अपेक्षित आलं तर अपेक्षापूर्ती, नाहीतर सुखद धक्क्याचा अपेक्षाभंग!
सदर - चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
केशव परांजपे
  • पं. शिवकुमार शर्मा, गानसरस्वती किशोरी आमोणकर आणि पं. सुरेश तळवलकर
  • Sat , 03 June 2017
  • शास्त्रीय संगीत Classical music केशव परांजपे Keshav Paranjpe शिवकुमार शर्मा Shivkumar Sharma किशोरी आमोणकर Kishori Amonkar सुरेश तळवलकर Suresh Talwalkar

अनेक मोठ्या कलाकारांच्या मुलाखती घेण्याचं भाग्य मला लाभलं. या मुलाखतींमध्ये त्यांचं संगीतविषयक चिंतन ओझरतं का होईना ऐकायला मिळालं. काही प्रश्न मी जसेच्या तसे सर्वांनाच विचारले - तुम्हाला हे सुचतं कसं?, तुमची तालीम, तुमचं शिक्षण आणि रियाज या गोष्टींचा तुमच्या सुचण्याशी नेमका कसा संबंध आहे? आणि शास्त्र-शास्त्र म्हणून जे म्हणतात त्या नियमांचा\निर्बंधांचा अडसर तुम्हाला तुमच्या सुचण्यात कधी जाणवतो का?

सर्व कलाकारांची या प्रश्नांची उत्तरं एकसारखी (कधी काही प्रमाणात एक छापाची) होती, भाषेचा तेवढा फरक. यातला पहिला प्रश्न त्यांना नेहमीच विचारला जात असणार. त्यामुळे त्याचं उत्तर तयार होतं. ते सोयीचं आणि पुढे कटकटीचे प्रश्न येऊ नयेत अशा तऱ्हेचं.

‘तुम्हाला हे सुचतं कसं?’ यावर ‘देवाची कृपा’ हे उत्तर. पुढे ‘मी काही सांगू शकत नाही, कसं सुचतं…सुचत जातं…दिसतं जातं…मी ट्रान्समध्ये असतो\असते…नंतर मला काही आठवतही नाही, मी काय गायलं\वाजवलं…कधी कधी माझं मलाच आश्चर्य वाटतं की, हे कुठून आलं? मी तर कधी ऐकलं नव्हतं, तयार केलं नव्हतं…’ इ.इ.

पं. शिवकुमार शर्मांसारख्या कलाकारांनी या विषयावर विचार केला आहे. म्हणजे याविषयी स्फूट विचार वेळोवेळी मनात येतच असतात. आपले आपल्याला प्रश्न पडत असतात. कधी अचानक त्यांची उत्तरं मिळतात, आपले विविध अनुभव या प्रश्नांभोवती गोळा होत असतात. या सर्व खळबळीकडे साक्षीवृत्तीने पाहून विचारवंत एक मांडणी करतात. ऑर्गनायझिंग अवर ओन थॉटस, यू सी…

तर पं. शिवकुमार शर्मा हे एक ऑर्गनाइज्ड कलाकार आहेत. किशोरीताईंनी एक अतिव्यापक मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या कोणत्याही प्रश्नाचं जेवढ्यास तेवढं असं उत्तर देत नाहीत. म्हणून त्यांचं प्रश्नाला थेट उत्तर नसतं, पण त्यांच्या व्यापक मांडणीत तो प्रश्न बसवून त्या अनुषंगाने उत्तर येतं. काही कलाकार त्या क्षणाला जे मनात येईल ते बोलून मोकळे होतात. काही जण प्रश्न विचारला की, गोष्टी सांगायला सुरुवात करतात. प्रश्नाच्या नीट\विस्कळीत, दिलेल्या - न दिलेल्या उत्तरांतून प्रश्न ऐकून मुद्रेवर उमटलेल्या रेषांतून, हललेल्या हातातून उत्तरं मिळतच असतात.

तत्कालस्फूर्ती, उत्स्फूर्तता हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत प्रस्तुतीचा एक महत्त्वाचा विशेष आहे. आपलं संगीत निबद्ध नसतं. सगळंच काही पूर्वनियोजित नसतं. सांगीतिक कल्पनेच्या उत्स्फूर्त आविष्कारावर आपली सर्व मदार असते. यालाच उपज म्हणतात. तरीही जी रागदारी गायली जाते, तिचे स्वत:चे काटेकोर नियम आहेत. रागाची अकरा-बारा लक्षणं आहेत. म्हणजे कोणते स्वर घ्यायचे किंवा घ्यायचे नाही ही अगदी प्राथमिक अट झाली. ते स्वर कसे घ्यायचे या विषयीही सूक्ष्म विचार - बारीक नियम - आहेत. असं असताना उत्स्फूर्ततेला कितीसा वाव मिळतो? उत्स्फूर्त कल्पनाविस्तार असं म्हणण्याला किती अर्थ असतो?

गायक ख्यालाचा विस्तार पाठ करून म्हणत नाही (म्हणू शकत नाही) ही मर्यादा हाच उत्स्फूर्ततेचा अर्थ आहे का? उत्स्फूर्ततेचा हा किमान अर्थ आहे आणि कमाल अर्थ आहे- नवरागनिर्मिती! या दोन टोकांमध्ये सर्व आंदोलनं आहेत. साधनेच्या प्रारंभिक अवस्थेत जसंच्या तसं गाता\वाजवता येणं या गोष्टीला महत्त्व दिलं जातं. जसंच्या तसं या आग्रहाने ग्रहणक्षमता कुशाग्र होते. स्वत:वर नियंत्रण ठेवण्याची क्षमता निर्माण होते. हे फायदे शिष्याच्या वैयक्तिक जडणघडणीच्या संदर्भात होतात, तर सामाजिक-सांस्कृतिक स्तरावर पूर्वसुरींची अमूल्य निर्मिती जतन केली जाते. सांस्कृतिक संचित समृद्ध होत जातं हा फायदा होतो.

चित्र हुबेहूब काढता न येणं (असमर्थता) हे इम्प्रेशनिस्ट चित्रकलेचं क्वालिफिकेशन नाही होऊ शकत ना? किंवा वृत्त-छंदाची गंधवार्ता नसणं, वृत्तबद्ध लिहिता न येणं हे नवकाव्याचं\मुक्तछंदाचं गमक नाही ना? साधनेच्या या प्रारंभिक अवस्थेत परिपूर्णता ही संगीतातली स्नातक पातळी आहे असं मला वाटतं. आणि या पातळीवरूनही संगीताचा निर्मळ आनंद मनमुराद देता-घेता येतो. या पातळीची मुळीच अवहेलना होऊ नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं. या पातळीची परिपूर्णता तत्त्वत: होऊही शकत नाही. तरीही जवळजवळ परिपूर्णता ही काही कमी कमाई नाही. क्लासिकल म्हटली जाणारी कला या मर्यादेतच कलानिर्मितीकडे पाहते (की काय?).

या पातळीवरच्या कलेची प्रस्तुती विलोभनीय असते. ती उत्स्फूर्त भासते. एका अर्थाने उत्स्फूर्त असतेसुद्धा! या संदर्भात पं. सुरेश तळवळकर यांनी जी मांडणी केली आहे ती उदबोधक आहे. शास्त्रीय संगीताच्या बाबतीत ‘घोटणे’ या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे असं ते मानतात. जुने लोक (गुरू) शिष्याला एखादी गोष्ट अगदी बरोबर, तंतोतंत म्हणता आली की, त्यानंतर ती निदान १०८ वेळा म्हणायला सांगत. तंतोतंत बरोबर येईपर्यंत किती वेळी म्हणायची याचं काही मोजमाप करायचं नाही. अशी १०८ वेळा म्हटली की, ती गोष्ट गळ्यावर चढते. आणखी अनेक वेळा घोटली की, तिला तेज येऊ लागतं. दर्दी श्रोत्याला हा कस बरोबर कळतो.

तार्किक दृष्टीने या म्हणण्याची संगती अशी लावता येईल- गाण्या-वाजवण्यातील प्रत्येक चीज (आलाप, तान, बोल, तुकडा…) अनेक सूक्ष्म परिमाणं घेऊन येत असते. उदा. आलापात फक्त स्वरांचा क्रम हे एकच परिमाण नसतं. त्या स्वरावलीची स्थूलमानाने गती (लय), अंतर्गत लय, स्वरांचा लहान-मोठेपणा स्वरांना एकमेकांशी जोडण्याची पद्धत…अशी अनेक परिमाणं असतात. त्यातली काही वेगळी काढून दाखवता येतात, काही दाखवता येत नाहीत. तीच चीज पुन्हा पुन्हा घोटल्याने तिचं गायन ही प्रतिक्षिप्त क्रिया बनते. जागृत मनाचं काम संपून बोधपूर्व जाणीव (मन) तिथं काम करू लागते आणि तेव्हाच ती चीज शिष्याची ‘आपली’ होते. ती चीज बरोबर गाण्याच्या ताणातून शिष्य मुक्त होतो आणि त्या चीजेशी त्याचं एक बरोबरीचं नातं जडतं. त्या चीजेच्या सौंदर्याचा आनंद तो घेऊ लागतो. आणि यामुळेच त्याचं गायन, ताजं टवटवीत आणि म्हणून उत्स्फूर्त वाटतं. माहिती शिळी होते, भाव असतो किंवा नसतो, पण तो शिळा होऊ शकत नाही. उत्स्फूर्तता म्हणजे नवनिर्मिती नव्हे, पण पुनर्प्रत्यय आहे. उत्स्फूर्ततेचं नातं प्रस्तुतीशी आहे.

आपलं संगीत अनेक कलाकारांनी एकत्र येऊन साकारण्याचं - सामूहिक प्रस्तुतीचं संगीत नाही. त्यामुळेच उत्स्फूर्ततेचं मूल्य आपल्या एकल गायन-वादनात अनुसरता येतं. उत्स्फूर्ततेमुळे सौंदर्याचा वेध घेण्याच्या गायकाच्या प्रयत्नांत श्रोता सहभागी होतो. एकानंतर एक येणारे स्वर\बोल हे पूर्वनियोजित नसतात. प्रत्येक क्षणी श्रोत्याच्या मनात अपेक्षा उत्पन्न होते, उत्कंठा लागू राहते. अपेक्षित तेच आलं तर अपेक्षापूर्तीचा आनंद मिळतो, नाहीतर सुखद धक्का देणारा अपेक्षाभंग! (काही वेळा अपेक्षाभंग दु:खद आणि अपेक्षापूर्ती सपक असते, ते सोडा!)

पं. सुरेश तळवलकर यांनी संगीतकलेचं अस्तित्व चौपदरी आहे असं सांगितलं आहे. तंत्र, शास्त्र, विद्या आणि कला हे ते चार पदर. सुरेशदादांच्या या मांडणीबद्दल विस्ताराने पुन्हा केव्हातरी बोलू. इथं त्यांचा एक महत्त्वाचा मंत्र उदधृत करतो - कलाकाराला मंचावर चढताना तंत्र, शास्त्र आणि विद्या यांतली आपली सर्व कमाई खाली सोडून द्यावी लागते, तेव्हाच मंचावर त्याला कला भेटते! या मंत्रातून ते उत्स्फूर्ततेचं मूल्यच अधोरेखित करतात. तंत्रावरची हुकमत, शास्त्राचं भान आणि विद्यासंपादन हे सर्व घटक कलेच्या अवतरणासाठी आवश्यक घटक आहेत. पण पुरेसे नाहीत. तंत्र, शास्त्र आणि विद्येने परिपूर्ण होऊन म्हणजेच या घटकांच्या परिपूर्णतेविषयी नि:शंक होऊन कलाकाराने कलेला साद घालावी. तंत्र, शास्त्र आणि विद्या गृहित धरून, या घटकांविषयीची साशंकता संपवून कलाकाराने मंचावर आरूढ व्हावं असा या मंत्राचा गर्भितार्थ मला दिसतो.

सुरेशदादांनी योजलेला नेमका शब्द आठवतो - विसरून. शिकलेलं सर्व विसरला आलं पाहिजे म्हणजे जे सुचतं ते ताजं, टवटवीत, झळाळतं असतं! अवगत करून घेतलेलं तंत्र, संपादन केलेली विद्या हा कलाकाराचा खजिना (भाता?) असतो. कलेच्या गरजेनुसार त्या त्या क्षणाला कलाकार या भात्यातून आपल्याला हवे ते बाण काढतो आणि लक्ष्यभेद करतो. त्या त्या क्षणाची साधनांची निवड ही उत्स्फूर्तता!

साठा उत्तराच्या कहाणीची ही अडीच उत्तरं, उरलेली अडीच उत्तरं पुन्हा कधी…

लेखक अभिनव पदवी महाविद्यालयाचे (भाईंदर, मुंबई) प्राचार्य आहेत.

kdparanjape@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.