कुंपण ओलांडण्याच्या मिषानं मुक्ती अनुभवता येते!
सदर - चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
केशव परांजपे
  • किशोरी आमोणकर एका मैफलीत गाताना
  • Sat , 01 July 2017
  • शास्त्रीय संगीत Classical music केशव परांजपे Keshav Paranjpe किशोरी आमोणकर Kishori Amonkar कुमार गंधर्व Kumar Gandharva खयाल Khayal

खयाल गायन हे एक गोष्ट सांगणं आहे असं म्हटलं जातं. ठाऊक असलेली गोष्ट, तिचं शब्दरूप पाठ न करता – त्या वेळी सुचेल तशी रंगवून सांगणं या प्रक्रियेत जे स्वातंत्र्य आहे आणि जेवढं बंधन आहे – तेवढं स्वातंत्र्य आणि ते बंधन खयाल गायनात आहे. एकच गोष्ट अनेक जणांनी सांगितली तरी ती गोष्ट तीच असते, पण प्रत्येकाचं कथन मात्र वेगळं असतं. म्हणून ती वेगळी असते. एकानेच वेगवेगळ्या वेळी कथन केली तरी प्रत्येक वेळी ती वेगळी असते. हे असं होतं कारण कथाकथन या प्रस्तुतीला अनेकविध परिमाणं (Varibles या अर्थानेही) आहेत. घटना, घटनाक्रम, पात्रं, संवाद अशा अनेक घटकांपैकी काही सुनिश्चित आहेत आणि बदलू शकतात. पात्रांमधील संवाद, प्रत्यक्ष शब्दयोजना बदलली तरी त्यांचं म्हणणं बदलत नाही. घटनांचा क्रम थोडा पुढे-मागे झाला तरी गोष्ट बदलत नाही. गोष्टीला एक वेगळं (आपण त्याला ‘अमूर्त’ म्हणू या) अस्तित्व आहे आणि ते व्यक्त करणारे घटक त्या अस्तित्वाशी नातं ठेवून स्वातंत्र्य घेऊ शकतात. हे घटक विविध रूपांत त्या अमूर्त अस्तित्वाला मूर्त करत असतात.

कथा आणि कथन या संदर्भात आपण हे सहज समजून घेऊ शकतो. राग आणि खयाल या संदर्भात ते समजून घेऊ या. राग म्हणजे कथा आणि खयाल म्हणजे कथन. वा व्वा! ऐकायला खूप सरळ, सोपं आहे, कळतंय असं वाटणारं आहे. श्रोत्यासाठी तत्त्वत: ते सोपं आहे. पण कलाकारासाठी प्रत्यक्षात हे कथा आणि कथन प्रकरण तितकं सोपं नाही. शब्दांत गोल गोल फिरू या का – कथा ही कथन आहे आणि कथन हे कथा आहे (केवढे हे कथन-कूट!).

शब्दभाषेत कथा आणि कथन एकमेकांपासून वेगळं काढून दाखवणं जरा तरी शक्य आहे, पण स्वरभाषेत ते दुरापास्त आहे. खयाल गायकाला राग अबाधित ठेवून खयाल सादर करायचा असतो. ज्या स्वरावली गायक गातो त्यातून त्याला राग उभा करायचा असतो किंवा उलट दिशेनं याच विधानाकडे पाहिलं तर राग ज्यातून व्यक्त होतो अशा (च) स्वरावली गायकाला गायच्या असतात. शास्त्रीय गायनात शास्त्रनियमांची बंधनं असतात, रागाचे नियम असतात. ते पाळूनच गायन सादर करायचं असतं. गायक आपल्या गायनातून रागाचं दर्शन घडवतो, अनोखं दर्शन घडवतो हे गायकाला मिळू शकणारं मोठं श्रेय आहे, तर तो रागाशी इमान राखत नाही, रागाची मोडतोड करतो, असा बोलही त्याला लावला जातो. एकीकडे नवेपणा आणायचा, अनोखं रूप, अनोखं सौंदर्य शोधायचं तर दुसरीकडे शास्त्र सांभाळायचं. नियम मोडायचे नाहीत. एकीकडे शास्त्र, नियम, परंपरा पाळायची तर दुसरीकडे गाणं पठडीबाज, तेच ते होऊ द्यायचं नाही. शास्त्रीय गायकांना असा अवघड तोल सावरत राहायचं असतं. म्हणजे किती कठीण काम!

म्हणून मी प्रत्येक मोठ्या कलाकाराला हा प्रश्न विचारला की – “नियम, बंधनं तुम्हाला (तुमच्या सर्जनाला) जाचक वाटत नाहीत का?” सर्वच मोठ्या कलाकारांनी या प्रश्नाचं उत्तर ‘नाही’ असं दिलं. जे शास्त्रनियम, परंपरा अगदी तंतोतंत पाळण्यासाठी प्रसिद्ध आहेत, त्यांनी आणि ज्यांनी बंडखोरी केली आहे त्यांनीही! ‘तुम्हाला दुरून विचाराच्या पातळीवर ही कसरत जेवढी दुर्धर वाटते तितकी ती प्रत्यक्षात गाता-वाजवताना दुर्धर वाटत नाही’ असाच सर्वांचा अभिप्राय होता. किंबहुना निसरडी, नागमोडी, अवघड वाट मोठी आनंदाची आहे. प्रत्येक वळण – जे तुम्हाला वाट रुद्ध करतं असं वाटतं ते – नवनवा आनंद देतं, निर्मितीला आव्हान देतं असंच या कलावंतांना वाटतं.

काही काही कलाकार मुळीच अलंकारिक बोलत नाहीत, तर साधं, सरळ वास्तवाचं भान ठेवून बोलतात. ते असं म्हणतात – ‘अनेक वर्षांची तालीम असते. रागाचा एकेक पलटा अनेकदा घोटलेला असतो. इतका की, तो आपलाच झालेला असतो. कोणीतरी शिकवलेलं, शिकवलं आणि बजावलं आहे म्हणून, लक्षात ठेवून नाइलाजाने वगैरे आम्ही गात नाही. रागांची चलनं, रागांचे नियम आमच्याकडून आत्मसात झालेले असतात. जर परंपरेनं आम्हाला ‘मुलतानी’ दिला नसता तर तो आमचा आम्हाला स्फुरला असता का? अनेकांची अनेक वेगवेगळ्या क्षणांची स्फुरणं आम्ही आमच्या संवेदनेत साठवून घेतो, रियाजानं आत्मसात करतो. कोणी आमच्यावर काही लादत नाही. आम्हीच आम्हाला शिस्त लावून घेतो.’ (नवनिर्मितीला, सर्जनालाही शिस्त लावावी लागते तेव्हा ते कलात्म होते!)

अनेक कलाकार म्हणतात – ‘आम्ही काही करत नाही. तो रागच आमचं बोट धरून आम्हाला चालवतो. आमची कर्तबगारी एवढीच की, आम्ही निर्धास्तपणे रागाच्या हातात आमचं बोट देतो आणि तो नेईल तिथं, तसं जातो.’ या अलंकारिक वर्णनात एक अपरिहार्यता आहे. कलाकारांचा हा अनुभव वेगळ्या, अनलंकृत भाषेत मांडून दाखवणं अवघड आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर सुचेल तसं गात जातो. म्हणजे जाणीवपूर्वक, पूर्वनियोजन करून, अट्टाहासानं काही करत नाही, असं म्हणणं सर्वस्वी खरं नसतं. पण त्यात काही सत्य आणि बरंच तथ्य असतं.

काहीही शिकलेलं नसतानाचं ‘सुचेल तसं’ आणि अनेक वर्षांच्या साधनेनंतरचं ‘सुचेल’ तसं यात जमीन-अस्मानाचं अंतर असेल! काहीही न शिकता म्हणजे कोणतंही औपचारिक, जाणीवपूर्वक शिक्षण न घेता अनौपचारिक आणि नकळत श्रवण व त्यातून काही शिक्षण झालेलंच असतं. शिक्षणानं आणि चांगल्या शिक्षणानं सुचणं विकसित होतं. सुचण्याला शिस्त लागते. दिशा मिळते. भरकटणं टळू लागतं. सुचणं ही एक सत्याच्या शोधाची वाट बनते.

किशोरी आमोणकरांसारखी कलावती ज्या निष्ठेनं सांगते की, ‘राग चैतन्यमय अस्तित्व आहे… ते जिवंत आहेत, ते बोलतात, सांगतात, ते नित्य आहेत…’ तेव्हा त्या सांगण्याकडे दुर्लक्ष करताच येत नाही. फार तर त्यांच्या अनुभवाचा अन्वय लावण्याचा प्रयत्न करता येतो. त्या म्हणतात की, ‘तुम्ही जस जसे त्यांच्या (रागांच्या) कक्षेत येऊ लागता, तसतसं तुमचं करणं फिरत (गळून पडत) जातं – तेच (राग) सांगतात, तेच चालवतात, तेच अवतीर्ण होतात.’

या संदर्भात विचार करताना चित्राचा एक प्रकार आठवला. संपूर्ण चौकोनभर नुसते ठिपके ठिपके असतात आणि सांगतात ‘चित्र ओळखा’. कोणाला त्यात ओंकार दिसतो. एकानं तसं सांगितलं की, (बऱ्याच) इतरांनाही तो दिसून लागतो. म्हणजे तो तिथं कागदावर असतोच, पण अन्य ठिपक्यांत तो मिसळून, लपून गेलेला असतो. तुमची एकाग्रता एका पातळीला पोचली की, तुम्हाला त्या ओंकाराचं दर्शन घडतं.

रागसंगीताबद्दल मला असं अनेकदा वाटतं की, एकाच चौकोनात एकाच वेळी अनेक चित्रं असतात. आणि गायक तुम्हाला त्यातलं एक असं दाखवतो की, अन्य ठिपके तुम्हाला दिसूच नयेत. याहीपेक्षा अधिक गहन विचार मनात येतो की, रागांचा संबंध मूलभूत संवेदनेशी आहे. (कदाचित सामूहिक संवेदनेशी) म्हणजेच प्रत्येकाला मनातल्या मनात राग ज्ञात असतो. म्हणजे आत, खोल मानवी संवेदनेला बरोबर काय, सत्य रागरूप काय हे माहीत असतं. आपण व्यवहारात ज्याला रागरूप म्हणतो, त्या अर्थानं किंवा त्या परिमाणांनी नसेल, त्याहून सूक्ष्मतेनं असेल, पण राग माहीत असतो. ज्याने साधना केलेली आहे अशा सिद्ध गायकाची तंद्री लागते, तो एकाग्र होतो, तेव्हा त्या सत्य (वैश्विक) रागरूपाशी त्याचं अनुसंधान जुळतं. कुणी, काय शिकवलं ते लक्षात ठेवून त्यावरून तो बरोबर काय आणि चूक काय हे ठरवत नाही, त्याचं त्याला कळतं. त्याला अंत:स्फूर्तीनं कळतं आणि त्या अंत:स्फूर्तीची ऊर्जा एवढी असते की, तो श्रोत्यांनाही ‘कळतं’ करतो (निदान त्या क्षणांपुरता). श्रोते माना डोलावतात. म्हणतात- ‘हो, बरोबर आहे. पटलं असंच…असंच!’

पुन्हा किशोरीताईंचं उदाहरण मनात येतंय. फेब्रुवारी २०१७मध्ये पुण्यात गानसरस्वती समारोहात त्या अगदी अनवट असा राग, हुसेनी तोडी गात होत्या. इतक्या रमून गेल्या होत्या. ऐकता ऐकला मला असा भास झाला की, तमाम तीन हजार श्रोत्यांना आता या क्षणाला असं वाटतंय की, ‘अरे, हा हुसेनी तोडी. आपल्या अगदी परिचयाचा. आपण ओळखतो याला.’

वैश्विक, मूलभूत सत्य संवेदनेचा सिद्धान्त जर आपल्याला मानायचा नसेल तर मग हे तरी मान्य करावं लागेल की, गायक आपल्या गाण्यानं स्वत:ला ‘जाण्यासाठी’ आणि श्रोत्याला ‘नेण्यासाठी’ एक वाट तयार करत असतो आणि एका क्षणाला (एका बिंदूनंतर) श्रोत्याला वाटू लागतं, ही वाट माझ्या माहितीची आहे. रागनियमाच्या बंधनांचा उपरेपणा तिथं गळून गेलेला असतो. ज्याला कुंपण म्हणून हिणवावं तेच क्षितिज भासू लागतं आणि नवनिर्मितीच्या अनंत शक्यता त्या क्षितिजाच्या अल्याड खुणावू लागतात.

सागराच्या तळातून किंवा आकाशाच्या घुमटातून जरा जमिनीवर येऊ या. कुमार गंधर्वांचा एक किस्सा आहे. ते ‘भूप’ गात होते. या रागात ‘म’ हा स्वर घेत नाहीत. गाता गाता कुमारांनी एकदम मध्यम लावला! (म्हणजे ‘म’ हा सूर ते गायले) संपूर्ण मैफल रोमांचित झाली. मग कुमारजी (म्हणे) म्हणाले – ‘बऱ्याच वेळापासून तो (‘म’ स्वर) बाहेर उभा होता, विनवणी करत होता, मलाही येऊ द्या ना म्हणून. शेवटी घेतला त्याला” शास्त्राला भूप रागात मध्यमाचा वापर मान्य नाही. पण शास्त्र ‘चैती भूप’ अशा नव्या रागाची निर्मिती अमान्य करू शकत नाही. या किश्श्यावर किशोरीताई म्हणाल्या होत्या (कुणाला सांगू नका हं) – ‘अरे, ‘म’ तिथं ‘मला घे’ म्हणायला येतोच कसा? एक तर भूप खोटा (चुकीचा) आहे किंवा… ”

किशोरीताईंचं म्हणणंही सयुक्तिक आहे. ज्या अर्थी शास्त्रकारांनी भूपात ‘म’ वर्ज्य सांगितला आहे, त्या अर्थी भूप म्हणून जे चित्र आहे, त्यात ‘म’ नावाचे ठिपके येऊ शकत नाहीत. भूपाचं जे सत्य विश्वात्मक, मूलभूत सांगीतिक तर्करूप आहे, ते ‘म’ला वर्ज्य मानतं. त्या तर्काशी तुम्ही पूर्णपणे एकरूप झालात तर तुम्हाला ‘म’ साद घालूच शकत नाही. पण अद्वैताच्या एक श्वास आधी – एकरूपतेच्या एक पाऊल अगोदरच – नवनिर्मितीचा स्वर्ग आहे का? कुंपण असतं म्हणूनच ते ओलांडण्याच्या मिषानं मुक्ती अनुभवता येते ना? नियमाला हुलकावणी देणं हीसुद्धा नियम पाळणाचीच एक रीत असते का?

तर मागच्या महिन्यात सुरू केलेली ही साठा उत्तरांची कहाणी काही प्रश्नांनी संपूर्ण!

लेखक अभिनव पदवी महाविद्यालयाचे (भाईंदर, मुंबई) प्राचार्य आहेत.

kdparanjape@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Vijay Joshi

Sat , 01 July 2017

Apratim lihale aahe