शहा मराई : अफगाणिस्तानची अक्षरश: युद्धभूमी पाहणारा फोटोग्राफर
दिवाळी २०१८ - माणसं : कालची, आजची, उद्याची
मीना कर्णिक
  • शहा मराई
  • Wed , 24 October 2018
  • दिवाळी २०१८ माणसं : कालची आजची उद्याची शहा मराई Shah Marai

३० एप्रिल २०१८.

सोमवार.

वेळ सकाळी सुमारे आठची.

काबुलमध्ये बॉम्बस्फोट झाल्याची बातमी कळली, तेव्हा तिथे काम करणारे फोटोग्राफर्स, पत्रकार घटनास्थळी धावत निघाले.

खरं तर आता हे धावणं त्यातल्या अनेकांच्या अंगवळणी पडलं होतं. विशेषत: फोटोग्राफर्सच्या. तालिबानचा दहशतवाद, आयसिससारख्या आणखी एका दहशतवादी संघटनेचा वाढता प्रभाव आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून सतत होणारे बॉम्बस्फोट. त्यात मरणारी माणसं. या माणसांच्या नातेवाईकांचं आक्रंदन. जखमी झालेल्यांचे भकास चेहरे...

किती वेळा आणि किती काळ आपल्या कॅमेऱ्यात पकडत राहणार ही दृश्यं? पण काम म्हटलं की, करायलाच पाहिजे.

एएफपी (एजन्सी फ्रान्स प्रेसी)चे काबुलमधले मुख्य फोटोग्राफर शाह मराईसुद्धा बहुदा याच भावनेतून बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी धावत निघाले असणार. ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या आपल्या व्हिडिओग्राफर सहकाऱ्याला त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपही केला, ‘काळजी करू नकोस, मी निघालोय. आणि फोटोंबरोबर व्हिडिओ शूटिंगही करतो...’

हा स्फोट काबुलवासियांच्या दृष्टीनं फार मोठा नव्हता. ‘फक्त’ चार माणसं त्यात मारली गेली होती. मराई आणि इतर काही वार्ताहर तिथे पोचले, तेव्हा त्या भागाभोवती पोलिसांनी सुरक्षा साखळी घातलेली होती. फोटो काढण्यासाठी मराई फुटपाथवरच्या थोड्या उंच ठिकाणी चढले आणि दुसऱ्याच क्षणी आणखी एक हादरा बसला.

एका आत्मघातकी बॉम्बरनं स्वत:ला उडवलं होतं. आणि त्याबरोबर आणखी किमान पंचवीस नागरिकांना. त्यात नऊ पत्रकारांचा समावेश होता.

रॉयटर्स वृत्तसंस्थेचे फोटोग्राफर ओमर सोभानी म्हणतात, ‘माझ्या मागे मी मोठा आवाज ऐकला. त्या हादऱ्यानं मी जमिनीवर कोसळलो. मागे वळून बघितलं तेव्हा पहिल्यांदा माझ्या नजरेला पडलं ते शाह मराई यांचं शरीर. ते हयात नाहीत हे मला क्षणात समजलं.’

एपी (असोसिएटेड प्रेस)चे फोटोजर्नलिस्ट मसौद होसैनींनी हा दुसरा बॉम्बस्फोट आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. केवळ नशिबानं ते त्यातून वाचले. कॅमेऱ्यातून मान वर करून त्यांनी समोर बघितलं, तेव्हा आणखी एक फोटोग्राफर त्यांच्या दिशेनं ओरडत येत होता, ‘मराई इज डेड, मराई इज डेड.’

शाह मराई. मूळचे अफगाणिस्तानचेच. हसरा चेहरा. मिश्किल डोळे. आणि उमदं व्यक्तिमत्त्व. वय वर्षं केवळ ४१.

तसं बघितलं तर त्यांनी पत्रकारितेचं किंवा फोटोग्राफीचं रितसर शिक्षण घेतलेलं नव्हतं. पण गेली बावीस वर्षं ते एएफपीमध्ये काम करत होते. मात्र त्यांनी काम करायला सुरुवात केली ते एक ड्रायव्हर म्हणून.

१९९६मध्ये अफगाणिस्तानमध्ये विविध वृत्तसंस्थांसाठी बातम्या कव्हर करायला जाणाऱ्या पत्रकारांची संख्या बऱ्यापैकी होती. त्यांना काबुलमध्ये किंवा इतरत्र फिरण्यासाठी त्या भागाची चांगली माहिती असणारा माणूस हवाच असायचा. एएफपीसाठी शाह मराई यांनी ते काम स्वीकारलं.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा -

https://www.booksnama.com/client/book_list_by_category

.............................................................................................................................................

तालिबानने अफगाणिस्तानवर आपलं साम्राज्य पसरवायला सुरुवात केली ते हे वर्ष. बाहेरच्या देशांतून आलेल्या पत्रकारांना आणि फोटोग्राफर्सना आपल्या देशातून फिरवता फिरवता एक छोटा कॅमेरा त्यांनी हाती घेतला. केवळ दोन वर्षांमध्ये स्वत: मराई एएफपीसाठी फोटो काढू लागले होते. दरम्यान तालिबानी दहशत वाढू लागली होती. अनेक वृत्तसंस्थांनी आपले पत्रकार परत बोलावून घेतले होते. २०००मध्ये मराई या वृत्तसंस्थेचा काबुलमधला एकमेव पत्रकार बनले होते. त्यांना देण्यात आलेल्या सॅटेलाईट फोनद्वारे आपल्या बातम्या वृत्तसंस्थेच्या इस्लामाबाद ब्युरोमध्ये पोचवायच्या आणि जमेल तेव्हा एव्हाना दहशतवादाने पोखरायला सुरुवात केलेल्या आपल्या शहराचे फोटो काढून पाठवायचे हे त्यांचं रोजचं काम बनलं होतं. २००२मध्ये त्यांना पूर्ण वेळ फोटो स्ट्रिंगर बनवण्यात आलं होतं. आणि कालांतरानं काबुलच्या ब्युरोच्या फोटोग्राफी विभागाचे ते प्रमुख बनले.

या काळात एएफपीनं त्यांचे अठरा हजारांहून अधिक फोटो जगभर वितरित केले. निसर्गानं भरभरून उधळण केलेल्या अफगाणिस्तानातल्या विविध ऋतूंचे फोटो. बर्फाळलेले डोंगर. अजून आपलं बालपण न हरवलेली मुलं. सणासमारंभात सामील झालेले पुरुष. फुटबॉलच्या खेळात आपले निवांत क्षण शोधणारे मुलगे. या फोटोंमधून मराई यांचं आपल्या देशाविषयीचं प्रेम जाणवून यायचं. १९ वर्षांचा आरश नावाचा फुगे विकणारा मुलगा त्यांना भावला. निवडणुकीच्या मोर्च्यात बुरखा घालून सामील झालेल्या बायकांमधली एक आपल्या मोबाईलमधून फोटो काढताना मराई यांच्या कॅमेऱ्यानं नेमकी टिपली होती. अर्थात, अफगाणिस्तानचं नैसर्गिक सौंदर्य त्यांच्या नजरेला पडलं, तितकीच देशातल्या हिंसाचाराची धगधगही त्यांच्या कॅमेऱ्याला जाणवली. कधी एकमेकांच्या डोक्यावर खेळण्यातलं पिस्तुल ठेवलेली लहान मुलं असोत नाही, तर बॉम्बस्फोटानंतर पेट घेतलेली वाहनं, बर्फानं आच्छादलेल्या स्मशानभूमीमधून वाट काढणारी बाई असो की, काबुल शहराच्या बाहेर भिंतीला टेकून धाय मोकलून रडणारा एक चिंगुला, त्यांच्या फोटोंनी अफगाणिस्तानमधली परिस्थिती आणि त्यातली भीषणता जगासमोर नेली. अनेकदा त्यांनी थेट तालिबानी दहशतवाद्यांचेही फोटो काढलेले आहेत. अमेरिकन सैन्यानं हल्ला केला तर आपली तयारी असावी म्हणून आपल्या बंदुका साफ करणारे तालिबानी अतिरेक्यांचे फोटो काही वेळा अर्थातच त्यांच्या नकळत काढावे लागत. नाहीतर मग फोटो काढणाऱ्याची खैर नव्हती.

तालिबानच्या राजवटीत पावलापावलावर धोका होता. ही मंडळी पत्रकारांचा तिरस्कार करत. स्वाभाविकही होतं म्हणा ते. त्यामुळे मराई आपला छोटासा कॅमेरा लपवून नेत, आपल्या फोटोंवर आपलं नाव छापलं जाणार नाही याची काळजी घेत. उगीच कोणाचं लक्ष आपल्याकडे वेधलं जायला नको म्हणून.

त्यामुळे आपलं काम सोपं नाही, सुरक्षित तर नाहीच नाही, याची मराई यांना कल्पना नव्हती असं तरी कसं म्हणता येईल?

२०१६मध्ये एएफपीसाठी लिहिलेल्या एका ब्लॉगमधून त्यांनी आपली ही घालमेल, आपल्या देशाची होणारी वाताहात, माणसाच्या जिवाचं कमी होत जाणारं मूल्य, त्यांना स्वत:च्या कुटुंबासाठी वाटणारी भीती या सगळ्याविषयी लिहिलं होतं. त्या ब्लॉगचं शीर्षक होतं, ‘देअर इज नो होप.’

“१९९८मध्ये मी एएफपीचा फोटोग्राफर म्हणून काम करायला लागलो ते तालिबानी राजवट असतानाच. पत्रकारांचा ही मंडळी तिरस्कार करत. त्यामुळे मी नेहमी लपून छपून माझं काम करत असे. अंगावर सलवार कमीज असा पारंपरिक वेश असेल याची काळजी घ्यायचो. बाहेर जाताना माझ्या हाताभोवती नेहमी एक स्कार्फ गुंडाळलेला असायचा. त्यात मी माझा कॅमेरा लपवून ठेवायचो. तालिबाननं लादलेल्या निर्बंधांमुळे काम करणं अत्यंत कठीण असे. कोणत्याही जिवंत गोष्टीचा फोटो काढायला त्यांची परवानगी नसायची. मग तो माणूस असो की प्राणी.

“एक दिवस बेकरीच्या बाहेर उभ्या असलेल्या रांगेचे फोटो मी काढत होतो. परिस्थिती तेव्हा कठीण होती. लोकांना काम मिळत नव्हतं. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडलेल्या होत्या. फोटो काढत असताना काही तालिबानी माझ्या दिशेने आले.

“काय करतोयस असा प्रश्न त्यांनी केला. ‘काही नाही, या पावाचे फोटो काढतोय,’ मी पट्कन उत्तर दिलं. डिजिटल कॅमेरे येण्यापूर्वीचे हे दिवस असल्यामुळे सुदैवानं मी खरं बोलतोय की नाही हे त्यांना तपासून बघता आलं नाही.

“त्या वेळी माझ्या फोटोंवर मी क्वचितच माझं नाव टाकत असे. कोणाचं लक्ष वेधलं जाऊ नये म्हणून नुसतंच ‘स्ट्रिंगर’ असं लिहून मी फोटो पाठवायचो.

“त्या सुमारास या भागात एएफपीचा तसा ब्युरो नव्हता. आज ज्या वाझिर अकबर खान भागात आमचं ऑफीस आहे तिथंच तेव्हाही होतं. अनेक विशेष प्रतिनिधी वेळोवेळी इथं येत. आम्ही नियमितपणे शोमाली पठाराच्या सीमेवर जात असू. इथं नॉर्दर्न अलायन्सनं तालिबानला रोखून धरलेलं होतं. बीबीसी वगळता शहरात एएफपी, एपी आणि रॉयटर्स अशा तीनच वृत्तसंस्था टिकून राहिल्या होत्या. २००० साली सगळ्या परदेशी पत्रकारांना देशाबाहेर घालवून लावण्यात आलं आणि एएफपीचा किल्ला लढवण्यासाठी मी एकटाच शिल्लक राहिलो. माझ्यापाशी असलेल्या सॅटेलाईट फोननं मी माझ्याजवळची माहिती इस्लामाबादच्या ब्युरोला देत असे.

“११ सप्टेंबरचा हल्ला मी बीबीसीवर बघितला तेव्हा त्याचे परिणाम आपल्या देशावर होणार आहेत याची जराही कल्पना मला नव्हती. त्यानंतर काही दिवसांनी इस्लामाबादच्या ब्युरोनं मला इशारा दिला, अमेरिका तुमच्यावर हल्ला करणार आहे अशा अफवा आहेत.

“आणि मग महिनाभराच्या आतच, ७ ऑक्टोबरला बॉम्बहल्ले सुरू झाले. पाकिस्तानी सीमेवर असलेलं कंदहार हे तालिबाननं आपलं राजधानीचं शहर बनवलं होतं. अमेरिकेचे हल्ले तिथंच होत होते.

“एक दिवस इस्लामाबादला फोनवरून माहिती देत असताना मला काबुलवर घिरट्या घालणाऱ्या विमानांचे आवाज ऐकू येऊ लागले. विमानतळाच्या जवळ बॉम्ब पडले होते. त्या रात्री मी झोपलो नाही. पण मला बाहेरही जाता येत नव्हतं.

“दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या गाडीत बसून मी विमानतळाच्या दिशेनं निघालो. वाटेत काळे कपडे घातलेला तालिबानी हल्लेखोरांचा एक गट मला दिसला. त्यातला एकजण माझ्यापाशी आला आणि म्हणाला, ‘हे बघ, आज मी चांगलं वागायचं ठरवलंय म्हणून तुला ठार मारत नाही, पण इथून ताबडतोब चालता हो.’ मी निमूटपणे परत फिरलो आणि माझी गाडी ऑफिसमध्ये ठेवली. संपूर्ण शहरात शुकशुकाट होता. मी माझी बाईक घेऊन पुन्हा निघालो. हाताभोवती गुंडाळलेल्या स्कार्फमध्ये लपवलेला कॅमेरा होता.

“त्या दिवशी मी सहा फोटो काढले. फक्त सहा. आणि त्यातले दोन मी एएफपीला पाठवले.

“आणि मग एके सकाळी तालिबान अचानक दिसेनासे झाले. तो अनुभव तुम्ही घ्यायला हवा होता. रस्ते माणसांनी फुलून गेले होते. जणू काही लोक सावलीतून बाहेर पडून आयुष्यातला प्रकाश नव्यानं पाहू लागले होते.

“खूप सारे सहकारीही मग येऊ लागले. एएफपीनं ताबडतोब मॉस्कोहून एक रिपोर्टर आणि एक फोटोग्राफर पाठवला. एकेक करत आम्ही डझनभर पत्रकार झालो. आता आमचं ऑफीस कायम माणसांनी भरलेलं असे.

“मी सगळ्यांना मदत करायचो. कुणाला रहायला जागा शोधून देण्यासाठी, कुणाला गाडी खरेदी करण्यासाठी किंवा मग एखाद्या ठिकाणी जाण्याचा उत्तम मार्ग सांगण्यासाठी. माझ्या अगदी जवळच्या एका मित्रानं सुलतान गेस्ट हाऊस सुरू केलं. काबुलमधलं हे पहिलं गेस्टहाऊस. त्यानं मला पार्टनरशिपही देऊ केली. मी ती नाकारली. आता वाटतं, घ्यायला हवी होती, कारण त्यानं या व्यवसायात तगडा नफा कमावला.

“तालिबानच्या राज्यातल्या त्या एकटेपणानंतर अचानक एवढे परदेशी लोक बघणं छान वाटायचं. जगभरातून ते आलेले होते. आमच्याकडची लहान लहान मुलं रस्त्यावर त्यांच्या पुढे पुढे धावत. मला आठवतंय, काबुलमधल्या एकाच्या हातात डॉलरची नोट होती आणि तो सारखं सारखं म्हणत होता, माझ्या हातात घेतलेला हा पहिला डॉलर आहे.

“तो आमच्यासाठी आशादायी काळ होता. सोनेरी काळ. शहरात दंगेधोपे नव्हते. ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, इटली, टर्की अशा देशांमधले सैनिक रस्त्यात गस्त घालत असायचे. समोरून येणाऱ्याकडे पाहून हसायचे. मला हवे तितके त्यांचे फोटो मी काढू शकत होतो. आम्ही कुठेही प्रवास करू शकत होतो. दक्षिण, पूर्व, पश्चिम, कुठेही. सगळीकडे सुरक्षित वाटायचं.

“आणि मग २००४मध्ये तालिबान परत आले. आधी गझनी विभागात. मग २००५मध्ये आणखी मोठ्या संख्येनं. २००६मध्ये त्याहून जास्त. एखाद्या व्हायरससारखे अफगाणिस्तानभर ते पसरू लागले. मग सुरू झाले त्यांचे हल्ले. परदेशी माणसं जायची अशा जागांना त्यांनी लक्ष्य केलं होतं.

“आज तालिबान पुन्हा सगळीकडे दिसू लागले आहेत. आम्ही काबुलच्या बाहेर फारसे जाऊ शकत नाही. आत्मघातकी पथकांपासून संरक्षण म्हणून बांधलेल्या काँक्रिटच्या भिंती जिथं तिथं दिसू लागल्या आहेत. हातात कॅमेरा असलेल्यांबरोबर कोणी मैत्रीनं वागतबोलत नाही. उलट आक्रमक होतात. लोकांचा एकमेकांवर विश्वास उरलेला नाही. त्यातून परदेशी वृत्तसंस्थेसाठी काम करणाऱ्यांवर तर नाहीच नाही. तू हेर आहेस का असा प्रश्न मला अनेकांनी केलेला आहे.

“अमेरिकन आक्रमणानंतर पंधरा वर्षांनी अफगाणी लोकांपाशी पैसे नाहीत, काम नाही, जागोजागी आहेत फक्त तालिबानी. २०१४मध्ये आवश्यक असलेलं पाश्चात्य सैन्य काढून घेण्यात आल्यानंतर अनेक नागरिक परदेशी निघून गेलेत, विस्मृतीत गेलेत. या देशात घातलेले लाखो डॉलर्स पाण्यात वाहून गेलेत.

“अमेरिकन आल्यानंतरच्या त्या सुरुवातीच्या दिवसांची मला खूप आठवण येते. अर्थात, २००१नंतर हे शहर खूप बदलून गेलंय. नवीन बिल्डिंग्स बांधल्या गेल्यात, रस्ते मोठे झालेत. युद्धाची चिन्हं पार दिसेनाशी झालीयेत. जुन्या दारुलामन राजवाड्याखेरीज शहरात भग्नावस्थेतलं एकही बांधकाम आता दिसत नाही. दुकानं भरलेली आहेत आणि इथं कोणतीही वस्तू मिळू लागलीये.

“पण आता इथं आशावादी नाही वाटत. तालिबानच्या अधिपत्याखाली होतं, त्यापेक्षा आयुष्य अधिक कठीण झालंय. असुरक्षितता वाढलीये. माझ्या मुलांना घेऊन बाहेर फिरायला जायला मला भीती वाटते. मला पाच मुलगे आहेत आणि सगळा वेळ ते घरात बसून असतात. रोज सकाळी ऑफिसला जाताना आणि संध्याकाळी घरी परतताना माझ्या डोक्यात एकच विचार असतो. इथल्या कुठल्या गाडीत बॉम्ब लावलेले असतील? कोण माणूस आत्मघातकी बॉम्ब अंगावर बांधून स्फोट करू पहात असेल? मी हा धोका पत्करू शकत नाही. म्हणून मग आम्ही बाहेरच पडत नाही. माझ्या मित्राचं काय झालं हे मी विसरू शकत नाही. भवितव्य नसणं म्हणजे काय याचा इतका जवळून अनुभव मी कधीच घेतला नव्हता. आणि यातून बाहेर पडण्यासाठी काही मार्ग आहे असंही मला वाटत नाही. अस्वस्थ करणारी ही वेळ आहे.”

शाह मराई यांनी लिहिलेला हा ब्लॉग वाचताना अंगावर शहारा येतो. मृत्यूच्या सहवासात जगणं म्हणजे काय हे केवळ त्या शब्दांमधून आपल्याला अनुभवता येतं. मराई यांनी आपल्या मित्राचा उल्लेख या लेखात केलाय. या मित्राचं नाव होतं अहमद सरदार. सरदारही एएफपीचे पत्रकार होते. बरीच वर्षं मराई आणि सरदार एकत्र काम करत होते. २०१४मध्ये नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला एका रेस्टॉरन्टमध्ये आपल्या कुटुंबाबरोबर जेवायला गेलेले असताना बंदुकधारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात त्यांच्यासह त्यांचं संपूर्ण कुटुंब बळी पडलं. त्यांचा एक लहान मुलगा आश्चर्यकारकरित्या या हल्ल्यातून बचावला.

त्यावेळी मित्रकर्तव्य म्हणून मराई यांनी मित्राच्या अंत्ययात्रेची सगळी तयारी केली. भेटायला आलेल्यांना ऑफिसातल्या सरदारांच्या टेबलवर पडलेल्या वहीत त्यांच्या शेवटच्या लेखाच्या नोंदी बघायला मिळाल्या होत्या. काबुलच्या प्राणीसंग्रहालयामध्ये एका सिंहाच्या बछड्याला वाचवण्यात आलं, त्याविषयीचा तो लेख होता. सरदार यांचा वाचलेला एकुलता एक मुलगा अबुझार पुढे कॅनडाला त्याच्या नातेवाईकांकडे रहायला गेला. मराई सतत त्याच्या संपर्कात राहिले. तो तिथं नीट स्थिरावतोय ना याकडे ते लक्ष ठेवून होते.

मित्राचं आणि त्याच्या कुटुंबाचं हे असं जाणं मराई यांच्या जिव्हारी लागलं नसेल तरच नवल. तेव्हापासून ते अधिक हळवे झाले. विशेषत: स्वत:च्या कुटुंबाबाबत.

मराई यांना दोन पत्नी. आणि सहा मुलं. त्यातले पहिले पाच मुलगे. त्यांच्या मृत्यूच्या पंधरा दिवस आधी त्यांना सहावं अपत्य झालं. यावेळी मुलगी झाली म्हणून ते प्रचंड खुश होते. मुलगी झाल्यानंतर आठ दिवसांनी काबुलमध्ये आणखी एक बॉम्बस्फोट झाला. मृतांमध्ये मतदानासाठी आपली नावं नोंदवायला आलेल्या नागरिकांचा खूप मोठ्या संख्येनं समावेश होता. किंबहुना, लोकशाही प्रक्रियेत सामील होऊ इच्छिणाऱ्या अफगाणी लोकांना दहशतवाद्यांनी दिलेला इशाराच होता तो. खबरदार, निवडणुकांचा विचार कराल तर. खबरदार, आमचं राज्य उलथून टाकायचा प्रयत्न केलात तर. खबरदार, आमच्या विरोधात गेलात तर.

सकाळी या विनाशाचे फोटो काढून मराई ऑफिसमध्ये आले, तेव्हा मुलीच्या जन्मानिमित्त सहकाऱ्यांसाठी आणलले पेढे त्यांच्या हातात होते. एका बाजूला नवीन जीव या जगात आल्याचा आनंद होता आणि दुसऱ्या बाजूला मृत्यूनं घातलेलं थैमान. वैयक्तिक आनंद आणि व्यावसायिक कर्तव्य. अफगाणिस्तानात रहायचं आणि जगायचं तर या दोन्ही गोष्टी हातात हात घालून येणार हे जणू गृहितच होतं.

त्यांच्या कुटुंबामध्ये एक आनुवांशिक दोष होता. आंधळेपणाचा. त्यांचे दोन भाऊ अंध आहेत. या दोघांना त्यांनी युरोपमध्ये पाठवून दिलं. त्यांच्यावर उपचार व्हावे म्हणून आणि त्यांना सुरक्षित आयुष्य जगता यावं म्हणूनही. त्यांच्या दोन मुलांनाही दिसत नाही. आपणही हा देश सोडून निघून जाऊ असा आग्रह ही दोन मुलं आपल्या वडिलांना वारंवार करत. मराई यांची आई त्यांना हे जीवघेणं काम सोडून दुकान थाटायचा सल्ला देत असे. मृत्यूच्या सान्निध्यात असं जगणं त्यांना नकोसं वाटू लागलं असेल तर तेही स्वाभाविकच म्हणायला हवं. देशावर प्रेम होतंच, पण म्हणून दिवसाचे चोवीस तास आपल्या वडिलांची किंवा आपल्या मुलाची चिंता करत रहायची, आज संध्याकाळी तो घरी येईल ना या तणावाखाली प्रत्येक दिवस काढायचा आणि तो जगण्याचा एक भाग आहे असं मानायचं याला आयुष्य तरी कसं म्हणावं?

पण आपल्या मुलांचं आणि आईचं म्हणणं मराई यांनी अर्थातच ते कधीही मनावर घेतलं नाही. ते नुसतेच हसायचे.

मराई यांच्या त्या हास्याची आठवण त्यांचे सहकारी आवर्जून काढतात. त्यांच्या या हसऱ्या स्वभावाविषयी खूप आपुलकीनं बोलतात. मराईंना चावट विनोद सांगायला खूप आवडायचं. ऑफीसमधलं वातावरण गंभीर झालं की, ते एखादा विनोद सांगून ताण हलका करायचा प्रयत्न करत. मात्र, अनेकदा विनोद सांगून संपवण्याआधी ते स्वत:च हसायला लागत. काही वेळा फेसबुकवर काहीतर मजेशीर पोस्ट टाकत आणि मग ऑफिसमध्ये त्याविषयी चर्चा व्हायला लागे. कधीतरी पिंगपाँग किंवा व्हॉलीबॉल खेळून आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची दाहकता कमी करू पहात. काबुलमधल्या सगळ्या पत्रकारांचे आपण आजोबा आहोत, कारण आपण इथं सगळ्यात जुने आहोत असं त्यांचं ठाम मत होतं.

अ‍ॅलिसन जॅकसन २०१७च्या ऑगस्ट महिन्यात काबुलच्या एएफपीच्या ऑफिसमध्ये दाखल झाल्या होत्या. मराईंविषयी त्या लिहितात, “आधी मला वाटायचं की, मी बाई आहे आणि त्यांची बॉस आहे म्हणून ते माझ्यावर छाप टाकायचा प्रयत्न करताहेत. त्यातून आमच्या ऑफिसमध्ये बायका कमीच होत्या. पण लवकरच माझ्या लक्षात आलं की, त्यांचा तो स्वभावच होता. लोकांना हसवायला त्यांना आवडायचं. काबुलमध्ये काम करणं म्हणजे रोजच्या रोज मृत्यूशी सामना. त्यामुळेच असेल बहुदा, पण आम्हा सगळ्या सहकाऱ्यांमध्ये एक मजबूत नातं निर्माण झालेलं असतं. त्यांच्या मृत्यूनंतर आलेले शोकसंदेश हेच नातं अधोरेखित करणारे होते. आपल्या एका जवळच्या सहकाऱ्याच्या मृत्यूचं दु:ख पेलण्याची ताकद त्यातून आम्हाला मिळाली. त्यांच्या मृत्यूच्या काही आठवडे आधीचीच गोष्ट. अचानक एक दिवस ते म्हणाले, तुम्ही ऑफिसमध्ये खूप जास्त वेळ घालवता. माझी फ्रेंच सहकारी अ‍ॅन शॉन आणि मला घेऊन ते काबुलपासून तासभर अंतरावर असलेल्या एका निसर्गरम्य ठिकाणी जुडासची बहरलेली झाडं पहायला घेऊन गेले होते. आमच्याबरोबर आमची आणखी एक मैत्रीण, सोनियाही होती. त्या स्वच्छ सूर्यप्रकाशात ब्रेड, चॉकलेट आणि कॉफीचा साधासा ब्रेकफास्ट घेत आम्ही खूप गप्पा मारल्या होत्या. ते त्यांच्या कुटुंबाविषयी भरभरून बोलत होते. मृत्यूच्या काही मिनिटं आधी त्यांनी पहिल्या स्फोटाचं व्हिडिओ चित्रण केलेलं होतं आणि मला फोन करून आपल्याला तिथं काय काय दिसतंय हे ते सांगत होते. एएफपीच्या आमच्या ऑफिसमधलं मराई यांचं टेबल आता रिकामं दिसतंय. समोरच्या काळ्या लेदरच्या खुर्चीवर बसून टेबलवर पाय ठेवलेली त्यांची मूर्ती अजूनही डोळ्यासमोर आहे. टेबलवर त्यांचा एक फोटो आहे. निळ्या रंगाचं बुलेटप्रुफ जॅकेट घातलेला, एका हातात हेल्मेट आणि दुसऱ्या हातात दोन कॅमेरे असलेला. चेहऱ्यावरून आत्मविश्वास ओसंडून वाहतोय. शेजारच्या भिंतीवर त्यांच्या पाच मुलांबरोबरचाही फोटो आहे. मात्र हाताशी कायम असलेले कॅमेरे आणि स्मार्ट फोन त्या स्फोटात नामशेष झालेत.”

अँड्र्यू क्विल्टी हेही मराई यांच्यासारखेच एक फोटोग्राफर. २०१३मध्ये ते अफगाणिस्तानमध्ये आले. आणि मग तिथेच राहिले. एखादी घटना घडली की, मराई तिथं सर्वांच्या आधी पोचलेले असत असा त्यांचा अनुभव. ‘आपल्याला इन्ट्यिूशन येतं असं त्यांचं म्हणणं होतं,’ क्विल्टी म्हणतात. ‘आम्ही ज्या वातावरणात रहातो, काम करतो तिथं असा गुण मौल्यवानच म्हणायला हवा. कारण त्यामुळे मिळालेल्या बातमीला तुम्ही ताबडतोब प्रतिसाद देऊ शकता. मात्र मराई आणि त्यांच्याबरोबर आणखी काही पत्रकार मारले गेले आणि आम्ही सगळे पत्रकार हादरून गेलो.’

पाकिस्तानी पत्रकार उमर वझिर यांचंही हेच म्हणणं आहे. वझिर बरेचदा अफगाणिस्तानात काम करतात. आजवर इथले त्यांचे तीन मित्र त्यांनी गमावलेले आहेत. मराई तिसरे. पाकिस्तानातल्या आदिवासी भागांमध्ये पत्रकारिता करणारे आपले सहकारी अजूनही घाबरलेले आहेत, कारण तिथेही आम्ही अशाच दहशतीच्या वातावरणात काम करतो असं ते सांगतात. ‘हे असं जर सतत घडत राहिलं तर आपल्यासमोर काय वाढून ठेवलंय ही धाकधुक यापुढे सदैव आमच्या मनात असेल.’

मराई यांच्या मनातही ही भीती होतीच. पण म्हणून त्यांनी कधीच आपल्या कामात कसूर केली नाही. त्यांनीच नव्हे, त्यांच्याबरोबर त्या भीषण सकाळी मृत्यूमुखी पडलेले सगळे पत्रकार आपलं कामच तर करत होते. नव्हे, या स्फोटानंतरही इतर अनेकांनी आपलं काम सुरूच ठेवलं होतं. आपल्या सहकाऱ्यांच्या अंत्ययात्रेला जाताना त्याविषयीचं रिपोर्टिंग करायला ते विसरले नव्हते.

बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी टेलिव्हिजनवरचा एक वार्ताहर थरथरत उभा होता. त्याच्याबरोबरचा कॅमेरामन त्याच्या डोळ्यादेखत मारला गेला होता. आणि त्या अवस्थेतही दुसर्‍या सहकार्‍याच्या कॅमेर्‍यासमोर उभं राहून तो बातमी सांगत होता. प्रत्येकापाशी आपल्या जवळच्या कुणाच्या तरी मृत्यूची बातमी होती. कोण कोण बळी पडलं होतं या स्फोटात?

नुकताच साखरपुडा झालेला एक कॅमेरामन होता. रेडिओवर रिपोर्टिंगचं काम करणारी एक तरुण मुलगी होती, अधिक पैसे देणारी ही नोकरी तिनं अगदी अलिकडेच स्वीकारलेली होती, घरातली एकमेव कमावती मुलगी असल्यानं तिच्यासाठी प्रत्येक पैसा महत्त्वाचा होता, कारण त्यातूनच तिच्या कॉलेजची फीसुद्धा भरली जाणार होती.

‘टोलो न्यूज’ची पत्रकार फराह नाझनं या अंत्ययात्रेनंतर लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय, ‘एखादी घटना स्फोटानं सुरू होत नाही. ती सुरू होते कुणा आईच्या, बहिणीच्या, बायकोच्या किंकाळ्यांनी. सकाळी घरातून बाहेर पडलेल्या पुरुषाचं शव काही तासांमध्ये छिन्नविच्छिन्न होऊन घरी येतं तेव्हा. आज सकाळी ज्यांचे तुकडेतुकडे झाले ते पुरुष आणि स्त्रिया आपल्या कामासाठी बाहेर पडलेल्या होत्या. त्यातल्या प्रत्येकाची स्वत:ची अशी स्वप्नं होती. त्या स्फोटामध्ये एक पिढी उदध्वस्त झाली.’ या पोस्टबरोबरच तिनं एक फोटोही फेसबुकवर टाकला होता. आपल्या सहकाऱ्याच्या रक्तानं माखलेल्या साखरपुड्याच्या अंगठीचा!

रुची कुमार ही पत्रकार काबुलमधूनच रिपोर्टिंग करते. बॉम्बस्फोट किंवा त्याच्या बातम्या तिच्याही अंगवळणी पडलेल्या होत्या. पण एकाच दिवशी आपल्या दहा सहकाऱ्यांच्या मृत्यूनं इतर पत्रकारांप्रमाणेच तीही हादरून गेली होती. शाह मराई यांचे फोटो तिच्याही काही लेखांसाठी वापरण्यात आलेले होते. त्यामुळे त्यांच्याशी खूप मैत्री नसली तरी अर्थातच ओळख होती. या हल्ल्याविषयी लिहिताना तिनं म्हटलंय, ‘हल्ल्याची बातमी पसरली तशी सोशल मीडियावरून चर्चा सुरू झाली. जगाला या घटनेची माहिती मिळाली पण त्याचे फोटो किंवा व्हिडिओ फूटेज तुलनेनं कमी उपलब्ध होतं. कारण घटना कव्हर करायला गेलेले बहुतेक फोटोग्राफर्स, व्हिडिओग्राफर्स आणि वार्ताहर हल्ल्यात मारले गेले होते किंवा जखमी झाले होते किंवा मग बसलेल्या धक्क्यातून सावरलेले नव्हते.’

मराई यांचं दफन झालं ते त्यांच्या मूळ गावामध्ये. काबुलच्या बाहेर, गुलदारा नावाच्या डोंगरावरच्या त्यांच्या घरी. गुलदारा म्हणजे फुलांची दरी. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स. त्यांचा अंध भाऊ आणि अंध मुलगा तिथं हजर होते. कबरीवर त्यांनीच माती टाकली.

आपल्या प्रार्थनेत इमाम म्हणाले, ‘रोज इथले रस्ते रक्ताळताहेत. ज्यांनी हे कृत्य केलंय, त्यांना सांगू इच्छितो की, मागे राहिलेल्या नातेवाईकांची वेदना एक दिवस तुम्हाला नष्ट केल्याशिवाय राहणार नाही.’

प्रार्थनेमध्ये इतकी ताकद असती तर काय हवं होतं! आणि प्रार्थनेमुळे दहशतवादी हल्ले थांबणार असते तर कोणाला नको होतं? पण जगभरातली परिस्थिती अशी आहे की, हे हल्ले होत राहणार याची कल्पना सगळ्यांनाच आहे. कुठे बॉम्बचा हल्ला, कुठे बेछूट गोळीबार, कुठे निरपराध नागरिकांच्या अंगावर गाडी घालणं, तर कुठे घरात गोमांस असल्याच्या संशयावरून दगडानं ठेचून मारणं.

मराईंचा मृत्यू झाला त्या हल्ल्याची जबाबदारी आयसिसनं स्वीकारली. या दहशतवादी संघटना जाणीवपूर्वक सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करतात. आपली ताकद दाखवून देण्यासाठी. आपली दहशत पसरवण्यासाठी. आपण निरागस लोकांना मारत आहोत, याचं जराही दु:ख त्यांच्या मनात नसतं. किंबहुना, तोच तर त्यांचा हेतू असतो.

पण म्हणून जगणं थोडंच थांबवता येणार आहे? काम थोडंच बंद करता येणार आहे? नवा दिवस उजाडला की माणसं घराबाहेर पडणार, संध्याकाळी सुरक्षित घरी आलं की, आजचा दिवस आपला म्हणणार. पत्रकार आणि फोटोग्राफर्स आपापली अवजारं घेऊन बातम्या शोधायला, त्या जगासमोर आणायला निघणार. मग तो त्यांच्या आयुष्यातला शेवटचा दिवस का ठरेना. शाह मराई आणि त्या आधी त्यांच्यासारख्या अनेकांनी घालून दिलेला हा मार्ग आहे. दहशतवाद किंवा मृत्यूच्या भीतीनं या मार्गावरचे वाटसरू आपला पत्रकारितेचा धर्म विसरणार नाहीत.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_list_by_category

.............................................................................................................................................

अशी किती उदाहरणं द्यायची?

जगभरातल्या कॉन्फ्लिक्ट झोनमध्ये काम करणारे अनेक पत्रकार, फोटोग्राफर्स आपला जीव धोक्यात घालून काम करताहेत.  मराई यांच्यासारखाच मृत्यू २००० साली ‘हिंदुस्तान टाइम्स’ या वृत्तपत्राचे फोटोग्राफर प्रदीप भाटिया यांच्या नशिबी आला होता. दहशतवाद्यांची ही रितच असावी. आधी एक छोटा बॉम्बस्फोट घडवायचा. आणि मग रिपोर्टिंग करण्यासाठी पत्रकार आणि फोटोग्राफर तिथं पोचले की दुसरा. श्रीनगरमध्ये २०००मध्ये हिजबुल मुजाहिद्दीननं युद्धविराम जाहीर केलेला होता. वाजपेयी सरकारनं त्यांच्यातल्या एका गटाशी बोलणी करण्याची तयारी दर्शवलेली होती. मात्र, या चर्चेत पाकिस्तानलाही सहभागी करून घ्यावं अशी मागणी हिजबुलनं केली. जी अर्थातच सरकारला अमान्य होती.

ही बातमी कव्हर करण्यासाठी सर्व मोठ्या वृत्तपत्रांचे आणि टीव्ही चॅनेल्सचे पत्रकार श्रीनगरमध्ये पोचले होते. बरखा दत्तही त्यात होत्या. आपल्या एका लेखात त्यांनी लिहिलंय, ‘१० ऑगस्टचा दिवस होता. स्फोटाचा आवाज ऐकून मी माझ्या हॉटेलमधून धावत बाहेर पडले. जवळच्याच प्रेस कॉलनीमधून इतर अनेक पत्रकारही स्फोटाच्या दिशेनं धावत सुटले होते. काही मिनिटांमध्येच आमच्या लक्षात येणार होतं की, हा बूबीट्रॅप होता. तिथेच उभ्या असलेल्या एका कारमध्ये अधिक ताकदीचा बॉम्ब ठेवण्यात आला होता. क्षणात त्याचा स्फोट झाला. आमच्या सगळ्यांच्या पुढे असलेला प्रदीप भाटिया जागच्या जागी मारला गेला. फयाझ नावाच्या आणखी एका फोटोग्राफरचं रक्तानं माखलेलं शरीर मी बाहेर काढल्याचं मला आठवतंय.’

जेम्स राईट फॉले या अमेरिकन पत्रकाराने सिरियाचं नागरी युद्ध कव्हर करताना आपले प्राण गमावलेले आहेत. त्यावेळी ते जेमतेम चाळीस वर्षांचे होते. तेसुद्धा फोटोग्राफरच होते. २२ नोव्हेंबर २०१२ या दिवशी त्यांचं अपहरण झालं. दोन वर्षं त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. आणि मग १९ ऑगस्ट २०१४ रोजी ‘अ मेसेज टु अमेरिका’ या शीर्षकाखाली आयसिलनं (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लेव्हन्ट) युट्युबवर एक व्हिडिओ अपलोड केला. हा व्हिडिओ ताबडतोब डिलीट करण्यात आला असला तरी, इंटरनेटवर तो बऱ्यापैकी व्हायरल झाला होता. व्हिडिओची सुरुवात बराक ओबामा यांच्या अमेरिका इराकवर हवाई हल्ले करत असल्याच्या घोषणेनं झाली होती. आणि त्या पाठोपाठ वाळवंटात गुडघ्यावर बसलेले जेम्स फॉले दिसत होते. त्यांच्या बाजूला काळ्या कपड्यातला मास्क घातलेला आयसिलचा दहशतवादी होता. फॉले यांचा प्रत्यक्ष शिरच्छेद दाखवण्यात आला नव्हता, पण त्यानंतर शीर धडावेगळं झालेलं त्यांचं शरीर मात्र स्पष्टपणे दिसत होतं. ओबामांनी इराकवरचे हवाई हल्ले थांबवले नाहीत तर आपल्या ताब्यात असलेले स्टीवन सॉटलॉफ यांचीही अशीच गत करू अशी धमकीही देण्यात आलेली होती. त्यानंतर २ सप्टेंबर २०१४ रोजी सॉटलॉफ यांचा शिरच्छेद दाखवणारा व्हिडिओही आयसिलनं पाठवला होता.

४९ वर्षीय जर्मन फोटो जर्नलिस्ट आन्जा निएद्रिन्गहॉस या असोसिएटेड प्रेस (एपी) या वृत्तसंस्थेच्या पत्रकार. २००५मध्ये इराकचं युद्ध कव्हर करणाऱ्या एपीच्या पुलित्झर पारितोषिक मिळवणाऱ्या अकरा फोटोग्राफर्सच्या टीममधल्या त्या एकमेव महिला फोटोग्राफर होत्या. त्याच वर्षी त्यांना इंटरनॅशनल वुमेन्स मिडिया फाऊंडेशनचा करेज इन जर्नलिझमचा पुरस्कारही मिळाला होता. ४ एप्रिल २०१४ रोजी अफगाणिस्तानमधली अध्यक्षीय निवडणूक कव्हर करत असताना एका अफगाणी पोलिसानं केलेल्या गोळीबारात त्यांचा बळी गेला.

ख्रिस होन्डोरासचा बळी गेला लिबियामध्ये २०११ साली. तेही अमेरिकन फोटोग्राफर होते आणि १९९०पासून कोसोवो, काश्मीर, इराक, आंगोला यासारख्या जगभरातल्या महत्त्वाच्या कॉनफ्लिक्ट झोन्समध्ये त्यांनी काम केलेलं होतं. २००५मध्ये अमेरिकन सैनिकांनी एका इराकी कुटुंबावर केलेल्या गोळीबाराचे फोटो त्यांनी काढले. गाडीतून प्रवास करणारं हे कुटुंब म्हणजे सुईसाईड बॉम्बर आहे असं वाटून अमेरिकन सैनिकांनी त्यांच्यावर गोळीबार केला. अत्यंत तपशीलवार काढलेल्या या फोटोंची त्यांची मालिका जगभर खूप गाजली होती. २०११मध्ये लिबियातील नागरी युद्ध कव्हर करत असताना सरकारी यंत्रणेनं केलेल्या हल्ल्यात ते आणि टिम हेदरिंग्टन हे आणखी एक फोटोजर्नलिस्ट मारले गेले.

अशी किती उदाहरणं द्यायची?

.............................................................................................................................................

लेखिका मीना कर्णिक पत्रकार व चित्रपट समीक्षक आहेत.

meenakarnik@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................