ये सैन्याची वाहने व आवरणाखाली तोफा झाकलेल्या होत्या.” हे सर्व पाहिल्यावर त्याच्या हृदयाचा ठोका पहिल्यांदा चुकला.

कोणाच्याही हृदयाचा ठोका चुकणे सहज होते, कारण गेली पन्नास वर्षे युरोपात कोणीच युद्ध पाहिले नव्हते. १८७०च्या फ्रँको जर्मन युद्धातले फार थोडे लोक आता जिवंत होते. ते युद्धही छोटे होते. युरोपच्या राजकारणात सर्व राष्ट्रांचे एकमेकांत काही करार होते. त्यातील काही स्पष्ट नव्हते. सोयीनुसार त्यांचा अर्थ लावता येत असे. काही करार तर तोंडी होते. राजेशाही व लोकशाही अशी संमिश्र व्यवस्था असल्याने काही करार जाहीर नव्हते, तर काही जुने झाले होते. सर्बिया व रशियाचे प्रेम होते, रशिया व फ्रान्स यांची जर्मनी विरुद्ध एकी होती, तर दुसऱ्या बाजूला जर्मनी व ऑस्ट्रियाने गळ्यात गळे घातले होते. आणि इंग्लंड युरोपातल्या कोणत्याही घडामोडीमुळे आपल्या साम्राज्याला धक्का लागू नये याबद्दल दक्ष होते. सर्व राष्ट्रे एका साखळीने बांधली गेली होती, याचा जर्मन चान्सलर बिस्मार्कला अंदाज होता. मर्यादित युद्धे घडवून अखंड व समर्थ जर्मनी त्यानेच घडवला होता. पण हे मोकाट सुटू पाहणारे वारू त्याने कह्यातही ठेवले होते आणि त्याला तर २५ वर्षांपूर्वीच केवळ एका दिवसाच्या नोटिशीने पदावरून हाकलून देण्यात आले होते. युद्धाला विरोध असणाऱ्या बर्ट्रांड रसेलनेदेखील म्हटले की, जर्मन तलवारींच्या खणखणाटाचा आम्हाला कंटाळा आला होता. जर्मनीने बेल्जियम सीमा ओलांडायला सुरुवात केल्याने पार्लमेंटमध्ये बरीच भवतीनभवती होऊन अखेर इंग्लंडने ४ ऑगस्ट १९१४ रोजी जर्मनी विरुद्ध युद्ध जाहीर केले. फ्रान्स आणि रशियाने या आधीच ते केले होते.

या युद्धाचा एक विशेष म्हणजे रेल्वेगाड्यांतून करण्यात आलेली सैनिकांची ने-आण. जर्मन सेनाविभागाने सैनिकी तुकड्यांच्या हालचालीसाठी ११,००० रेल्वेगाड्यांचे टाइम टेबल तयार ठेवले होते. ते राबवण्यात आले. कोल्न या जर्मन शहराजवळ असणाऱ्या ऱ्हाइन नदीवरच्या होहेनझेलोर्न पुलावरून बेल्जियमकडे २ ते १८ ऑगस्ट या काळात २१३० पेक्षा जास्त रेल्वेगाड्या गेल्या. त्या प्रत्येकी ५४ डब्यांच्या होत्या. पॅरिसच्या यार्डामध्ये रेल्वेची इंजिने व अनेक डबे आदेशाची वाट पाहत होते. त्यातल्या अनेक डब्यांवर खडूने ‘बर्लिन’ असे लिहिले होते. जर्मन-फ्रान्सच्या सीमेवर अनेक छोटी छोटी खेडी होती, त्या ठिकाणी मैलभर लांबीचे प्लॅटफॉर्म कितीतरी आधीच बांधून तयार ठेवण्यात आले होते. जो देश आपले सैन्य प्रचंड संख्येने सर्वांत आधी सीमेवर पोचवेल त्याला आघाडी मिळणार हे उघड होते.

फक्त सैनिकच राखीव नव्हते तर घोड्यांचीसुद्धा राखीव फौज होती. शांततेच्या काळात उद्योगपती, खेळाडू तसेच शेतकरी यांच्याकडे किती घोडे आहेत आणि ते कुठे आहेत याची नोंद सैन्यात ठेवलेली असे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण युरोपातून घोडे गोळा करण्यात आले. ब्रिटिश सैन्याने १,६५,०००, ऑस्ट्रियाने ६,००,०००, जर्मनीने ७,१५,००० घोडे गोळा केले, तर रशियन घोडदळाकडे दहा लाखांपेक्षा जास्त घोडे होते.

ब्रिटनचे सैन्य लहान होते, पण त्यांच्या नौदलाला तोड नव्हती. ते कवायतीसाठी एकत्र आधीच आले होते. त्या संपताच स्कापा फ्लो या स्कॉटलंड जवळच्या युद्धकालीन तळावर जाण्याचे आदेश नाविक मंत्री चर्चिलने दिले. त्यांची रांग २८ किलोमीटरची होती.

युरोपात लोकांच्या मनात युद्धाबद्दलच्या कल्पना अति रम्य होत्या. सैन्य जमवाजमवीच्या आदेशानंतर लंडन, बर्लिन व पॅरिसमध्ये लोकांच्या उत्साहाला उधाण आले. पब आणि रेस्टाँरंटमध्ये बाकीचे संगीत बंद होऊन आपापल्या दोस्त राष्ट्रांची राष्ट्रगीते वाजू लागली. रिचर्ड कॉब या फ्रेंच इतिहासकाराने त्या वेळच्या पॅरिसमधल्या घटनांची नोंद केली आहे. राखीव सैन्याला अजून बोलावले नव्हते, पण लोकांनी आवराअवरी सुरू केली. विविक्षित ठिकाणी रिपोर्ट करण्याच्या दिवशी व त्याच्या आदल्या दिवशी तरुणांना सुट्टी असे. ते एकमेकांना भेटल्यावर “तू कोणत्या तुकडीत आहेस?” असे विचारू लागले व उत्तर मिळायच्या आत, “मी पहिल्याच तुकडीत आहे!” असे सांगू लागले. कोणी “मी नवव्या तुकडीत वा अकराव्या तुकडीत आहे” असे सांगितल्यावर, “मग तोपर्यंत गंमत संपलेली असेल.” वा “तू बर्लिनला काही पोचू शकणार नाहीस.” (कारण युद्ध आधीच संपून जाईल) अशा प्रतिक्रिया मिळत. पॅरिसमधल्या स्टेशनांचे एका पायदळातल्या अधिकाऱ्याने केलेले वर्णन लक्षात राहणारे आहे. “सकाळी सहा वाजता सैनिकांनी भरलेल्या गाडीने संथपणे गती घेतली, त्यासरशी एखाद्या धुमसणाऱ्या आगीचे अचानक ज्वालेत रूपांतर व्हावे, त्याप्रमाणे फलाटावरच्या हजारो कंठातून ‘मर्सेली’ हे फ्रान्सचे राष्ट्रगीत बाहेर पडले. गाडीच्या दारात आणि खिडक्यांत गर्दी केलेल्या सैनिकांनी आपल्या टोप्या हातात घेऊन हलवल्या. प्लॅटफॉर्मवरल्या लोकांनीही प्रतिसाद म्हणून आपल्या टोप्या व हातरूमाल हलवले व तरुणींनी चुंबनांची फेक केली.” राष्ट्रवादाने टोक गाठले होते.

जर्मन सेना बेल्जियममध्ये घुसल्या त्या श्लायफेनच्या चढाईच्या योजनेचा भाग म्हणून. १९०६ पासून ही योजना तयार होती व तिच्यात वेळोवेळी श्लायफेनने सुधारणा करत आणल्या होत्या. पण त्या राबवणे मात्र तत्कालीन जर्मन सेनानी मोल्टकेच्या हातात होते. योजना आखणे व राबवणे यात अंतर असते. ते अंतर मानसिक धैर्याच्या अभावामुळे पडते. या योजनेनुसार फ्रँको जर्मन सीमेवरचा जर्मन सेनाविभाग थोडा कमकुवत ठेवून मोठ्या जर्मन सेना दलाने बेल्जियममध्ये शिरून जर्मन सीमेवरून आत घुसू पाहणाऱ्या फ्रेंच सैन्याच्या बगलांवर व पाठीमागून आक्रमण करणे अपेक्षित होते. हे अमलात आणण्यासाठी दोन गोष्टी करणे आवश्यक होते. बेल्जियमची अलिप्तता नष्ट करणे व फ्रँको जर्मन सीमेवरच्या फ्रेंच सेना आत घेण्यासाठी तेथल्या जर्मन सेनेला माघारीला योग्य वेळी परवानगी देणे. ५,८०,००० जर्मन सेनेचे हे भव्य चक्र मेट्झ या जर्मन किल्ल्याभोवती फिरणार होते व पॅरिसला वळसा घालून फ्रेंच सेनेच्या पिछाडी व बगलेवर येणार होते. ३९ दिवसांत पॅरिस व ४२ दिवसांत संपूर्ण फ्रान्सवर जर्मन सेनांचा कब्जा बसेल, असा रीतीने हे वेळापत्रक आखण्यात आले होते. नंतर हे सैन्य पूर्व आघाडीवर रशियाशी सामना देण्यासाठी सज्ज होणार होते. बेल्जियम छोटा होता. त्याच्या अलिप्ततेची हमी जर्मनीसह इंग्लंड व फ्रान्सनेही दिली होती. पण जर्मन सेनाविभागात त्याच्या अलिप्ततेवर कोणचाच विश्वास नव्हता, ती भंग पावणार हे गृहीत धरण्यात आले होते. त्यामुळे श्लायफेन योजनेतली पहिली गोष्ट अमलात आणली गेली.

दुसरी गोष्ट अमलात आणणे अवघड होते. फ्रँको जर्मन सीमेवरच्या जर्मन सेनाविभागाकडे जास्त सैन्य ठेवण्यात आले. ते ठेवून बेल्जियममधून आक्रमण करणारा जर्मन सेना विभाग पुरेसा मजबूत करता येण्याएवढे सैन्य मुळातच जर्मनीकडे नव्हते. या जर्मन सेनेची लढाई फ्रान्समधल्या मार्नेपाशी अडकून पडली व सर्व युद्धाचे खंदकाच्या लढाईत रूपांतर झाले. दोन्ही पक्षांनी खणलेल्या एकंदर खंदकांची लांबी २५,००० मैलाच्या आसपास जाते. युद्ध संपेपर्यंत अनेक लढाया झाल्या. युद्धकालीन सीमा पुढे मागे होत राहिल्या. त्या सर्वांचा इतिहास सांगणे हा या लेखाचा हेतू नाही, तर प्रारंभी रोमांचक वाटणाऱ्या युद्धाने ते सुरू झाल्यावर काही काळातच आपला चेहरा कसा बदलला? सैनिकांचे युद्धकालीन जीवन कसे होते? ते कोणत्या मन:स्थितीतून जात होते व त्याचे नंतर साहित्यात कसे प्रतिबिंब उमटले, तसेच या युद्धाचे राष्ट्रांच्या जीवनात काय स्थान? याचा मागोवा काही पुस्तकांच्या मदतीने समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_list_by_category

.............................................................................................................................................

खंदकातले युद्ध हे क्रूर होते आणि त्यातले रोजचे जीवन हे कठीण व कंटाळवाणे होते. तीन खंदक एकमेकांना समांतर असे खणलेले असत. त्यातले अंतर हे ५० ते २०० मीटर असे, खोली १६ ते २० फूट असे आणि ते मोजक्या ठिकाणी परस्परांशी सामान, सैनिक व निरोप यांची देवाणघेवाण करण्यासाठी जोडलेले असत. बाजूची माती ढासळून पडू नये म्हणून खंदकांना वाळूची पोती आणि लाकडाच्या ओंडक्यांचा आधार देत. शत्रू खंदकात उतरला तर त्याला सरळ रेषेत गोळीबार करता येऊ नये म्हणून ते नागमोडी खणलेले असत. खंदकाच्या समोर काटेरी तारांची कुंपणे आणि वेटोळी असत. खंदकात शिरायचे असल्यास त्यांतून रस्ता काढणे हे शत्रूसैन्यासाठी दिव्य असे. खंदकाचा मागचा भागही वाळूची पोती लावून सुरक्षित केलेला असे. काही खंदकात आणखी वीस-पंचवीस फूट खोल तळघरे असत. ज्याला डगआउटस् म्हणत. ज्यात पलंग, स्टोव्ह वगैरे सामान असे. जर्मन तळघरे जास्त व्यवस्थित असत. सीमेच्या रणभूमीवरच्या जर्मन खंदकातल्या तळघरात तर टॉयलेटस्, वीज, वायूविजन या साऱ्या सोयी होत्या. भिंतीला वॉलपेपरही लावला होता. शांतता असताना खंदकाच्या ढासळलेल्या वा तोफगोळ्यांनी उखडलेल्या जागा परत बांधून काढणे, शस्त्रे साफ करणे, मृतांचे दफन करणे, मुताऱ्या खणणे अशी कामे असत. खंदकाच्या तळापासून त्याच्या काठावर येण्यासाठी ठराविक अंतराने पायऱ्या असत, ज्याला ‘फायर स्टेप्स’ म्हणत. ज्यावर चढून समोर लक्ष ठेवावे लागे आणि आक्रमण झाले तर ते थोपवण्यासाठी गोळीबार करावा लागे. आक्रमणाच्या वेळा पहाटे वा सूर्यास्ताच्या असत. सॉमच्या रणभूमीवर जर्मन सैन्याने एका किलेामीटरच्या अंतराने अशा खंदकांच्या दोन रचना निर्माण केल्या होत्या. ज्यावर मात करणे केवळ अशक्य होते. रात्रीच्या वेळी टेहळणीसाठी वा शत्रूच्या गोटात छापा मारण्यासाठी सैनिकांच्या तुकड्या खंदकातून बाहेर येत.

खंदक खणताना काही वेळा लगेच पाणी लागे व पुढचे दिवस पाण्यात आणि चिखलात काढावे लागत. ब्रिटिश सेनेला जमले नाहीतर ब्रिटिश नेव्ही आपली खंदकातून मुक्तता करण्यासाठी निश्चित येईल, असा विनोद फ्लँडर्सच्या खंदकातल्या ब्रिटिश सैन्यात प्रचलित होता. सतत पाय पाण्यात राहिल्यामुळे पायाचे कातडे सडे. त्याला ‘ट्रंच फूट’ असे नाव पडले. त्यातून गँगरिन होऊन सैनिकाचा पाय कापावा लागे. या ‘ट्रंच फूट’मुळे मृत्यूसुद्धा होत. मानवी शत्रू एवढेच टायफाइड, कॉलरा व हगवण हे भीतीदायक शत्रू होते. १९१६ साली सॉमची चढाई सुरू होण्याआधी एक लाखापेक्षा जास्त सैनिक खंदकातल्या अशा अवस्थेने मरण पावले. साधारण पंधरा टक्के सैनिक पहिल्या खंदकात म्हणजे फायरिंग ट्रंचमध्ये, दहा टक्के त्या मागच्या सपोर्ट ट्रंचमध्ये, तीस टक्के त्या मागच्या रिजर्व ट्रंचमध्ये व वीस टक्के विश्रांतीसाठी व इतर इस्पितळात वा प्रशिक्षणासाठी असत. एका खंदकातून दुसऱ्या खंदकात सैनिकांची ठराविक काळाने बदली होत असे. सैनिकांबरोबरच उवा व उंदरांचे साम्राज्य खंदकात असे. उंदीर मृतांच्या मांसावर गलेलठ्ठ होत व सैनिक त्यांना बंदुकीने गोळ्या घालत. विरुद्ध पक्षाच्या खंदकाचे अंतर २०० मीटरच्या आसपास असे. काही ठिकाणी हे अंतर ५० मीटरपर्यंत कमी होते. दोन्हीच्या मधला भाग ‘नो मॅन्स लँड’ म्हणून ओळखला जाई.

तोफगोळ्यांनी या प्रदेशात खड्डे पडलेले असत. युद्ध संपण्यापूर्वी महिनाभर मेजर पिल्डिक्ट याला काही जुन्या ‘नो मॅन्स लँड’मध्ये जाण्याची संधी मिळाली. तो लिहितो, “या ‘नो मॅन्स लँड’मध्ये फिरणे भयानक होते. वेगवेगळ्या चढायातल्या सैनिकांचे सांगाडे अजून तेथे पडले होते. त्यांच्या अंगावर असलेल्या हेल्मेट वा गॅस मास्कसारख्या उपकरणांनी तो सैनिक कोणत्या चढाईत मरण पावला असावा याचा अंदाज बांधता येत असे.” प्रामुख्याने दोन्ही पक्षांचे खंदक व त्यामधले ‘नो मॅन्स लँड’ या भोवती पहिल्या महायुद्धातल्या सैनिकी जीवनाचे दर्शन होते.

देशभक्तीचे नाव चुकूनही कोणी खंदकात काढत नसे. त्या गोष्टी फार दूरच्या नागरी लोकांसाठी होत्या. वर्तमानपत्रातल्या शौर्याच्या गोष्टींना खंदकातले सैनिक हसत. जी गोष्ट छापलेली असे ती सोडून कोणतीही गोष्ट खरी असू शकते, अशी भावना खंदकातल्या सैन्यामध्ये वसे. सैनिकांचे मनोधैर्य टिकवून धरणे हा स्थानिक नेतृत्वासाठी आव्हानाचा विषय होता. घरी घडणाऱ्या गोष्टींचा परिणाम सैनिकांच्या मनावर होत असे. त्यासंबंधीची असहाय्यता त्यांना घेरून टाके. रॉबर्ट ग्रेव्हची या संदर्भातली आठवण चटका लावणारी आहे. तो लिहितो, ‘रात्रीच्या वेळी मी राउंडवर होतो. पहाऱ्यावरचा एक सैनिक मशीनगनच्या जाळीवर मान टाकून पडलेला दिसला. मी जसा विजेचा झोत त्यावर मारला तसे माझ्या लक्षात आले, त्याच्या एक पाय नागवा होता. मी त्याला हाक मारून जागे करण्याचा प्रयत्न केला तसे बाजूचा सैनिक म्हणाला, “सर, त्याच्याबरोबर बोलण्याचा काही उपयोग होणार नाही.” हे ऐकल्याबरोबर मी सैनिकाच्या जवळ गेलो व त्याला हलवले, तसे माझ्या लक्षात आले की, त्याच्या डोक्यातून गोळी आरपार गेली होती. आपल्या बंदुकीची नळी त्याने तोंडात धरली होती व एका पायातला बूट व मोजा काढून त्याने पायाच्या अंगठ्याने बंदुकीचा चाप ओढला होता. त्याने असे का केले असे त्याच्या जोडीदाराला विचारताच तो म्हणाला, “सर, आज त्याचा कडेलोट झाला. आपल्या प्रेयसीच्या नवीन मित्राबद्दल त्याला आजच समजले.” चौकशी अधिकाऱ्याने म्हटले, “मी काही याची आत्महत्या म्हणून नोंद करत नाही. त्याच्या घरच्यांना लिहा की, त्याला सैनिकाचे, शूराचे मरण आले.” घरी कळवण्याचे पत्र पाठवण्यासाठी एक फॉर्म असे. ‘तुमचा भाऊ वा नवरा वा मुलगा’ असे त्यात पर्याय असत. त्यात हवा तो पर्याय ठेवायचा बाकी खोडायचे. शूराच्या मरणाला मात्र पर्याय नसे. ते सामाइक असे.

शौर्याच्या घटना घडतच नसत असे मात्र नव्हते. एकदा ‘नो मॅन्स लँड’मधून जोरात किंकाळी ऐकू आली. जर्मन खंदकाजवळ जखमी होऊन पडल्यावर दोन दिवसांनी ब्रिटिश सैनिकाला शुद्ध आली होती. इतरांच्या बरोबर बकस्टर नावाच्या लान्स कार्पोरलने ती ऐकली. त्याने त्या जखमी सैनिकाच्या मदतीला कोण त्याच्याबरोबर येईल का याची चौकशी केली. कोणीही तयार झाले नाही. खंदकाच्या बाहेर हात टाकणे म्हणजे मृत्युला आमंत्रण होते. पण हा लान्स कार्पोरल मात्र पांढरा हातरुमाल फडकवत त्या सैनिकाच्या दिशेने सरपटत निघाला. जर्मन सैनिकांनी त्याला घाबरवण्यासाठी त्याच्या जवळपास गोळीबार केला. पण तो तसाच पुढे येताना बघून जर्मन सैनिकांनी त्याला जवळ येऊ दिले. जखमी सैनिकाजवळ पोचल्यावर बकस्टरने त्याच्या जखमा बांधल्या. त्याला थोडी रम व बिस्किटे देऊन रात्री परत येण्याचे आश्वासन दिले. रात्री चार जवान व स्ट्रेचर घेऊन बकस्टर त्या सैनिकाला घेऊन आला. तो सैनिक नंतर जगला. बकस्टरचा परमविशिष्ट सेवा पदकाने सन्मान करण्यात आला. पण त्याला व्हिक्टोरिया क्रॉस हे सर्वोच्च पदक मिळायला हवे होते, असे ग्रेव्हला वाटत राहिले.

नाश्त्याच्या व जेवणाच्या वेळा ठरलेल्या असत. दोन्ही बाजूंनी अघोषित शांतता त्यावेळी पाळली जाई. कधी शत्रूच्या खंदकातल्या स्वयंपाकाचा वास स्वत:च्या खंदकापर्यत येई. कधी बरेच दिवस काही घडत नसे. फावल्या वेळात पुस्तके वाचणाऱ्या सैनिकांची संख्या बरीच होती. कटू वास्तवापासून ती त्यांना काही क्षणासाठी दूर घेऊन जात. ड्रायडेन, किट्स, टेनिसन व शेक्सपिअर यांना बरीच मागणी होती. इप्रच्या खंदकात जेफ्री केन्स ‘बॅबिलोग्राफी ऑफ सॅम्युअल जॉनसन’ हा ग्रंथ वाचे. तर जॉन्सनच्याच ‘जर्नी टू वेस्टर्न आयलंडस्’ या ग्रंथाचे संपादन चॅपमनने खंदकात असताना केले. एकटा व घाबरलेल्या स्थितीत असताना जे.एस वेन हा सैनिक धीर येण्यासाठी शेक्सपिअरच्या ‘हेन्री द फिफ्थ’मधली स्वगते मोठ्याने म्हणे. सॉमच्या रणभूमीवर १ जुलै १९१६ रोजी आक्रमणाच्या वेळी आपले आजूबाजूचे सहकारी मशीनगनच्या माऱ्याने विद्ध होऊन पडत असल्याचे पाहून पुढे सरकताना ‘केवळ इंग्लंडसाठी’ हे वाक्य तो सारखे म्हणे. तो म्हणतो, ‘मी काही शूर नायक नव्हतो. मी ते वाक्य घाबरून म्हणत होतो.’

इप्र, व्हार्डून, मार्ने व सॉम या पहिल्या महायुद्धातल्या काही महत्त्वाच्या लढाया. खंदकाची लढाई जिंकणे किती अवघड होते, याचे प्रत्यंतर ब्रिटिशांनी केलेल्या १९१६च्या सॅामच्या चढाईच्या वेळी ध्यानात येते. सेनापती हेगने यासाठी प्रचंड तयारी केली होती. सॉमच्या रणभूमीच्या मागे २५ मैलावर अल्बर्ट नावाचे छोटेसे गाव होते. त्याला सैन्यतळाचे स्वरूप आले. तेथून ब्रिटिश खंदकापर्यंत पुरवठ्यासाठी नवीन रस्ते बांधण्यात आले. वाटेत दारूगोळा साठवण्यासाठी डेपो उभारले गेले. त्यात तीस लाख तोफगोळे साठवण्यात आले. हे तोफगोळे म्हणजे १००० मध्यम आकाराच्या तोफा, १८० मोठ्या तोफा व २४५ माहाकाय तोफा यांचे प्रत्यक्ष चढाईच्या आधीचे फक्त आठवड्याभराचे भोजन होते. म्हणजे १८ मीटरवर एक तोफ व ५३ मीटरवर एक महाकाय तोफ हे प्रमाण होते. मैदांनी तोफांनी शत्रूच्या खंदकासमोरील तारांचे कुंपण उदध्वस्त करायचे व महाकाय तोफांनी खंदकावर व इतर बचावासाठी मजबूत केलेल्या ठिकाणावर नेम साधायचा. आठवड्याभराने ब्रिटिश पायदळ आपल्या खंदकातून बाहेर पडणार, तेव्हा त्यांच्यामागून ब्रिटिश तोफा पायदळाच्या पुढे तोफगोळे टाकत राहणार. म्हणजे ब्रिटिश तुकड्या जेव्हा जर्मन खंदकापर्यंत पोचणार तोपर्यंत खंदकातले जर्मन सैन्य नष्ट झालेले असणार. अशा प्रकारच्या तोफांच्या मारागिरीसाठी जास्त कौशल्य आवश्यक होते. नाहीतर या तोफांच्या मारागिरीत ब्रिटिश सैनिकांच्याच तुकड्या आल्या असत्या. मिनिटाला ५० मीटर पायदळ पुढे सरकणार असा अंदाज होता. त्याप्रमाणे तोफांचा कोन बदलून तोफगोळे दर मिनिटाला आणखी थोडे पुढे टाकायचे.

अशी ही योजना होती. प्रत्यक्षात आपल्याच तुकड्या आपल्याच तोफांच्या माऱ्यात सापडण्याच्या भीतीने तोफखान्याने तोफगोळे बरेच पुढे टाकण्यास सुरुवात केली. अनेक गोळे जर्मन खंदकांच्या पलीकडे पडत असल्याचे ब्रिटिशांना दिसत होते, पण हल्ल्याच्या धामधुमीत ते मागे कळवण्याचे कोणतेही साधन त्यांच्याजवळ नव्हते. शेवटी ब्रिटिश पायदळ खंदकाच्या जवळ पोचण्याच्या बरेच आधी हा तोफांचा मारा बंद करण्यात आला. २४ जून रोजी १,३८,००० तर २८ जून रोजी ३,७५,००० तोफगोळे टाकण्यात आले. त्यांच्या आवाजाने जर्मन सैनिकांना वेड लागायची वेळ आली.

पहिल्या खंदकाची बरीच पडझडही झाली. पण खंदकातल्या डग आउट्समधल्या पेरिस्कोपमधून पाहत ब्रिटिश तोफांचा मारा कधी एकदा बंद होतो आणि ब्रिटिश सैनिक आपल्या खंदकातून कधी बाहेर पडतात याची जर्मन सैनिक वाट पाहत राहिले. ते सैनिक यांच्या खंदकापाशी पोचायच्या आत जर्मनांना आपली शस्त्रे घेऊन स्वत:च्या खंदकाबाहेर पोचणे आवश्यक होते. जो पहिला पोचणार त्याची जिवंत राहण्याची शक्यता जास्ती.

१ जुलै १९१६ रोजी तासभरच्या तोफांच्या माऱ्यानंतर सकाळी ७.३० वाजता ब्रिटिश सैन्य खंदकातून आक्रमणासाठी बाहेर पडले आणि परिस्थितीचा अंदाज येण्यापूर्वीच ते टिपले जाऊ लागले. तोफखान्याच्या माऱ्यातदेखील बहुतेक जर्मन सैन्य आपल्या २५ फूट खाली खणलेल्या डग आऊट्समध्ये सुरक्षित होते याची त्यांना कल्पना नव्हती. तारांचे कुंपण उदध्वस्त करण्यासाठी टाकलेले अनेक तोफगोळे तारांमध्ये अडकून न फुटता तसेच होते (त्यांच्या रचनेप्रमाणे ते जमिनीवर पडल्यावरच आपटून फुटत) एका जर्मन सैनिकाच्या आठवणी जॉन किगानने उदधृत केल्या आहेत- “ ‘ते आले… हेल्मेट, रायफल, बेल्ट’ असे ओरडत असताना सेंट्री शेवटच्या तोफगोळ्याच्या स्फोटात गत:प्राण झाला. त्याचे शीरविहीन धड गडगडत खाली आले. ब्रिटिश नंतर आमच्या खंदकापासून केवळ वीस मीटरवर आले आणि मग आमच्या मशीनगनने त्यांच्या फळीत खिंडारे पाडायला सुरुवात केली.” एक आयरिश सार्जंट लिहितो, “खंदकातून बाहेर पडताना माझ्या आजूबाजूला सैनिकांच्या मोठ्या रांगा होत्या. नंतर मी मशीनगनचा आवाज ऐकला. मी नऊ मीटर पुढे गेलो असेन तर काही थोडेच सैनिक माझ्याभोवती शिल्लक राहिले आणि मी अठरा-वीस मीटर गेलो, तेव्हा मी एकटाच शिल्लक राहिलो. नंतर मलाही गोळी लागली.” खंदकातून बाहेर पडल्यावर अनेक सैनिक ‘नो मॅन्स लँड’मध्ये पोचण्याच्या आधीच मारले गेले वा जखमी झाले. लढाईच्या पहिल्याच दिवशी ५७४७० ब्रिटिश सैनिक मारले गेले. किगान लिहितो, “काही दिवस गेले तसे लक्षात आले की, जे एक लाख सैनिक खंदकाबाहेर पडले होते, त्यातले जे ४०,००० परत आले ते जखमी अवस्थेत. काही बटालियन संपूर्ण नष्ट झाल्या.” अट्टहासाने चालवलेली ही लढाई सेनापती हेगने अखेर पाच महिन्यांनी नोव्हेंबर १९१६ मध्ये बंद केली, तेव्हा ४,२०,००० ब्रिटिश सैनिक मरण पावले होते व सैन्य चढाईच्या पहिल्या दिवशीच्या उद्दिष्टाच्या तीन मैल अलिकडेच होते. ४,५०,००० जर्मन सैनिकही यात मेले. ‘सॉमचा खाटिक’ असे नाव सेनापती हेगला पडले. युद्ध लवकर संपण्याची कोणतीही आशा आता संपली. युद्धे संपवण्यासाठी चालले हे युद्ध कधीतरी संपेल का? असा प्रश्न सर्वां घेरू लागला. गॅसच्या हल्ल्यात जखमी झालेला कवी आयव्होर गुर्ने १९३७ साली मनोरुग्णांच्या इस्पितळात मरण पावला, तेव्हाही तो युद्ध चालू आहे या समजुतीत त्याच्यावर कविता लिहीत होता. बनार्ड शॉने सॉम आघाडीला भेट दिल्यावर म्हटले, “हेग बहुदा रिटायर होईपर्यंत हे युद्ध चालवणार असे दिसते.”

सैनिकांचा वरिष्ठांसंबंधी असलेला आदर अशा मानवी संहारामुळे उतरणीला लागला. ‘सिंहाचे नेतृत्व गाढवांनी केले’ असे म्हटले गेले. युद्धाबद्दलच्या रम्य कल्पना पार उदध्वस्त झाल्या. एकदा संघर्षाला तोंड लागले की, कोणतीही योजना कागदावर आखली असते तशी राहत नाही. त्यात न योजलेला मानवी हस्तक्षेप आवश्यक असतो. पहिल्या महायुद्धातल्या लढायात सैन्यसंख्या खूप असे. योजनाही पक्क्या आखलेल्या असत, पण त्या लवचीक नसत.

अवाढव्य यंत्रणेचे चाक एकदा फिरू लागले की, त्याची गती, दिशा बदलणे वा ते थांबवणे अशक्य असे. संदेश वाहनयंत्रणा अजून प्राथमिक अवस्थेत होत्या. ते काम प्रामुख्याने माणसांतर्फे होत असे. सैन्यसंख्या कमी पडू लागली तशी भरती होण्यासाठी शारिरीक क्षमतेच्या अटी सैल करण्यात आल्या. नंतर स्वयंसेवी दलांच्या तुकड्या उभारण्यात आल्या. त्यासाठी इंग्लंडमध्ये भरपूर जाहिरात करण्यात आली. “बाबा तुम्ही महायुद्धात काय केले?” असे मुले वडिलांना विचारत आहेत अशी पोस्टर्स लावण्यात आली. भौतिकशास्त्रातली अटॉमिक नंबर वा अणुक्रमांक ही अत्यंत क्रांतिकारी संकल्पना शोधणारा हेन्री मोस्ले संशोधन सोडून स्वयंसेवक म्हणून सैन्यात सामील झाला व गॅलिपोलीच्या लढाईत मारला गेला. तो फक्त २७ वर्षांचा होता. मानवतेच्या दृष्टीने विचार केला तर मोस्लेचा मृत्यू हा महायुद्धातला सर्वांत किमती मृत्यू होता असे आयझॅक असिमॉव्हने लिहिले आहे. अशा स्वयंसेवकांच्या लढण्याच्या कौशल्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होई, पण लढण्याच्या जिद्दीमध्ये हे स्वयंसेवी सैनिक नेहमीच्या सैनिकांपेक्षा तसूभरही मागे नव्हते.

महायुद्धातल्या लढाया या एकमेकांना थकवण्याच्या लढाया होत्या. जो सर्वांत शेवटी राखीव सैन्य रणांगणावर आणू शकेल तो विजयी ठरणार होता. १९१८ च्या नोव्हेंबर महिन्यात इंग्लंड, फ्रान्स या दोस्तांच्या विजयाने हे महायुद्ध संपले. टेड हगेस या कवीच्या मते तर इंग्लंड रणांगणावर थकून पडले होते, तेव्हा कोणीतरी येऊन त्याच्या गळ्यात विजयाचे पदक अडकवले.

युद्ध जर एवढे भयंकर आहे तर सैनिक का लढतो? असा प्रश्न आपल्या ‘फेस ऑफ द बॅटल’ या आगळ्या पुस्तकात लष्करी इतिहासकार जॉन किगानने विचारला आहे. तर तो नेहमीच लढतो असे नाही असे उत्तर त्यानेच दिले आहे. भयंकर संहार व खंदकातल्या जीवनाला सैनिक कंटाळले होते. प्रत्येक देशाच्या सैन्यात बंडखोरीची प्रकरणे घडली. ब्रिटिशांनी स्वत:च्या सैन्यातल्या बंडखोरीला सामूहिक नियमभंग असे म्हटले. सॉमच्या लढाईत आक्रमणासाठी खंदकाबाहेर पडावे लागू नये म्हणून काही सैनिकांनी स्वत:ला जखमा करून घेतल्या. अधिकारी वर्गाला या सर्वांवर मात करून सैनिकांचे मनोधैर्य टिकवावे लागे. तोफगोळ्यांच्या स्फोटाने झाडे उन्मळून पडत व स्फोटाच्या आवाजाने सैनिक गोठून जात. ‘ढाल तलवारे गुंतले हे कर, म्हणे मी झुंजार कैसा झुंजू’ असे तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे त्यांची परिस्थिती होई. अशा वेळी तुकडीला आक्रमण करण्यासाठी बाहेर काढणे अत्यंत अवघड असे. त्यासाठी आपल्याच बटालिअनमधल्या सैनिकांना गोळी घालण्याचा प्रसंग कमांडर येई. ३०७ सैनिकांना भित्रेपणासाठी गोळ्या घालण्यात आल्याची नोंद आहे. नेहमीचे सैनिक अधिकारी स्वयंसेवी सैनिकांच्या तुकडीवर जायला नाखूश असत. ते पब्लिक स्कूलमधून आले होते. त्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत गेले, तसे तळातून आलेल्या सैनिकांना बढतीच्या संधी मिळाल्या. त्यामुळे त्यांच्यात स्तराचा अभिमान नसे. तळाच्या स्तरातून वर आल्याने या अधिकारी वर्गाला आपल्या माणसांचा पूर्ण परिचय असे. आपल्या तुकडीतल्या सैनिकांचे खेळाचे सामने घेणे, त्यात स्वत: भाग घेणे, खंदक खणण्याच्या, नेमबाजीच्या, धावण्याच्या स्पर्धा घेणे, तसेच त्यांच्या जेवणाची, तब्येतीची विशेषत: पायांची काळजी घेणे, या सर्व गोष्टी हा अधिकारी वर्ग करी. सैन्याचे निरीक्षण करताना एखाद्याचा कान पकडणे, त्याच्या मुलांची चौकशी करणे, तो सुट्टीवर जात असल्यास त्याच्या तिथल्या कार्यक्रमासंबंधी विचारणे याने सैनिकांच्या मनात अधिकाऱ्याविषयी आत्मीयता निर्माण होई. ‘इन मेमेारियम’ ही इ. ए. मेकिंतोश या लेफ्टनंटची कविता. यात तो आपल्या मारल्या गेलेल्या सैनिकाच्या वडिलांना म्हणतो, ‘तुम्ही तर फक्त डेव्हिडचे वडील होता, पण मी पन्नास मुलांचा बाप होतो.’ शेवटच्या कडव्यात तो लिहितो,

“तुम्ही त्यांना पाहिलेत आनंदी, वीरवृत्तीने भारलेले

आणि तारुण्याने मुसमुसलेले.

पण पाहिले नाहीत तुम्ही त्यांना

जेव्हा त्यांची देखणी शरीरे मोडून पडली

आणि पाहिले नाहीत तुम्ही त्यांना

जेव्हा त्यांची शरीरे वेदनेने पिळवटून निघाली.

ऐकल्या नाहीत तुम्ही त्यांच्या किंकाळ्या ‘सर, मला सोडून जाऊ नका’च्या

तुम्ही तर फक्त त्यांचे वडील होता, पण मी त्यांचा अधिकारी होतो!”

बक्षिसे व शिक्षा या दुहेरी दगडांवर अधिकाऱ्यांचे पाय भक्कम रोवलेले असत. जर्मन सैन्यात मात्र अधिकारी वर्गाला शिक्षार्थी असल्यापासूनच वेगळा काढले जाई. ‘द ग्रेट वॉर अ‍ॅन्ड मॉडर्न मेमरी’ हा या युद्धावरचा महत्त्वाचा ग्रंथ लिहिणारा पॉल फ्युसेलने तो ग्रंथ आपल्या दुसऱ्या महायुद्धातल्या अधिकाऱ्याला अर्पण केला आहे. दुसऱ्या युद्धात बॅटल ऑफ बल्जच्या वेळी जर्मन तोफगोळा या दोघांच्या जवळ पडला, तसे दोघांनी जमिनीच्या दिशेने झेप घेतली आणि काही क्षणानंतर फक्त एकच माणूस उठून उभा राहिला. फ्युसेल म्हणतो, “माझ्या अधिकाऱ्याचा मृत्यू हा सहज माझा असू शकणार होता. अधिकारी कसा असला पाहिजे हे मी त्याच्याकडून शिकलो होतो आणि ज्या कोणाची ऐकावयाची तयारी असेल त्याच्या समोर मरेपर्यंत या व्यक्तीविषयी बोलायची माझी तयारी आहे.” सैनिक त्याच्या अधिकाऱ्यासाठी लढे.

निष्पाप, निष्कपट भावना व मानवी वृत्तींसंबधीचे गोड अज्ञान यांना जोरदार धक्का या महायुद्धाने दिला. या युद्धाच्या स्मृती इंग्रजी भाषेने आणि साहित्याने ज्या प्रकारे जपल्या आणि त्यांना आकार दिला, त्याचा वेध पॉल फ्युसेलने घेतला आहे. युद्धाच्या सुरुवातीला त्याला तेजोवलय प्राप्त करून देण्यात आले होते. ‘युद्धे संपवण्यासाठीचे युद्ध’ अशी त्याची जाहिरात शासनाने केली. लोक अशाने प्रभावित होत. सैन्य भरतीच्या वेळी ऑर्थर सिडने या ४९ वर्षांच्या माजी कप्तानाने त्याला वयामुळे नाकारण्यात आले, तेव्हा त्याने आत्महत्या केली. युद्धाच्या वेळी पायदळात अधिकारी असलेले व नंतर ब्रिटनचे पंतप्रधान झालेले अ‍ॅन्थनी इडन लिहितात, “ज्या प्रकारे जगाला मी ओळखत होतो, ते जग नष्ट झाले. माझा सर्वांत मोठा भाऊ पहिल्या हिवाळ्यात मारला गेला. नंतर वडील वारले. माझ्या मोठ्या भावाला जर्मनीत जबरदस्तीने सैन्यात भरती करण्यात आले. विमानदलात असणार्‍या माझ्या काकांचे विमान पाडण्यात येउन त्यांना कैद करण्यात आले. मी खंदकात असताना माझा लहान भाऊ, जो माझ्या सर्वांत जवळचा होता, ज्युटलँडमध्ये मारला गेला. तो फक्त सोळा वर्षांचा होता. या नंतर मी ऐकले सॉमच्या रणभूमीवर माझ्या बहिणीचा नवरा गंभीर जखमी झाला.” खरे तर युद्धानंतरही ब्रिटनकडे सर्वांत मोठे नौदल व विमानदल होते. युद्धामुळे बेकारी संपुष्टात येऊन औद्योगीकरणात वाढ झाली होती व दहा लाख चौरस मैलाचा प्रदेश नव्याने साम्राज्यात आला होता. पण ‘एन्ड ऑफ द ग्लोरी, लॉस्ट जनरेशन, क्रीम ऑफ ब्रिटिश युथ आणि लॉस ऑफ इनोसन्स’ असे शब्द प्रयोग नंतर वापरात आले. आशेला आधार अज्ञानाचा होता. हा धक्का सर्वांत मोठा होता. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी असे घडले नाही. युद्ध काय असते याची पूर्ण कल्पना सत्ताधाऱ्यांना होती. त्यामुळे तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान चेंबर्लेनने ते सामोपचाराने थोपवायचा बराच प्रयत्न केला, असे काही इतिहासकारांचे निरीक्षण आहे.

युद्ध संपल्यानंतर साधारण दहा वर्षांनी त्याचे प्रतिसाद साहित्यात उमटू लागले. जे सैनिक युद्धात लढले होते, त्यांच्या आठवणी व अनुभव कविता, कथा, कादंबऱ्यांच्या रूपाने प्रसिद्ध होऊ लागले. ते उपरोधाने (Irony) भरले होते. त्याने शौर्य, कीर्ती, स्नेह, प्रेम, देशाभिमान, निष्ठा या शाश्वत समजल्या जाणाऱ्या मूल्यांविषयी शंका उपस्थित केल्या. अर्नेस्ट हेमिंग्वे हा पुढे प्रसिद्धीला आलेला लेखक या युद्धात रुग्णवाहिकेचा चालक होता. युद्ध त्याने जवळून अनुभवले. ‘फेअरवेल टू आर्मस्’ ही त्याची कादंबरी १९२९ रोजी प्रकाशित झाली. हा लेखक संवादप्रधान आहे. युद्धाच्या सावल्या त्यातल्या संवादांमध्ये स्पष्ट दिसतात. आपल्या प्रेयसीशी लग्न करण्याच्या विचारात असलेला सैनिक नायक आपल्या मैत्रिणीला विचारतो,

“फेगी, तू आमच्या लग्नाला येशील?”

“तुम्ही कधीच लग्न करणार नाही.”

“आम्ही करू!”

“त्या आधीच तुम्ही भांडाल.”

“आम्ही भांडणार नाही.”

"मग तुम्ही मराल. माणसे भांडतात किंवा मरतात...”

नायिका कॅथरीन आपल्या प्रियकराला, फ्रेड्रीकला म्हणते, “आपण मात्र कधीच भांडणार नाही. आपण विरुद्ध सारे जग असा हा सामना आहे. आपणामध्ये जर वितुष्ट आले तर हे सगळे जग आपल्याला मिटवून टाकेल!”

“हे घडणार नाही कारण तू धैर्यवान आहेस.”

“पण धैर्यवान माणसे मरतात.”

“पण एकदाच.’’

“असे कोण म्हणते?”

“भित्री माणसे हजारदा मरतात तर शूर माणूस एकदाच मरतो.”

“हे कुठल्यातरी घाबरट माणसाचे वाक्य आहे. शूर माणूस, जर तो हुशार असेल तर दोन हजार वेळा तरी मरतो. फक्त तो त्याबद्दल बोलत नाही. शूराच्या मनात डोकावणे अवघड आहे.”

अशा नायकाची लढाईत उदध्वस्त झालेल्या गावात अजूनही देशप्रेमात बुडालेल्या नव्या सैनिकाशी गाठ पडते. नायक फ्रेड्रीक त्याला म्हणतो, “ज्या गोष्टी देदीप्यमान वाटल्या होत्या, त्या तशा नव्हत्या. खरे तर कीर्ती, आदर, धैर्य, समर्पण हे सगळे गलिच्छ शब्द आहेत. कृत्रिम आहेत. त्यांना कसलाही अर्थ नाही. फक्त नद्यांची, गावांची माणसांची, रस्त्यांची, रेजिमेंटची नावे हेच शब्द खरे आहेत. त्यांना प्रतिष्ठा आहे.” हेच हेमिंग्वेने जर युद्धाच्या आधीच्या कालखंडात लिहिले असते तर ते कोणालाही कळले नसते. ‘फेअरवेल टू आर्मस्’ यात ‘आर्मस्’ या शब्दावर श्‍लेष आहे.

‘आर्मस’चा अर्थ टीकाकारांच्या मते फक्त शस्त्रांना निरोप देणे असे नसून कॅथरिन या त्याच्या प्रेयसीच्या बहुपाशातून लांब जाणे असाही आहे. पण त्याही पलीकडे जाऊन जी संस्कृती आदर्शवादी शब्दांच्या बहुपाशात सुरक्षित विसावली होती, त्या शब्दांचाच नव्हे तर त्या संकल्पनांचाच निरोप तिने या युद्धाअखेर घेतला असेही म्हणता येईल. ही शोकांतिका कोणत्या एका देशाची नव्हती. ती सार्वत्रिक होती. जर्मन लेखक एरिक रिमार्के याच्या ‘ऑल क्वायट ऑन वेस्टर्न फ्रंट’ या कादंबरीच्या सुरुवातीलाच एक सैनिक आपल्या मरणेान्मुख सहकाऱ्याचा बूट आपल्याला बरोबर होतो की नाही ते पहात असतो. डेव्हिड ससून हादेखील युद्धात लढलेला कवी. या कवीच्या ‘हीरो’ या कवितेत अधिकारी मुलाच्या मृत्यूचा निरोप त्याच्या आईला द्यायला गेला असतो. तो देताना त्याच्या शौर्याचे वर्णन करतो. म्हातारीला बरे वाटते. परत येताना त्याला खरा जॅक आठवतो. तो कसा घाबरट व बिनकामाचा असतो तेही आठवते. तो जेव्हा तोफगोळ्याच्या स्फोटात मरतो, तेव्हा खरे तर एक ब्याद गेली असेच सर्वांना वाटलेले असते.

युद्धाने जन्माला घातलेले जग हे असे होते.

जॉन मेसफिल्ड या लेखकाने ऑडर्ली म्हणून या युद्धात हॉस्पिटलमध्ये काम केले. तो बायकोला लिहितो, “युद्ध ही भयानक गोष्ट आहे हे खरे आहे. त्यात धाडसाच्याही काही गोष्टी घडतात. पण भयानकतेकडे दुर्लक्ष करून केवळ धाडसावर लिहिणे हे जुनी मढी परत उकरण्यासारखे आहे. हे काम आपण अनेक वर्षं फावल्या वेळात घरी बसून करत आलो आहोत. ते करण्यात कसलेही शौर्य नाही.” एडमंड ब्लुनडेनचे ‘अंडरटोन्स ऑफ वॉर’सारखे पुस्तक वा युद्धात सैनिक म्हणून भरती झालेला झेक लेखक जारोस्लाव हासेकचे ‘द गुड सोल्जर स्वेजक’ हे परत परत वाचण्यासारखे आहे. स्वेजकला त्याच्या घरी काम करणारी स्त्री म्हणते, “अखेर आपल्या फर्डिनांडला त्यांनी मारले तर?” तो विचारतो, “कोणचा फर्डिनांड? मला तर दोन फर्डिनांड माहीत आहेत. एक केमिस्टकडे निरोप्या म्हणून काम करतो, तर दुसरा गावातली कुत्र्याची घाण गोळा करतो. यापैकी कोणालाही मारले तरी आपले काहीही नुकसान नाही.”

उपहासाची प्रसन्न पाखरण हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य. दुसऱ्या महायुद्धात हसेकच्या पुस्तकावर बंदी आली. या युद्धाने असे साहित्यिक दिले ज्यांनी युद्ध जसे पाहिले, अनुभवले तसेच त्याबद्दल लिहिले. त्याला कोणतीही देशभक्तीची, शौर्याची, तत्त्वज्ञानाची वा कोणत्याही अवसानाची झालर लावली नाही. समाजाने त्याबद्दल त्यांचे ऋणी असले पाहिजे.

‘शांतता हवी असेल तर युद्धाला सतत सज्ज रहा’ हा रोमन सेनापतींनी दिलेला इशारा अपूर्ण आहे. मानवी संस्कृतीच्या ज्ञात इतिहासापासून जग सतत युद्धाला तयार आहे आणि त्याला शांततेचे फक्त काही क्षण लाभलेले आहेत. संघर्षाच्या काळात विजयाची पूर्ण हमी देईल एवढे सैन्य कोणत्याही देशापाशी नसते. ‘शांतता हवी असेल तर युद्ध समजून घ्या’ हा ब्रिटिश लष्करी इतिहासकार लिडेल हार्टने दिलेला सल्ला रोमन सेनापतींचा इशारा पूर्ण करतो.

माझी प्रत्येक लढाई ही वेगळी आहे असे नेपोलिअनने म्हटले आहे. इतिहासातल्या प्रत्येक लढाईबद्दल ते खरे आहे. प्रत्येकातले डावपेच, वापरलेली शस्त्रास्त्रं, सैन्यसंख्या, त्यांचे कालखंड या साऱ्यात विविधता आहे. असे असले तरी त्यात जे मानवी आहे, ते सामान आहे असे किगानने या युद्धाचा जो इतिहास लिहिला त्याच्या समारोपात म्हटले आहे. युद्धाचा अभ्यास माणसाच्या भीतीचा आणि धैर्याचा अभ्यास आहे, तो नेहमीच नेतृत्व गुणांचा, आज्ञाधारकतेचा, कृतीच्या अनिवार्यतेचा व क्वचितच होणाऱ्या बंडखोरीचा तो अभ्यास आहे. तो अभ्यास माणसाच्या मनातल्या अनिश्चिततेचा, शंकांचा व चुकीच्या आशांचा अभ्यास आहे. नेहमीचे शांत जीवन सोडून लाखो अनाम सैनिक खंदकात नि:संशय विनातक्रार राहिले याबद्दल त्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. खंदकातले जीवन क्रूर होते याबद्दल दुमत नाही, पण त्यानेच शांत नागरी जीवनात शक्य नव्हता एवढा आपल्या सहकाऱ्यांबद्दल बंधुभावदेखील त्याने निर्माण केला. हे सारे मानवी जीवना इतकेच त्याला गूढ वाटते.

३ ऑगस्ट १९१४ रोजी ब्रिटिश परराष्ट्र सचिव एडवर्ड ग्रे सायंकाळपर्यंत परराष्ट्र खात्याच्या कचेरीत थांबला होता. सरत्या सायंकाळी खाली गॅसचे दिवे पेटवताना त्याने पाहिले व तो जवळ उभ्या असलेल्या सहकाऱ्याला म्हणाला ‘साऱ्या युरोपात दिवे विझत आहेत. आपल्या हयातीत ते परत प्रज्वलित झाल्याचे आपल्याला दिसणार नाहीत.’ हे उद्गार इतिहासात चिरस्थायी झाले आहेत. या नंतर चार वर्षे तीन महिने आणि चौदा दिवसांनी युद्ध संपले. युद्ध समाप्तीनंतरही सहा महिने म्हणजे १९१९ च्या एप्रिल महिन्यापर्यंत एडिथ इव्हान्स नर्स म्हणून रेड क्रॉस हॉस्पिटलमध्ये काम करत होती. जखमी सैनिकांची संख्या कमी कमी होत गेली. हॉस्पिटल बंद करण्याच्या आदल्या रात्री पहाटेपर्यंत नाच गाण्यांचा कार्यक्रम होता. सकाळी उरलेले सगळे सैनिक निघून गेले. त्यांचा निरोप घेऊन एडिथ परत हॉस्पिटलमध्ये आली आणि तिला तिथल्या बाथरूमच्या खिडकीत सिगरेटचे थोटूक सापडले. तिच्या वॉर्डात सैनिकांना सिगारेट ओढायला तिने बंदी केलेली असते. आता मात्र तिने ते सिगारेटचे थोटूक बोटांनी उचलले आणि सैनिकांच्या आठवणींनी ती ढसढसा रडू लागली. ‘सारी स्वरूपे कुरूप झालीं, हुरूप कशाचा नाही चित्ता! सारेच दीप कसे मंदावले आता!!’

.............................................................................................................................................

लेखक रवींद्र कुलकर्णी युद्धविषयक पुस्तकांचे संग्राहक आणि अभ्यासक आहेत.

kravindrar@gmail.com

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................