भरत, आम्ही तुझी वेदना समजू शकतो. पण आम्हा सर्वांना तुझा अभिमान आहे!
दिवाळी २०१८ - माणसं : कालची, आजची, उद्याची
डॉ. अरुण गद्रे
  • डॉ. भरत वाटवानी रॅमन मॅगसेसे पुरस्कार स्वीकारताना
  • Wed , 24 October 2018
  • दिवाळी २०१८ माणसं : कालची आजची उद्याची डॉ. भरत वाटवानी Bharat Vatwani रॅमन मॅगसेसे पुरस्कार Ramon Magsaysay Award

डॉ. भरत वाटवानी यांना २०१८ सालच्या रॅमन मॅगसेसे पुरस्कारानं सोनम वांगचुक व डॉ. भरत वाटवानी यांना गौरवण्यात आलं. त्यापैकी वाटवानी यांच्याविषयीचा हा लेख त्यांच्या वर्गमित्रानं लिहिलेला...

.............................................................................................................................................

भरत (डॉ. भरत वाटवानी) माझा वर्गमित्र. म्हणजे आम्ही दोघांनी एकत्र ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्याला आता चाळीस वर्षं होतील. पण आम्ही एकमेकांना फार जवळून ओळखत नव्हतो. आजही नाही. कारण विस्तीर्ण अशा आमच्या कॅम्पसमध्ये आमची डिपार्टमेंटस विखुरलेली होती. वीस वीसच्या बॅचमध्ये आम्ही आमची साडेपाच वर्षं घालवली. माझे आडनाव ‘G’ वरून आणि त्याचे ‘V’ वरून. साहजिकच आम्ही एका बॅचमध्ये नव्हतो. एक शक्यता होती की, आम्ही एकत्र कॉमन लेक्चरला भेटू. पण तीही वास्तवात आली नाही. कारण आम्ही दोघंही जवळपास इतरांसारखे कधीच कॉमन लेक्चरला बसलो नाही. बॉइज कॉमन रूम वा सेंट्रल कॅन्टीनला दिवस घालवायचा. मात्र सकाळी वॉर्डला मात्र न चुकवता हजर असायचो.

किंबहुना भरत आणि माझ्यातला व इतर अनेकांतला एक समान दुवा म्हणजे सबंध first MBBS चं दीड वर्षं आम्ही आपली लाईन चुकली यावर ठाम होतो. आम्ही खरं पाहता engineering वाले. पण या अतोनात भयावह अशा घोकंपट्टीत अडकलो होतो. कसेबसे पाठ केलेले ओकून मार्क मिळवत होतो. पण भरत आणि मीही second MBBS ला आलो आणि आमच्या स्वप्नाची बत्ती उघडली. आम्हाला कुठेतरी पेशंट – एक माणूस बरा करण्याची या कोर्समधली शक्यता खुणावत होती. आणि त्याला भुलून आम्ही मेडिकलला प्रवेश घेतला होता. second MBBS ला समोर पेशंट बरा होताना बघून आमचा जीव भांड्यात पडला होता.

भरत सायकियट्रिस्ट झाला, मी गायनाकॉलॉजिस्ट, तेव्हा तर संपर्कच सुटला. आणि भरत एक वर्ष general practice मध्ये गोते खाऊन परत पोस्ट ग्रॅज्युएशनकडे वळला होता. एक वर्ष मागे पडला होता. आता अनेक मुलाखतीत त्यानं हे कबूल केलं आहे की, त्याची क्लासमेट स्मिता जिने सायकियट्री घेतलं होतं, तिच्या प्रेमात हा पडून लग्न करून बसला होता. आणि नियतीचं अनाकलनीय बोट पकडून त्यालाही सायकिएट्रीमध्येच पोस्ट ग्रॅज्युएशन मिळालं.

आज भरतला रॅमन मॅगसेसे अवार्ड मिळालं. त्याच्यावर प्रकाशझोत आला आणि सर्वांनी असा अचंबा व्यक्त केला की बघा – आधी बाबा आमटे, मग प्रकाश व मंदा आमटे आणि आता भरत, ही एक अलौकिक साखळी आहे! कारण प्रकाश-मंदा आणि भरतमधला समान दुवा हा आहे की, या सर्वांनी बाबांपासून प्रेरणा घेतली. बाबांनी त्यांचा हात यांच्या पाठीवर थपथपला.

......................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - 

https://tinyurl.com/y86lc3fq

......................................................................................................................................................

भरतचं कौतुक आहे मला की, तो प्रकाशसारखाच आरस्पानी आहे. असा प्रखर प्रकाशझोत पडूनसुद्धा –आमच्या पुण्यातल्या पुना सिटीझन डॉक्टर फोरमतर्फे भरतचा सत्कार आम्ही पुण्यात घडवून आणला, प्रकाश व मंदा यांच्या हस्ते, तेव्हा भरत भावविवश झाला होता. त्यानं जाहीरपणे आणि कृतज्ञतेनं बाबा व प्रकाशचं ऋण व्यक्त केलं.

सहजपणे सांगितलं की, काही वर्षं तो DEPRESSED होता. अस्वस्थ होता, निराश होता. या टप्प्याला त्यानं आपलं काम सुरू केलं होतं. म्हणजे त्याच्या व स्मिताच्या आयुष्यात तो क्षण आला होता, काहीच वर्षं आधी दोघांनी बोरीवलीला आपलं हॉस्पिटल उघडलं होतं. छोटं ८ बेडचं. दोघं एका सकाळी एका रेस्टॉरंटमध्ये चहा पीत होते. अन त्यांना एक व्यक्ती रस्त्याच्या पलीकडच्या काठावर वाकून गटारातलं पाणी पिताना दिसली. अंगावर फाटके कपडे होते, स्वत:शी बडबड चालू होती. ही व्यक्ती स्किझोफ्रेनियानं बाधित आहे, हे निदान करायला सायकियट्रिस्टची गरज नव्हती.

बाबा – प्रकाश व मंदा – भरत यांच्यात एक साखळी आहे, रॅमन मॅगसेसे अवार्डची. पण अजून एक साखळी आहे. बाबा वकील म्हणून प्रसिद्ध होते. एक दिवस ते टांग्यातून जाताना त्यांना एक कुष्टरोगी दिसला – इतर सर्व जगाला दिसत होता तो. ते त्याला ओलांडून पुढे गेले – पण ते परत वळले. कुष्टरोग्याजवळ जाऊन त्यांनी त्याचा हात हातात घेतला अन ‘आनंदवन’ झालं. प्रकाश सहलीसाठी बाबांबरोबर माडिया आदिवासीच्या जंगलात गेला MBBS पास झाल्यावर. त्याला शहरी माणसांना घाबरून जंगलात पळून गेलेले आदिवासी दिसले. तो त्यांना ओलांडून पुढे गेला पण परत वळला. त्या आदिवासीचा हात त्यानं हातात घेतला आणि ‘हेमलकसा’ घडलं. भरत आणि स्मितानं हा स्किझोफ्रेनियाचा पेशंट बघितला. त्याला ओलांडून ते पुढे गेले पण पुन्हा परत वळले. त्याला जाऊन त्यांनी विचारलं, ‘येणार का आमच्या बरोबर?’ त्यानं होकार दिला. भरत मुलाखतीत सांगतो की, ‘येतात ही माणसं. समजते त्यांना प्रेमाची भाषा.’ खरं असणार ते! पण प्रेम दाखवणारी माणसं आहेत कुठे? मदर तेरेसा यांनी अशीच रस्त्यावर मरू घातलेली माणसं उचलली होती.

अर्थात भरतच्या आयुष्यात तो मागे वळण्याचा क्षण आला, तो असाच नव्हता आला. बाबा आमटे जेव्हा त्या क्षणाला सामोरे गेले, त्याआधीसुद्धा ते कुष्टरोगी बघत. तेसुद्धा पुढे जात होतेच की – पण जेव्हा तो क्षण त्यांच्या आयुष्यात आला – कुठेतरी पूर्वतयारी होत होती. या तयारीचा एक भाग येशू ख्रिस्ताची करुणा होती. बाबांची एक कविता आहे –

वधस्तंभ पेलण्याचे बळ नाही माझ्या कायेत

मी चाललो त्याच्या छायेत

भरतच्या जीवनात ती पूर्वतयारी होत होती, जेव्हा तो मदर तेरेसा यांच्या एका संस्थेत त्यांनी उचलून आणलेले भणंग पण स्किझोफ्रेनिक पेशंट तपासायला जात होता तेव्हा. भरतनं मुलाखतीत असं सांगितलं की, मदर तेरेसाकडे तो असं युनिट सुरू करणार होता. त्या स्वत: त्याला भेटणार होत्या. पण नियतीच्या मनात वेगळं होतं. मदर स्वत: सिरिअस झाल्या अन हा प्लॅन पुढे जाऊ शकला नाही.

स्वत: भरत आणू लागला होता असे पेशंट. पहिले काही पेशंट आणले अन ते दीड ते तीन महिन्यांत खडखडीत बरे झाले औषध उपचारानं. त्यांना भरतनं त्यांच्या कुटुंबात परत नेलं. असा हरवलेला बरा होऊन अनपेक्षितरीत्या आणि आशा सोडल्यावर परत घरी येतो / येते – जल्लोश झाला. भरत सांगतो – यापेक्षा आयुष्यात काय प्रयोजन हवं? अन हे पाहून त्यानं आता त्याचं प्रसिद्ध झालेलं वाक्य उदगारलं – “या व्यक्ती त्यांचा कोणताही दोष नसताना अशा रस्त्यावर का असाव्यात? असताच कामा नयेत!”

पण त्याचे हात तोकडे पडत होते. तो आधीपासून नैराश्यानं ग्रासला होता. तो ट्रेकर आहे. आणि कैलास मानस सरोवराच्या ट्रेकसाठी त्याची निवड झाली होती. मात्र हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असलेल्या दोन पेशंटनी त्याला अडवलं. तो नाही गेला. अन नेमका त्या वर्षी भीषण अपघात होऊन ती संपूर्ण ट्रेकरची बॅच मालपा लँड स्लाइडमध्ये मृत्यूच्या स्वाधीन झाली. पौर्णिमा बेदी त्यात होत्या. त्यापासून भरत अस्वस्थ होता. सतत स्वत:ला विचारात होता की, देवानं त्याला एकट्याला का वाचवलं? या अस्वस्थतेचं उत्तर शोधत तो बाबांना भेटायला हेमलकसाला पोचला. जाताना एक आदिवासी स्किझोफ्रेनिक रस्त्यावर दिसला. हातात लोखंडी बेड्या असलेला. त्यानं तो उचलला आणि त्याच्यासकट तो भेटला पहिल्यांदा बाबा – प्रकाश व मंदाला. त्या रुग्णाची अवस्था बघून बाबा रात्रभर रडत होते. रात्री दिवसभराचा थकवा बाजूला करून चार तास खपून प्रकाशनं बेड्या तोडल्या होत्या. अन बाबा स्मिताला म्हणाले, ‘अग हा depressed नाही. तो शोधात आहे आयुष्याच्या प्रयोजनाच्या.’ या वाक्यानंतर अनेक वर्षानं भरतच्या चेहऱ्यावर स्मित आलं.

बाबा त्याच्यामागे हात धुऊन लागले की, हेच काम मोठ्या प्रमाणावर कर. मोठा प्रोजेक्ट हातात घे. त्याचा परिणाम म्हणून कर्जतला ‘Shraddha Rehabilitation Foundation’चा एक मोठा प्रकल्प उभा राहिला. बाबा खूप आजारी होते, प्रकाश उद्घाटनाला गेला.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_list_by_category

.............................................................................................................................................

तीस वर्षांचा हा प्रवास – भरत काही मॅगसेसे अवार्ड मिळेल म्हणून करत नव्हता. तो करत राहिला होता कारण समस्येचा समुद्र आजूबाजूला होता अन आहे. तो मुलाखतीत म्हणाला – ९००० स्किझोफ्रेनिक पेशंटना उचलून आणून बरं करूनही आज तो अस्वस्थ आहे. कारण भारतभर आजमितीला सव्वा लाख असे पेशंट रस्त्यावर भणंग असे फिरत आहेत. त्यांचे कुटुंबीय त्यांना शोधून थकले आहेत. पार नेपाळ आणि तामिळनाडू, छत्तीसगडचे पेशंट मुंबईत व इथले अजून दूर असे सर्वत्र फिरत आहेत. भरतची झोळी अपुरी आणि फाटकी आहे.

मॅगसेसे मिळाल्याचा त्याला आनंद हा आहे की, आता निदान या रोगाबद्दल समाजात काही जागरूकता येईल. पैसे मिळाले हा अजून एक आनंद. वीस लाख महिना खर्च आहे. आज मी गेलो होतो कर्जतला. तिथे आजमितीला १२६ पेशंट अॅडमिट आहेत. दहाएक कौउन्सिलरचा पगारी ताफा आहे. गेली तीस वर्षे अज्ञात शक्ती आर्थिक ताकद उभी करत आली आहे. कारण तो सांगतो तसं भारतात मानसिक आरोग्यासाठी देणगीदार मिळत नाहीत. एकूण समाजातच या पेशंटसंबंधी असलेली अनास्था व घृणा खूप खोलवर भिनलेली आहे.

आता थोडा थकवा त्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे. गेल्या काही वर्षांत अनेक ठिकाणांहून मागणी येत आहे की, तिथं असा एक प्रोजेक्ट त्यानं उभारावा. तशी गरजही आहे. पण भरत थकला आहे – कारण त्याला जरी एका पायावर सीमोल्लंघन करायचं असलं तरी  – तरी – हा - तरी- आपल्या सर्वच समाजाला अंतर्मुख करणारा आहे. भरतला  महिन्याला लाख रुपये पगार देऊ करत असूनही सायकियट्रिस्ट तरुण मुलं-मुली मिळत नाहीत. सर्व मेडिकल कॉलेजला लिहून झालं आहे. आता सर्वत्र तो आवाहन करत आहे. पण एकूणच वैद्यकीय व्यवसाय जसा धंदेवाईक झाला आहे, त्याचा असा फटका भरतला बसत आहे.

दुसरी त्याची वेदना जी त्याला थकवत आहे. ती त्याला रस्त्यावरून पेशंट उचलून आणायला तर लागतातच, पण सरकारी मेंटल हॉस्पिटलमधूनसुद्धा उचलून आणावे लागतात. तिथं दहा–पंधरा वर्षं हे खितपत पडलेले असतात. त्यांना पाहणारे सायकियट्रिस्ट तिथं असतात, कौउन्सिलरसुद्धा असतात, पण सरकारी अनास्था या पेशंटना सडवत असते. असा एक पेशंट त्यानं चेन्नई मेंटल हॉस्पिटलमधून उचलला, दोन महिन्यांत त्याला त्याच्या घरच्यांना भेटवलंसुद्धा.

एक अजून भीषण वास्तव त्याला अस्वस्थ करतं. जवळपास ९० टक्के पेशंट हे गरीब असतात (काही अति उच्चशिक्षित व मध्यमवर्गातलेसुद्धा असतात). सरकारी आरोग्य व्यवस्थेचं हे दारुण चित्र आहे की, हे पेशंट उपचाराअभावी असे रस्त्यावर आहेत. पण वेड्या नसलेल्या अब्जावधींना जिथं सरकारनं वाऱ्यावर सोडलं आहे वैद्यकीय उपचाराची जबाबदारी झटकून; तिथं मानसिक रुग्ण कसं प्राधान्य असणार? प्रसिद्ध सायकियट्रिस्ट डॉ. हमीद दाभोलकर सांगत होते की, साताऱ्यातल्या मेंटल हॉस्पिटलमध्ये सहा महिने औषधंच नव्हती.

तेव्हा भरत – तू अस्वस्थ आहेस. आम्ही तुझी वेदना समजू शकतो. पण आम्हा सर्वांना तुझा अभिमान आहे. ज्या मायेनं, ओलाव्यानं, समर्पणानं तू उतरला आहेस – आमची माणुसकीवरची श्रद्धा पुन्हा जागी झाली आहे. पुरुष असून समारंभात सहजपणे अश्रू वाहून देणारा तू आमच्या समाजाचं क्षितिज वाढवण्यात महत्त्वाचा वाटा उचलत आहेस.

तुला कर्जतला पेशंटमध्ये पाहणं एक अनुभव असतो. त्या दिवशी ती एक मुलगी – जी अवघ्या दोन महिन्यांपूर्वी रस्त्यावर भणंग म्हणून फिरत होती - ती सारखी पुढे येत विचारात होती – डॉक्टर, तू मला कधी माझ्या घरी घेऊन जाणार? तू हसून तिला विचारात होतास – तू बदल्यात मला काय देणार? ती देत असलेला तो आनंद अन ते अतिव समाधान केवळ तुलाच स्पर्श करत नव्हतं, भरत – ते आम्हाला पण माणूस म्हणून समृद्ध करत होतं.

आम्ही तुझे ऋणी आहोत!

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Vivek Date

Mon , 29 October 2018

I am Vivek Date of Germantown MD USA. I had no idea of the work of Dr. Bharat Vatwani and was very pleased to read about his receiving Magsaysay Award. This article of Dr. Gadre about his work and motivation is something very outstanding that I never read elsewhere. Thank you Dr. Gadre. I am well aware of the work of Baba, Prakash and Vikas Amte. I have met both Prakash and Vikas during their visit to Virginia USA. I am so happy to read about their common motivation.